जनरेटर लावून झोपले, सकाळी पित्यासह दोन्ही मुलं मृतावस्थेत आढळली; वाचा जनरेटरनं कसे घेतले प्राण?

- Author, विजयानंद अरुमुगम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चेन्नईमध्ये जनरेटरच्या धुरामुळे 1 जुलैला एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुझल पोलिसांनी दिली आहे.
तर, दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 जुलैला चेन्नईतील अलंदूरमध्ये जनरेटरच्या धुरामुळे 7 जणांना गुदमरल्यासारखं झालं.
त्यांना गिंडी येथील सरकारी रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
'जनरेटर आणि गॅस उपकरणं जर योग्यरित्या हाताळली नाहीत तर ती घातक ठरू शकतात' असा इशारा तज्ज्ञ देतात.
या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये वरील दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय घडलं? तसंच जनरेटर वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? याबाबत माहिती घेऊ.
पुझलमध्ये नेमकं काय घडलं?
चेन्नईजवळच्या पुझल काथिरवेदू परिसरात राहणारा सेल्वराज हा ट्रक ट्रान्सपोर्टसाठी बुकिंगसेवा चालवण्याचं काम करायचा.
तो मूळचा अरियालूरचा आहे आणि त्याला पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी आहे. 1 जुलैला जेवण आटोपल्यानंतर तो मुलांसोबत झोपायला गेला.
त्याची पत्नी आणि मुलगी एका खोलीत झोपली होती. सेल्वराज मुलांसह दुसऱ्या खोलीत झोपला होता.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जुलैच्या सकाळी जेव्हा सेल्वराज बराच वेळ उठला नाही, तेव्हा त्याच्या पत्नीनं जवळच्या लोकांच्या मदतीनं दरवाजा तोडला.
तेव्हा तिचा पती आणि दोन मुलं मृतावस्थेत आढळले. त्यांच्या तोंडाला फेस आला होता, असं पुझल पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर, पोलिसांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले आणि ते चेन्नईतील सरकारी स्टॅनली रुग्णालयात पाठवले.

तिघांच्याही शरीरावर इतर कोणत्याही जखमा नसल्यानं, पोलिसांनी मृत्यूचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला.
"सेल्वराज आपल्या मुलांसोबत ज्या खोलीत झोपला होता ती खोली खूपच लहान होती. पोलीस आत आले तेव्हा त्यांना धुराचा वास येत होता.
"त्या रात्री वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सेल्वराजनं एक छोटा डिझेल जनरेटर चालू केला होता," असं पुझल पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कॉन्स्टेबलनं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
त्या छोट्या खोलीत हवा येण्या-जाण्यासाठी जागा नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
ते म्हणाले, "त्यामुळे जनरेटरमधून येणाऱ्या धुरामुळे तिघांचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष आम्ही काढला. "
शवविच्छेदन अहवालातही असं म्हटलंय की, तिघांचा मृत्यू जनरेटरमधून बाहेर पडणाऱ्या कार्बन मोनोऑक्साइड वायूमुळे झाला आहे.
त्यात असंही म्हटलंय की, तिघांच्याही फुफ्फुसांमध्ये श्वासांमार्फत कार्बन मोनोऑक्साइड आता गेल्याचं आढळून आलं.
अलंदूरमध्ये काय घडलं?
चेन्नईतील जीएसटी रोडवरील अलंदूरजवळील एका खाजगी वसतिगृहात 2 जुलैच्या सकाळी वीजपुरवठा खंडित झाला होता.
यामुळे जनरेटरद्वारे तेथील खोल्यांमध्ये वीजपुरवठा करण्यात आला.
त्यावेळी हॉटेलच्या रिसेप्शनवरील व्यक्ती आणि एका खोलीत राहणारे सहा जण जनरेटरमधून निघणाऱ्या धुरामुळे बेशुद्ध पडले.
मात्र, अग्निशमन दल, मदतकार्य विभाग आणि पोलिसांनी त्यांना वाचवलं. त्यातल्या काहींना गिंडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केलं गेलं. तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
डॉक्टरांनी सांगितलं की,त्यांना धुरामुळे गुदमरल्यासारखं झालं होतं, पण आता सर्वजण ठीक आहेत.
"हवा येण्या - जाण्यासाठी जागा नसलेल्या खोलीत जनरेटरचा वापर केला जातो तेव्हा त्यातून बाहेर पडणारा कार्बन मोनोऑक्साइड वायू मानवांसाठी आणि प्राण्यांसाठी हानिकारक ठरू शकतो," असं डॉक्टर्स फॉर इकोलॉजी असोसिएशनचे डॉ. व्ही. पुगाझेंडी सांगतात.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "या वायूमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनला चिकटण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तात हायपोक्सिया होतो. या वायूमध्ये ऑक्सिजनपेक्षा सुमारे 200 पट जास्त हिमोग्लोबिनला चिकटण्याची क्षमता असते."
इमारतींना आग लागल्यावर काही लोकांना भाजत नाहीत पण तरीही त्यांचा मृत्यू होतो, असं सांगताना व्ही. पुगाझेंडी म्हणाले की, "आग लागते त्यावेळी कार्बन मोनोऑक्साइड वायू खोलीत सोडला जातो आणि त्यामुळे मृत्यू होतो."
'अल्पकालीन परिणाम'

