कॅन्सर : केमोथेरपीमुळे गळून गेलेले केस पुन्हा येतात का? कॅन्सर तज्ज्ञांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, षण्मुगप्रिया
- Role, बीबीसी तमिळसाठी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
आपल्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर लहान समस्याही मोठ्या संकटात बदलू शकतात. अशाच एक समस्येमुळे, अनेकांना कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
बीबीसीने कॅन्सरसंबंधी मूलभूत शंकांचं निरसन करण्यासाठी कॅन्सर सर्जन डॉ. अय्यप्पन यांच्याशी संवाद साधला.
कॅन्सर कसा होतो? साधी गाठ कॅन्सरच्या गाठीत कशी बदलते? सततची बद्धकोष्ठता कॅन्सरचे लक्षण आहे का? केमोथेरपीबद्दलचे चुकीचे समज यांसह, त्यांनी दिलेली विविध वैज्ञानिक माहिती सविस्तर पाहूया.
कॅन्सर म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो?
माणसाच्या शरीरातील पेशी सतत विभागून वाढतात. पेशी दोनमध्ये विभागल्या जातात, नंतर चार होतात आणि हळूहळू अवयव तयार होतात. साधारणपणे, ही पेशींची वाढ एक नियंत्रित पद्धतीने होत असते.
पण काही वेळा ही नियंत्रित वाढ थांबत नाही आणि पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात. ही वाढ एक गाठ तयार करते, या गाठीलाच आपण कॅन्सर म्हणतो.

फोटो स्रोत, Getty Images
अनियंत्रित पेशींच्या वाढीमुळे तयार होणाऱ्या गाठींना दोन प्रकारात विभागता येतं, साधी किंवा सौम्य गाठी (ट्यूमर) आणि घातक गाठी (कॅन्सरच्या गाठी).
साध्या गाठींपेक्षा कॅन्सरच्या गाठ्या वेगळ्या असतात. या गाठी जीवनासाठी धोकादायक असतात आणि शरीरातील इतर अवयवांमध्ये पसरू शकतात.
कॅन्सरच्या पेशी रक्तप्रवाहाद्वारे फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, हाडे अशा इतर अवयवांमध्ये पसरू शकतात. याला मेटास्टेसिस म्हणतात. जेव्हा कॅन्सर फक्त ज्या ठिकाणी सुरू झाला तिथेच असतो ते सुरुवातीचे टप्पे आहेत, पण इतर अवयवांमध्ये पसरल्यास ते पूर्ण स्थिती किंवा टप्पे असतात.
साधी गाठ कॅन्सरमध्ये बदलू शकते का?
साध्या गाठी साधारणपणे तसंच राहतात.
पण जर वर्षानुवर्षे असलेली साधी गाठ अचानक मोठी होऊ लागली, तर लगेच डॉक्टरांकडे जावं. साध्या गाठी कॅन्सरमध्ये बदलणे फारच कमी घडते, पण काही खूपच दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्याची शक्यता असते.

