आयपीएल : मुंबई इंडियन्सचा तळापासून क्वालिफायर 2 पर्यंतचा प्रवास, 7 वी फायनल खेळणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आयपीएलचा हंगाम पाहता-पाहता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला. विजेतेपदाचा तुरा यंदा कोणत्या संघाच्या शिरपेचात खोवला जाणार, हे अवघ्या दोन सामन्यांनंतर समजेल. पण नेहमीप्रमाणे या सगळ्या चर्चांमध्ये एका संघाची चर्चा सुरू झाली आहे. तो संघ म्हणजे मुंबई इंडियन्स.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज (1 जून) अहमदाबादेत क्वालिफायर 2 सामना रंगणार आहे. या दोघांमधील विजेता अंतिम सामन्यात किंग कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूबरोबर भिडणार आहे.
क्वालिफायर 2 मध्ये पोहोचण्यासाठी मुंबईनं शुक्रवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा 20 रन्सने पराभव केला. पण पहिल्या पाच सामन्यांनंतर तळाला असलेल्या या संघानं टॉप 3 पर्यंत केलेला प्रवास खास ठरला आहे.
तसं पाहता सलग पराभवानंतर पुन्हा मुसंडी मारण्याची मुंबई इंडियन्स संघाची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये अशी दर्जेदार कामगिरी करून दाखवली आहे.
त्यामुळंच मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचताच इतर संघांच्या फॅन्समध्ये अस्वस्थपणा पाहायला मिळतो. कारण या संघाकडे एकाहून एक वरचढ असे खास खेळाडू आहेत. कोणत्याही क्षणी सामना आपल्या बाजुने फिरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
गेल्या काही सामन्यांमध्ये ते पाहायलाही मिळालं. त्यामुळं आता हार्दिकच्या नेतृत्वातील ही एमआय पलटन सहाव्या विजेतेपदाकडे वाटचाल करण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावणार यात शंका नाही.
मात्र, या संघाचा आयपीएलमधला यंदाचा प्रवास, त्यात खास कामगिरी केलेले खेळाडू आणि एकूणच संघाच्या कामगिरीबाबत आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
पहिल्या 5 पैकी 4 सामन्यांत पराभव
मुंबई इंडियन्सची 2025 च्या आयपीएल हंगामाची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. त्यांना पहिल्या 5 सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला होता. त्यामुळं गुणतालिकेत मुंबईच्या संघानं तळ गाठल्याचंही पाहायला मिळालं.
पण मुंबई इंडियन्सच्या खेळाडुंना मात्र त्याचा फार काही तणाव असेल असं वाटत नाही. कारण संघाला तळावरून शिखरापर्यंत कसं न्यायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे. त्यांनी याआधीही तशी कामगिरी करून दाखवली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2015 च्या स्पर्धेत तर मुंबई इंडियन्सच्या संघानं पहिले चार सामने ओळीनं गमावले होते. पण तरीही त्यांनी स्पर्धेत जोरदार पुनरागमन केलं आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याबरोबरच मुंबईच्या संघानं या स्पर्धेत विजेतेपदही मिळवलं होतं.
सध्या मुंबईचा कर्णधार असलेला हार्दिक पांड्यानं त्या हंगामामध्ये आयपीएलचं पदार्पण केलं होतं.
त्यामुळं यावर्षी सुरुवातीला पाचपैकी फक्त एक सामना जिंकता आला असला तरी त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सच्या संघानं सलग सहा सामने जिंकले आणि प्लेऑफपर्यंतची मजल मारली. साखळी फेरीतल्या अखेरच्या 6 सामन्यांपैकी मुंबईनं फक्त दोन सामने गमावले.
त्यानंतर शुक्रवारी प्लेऑफच्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला धूळ चारत मुंबई इंडियन्सचे क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं ते फायनलपासून एक आणि विजेतेपदापासून फक्त दोन पावलं दूर आहेत, असं म्हणणंही वावगं ठरणार नाही.
सूर्या, रोहित बनले फलंदाजीचा कणा
यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीतील सातत्यामुळं मुंबई इंडियन्सच्या संघाला प्लेऑफपर्यंत मजल मारता आली आहे. स्फोटक खेळीनं प्रतिस्पर्धी गोलंदाजांना नामोहरम करत हे दोन्ही फलंदाज ऐनवेळी संघाच्या मदतीला धावून आले आहेत.
सूर्यकुमार यादवनं तर त्याला टी 20 मधील जगातला सर्वोत्कृष्ट फलंदाज का म्हटलं जातं? हे दाखवून दिलं आहे. त्यानं यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळलेल्या प्रत्येक सामन्यात 25 पेक्षा जास्त धावा करत एक अनोखा विक्रम रचला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यंदाच्या ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये सूर्यकुमार दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं आतापर्यंत 673 धावा केल्या आहेत. त्यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. यात 35 षटकारांची आतषबाजी करत सूर्यानं चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजनही केलं आहे.
तर मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे रोहित शर्मा. रोहितनं यंदाच्या आयपीएलमध्ये 410 धावा केल्या आहेत. त्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
सुरुवातीला काही सामन्यांत फार धावा केल्या नसल्या तरी ऐनवेळी रोहितला सूर गवसला आहे.
