नसीरुद्दीन शाह: 'फिल्मफेअर पुरस्कार बाथरूमच्या हँडलला लावणारा', रोखठोक भूमिका घेणारा अभिनेता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
- वाचन वेळ: 9 मिनिटे
भारतीय चित्रपटसृष्टीत नसीरुद्दीन शाह यांची ओळख एक जबरदस्त ताकदीचा, अष्टपैलू अभिनेता अशी आहे.
अभिनयाव्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह सामाजिक, राजकीय आणि चित्रपटांशी संबंधित मुद्द्यांवर भूमिका मांडत असतात. यासंदर्भातील त्यांच्या वक्तव्यांमुळे देखील ते अनेकदा चर्चेत असतात.
एरवी चित्रपटसृष्टीतील लोक कोणत्याही मुद्द्यावर अतिशय सावध भूमिका घेतात. अनेकदा ते गप्पच राहतात. नसीरुद्दीन शाह यांनी मात्र त्यांच्या वैयक्तिक मतांविषयी नेहमीच रोखठोकपणा दाखवला आहे. ते अतिशय स्पष्टपणे त्यांची मतं मांडतात.
हा प्रतिभासंपन्न कलाकार 20 जुलैला 75 वर्षांचा झाला आहे.
त्यांच्या आयुष्यातील 50 वर्षे त्यांनी चित्रपटसृष्टीला दिली आहेत. 1975 मध्ये, 'निशांत' हा नसीरुद्दीन शाह यांचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्यावेळेस त्यांना आनंद व्हायच्याऐवजी दु:ख झालं होतं.
त्यामागं कारण होतं की, दूरदर्शननं त्यांना इंग्रजी आणि हिंदी बातमीपत्र सादरकर्त्याच्या कामासाठी नाकारलं होतं.
त्याच काळात त्यांच्या एक सहअभिनेत्री स्मिता पाटील दूरदर्शनवर मराठी बातम्या सादर करून नाव कमावत होत्या.
नसीरुद्दीन शाह यांचा जन्म बाराबंकीमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांशी त्यांचं फारसं कधीच पटलं नाही. इतर वडिलांप्रमाणेच नसीरुद्दीन शाह यांच्या वडिलांची देखील इच्छा होती की मुलानं एक चांगला, पारंपारिक करियर निवडावं आणि आयुष्यात स्थिर व्हावं.
नसीरुद्दीन शाह यांनी 'अँड देन वन डे' हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
त्यात त्यांनी लिहिलं आहे, "माझे वडील इंग्रजांप्रमाणे राहायचे. सरधना सारख्या छोट्या शहरातदेखील ते हॅट घातल्याशिवाय घराबाहेर पडत नसत. आम्हाला सर्वोत्तम गोष्टी मिळाव्या यासाठी ते प्रयत्नशील असायचे."
"त्यांना पश्तो आणि फारसी भाषेबरोबरच उत्तम इंग्रजीदेखील बोलता यायचं. मात्र आम्हीदेखील पश्तो किंवा फारसी शिकावं असं त्यांना कधी वाटलं नाही."
आईवरचं प्रेम
वडिलांच्या तुलनेत नसीरुद्दीन शाह त्यांच्या आईच्या अधिक जवळ होते. त्यांच्या आईचा राग प्रसिद्ध होता. नसीरुद्दीन शाह यांची आई रागावल्यावर त्यांचे वडील देखील समोर उभे राहत नसत.
नसीर यांनी त्यांच्या आईबद्दल लिहिलं आहे, "माझ्या वडिलांशी माझा संवाद पूर्णपणे थांबवल्यानंतर, माझ्या आईचाच मला आधार होता."

