उत्तरकाशीत ढगफुटीनं हाहा:कार, चिखलाचे लोट आले आणि अख्ख गाव त्यात बुडालं

उत्तरकाशीत ढगफुटीनं हाहा:कार, चिखलाचे लोट आले आणि अख्ख गाव त्यात बुडालं

काल (5 ऑगस्ट) उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीची घटना घडली. हर्षिल परिसरातील खीर गंगा गदेराच्या म्हणजेच खोल नाल्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं धाराली गावाचं मोठं नुकसान झालं.

उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी माध्यमांना सांगितलं की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि काही ठिकाणी मालमत्तेचं नुकसान झाल्याचीही माहिती मिळाली आहे.

दरम्यान, एनडीआरएफचे डीआयजी मोहसेन शहेदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार, "या घटनेत 40 ते 50 घरं वाहून गेली आहेत आणि 50 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत."

दरम्यान, धारली येथील स्थानिकांचा असा दावा आहे की, या विध्वंसाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विटरवर पोस्ट करून या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे . ते म्हणाले की ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.