गुजरातच्या विरोधातील एलिमिनेटर सामन्यात 81 धावांची खेळी करत रोहितनं मोक्याच्या क्षणी धावा केल्या आहेत. आता पुढच्या सामन्यांतही त्याच्याकडून चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याशिवाय तिलक वर्मा आणि रायन रिकल्टननंही मुंबईच्या फलंदाजीला चांगला हातभार लावला. रोहितच्या साथीनं सलामीला खेळताना रिकल्टननं 388 धावा केल्या आहेत. तर तिलक वर्मानं मधल्या फळीची जबाबदारी घेत 299 धावा केल्या आहेत.
नमन धीर आणि हार्दिक पांड्या यांनीही अखेरच्या षटकांत येऊन तडाखेबाज फलंदाजी करत काही सामन्यांचं चित्र पालटवलं आहे. दिल्लीच्या विरोधात नमन धीरनं मुकेशच्या ओव्हरमध्ये केलेल्या फटकेबाजीच्या जोरावरच मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात यश आलं होतं.
'बूम-बूम'ची कमाल
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा विचार करता त्यांच्याकडे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत.
सुरुवातीला काही सामन्यांत मुंबईला जसप्रित बुमराहची अनुपस्थिती नक्कीच जाणवली. पण त्याच्या संघातील प्रवेशानंतर मुंबईच्या संघानं मागे वळून पाहिलं नाही.
टी 20 च्या सामन्यांत बुमराह ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो, ती पाहता त्याच्या 4 ओव्हर हिशेबात धराव्या की नाही? असा प्रश्न प्रतिस्पर्धी संघासमोर असतो. त्यामुळं प्रतिस्पर्धी संघासाठी फलंदाजी 16 ओव्हरच मिळाल्यासारखी असते.

फोटो स्रोत, Getty Images
आकड्यांचंच बोलायचं झाल्यास सुरुवातीच्या सामन्यांना मुकल्यानंतरही यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह 18 विकेटसह 6 व्या स्थानी आहे.
विशेष म्हणजे हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून जेव्हा गरज भासते तेव्हा तो बुमराहच्या हाती चेंडू सोपवतो आणि त्यानंतर काम फत्ते झालंच म्हणून समजा. आयपीएलमधील आघाडीच्या गोलंदाजांमध्ये बुमराहचा इकॉनॉमी रेट सर्वात कमी आहे.
आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात तर त्यानं वॉशिंग्टन सुंदरला ज्या चेंडूवर बाद केलं, त्या चेंडूचा समावेश क्रिकेटमधील सर्वोत्तम चेंडूंमध्ये व्हावा असा होता.
त्याचबरोबर ट्रेंट बोल्ट नेहमीप्रमाणे मुंबईसाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यावर्षी त्यानं 21 विकेट मिळवल्या आहेत. हार्दिक, सँटनरही त्यांना साथ देत आहेत. दीपक चहरला मात्र यंदा चमकदार कामगिरी करता आलेली नाही.
कर्णधार हार्दिक पांड्या
गेल्या वर्षी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचं नेतृत्व दिल्यानं फॅन्समध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली होती. त्यावरून भर मैदानात चाहत्यांनी हार्दिक विरोधात हुटींग केलं होतं.
त्यानंतर यावर बरीच चर्चा झाली. पण प्रत्यक्षात हार्दिक आणि रोहित यांच्यात मात्र सर्वकाही आलबेल असल्याचं नंतर अनेकदा दिसून आलं. भारतीय संघातही हार्दिक रोहितच्या नेतृत्वात खेळला.
पण यावर्षी मात्र चाहत्यांनी हार्दिकला मुंबईचा कर्णधार म्हणून स्वीकारल्याचं दिसत आहे. तसंच हार्दिकचे डावपेटही मुंबईसाठी यशस्वी ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अष्टपैलू म्हणून त्याची कामगिरी चोख बजावतानाच हार्दिक कर्णधार म्हणून प्रतिस्पर्धी संघाचा पाडाव करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावताना दिसत आहे.
प्लेऑफमध्ये आतापर्यंतची दादागिरी
आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरलेले दोन संघ म्हणज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज. या दोन्ही संघांकडंच आतापर्यंतच्या 17 पैकी 10 विजेतेपदं आहेत. तर 18 व्या हंगामाच्या स्पर्धेत मुंबई इंडिन्स अजूनही कायम आहे.
मुंबईचा विचार करायचा झाल्यास मुंबईच्या संघानं यावर्षीसह एकूण 12 वेळा आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजे 18 वर्षांपैकी 12 वर्ष हा संघ पहिल्या चार संघांपैकी एक होता.

फोटो स्रोत, Getty Images
यापूर्वीच्या 11 प्लेऑफपैकी 6 वेळा मुंबईच्या संघानं पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवत फायनल सामना खेळला. त्यापैकी 5 वेळा विजेतेपद पटकावत मुंबईनं इतिहास रचला आहे. म्हणजे आतापर्यंत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर फक्त एकदा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
यावर्षी क्वालिफायर 2 म्हणजेच एकप्रकारच्या सेमिफायनल सामन्यात मुंबई आणि पंजाबचे संघ आमनेसामने असतील. पंजाबचा विजय झाला तर यंदा आयपीएलला नवा विजेता संघ मिळणार हे स्पष्ट आहे.
पण सहाव्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी अग्रेसर झालेल्या मुंबई इंडिन्सच्या संघाला रोखण्याचं आव्हान त्यांना त्यासाठी पेलावं लागणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