फोटो स्रोत, Getty Images
आईबरोबरच्या नात्याबद्दल नसीरुद्दीन शाह यांनी लिहिलं आहे, "मला जेव्हा पद्म पुरस्कारानं गौरविण्यात आलं, तेव्हा मी राष्ट्रपती भवनात आईला सोबत घेऊन गेलो होतो. माझ्या कपाटात आईचा एक दुप्पटा अजूनही ठेवलेला आहे. तो मला माझ्या आईची आठवण करून देतो."
"माझी आई जेव्हा तिच्या दुपट्ट्याचा एक कोपरा तिच्या श्वासानं उबदार करून माझ्या पापण्यांवर लावायची, तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुखकारक क्षण असायचा."
परवीन मोरादशी विवाह
नसीरुद्दीन शाह अलीगड विद्यापीठात शिकत असताना त्यांची भेट वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिक परवीन मोराद यांच्याशी झाली.
त्यावेळेस त्यांचं वय 19 वर्षांचं होतं. मात्र तरीदेखील त्यांनी त्यांच्यापेक्षा वयानं जवळपास 15 वर्षे मोठ्या असलेल्या परवीन यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. या दोघांनी मग विवाहदेखील केला.

फोटो स्रोत, Getty Images
नसीरुद्दीन शाह लिहितात, "ती दिसायला फार देखणी नव्हती. मात्र तिचा पेहराव मला आकर्षित करायचा. ती खूप जास्त हसायची. अलीगढच्या लोकांना इतरांच्या कामात ढवळाढवळ करायला खूप आवडायचं. आम्ही दोघं जेव्हाही एकमेकांचा हात पकडून बाहेर पडायचो, तेव्हा लोकांमध्ये कुजबुज सुरू व्हायची."
"एक नोव्हेंबर 1969 ला आम्ही गुपचूप लग्न केलं. अनेक दिवसांनी माझ्या वडिलांना याबद्दल माहीत झाल्यावर, त्यांनी मला पत्र लिहून, भोळसट म्हटलं."
परवीन यांची मोठी सावत्र बहीण सुरेखानं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतलं होतं. नंतरच्या काळात त्यांनी अनेक चित्रपट आणि 'बालिका वधू' सारख्या मालिकांमध्ये अभिनय करून खूप नाव कमावलं.
अलकाजी झाले नसीरुद्दीन शाहांचे गुरू
यादरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (एनएसडी) प्रवेश घेतला. तिथे ते एनएसडीचे संचालक इब्राहीम अलकाजी यांच्या संपर्कात आले.
नसीरुद्दीन शाह यांनी अभिनयाचं शिक्षण घ्यावं असं अलकाजी यांना वाटत नव्हतं. त्यांची इच्छा होती की नसीरुद्दीन शाहांनी दिग्दर्शक व्हावं.
अलकाजी यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंनी नसीरुद्दीन यांच्यावर खूप प्रभाव टाकला.

फोटो स्रोत, X
नसीर लिहितात, "बारीकसारीक गोष्टींवरदेखील त्याचं लक्ष असायचं. एनएसडीचे संचालक असूनदेखील ते शौचालयातील स्वच्छतेवर लक्ष द्यायचे. अनेकदा ते स्वत: शौचालयाची साफसफाई करताना दिसायचे."
यादरम्यान नसीर यांच्या मुलीचा जन्म झाला. तिचं नाव हिबा. नसीर त्यांचं आत्मचरित्रात मान्य करतात की त्यांना स्वत:च्याच मुलीचा हेवा वाटू लागला.
त्यांना या गोष्टीचा त्रास होऊ लागला की आता ते त्यांची पत्नी परवीन यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे व्यक्ती राहिले नव्हते. परवीनबद्दलचं त्यांचं आकर्षण कमी होत गेलं.
दिल्लीहून अलीगढला त्यांच्या दर आठवड्याला फेऱ्या व्हायच्या. मात्र आता ते महिन्यातून एकदा जाऊ लागले. नंतर मग हळूहळू त्यांचं अलीगडला जाणं बंद झालं. परवीन यांनी आधी इंग्लंडला आणि नंतर इराणमध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला.
गिरीश कर्नाडमुळे मिळाली चित्रपटातील पहिली संधी
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतल्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचं शिक्षण घ्यायचं ठरवलं.
त्यांचे भाऊ जहीर आणि जमीर यांना त्यांना शिक्षणासाठी पैसे पाठवण्यात हात आखडता घेतला नाही. या दोघा भावांचं दर महिन्याचं उत्पन्न फक्त 600 रुपये होतं. तसंच ते दोघं विवाहित देखील होते. मात्र तरीदेखील ते नियमितपणे नसीरुद्दीन यांना 100 रुपये पाठवायचे.

