गाझियाबादमध्ये 3 बहिणींचा मृत्यू, आतापर्यंत काय माहिती आली समोर? कोरियाचं कनेक्शन काय?

गाझियाबादमधील भारत सिटीतील ही तीच इमारत आहे, जिथे तीन मुलींचा मृत्यू झाला.
फोटो कॅप्शन, गाझियाबादमधील भारत सिटीतील याच इमारतीतील तीन मुलींचा मृत्यू झाला.
    • Author, शुभांगी मिश्रा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

उत्तर प्रदेश मधील गाझियाबादमध्ये एका रहिवासी सोसायटीत तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला. तिघांच्या या मृत्यूनंतर 'आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातील पालकत्व' यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

गाझियाबादमधील शालीमार गार्डनमधील ही घटना काही दिवसांपासून चर्चेत असून याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत.

शालीमार गार्डनचे एसीपी अतुल कुमार सिंह म्हणाले की, "4 फेब्रुवारीच्या रात्री 2.15 वाजता माहिती मिळाली की टीला मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारत सिटीमध्ये एक घटना घडली आहे."

"माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे तीनही मुलींचा उंच इमारतीवरुन पडल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यांना 108 अ‍ॅम्बुलन्सद्वारे लोणी येथील रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत."

या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलींकडून त्यांचे फोन काढून घेण्यात आले होते.

ही आत्महत्या होती की नाही याचा पोलीस अद्याप तपास करत आहेत, असं ट्रान्स हिंडन गाझियाबादचे उपायुक्त निमिष पाटील यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं.

'पोलिसांनी काय सांगितलं'

उपायुक्त निमिष पाटील म्हणाले की, "पोलिसांनी अद्याप या प्रकरणात एफआयआर नोंदवलेला नाही. प्राथमिक तपासात, फोन आणि कोरियन संस्कृतीबद्दलची आवड या घटनेची मुख्य कारणं असू शकतात."

"मुलींना कोरियन संगीत, ड्रामा, सेलिब्रिटीज, जपानी चित्रपट आणि 'डोरेमॉन', 'शिन-चान' सारखे कार्टून तसेच ऑनलाइन गेम्स आवडायचे."

"त्याचबरोबर त्यांच्यावर कोरियन संस्कृतीचा इतका प्रभाव पडला होता की, त्यांनी आपली नावेही बदलली होती. पण 'ब्लू व्हेल' सारखे टास्क-आधारित गेम हे घटनेचे एकमेव किंवा मुख्य कारण मानलं जाऊ शकत नाही."

गाझियाबाद पोलिसांचं म्हणणं आहे की, टास्क आधारित गेम हे या घटनेचं 'एकमेव कारण' मानलं जाऊ शकत नाही.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, गाझियाबाद पोलिसांचं म्हणणं आहे की, टास्क आधारित गेम हे या घटनेचं 'एकमेव कारण' मानलं जाऊ शकत नाही.

पोस्टमॉर्टम अहवालात सांगितलं आहे की, तीनही मुलींचा मृत्यू मुख्यत्वे रक्तस्त्राव आणि जखमांमुळे झाला आहे. उंचीवरून पडल्यामुळे त्यांची अनेक हाडे मोडली होती.

निमिष पाटील म्हणाले की, सुसाइड नोटमध्ये मारहाणीचा उल्लेख होता, पण पोस्टमॉर्टम अहवालात अशी कोणतीही जखम आढळून आलेली नाही.

निमिष पाटील म्हणाले की, "कुटुंब आर्थिक तंगीमुळे त्रस्त होते आणि घरातील कलहामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली होती. कोविडनंतर कुटुंबाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आणि त्यांच्यावर खूप कर्ज झालं होतं. काही वर्षांपूर्वी कुटुंबाने मुलींना शाळेतूनही काढलं होतं."

त्यांनी सांगितलं की, "कुटुंबात भांडणंही व्हायचे. वडील मुलींशी खूप कडक वागायचे. सुरुवातीला मुलींकडे दोन मोबाइल होते, ते त्या शेअर करत होत्या. पण आर्थिक ताणामुळे वडिलांनी सहा महिने आधी एक मोबाइल विकला, आणि दुसरा मोबाइल घटनेच्या 10 ते 15 दिवस आधी विकला होता."

'वडील आणि सोसायटीतील लोकांनी काय सांगितलं?'

मुलींचे वडील चेतन कुमार यांना पत्रकारांनी त्यांच्या आर्थिक तंगीबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, "मला 20 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झालं होतं, पण याचा अर्थ मुलींनी आत्महत्येसारखं पाऊल उचलावं असं नाही. मुलींनी तर आपली नावंही बदलली होती."

पोलिसांनी सांगितलं की, "चेतन कुमार यांना दोन पत्नी आहेत, त्या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. घरात त्यांच्यासोबत एक मेहुणीही राहते. या दोन बायकांपासून त्यांना एकूण पाच मुले आहेत."

चेतन हे व्यवसायाने स्टॉक ब्रोकर आहेत. त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, "मुली म्हणायच्या की पप्पा, आपण कोरियाला जाऊ. त्यांना भारतीय नावांची चीड येऊ लागली होती."

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलींकडून त्यांचे फोन काढून घेण्यात आले होते.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलींकडून त्यांचे फोन काढून घेण्यात आले होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीबीसीने या घटनेबाबत स्थानिक लोकांशी चर्चा केली तेव्हा, सोसायटीत या मुलींच्या घरापासून दोन मजले खाली राहणाऱ्या आर.के सिंघानिया यांची त्या रात्री एका मोठ्या आवाजामुळे झोप मोड झाली."

