वर्दीचं आकर्षण, पोलीस भरतीची तयारी आणि स्वप्नपूर्तीचं मृगजळ; ग्रामीण तरुणांच्या मनात चाललंय काय?

फोटो स्रोत, Kiran sakale
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
“माझा एक मित्र होता जवळचा. त्याच्या पाच-सहा भरत्या झाल्या. आमचं ग्राऊंड एकाच दिवशी आलेलं होतं मुंबईचं. दोन-तीन महिन्याआधी त्यानं सुसाईड करुन घेतलं. घरच्यांचे बोलणे, ओरडणे किंवा त्यांच्या मनाचा मानसिक तणाव त्याला खूप जास्त झाला. आणि त्याने सुसाईड करुन घेतलं. माझ्याही मनात कधीतरी तसे विचार येतात की काय करायला काय पाहिजे?”
29 वर्षांचा सुनील मोकळे सांगत होता. सकाळी 7 च्या सुमारास सराव करून झाल्यावर सुनील आमच्याशी बोलत होता.
खरं तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात दररोज पहाटे एक दृश्य हमखास नजरेस पडतं. पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण धावताना, भरतीसाठीचा सराव करताना दिसतात.
यापैकीच एक आहे छत्रपती संभाजीनगरच्या डोनवडा गावचा सुनिल मोकळे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयुक्तालय आणि कारागृहातील 527 शिपाई पदांसाठी तब्बल 86 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले. म्हणजे अर्जांचा आकडा पदांच्या जवळपास दीडशेपटाहून अधिक आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठीची स्पर्धा प्रचंड आहे. म्हणूनच सुनिलनं यंदा मुंबई कारागृह आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज केला होता.
सुनील सांगतो, “भरती करता-करता मला 4-5 वर्षं झाले. यात 5-6 भरत्या झाल्यात. या सगळ्यात मी कंटाळून गेलोय भरती करून करून. कारण व्यवस्थित जागा निघत नाही, एक-दोन मार्कांनी प्रत्येक वेळेस कटणार, या गोष्टी मागच्या 5-6 वर्षांपासून चालू आहे. त्याच्यामुळे माणसाचं खच्चीकरण होतं. आता काय करावं म्हणून माझं डोकंच नाही चालत आहे.”


सुरुवातीची दोन वर्षं सुनिलनं तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगरला येऊन पोलीस भरतीची तयारी केली. पण राहण्या-खाण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे तो गावाकडे परतला. भरतीसाठीची तयारी मात्र त्यानं कायम ठेवली.
राज्य सरकारनं यंदा जाहीर केलेल्या भरतीसाठीही सुनीलने अर्ज केला होता.
“आता यावेळेस मुंबईला गेलो भरतीला तर रात्रभर पाऊस चालू होता. त्याच्या दुसरी दिवशी ग्राऊंड मारलं तर दुपारी 12 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. सर्व पोरांनी 1600 मीटर अक्षरश: पावसात ग्राऊंड मारलं. त्याचा परिणाम आमचं ग्राऊंड कमी येणार आणि तेच एक-दोन मार्क इकडे मेरिटमध्ये आम्ही कमी बसणार.”
पण, ही एकट्या सुनिलची गोष्ट नाहीये. परभणीतल्या खेडूळा गावच्या महेश डुकरे आणि आकाश जाधव यांनी यंदा पहिल्यांदाच पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी दिलीय. ते दोघेही बारावी उत्तीर्ण आहेत.

फोटो स्रोत, kiran sakale
पाथरी येथे असलेल्या एका व्यायाम शाळेत सकाळीच 5 वाजता आमची या दोघांशी भेट झाली.
गोळा फेकण्याचा सराव करुन त्यांनी पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला होता.
महेश सांगू लागला, “मी फर्स्ट टाईम भरती मारली यावर्षी. माझा मुंबईला फॉर्म होता. माझं ग्राऊंड होतं सहाचं.पण रात्री दोन-तीन वाजल्यापासून तिथं रांग लागलेली होती. रांगेत 4-5 तास उभं राहावं लागतं. नंतर भरतीच्या टायमाला सगळा स्टॅमिना लूझ झालता.”
“राहण्याची व्यवस्था नसते. मग इकडं तिकडं स्टेशनवर, बाहेर रस्त्यावर झोपावं लागतं. इथून प्रवास करुन जावं लागतं. त्याच्यामुळे अशक्तपणा येतो. आणि मग ग्राऊंड चांगलं येत नाही.”

फोटो स्रोत, kiran sakale
पण, मग तुम्ही स्वत:च्याच जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी अर्ज का नाही करत?
या प्रश्नावर आकाश म्हणाला, “आम्ही आमच्या जिल्ह्यात अर्ज करायला तेवढ्या जागा निघत नाही ना सर. जिथं जास्त जागा निघत्यात तिथं अर्ज टाकतोत. इथं दोन-दोन,तीन-तीन जागा निघतात. मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या ठिकाणी चांगल्या जागा सुटतात.”
वर्दीचं आकर्षण
ग्रामीण भागात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुणांचा कल पोलीस भरतीकडे असतो. भारत धनले परभणीच्या पाथरीमध्ये कबड्डी आणि पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यायाम शाळा चालवतात.
धनले सांगतात, “खेड्यातून जी मुलं येतात, एकतर गरीब परिस्थिती असते, त्यामुळे जास्त शिकू शकत नाहीत. त्यामुळे मग बारावी पास झाल्यानंतर मुलं पोलीस भरतीच्या तयारीला लागतात. पोलीस भरती आणि वर्दीविषयी ग्रामीण मुलांना एक आकर्षण असतं.”