फोटो स्रोत, Getty Images
नसीरुद्दीन शाह यांचे मोठे भाऊ जमीरुद्दीन शाह सैन्यात मोठ्या पदावर पोहोचले आणि उपलष्करप्रमुख होत निवृत्त झाले.
श्याम बेनेगल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, "पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटचा संचालक आणि माझे मित्र गिरीश कर्नाड यांना मी एकदा म्हटलं होतं की त्यांच्या डोळ्यासमोर एखादा चांगला अभिनेता आहे का जो यावर्षी पदवीधर होईल?"
"त्यावर गिरीश कर्नाड मला म्हणाले होते की एक मुलगा आहे, त्याचं नाव नसीरुद्दीन शाह आहे. तसं तो मला फार त्रास देत आला आहे. मात्र तो एक उत्तम अभिनेता आहे. मग मी निशांत चित्रपटामध्ये नसीरुद्दीन शाह यांना घेतलं."
नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, या चित्रपटात अभिनय करण्यासाठी त्यांना 10,000 रुपये मिळाले होते.
आई-वडिलांनी पाहिला नसीरुद्दीन यांचा पहिला चित्रपट
नसीरुद्दीन शाह लिहितात, "सहा महिन्यांनी चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा मसूरीमध्ये मॉल रोड जवळून जाताना माझ्या वडिलांनी चित्रपटाच्या पोस्टरवर माझं नाव पाहिलं. मग ते थेट रियाल्टो टॉकीजमध्ये माझा चित्रपट पाहण्यासाठी गेले. घरी येऊन आनंदानं त्यांनी माझ्या माझ्या आईला माझ्या अभिनयाबद्दल सांगितलं."

फोटो स्रोत, FACEBOOK
"ते ऐकून माझी आई यासाठी नाराज झाली की ते एकटेच का चित्रपट पाहायला गेले होते. आई म्हणाली की तिलादेखील चित्रपट पाहायचा आहे. मग माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच एखादा चित्रपट दुसऱ्यांदा पाहिला."
"त्यांनी मला एक प्रदीर्घ पत्र लिहून सांगितलं की पडद्यावर माझं नाव पाहून ते खूप आनंदी झाले."
मंथन आणि मासूम मधील जबरदस्त अभिनय
त्यानंतर एकापाठोपाठ एक आलेल्या नसीरुद्दीन शाह यांच्या चित्रपटांचं समीक्षकांनी कौतुक केलं. सर्वात आधी 'मंथन' हा चित्रपट आला. या चित्रपटासाठी गुजरात सहकार दुग्ध फेडरेशनच्या पाच लाख सदस्यांनी दोन-दोन रुपये गोळा करून 10 लाख रुपयांचा निधी उभारला.
मुंबईतील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दहा आठवडे हाऊसफूल होता. त्यानंतर आलेल्या 'भूमिका', 'कथा', 'स्पर्श', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'मंडी', 'जुनून', 'उमराव जान', 'पार', 'खंडहर' आणि 'आक्रोश' सारख्या अनेक चित्रपटांमधून नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