"बंद खोलीत वायू जितक्या वेगानं पसरतो तितके त्याचे परिणाम जास्त होतात. हा वायू श्वासात गेल्यानंतर थोड्याच वेळात मृत्यू होऊ शकतो. श्वास रोखला जातो आणि फुफ्फुसांवरही परिणाम होऊ शकतो," असं डॉ. व्ही. पुगाझेंडी म्हणाले.
"पेट्रोल आणि डिझेल वापरतो तेव्हा त्यातून कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडतो. तो धोकादायक असतो. त्यापेक्षा बॅटरीचा वापर केला तर सहसा असा धोका निर्माण होत नाही,"असंही व्ही. पुगाझेंडी सांगतात.
"कार्बन मोनोऑक्साइड हा रंगहीन, गंधहीन वायू आहे. जेव्हा हा वायू कमी हवेशीर भागात सोडला जातो तेव्हा तो मानवांच्या श्वसनमार्गाला नुकसान पोहोचवू शकतो," असं आसाममधील राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ पार्थिवन म्हणतात.
पार्थिवन म्हणतात की, कार्बन मोनोऑक्साइड वायू आणि सायनाइड विषबाधा यांचे सारखे परिणाम होतात.
ते पुढं सांगतात, "यामुळं श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि काही तासांत जीव जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते."
जास्त धोका कुणाला?
या संदर्भात अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वेबसाइटवर काही माहिती देण्यात आली आहे.
त्यात असं म्हटलं आहे की, हा वायू अनेकदा कळून येत नाही आणि म्हणूनच या निष्काळजीपणामुळे झोपेत त्रास होऊ शकतो .
या वायूचं वर्णन 'अदृश्य मारेकरी' म्हणून करणाऱ्या यूएस नॅशनल सेफ्टी काऊन्सिलनं म्हटलं आहे की, हा वायू कार, ट्रक, छोटे इंजिन, स्टोव्ह, दिवे, फायरप्लेस, लहान जनरेटर आणि भट्टीमध्ये इंधन जाळण्यामुळं तयार होतो.

कार्बन मोनोऑक्साइड जेव्हा बंदिस्त जागांमध्ये तयार होतो, त्यावेळी जर तो श्वासांत गेला तर तो मानवांसाठी आणि प्राण्यांसाठी हानिकारक ठरू शकतो.
अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) म्हणतं की लहान मुलं, वृद्ध, दीर्घकालीन हृदयरोग, अशक्तपणा आणि श्वसनाच्या समस्या असलेल्या लोकांना यामुळे मृत्यूचा धोका असतो.
त्यात असंही म्हटलं आहे की, हिवाळ्यात कार्बन मोनोऑक्साइडचं प्रमाण जास्त असतं आणि हिवाळ्यात लोक गरम राहाण्यासाठी जे प्रयत्न करतात त्याला याचं श्रेय जातं.
खबरदारी आणि लक्षणं
अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी हे टाळण्यासाठी सुरक्षा उपायांची यादीही दिली आहे.
घरात अशी गॅस उपकरणं, ज्यामध्ये वॉटर हिटर आणि फर्नेसचा समावेश आहे ती दरवर्षी दुरुस्त करुन घ्यावीत.
आतील खोल्यांमध्ये रासायनिक हिटर वापरू नयेत.
घरात 20 फूट अंतरावर जनरेटर वापरू नका. दरवाजे आणि खिडक्या उघड्या असतानाही, कारण काही मिनिटांच्या आतच कार्बन मोनोऑक्साइडची धोकादायक पातळी बाहेर पडू शकते.

फोटो स्रोत, Getty Images
याची लक्षणं कशी ओळखायची? तर यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणतं की श्वासांत कार्बन मोनोऑक्साइड गेल्यानंतर दिसणारी सौम्य लक्षणं बहुतेकदा फ्लू समजली जातात.
यात डोकेदुखी, थकवा, धाप लागणं, मळमळ आणि चक्कर येणं अशा लक्षणांचा समावेश होतो.
त्यात जास्त कार्बन मोनोऑक्साइड श्वासात घेतल्याची लक्षणं देखील दिलेली आहेत.
त्यानुसार, अस्वस्थ वाटणं, उलट्या होणं, स्नायूंच्या त्रास, हळूहळू संवेदना जाणं यांचा समावेश होतो.
"जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणं आहेत, तर ताबडतोब आहात तिथून बाहेर पडा आणि ताजी हवा घ्या. जर तुम्ही घरात थांबलात तर तुम्ही बेशुद्ध पडू शकता आणि मृत्यू होऊ शकतो," असं यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननं म्हटलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