आवाज ऐकल्यानंतर सोसायटीतील लोक घराबाहेर आले आणि पाहिलं की, जमिनीवर तीन मुलींचे मृतदेह पडलेले होते. त्यानंतर लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली.

सोसायटीचे सचिव राहुल कुमार झा यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, "जेव्हा मी प्राथमिक पुरावा म्हणून वरच्या मजल्यावर गेलो, तेव्हा खोली आतून बंद होती. याच खोलीतून मुलींनी तिथून उडी मारल्याचे बोलले जात आहे."

"पोलिसांनी तो दरवाजा तोडला. आत कुटुंबीयांचे फोटो जमिनीवर पसरलेले होते आणि खोलीत एक सुसाइड नोटही सापडली, ज्यात 'सॉरी पप्पा' असं लिहिलं होतं."

या घटनेनंतर मुलांमध्ये फोनच्या व्यसनावर पुन्हा जोरात चर्चा सुरू झाली आहे.

सोसायटीच्या रहिवासी कुसुम म्हणतात, "आमची मुलं इतकी घाबरली आहेत की त्याना रात्री झोपत येत नाहीये. माझ्या मते, मुलं फोनमध्ये काय करत आहेत, किमान इतकं तरी पालकांना माहीत असावं."

त्याचबरोबर सोसायटीत राहणारे लोक फोन वापराचे व्यवस्थापन (फोन मॅनेजमेंट) आणि समुपदेशनाबाबत यावर चर्चा करताना दिसले.

'मुलांमधील फोनच्या व्यसनावर कसं नियंत्रण ठेवावं'

बाल मानसोपचारतज्ज्ञ नीलेश देसाई म्हणतात की, फोनचे व्यसन हे रासायनिक पदार्थांच्या व्यसनासारखेच आहे.

देसाई सांगतात, "पौगंडावस्था म्हणजेच किशोरावस्था अतिशय नाजूक असते. बदलत्या समाजात तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढतो आहे. अशा वेळी जर मुलांकडून अचानक फोन हिसकावून घेतला, तर मोठी अडचण निर्माण होते. लहान मुलासाठी हे रासायनिक पदार्थांच्या व्यसनासारखेच असते."

ते म्हणतात, "फोन वापरल्यावर डोपामाइन हार्मोन मिळतो, जो आनंद देतो. हे रासायनिक पदार्थांइतकेच प्रभावी असते. जेव्हा पालक मुलांकडून अचानक फोन काढून घेतात, तेव्हा ते केमिकल काढून घेतल्याच्या स्थितीत जातात."

दिल्ली येथील मानसिक तज्ज्ञ डॉ. भावना बर्मी म्हणतात की, "शाळेत दीर्घ काळापर्यंत न जाणे याचा अर्थ शिक्षणापासून वंचित राहणं असा होत नाही. यामुळे मानसिक दुर्बलतेची साखळी तयार होते.

शाळा किशोरवयीन मुलांच्या आरोग्यदायी विकासासाठी फक्त ज्ञान शिकवण्याची जागा नाही, तर ही एक महत्त्वाची रचना म्हणून काम करते."

डॉ. भावना म्हणतात, "जिथे के-पॉप, के-ड्रामा, कोरियन ब्यूटी ट्रेंड आणि आयडल्सबद्दल असलेलं आकर्षण सामान्य आवडीपेक्षा जास्त खोलवर गेलं आहे, अशा अनेक किशोरवयीन आणि कुटुंबांना मी सल्ला दिला आहे. अखंड कंटेंट आणि एआय चॅटबॉट्ससोबत रोल-प्ले करणं आणखी हानिकारक ठरू शकतं."

बाल मानसोपचारतज्ज्ञ नीलेश देसाई म्हणतात की, फोनचे व्यसन हे रासायनिक पदार्थांच्या व्यसनासारखेच आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बाल मानसोपचारतज्ज्ञ नीलेश देसाई म्हणतात की, फोनचे व्यसन हे रासायनिक पदार्थांच्या व्यसनासारखेच आहे.

त्या म्हणतात, "जेव्हा मुलं एकाकी राहतात, जसं की काही वर्षे शाळेत न गेल्याने,

भावंडं एकाच प्रकारच्या कंटेंटशी कनेक्ट होऊ शकतात. ते एकत्र पाहतात, चर्चा करतात आणि एकत्रित कोरियन व्यक्तिमत्व तयार करतात. यामुळे 'आम्ही विरुद्ध जग' असा एक बबल (बुडबुडा) तयार होतो, जिथे फक्त कल्पनाशक्ती हे त्यांचे एकमेव सुरक्षित आणि रोमांचक ठिकाण बनतं."

अशा परिस्थितीत पालकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे दोन्ही मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पालक मुलांच्या फोनच्या व्यसनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपाय करू शकतात:

  • त्यांनी स्वतः फोनचा वापर कमी करून मुलांसाठी रोल मॉडेल बनावं.
  • फोन वापरण्यासाठी वेळ ठरवा, म्हणजे ते दिवसातून किती तास फोन किंवा आयपॅड वापरू शकतात ते सांगा.
  • खेळासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन द्या, त्यांच्याशी बोलत राहा

(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्हीही तणावाखाली असाल, तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 1800 233 3330 वर मदत घेऊ शकता. तसेच, तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांशी बोलायला हवं.)

(बीबीसी हिंदीच्या ट्रेनी शुभ राणाच्या अतिरिक्त रिपोर्टिंगसह)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.