फोटो स्रोत, SAHYADRI FILMS
1983 मध्ये त्यांचा 'मासूम' हा चित्रपट आला. या चित्रपटातील अभिनयासाठी नसीरुद्दीन शाह यांचं प्रचंड कौतुक झालं.
चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, "चित्रपट निर्माता म्हणून माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी वेदना ही होती की मी मासूमनंतर नसीरबरोबर कधीही काम केलं नाही."
"या चित्रपटातील नसीरुद्दीन शाहांचा अभिनय इतका दमदार, ताजातवाना आहे की असं वाटतं, हा चित्रपट कालच बनवण्यात आला आहे. ते भारतातील महान अभिनेत्यांपैकी एक आहेत, यात कोणतीही शंका नाही."
हॉलीवूड अभिनेते स्पेन्सर ट्रेसीचा प्रभाव
करियरच्या सुरुवातीच्या काळात नसीरुद्दीन शाह यांना वाटत होतं की त्यांच्याकडे एखाद्या फिल्मस्टारचा करिश्मा नाही, तसं देखणेपण नाही. व्यावसायिक हिंदी चित्रपटातील अभिनेत्याप्रमाणे त्यांच्यात नृत्य कौशल्यदेखील नव्हतं.
किशोरावस्थेच्या सुरुवातीच्या काळात ते शम्मी कपूर यांची नक्कल करत असत. मात्र त्यांना हे माहित होतं की ते कधीही 'दिल दे के देखो' सारखं नाचू शकत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
नंतरच्या काळात त्यांनी हॅमिंग्वे यांच्या कादंबरीवर आधारित 'ओल्ड मॅन अँड द सी' हा चित्रपट पाहिला. त्यावेळेस त्यांना वाटलं की साधारण दिसणारा स्पेन्सर ट्रेसीसारखा अभिनेता जर पडद्यावर प्रभाव पाडू शकतो, तर मग ते का असं करू शकत नाहीत.
स्पेन्सर ट्रेसीबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, "ते या चित्रपटात इतके खरेखुरे वाटत होते की त्यांच्याकडून येणारा समुद्राचा वासदेखील त्यांना जाणवायचा."
"ट्रेसी यांचा रापलेला चेहरा, फाटके जुने कपडे आणि अनवाणी पायांकडे पाहिल्यावर असं वाटत होतं की जणूकाही त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य बोटींवरच घालवलं आहे."
रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध
नसीरुद्दीन शाह नेहमीच त्यांचं मत स्पष्टपणे, रोखठोकपणे मांडत आले आहेत. अलीकडेच पहलगाममध्ये झालेल्या घटनेनंतर अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी एका पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर काम करण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
त्यावर नसीरुद्दीन शाह यांनी दिलजीतचा बचाव करताना फेसबुक अकाउंटवर लिहिलं होतं, "मी दिलजीत दोसांझच्या पाठीशी आहे. या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी दिलजीत नाही तर चित्रपटाचा दिग्दर्शक जबाबदार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे हे कोणालाच माहीत नाही, मात्र दिलजीतला सर्वजण ओळखतात."
नंतर असा दावा करण्यात आला की त्यांनी त्यांची पोस्ट डीलीट केली. मात्र नसीरुद्दीन शाह यांनी दावा केला की फेसबुकनंच त्यांची पोस्ट काढून टाकली आणि अजूनही ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत.
ही पोस्ट हटवण्यात आल्यानंतर त्यांनी पोस्ट शेअर केली. वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानी जॉर्ज क्रिस्टोफ लिचेनबर्ग यांनी लिहिलेल्या गोष्टी नसीरुद्दीन यांनी शेअर करत लिहिलं, "कोणाचीही दाढी न जाळता, गर्दीमध्ये सत्याची मशाल घेऊन जाणं जवळपास अशक्य आहे."

फोटो स्रोत, hoture
सीएए-एनआरसी वादाच्या वेळेस त्यांनी अभिनेते अनुपम खेर यांना 'जोकर' म्हटलं होतं. त्यावरून देखील खूप गदारोळ झाला होता. मात्र शब्द परत घेण्याऐवजी नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की अनुपम खेरला गांभीर्यानं घेता कामा नये.
कथित 'लव जिहाद' ही उघडपणे समाजात फूट पाडणारी गोष्ट आहे, असं नसीरुद्दीन शाह म्हणतात.
2016 मध्ये नसीरुद्दीन शाह यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की राजेश खन्ना हे एक वाईट अभिनेते असून भारतीय चित्रपटाचा दर्जा खालावण्यासाठी ते जबाबदार आहेत.
राजेश खन्नाचे चाहते आणि सहकारी नसीरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्यानं खूपच दुखावले गेले. त्यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. राजेश खन्ना यांची मुलगी ट्विंकल खन्नानं टीका केल्यानंतर त्यांनी या वक्तव्यांबद्दल माफी मागितली होती.
2010 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. नसीर म्हणाले होते की अमिताभ बच्चन यांनी कोणताही महान चित्रपट केलेला नाही. 'शोले' हा चित्रपटदेखील फक्त मनोरंजक चित्रपट असल्याचं ते म्हणाले होते.
व्यावसायिक चित्रपटांमध्येही केला अभिनय
नसीरुद्दीन शाह यांनी फक्त कलात्मक चित्रपटांमध्येच काम केलं असं नाही. त्यांनी व्यावसायिक चित्रपटांमध्येही अभिनय केला. 1989 मध्ये प्रदर्शित झालेला 'त्रिदेव' हा त्यांचा एक अविस्मरणीय चित्रपट होता.
या चित्रपटात नसीरुद्दीन शाह यांनी लाल पंख असलेली फ्लॉपी हॅट घालून 'ओए ओए' हे गाणं म्हटलं होतं, तेव्हा अनेक चित्रपट समीक्षकांना धक्का बसला होता.
2011 मध्ये त्यांचा 'डर्टी पिक्चर' हा चित्रपट आला होता. यात त्यांच्याबरोबर विद्या बालन होती. चित्रपटात विद्याबरोबर नसीर यांनी 'ऊ ला ला' या गाण्यावर नाचून अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं.