फोटो स्रोत, shrikant bangale
राज्य सरकारनं पोलीस दलातील 2022-23 मधील रिक्त 17 हजार 471 शिपाई पदांसाठी 2024 च्या जून महिन्यापासून भरती प्रक्रिया सुरू केली. या 17 हजार पदांसाठी तब्बल 17 लाख 76 हजार 256 अर्ज प्राप्त झाले. पोलीस भरतीतील स्पर्धा वाढलीय आणि अपयशातून येणारं नैराश्यही.
पोलीस भरतीशिवाय इतर गोष्टींसाठी, खासगी नोकरीसाठी का नाही प्रयत्न करत? यावर आकाश सांगतो, “आमची जी मेंटॅलिटी आहे ती ग्राऊंड प्लस माईंड आहे आमचं. ग्राऊंड चांगलं असल्यामुळे हे होऊ शकतं आमच्याकडे आर्मी, पोलीस भरती. बाकीच्या फिल्डमध्ये नाही करू शकत आम्ही.”

फोटो स्रोत, kiran sakale
अनिल उजगरे गेल्या 10 वर्षांपासून पाथरीत अभ्यासिका चालवतात. पोलीस भरतीचे काही विद्यार्थी त्यांच्या अभ्यासिकेत आहेत.
बीबीसी मराठीशी बोलताना अनिल म्हणाले, “पोलीस भरतीची तयारी करणारे पुष्कळ विद्यार्थी आपला शेवटचा अटेम्प्ट आहे, घरच्यांनी खूप मदत केलेली असते, पाठबळ दिलेलं असतं, असं असतानाही सिलेक्शन नाही झालं तर आत्महत्येपर्यंत जात असतात.”
महाभरतीची गरज
पोलीस भरतीच्या तयारीसाठी तालुका पातळीवर जागोजागी अकॅडमी सुरू झालेल्या दिसून येतात. सकाळी वर्क आऊट, दिवसभर अभ्यास आणि संध्याकाळी पुन्हा मैदानावर सराव, असा पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांचा दिनक्रम असतो. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या या तरुणांना सरकारकडून काही अपेक्षा आहेत.
आकाश म्हणतो, “अपेक्षा तीच आहे की त्यांनी दरवर्षी भरती काढायला पाहिजे. थोडीफार का जागांवरती होईना पण काढायला पाहिजे. मुलांचं रूटीन चालू राहतं, तुटत नाही. पण एकदा जागा निघाल्या पुढच्या दोन-तीन वर्षं निघत नाही. त्यामुळे त्याची मेंटॅलिटी राहत नाही. मग तो व्यसनाच्या आहारी जातो, तयारी सोडून देतो.”

फोटो स्रोत, kiran sakale
तर सुनिल सांगतो, “मुद्दा महत्त्वाचा हाच आहे की बेरोजगारी खूप जास्त आहे. आता मी 29 वर्षांचा झालोय, अजून नोकरी नाही. किती दिवस राहणार हे असं. आता जर सरकारनं महाभरती काढली, जागा व्यवस्थित काढल्या तर मी नोकरीला लागेल.”
'9 हजार पदांची जाहिरात'
दरम्यान, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 12 जुलै 2024 रोजी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस भरतीविषयी माहिती दिली होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पोलिसांच्या ज्या काही समस्या आहेत, त्यामध्ये विशेषत: पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी आपण पोलीस भरतीचं काम हातामध्ये घेतलं. आपण या दोन वर्षांमध्ये जवळपास पहिल्यांदा 18,331, त्यानंतर 17 हजार आणि पुन्हा 9 हजार असे एकूण मिळून चाळीस हजारांच्या वर पोलिसांची भरती करत आहोत.
"यातील पहिली 18 हजारांची भरती झाली असून दुसरी 17 हजारांची भरती सुरु आहे. या प्रक्रियेतील मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांची 7,50,723 संख्या होती. त्यातील 5,01,748 उमेदवारांची चाचणी पूर्ण झाली आहे. एकूण 46 घटक पोलीस भरतीकरिता आहेत. या घटकांमध्ये सगळी प्रकिया पूर्ण झाली असे 22 घटक आहेत. मैदानी चाचणी पूर्ण झाली, पण लेखी चाचणी बाकी असलेले 14 घटक आहेत; तर मैदानी चाचणी सुरु आहे असे केवळ 10 घटक आहेत. त्यामुळे अतिशय वेगाने ही प्रक्रिया चाललेली आहे.
"या 10 घटकांचीही जी काही प्रक्रिया आहे, ती आम्ही पूर्ण करु. आपण 17,471 पदांची भरती झाल्यानंतर लगेच 9 हजार पदांची जाहिरात काढत आहोत. मध्यंतरीच्या काळात काही तरुण उपोषणाला बसले होते. मागील काळामध्ये भरती पुढे गेल्यामुळे आमचा वयाचा निकष ओलांडला गेला आहे; त्यामुळे एक संधी आम्हाला दिली गेली पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. तर त्यांना एक संधी देण्याचा निर्णय आपण या 9 हजारांच्या भरतीमध्ये घेतला आहे."

फोटो स्रोत, ANI
'इंडिया एम्प्लॉयमेंट 2024' या ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालात देशातल्या एकूण बेरोजगारांपैकी 83 % हे तरुण बेरोजगार आहेत.
या पार्श्वभूमीवर तसेच वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस दलातील शिपायांची संख्याही वाढली पाहिजे, असं मत जाणकार नोंदवतात.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