फोटो स्रोत, PR
याशिवाय त्यांनी 'चमत्कार', 'मोहरा', 'चायना गेट' आणि 'जिंदगी न मिलेगी दोबारा' सारख्या व्यावसायिक चित्रपटांमध्येही दमदार अभिनय केला.
मात्र व्यावसायिक चित्रपटांमध्ये वास्तवदर्शी अभिनय करण्याचा त्यांचा प्रयत्न योग्य मानण्यात आला नाही किंवा आवडालाही नाही. एका दिग्दर्शकानं तर त्यांना स्पष्टच सांगितलं होतं, "नसीरजी हा कलात्मक चित्रपट नाही. यात अभिनय करावा लागतो."
काही चित्रपट समीक्षकांनी लिहिलं आहे की नसीरुद्दीन शाह यांच्या ज्या चित्रपटानं त्यांची सर्वाधिक निराशा झाली, तो म्हणजे हॉलीवूडचा, 'द लीग ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी जंटलमन' हा चित्रपट.
नंतर स्वत: नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीतील हा सर्वात वाईट आणि कंटाळवाणा अनुभव होता. मात्र मला या चित्रपटासाठी इतके पैसे मिळाले की मी कोणतीही तक्रार केली नाही."
"यात शंका नाही की चित्रपट सहन करण्यापलीकडे होता. मात्र चित्रपटातील माझा अभिनय वाईट होता असं नाही. मी यापेक्षा वाईट चित्रपट केले आहेत. त्यात 'ज़िंदा जला दूँगा' आणि 'मुझे मेरी बीवी से बचाओ' हे चित्रपट आहेत."
चित्रपट पुरस्कारांना दिलं नाही महत्त्व
1983 मध्ये अभिनेत्री रत्ना पाठक यांच्याशी नसीरुद्दीन शाह यांचा दुसरा विवाह झाला. नसीरुद्दीन शाह यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.
याशिवाय त्यांना पार, स्पर्श आणि इकबाल या चित्रपटातील जबरदस्त अभिनयासाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आक्रोश, चक्र आणि मासून या चित्रपटांमधील अभिनयासाठी त्यांना तीन फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाले.

फोटो स्रोत, Getty Images
रोखठोकपणासाठी प्रसिद्ध असलेल्या नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखताती मान्य केलं होतं की ते 'या पुरस्कारांना गांभीर्यानं घेत नाहीत. तसंच या पुरस्कारांचा त्यांना अभिमानदेखील वाटत नाही.'
'त्यांनी जेव्हा फार्म हाऊस बांधलं, तेव्हा फिल्मफेअर पुरस्काराचा वापर त्यांनी त्यांच्या वॉशरुमच्या दरवाजाचं हँडल म्हणून केला. त्यांचं असंही म्हणणं आहे की इथे बहुतांश पुरस्कार शिफारस किंवा लॉबिंगमुळे मिळतात. त्यामुळेच ते या पुरस्कारांना महत्त्व देत नाही.'
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