हा बदल कधीकधी सार्कोमा प्रकारात होऊ शकतो. 100 पैकी एका व्यक्तीमध्ये असा बदल होऊ शकतो. त्यामुळे, गाठ वेळोवेळी डॉक्टरांकडे तपासून त्याची स्थिती जाणून घेणे खूप गरजेचं आहे. उशिराने शोधल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
काही अवयव सोडले तर बहुतेक अवयवांमध्ये पुरुष आणि महिला दोघांनाही कॅन्सर होऊ शकतो.
महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर आणि डिम्बग्रंथींचा कॅन्सर हे सर्वात सामान्य कॅन्सर आहेत.
पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर आणि मोठ्या आतड्यांचा कॅन्सर (कोलन कॅन्सर), हे सर्वात सामान्य कॅन्सर आहेत.
मोठ्या आतड्याचा कॅन्सर का वाढतो?
अलीकडे मोठ्या आतड्यात (कोलन) आणि मूत्रमार्गाच्या शेवटच्या भागात (मलाशय) कॅन्सरचे (रेक्टम) प्रमाण वाढत आहे.
मोठे आतडे आणि मलाशय हे पचनसंस्थेच्या शेवटच्या भागात येतात.
जीवनशैलीतील बदल, पर्यावरणातील बदल, आहारातील सवयी, पुरेशा प्रमाणात भाज्या न खाणे आणि जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले मांस खाणे, हे सर्व मोठ्या आतड्याच्या कॅन्सरची मुख्य कारणे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
विशेषतः धूम्रपान करणे, मद्यपान करणे, व्यायाम न करणे आणि शरीराची पुरेशी हालचाल न करणे - हे कॅन्सर होण्याची शक्यता वाढवतात.
मलविसर्जनात अडचण येणे, सतत बद्धकोष्ठता आणि मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागात अडथळा येणे यासारख्या कारणांमुळे गुदाशयचा म्हणजेच मलाशयाचा कर्करोग होऊ शकतो.
जर हा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात शोधला गेला, तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. सुरुवातीला उपचार घेण्याचा खर्चही खूप कमी असतो आणि उपचाराचे दुष्परिणाम देखील कमी असतात.
गुदाशयाच्या कॅन्सरची मुख्य लक्षणे:
रक्तस्त्राव: विष्ठा किंवा मलासोबत रक्त जाणे हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. मलाशयात रक्त दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अशक्तपणा: रक्ताची कमतरता, श्वास घेण्यात अडचण येणे, पाय सुजणे.
अचानक वजन कमी होणे: कोणत्याही कारणाशिवाय वजन अचानक कमी होणे ही धोक्याची घंटा आहे.
आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल: मल बाहेर जाण्यास अडचण, सतत बद्धकोष्ठता येणे ही महत्त्वाची लक्षणे आहेत
पोटातील अल्सर कॅन्सरमध्ये बदलू शकते का?
मोठ्या आतड्याच्या जखमा (कोलोरेक्टल अल्सर) आणि मलाशयाच्या जखमांमध्ये (गॅस्ट्रिक अल्सर) फरक ओळखणं गरजेचं आहे.
मोठ्या आतड्यात आढळणाऱ्या जखमांपैकी 99 टक्के कॅन्सरशी संबंधित असतात. याकडे विशेष काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बहुतेक गॅस्ट्रिक अल्सर हे सौम्य असतात. ते औषधांनी बरे होऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
जर त्याकडे लक्ष दिले नाही, तर काही वर्षांनी त्या जखमांमुळे कॅन्सर होऊ शकतो. खाण्यास त्रास होत असेल किंवा दुखत असेल, तर एन्डोस्कोपी करणे गरजेचे आहे.
केमोथेरपीचं स्वरूप काय असतं?
पारंपरिक स्वरूपानुसार केमोथेरपीत वापरलं जाणारं रसायन असून हे कॅन्सर पेशींसाठी अत्यंत विषारी असतं. कॅन्सर पेशींना मारण्याची क्षमता या रसायनात असते.
याला सायटोटॉक्सिक केमिकल म्हटलं जातं. केमोथेरपीचं प्राथमिक स्वरूप मस्टर्ड गॅसपासून तयार करण्यात आलं होतं. पहिल्या महायुद्धादरम्यान याचा वापर रासायनिक अस्त्र म्हणून करण्यात आला होता.
अर्थात कॅन्सरच्या पेशींसाठी जीवघेणं असणारं हे रसायन शरीरातील निरोगी पेशींना धोकादायक ठरू शकतं. निरोगी पेशींचं शरीरात संवर्धन होणं महत्त्वाचं असतं.
जास्तीत जास्त कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करतील आणि कमीत कमी निरोगी पेशी मरतील, अशी केमोथेरपी शोधणं हेच खरं कौशल्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कॅन्सरच्या पेशी आणि त्याच्या सभोवतालच्या निरोगी पेशी ओळखू शकेल असं रसायन शोधण्यात डॉक्टरांना दिवसेंदिवस चांगलं यश मिळतं आहे.
पेशी ज्या वेगाने नव्याने निर्माण होतात किंवा त्यांचं विभाजन होतं यावरून निरोगी आणि कर्करोगाच्या पेशींमध्ये मूलभूत फरक असतो.
अन्य पेशींपेक्षा कॅन्सरच्या पेशी वेगाने वाढतात. म्हणूनच ट्यमूर किंवा गाठी तयार होतात. त्या शरीरात तयार होणाऱ्या नैसर्गिक संप्रेरकांना कमी किंवा जास्त प्रतिसाद देऊ लागतात.
कॅन्सर पेशींची वाढ खुंटावी यासाठी केमोथेरपीचे काही प्रकार काम करतात.
बाह्य आक्रमणापासून रोखण्यासाठी शरीरात असलेली प्रतिकारक्षमता यंत्रणा कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करत नाहीत कारण ही यंत्रणा कॅन्सर पेशींना परकं मानत नाही.
बचाव यंत्रणा कॅन्सर पेशींना परकं मानून त्यांच्यावर आक्रमण करेल अशी पद्धतीनेही केमोथेरपीचे काही प्रयोग सुरू आहेत.
केमोथेरपीचे उपचार कसे होतात?
केमोथेरपी इंजेक्शनद्वारे थेट रक्तवाहिन्यांमध्ये देण्यात येते.
औषध शरीरात सहजतेनं आवश्यक तिथे पोहोचावं यासाठी सलाईन ड्रिपद्वारेही केमोथेरपी देण्यात येते. असं केल्याने रक्तवाहिनीला धक्का न लावता उपचार होतात.

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या रुग्णाला उपचारांसाठी सातत्याने वेगवेगळ्या औषधांची आवश्यकता असेल तर त्याला किंवा तिला दरवेळी नवीन इंजेक्शन घ्यायला लागू नये म्हणून रक्तवाहिनीमध्ये ट्यूब बसवण्यात येते. ट्यूब सीरिंजला जोडलेली असते. छातीतल्या रक्तवाहिनीत अशी जोडणी केली जाते त्याला 'हिकमॅन लाइन' असं म्हणतात.
कॅन्सरग्रस्त भागाला केमोथेरपी दिली तर दुष्परिणामांची शक्यता कमी होते.
मूत्राशयाच्या कॅन्सरसाठी, केमोथेरपी थेट त्या पेशींमध्ये दिली गेल्यास परिमाण अधिक होतो. केमोथेरपीच्या सायकल्स किती द्यायच्या म्हणजेच त्याच्या उपचारांची वारंवारता कॅन्सरच्या प्रकारावर अवलंबून आहे. काही रुग्णांना पंधरा दिवसात अनेकदा दिली जाते. काहींना अनेक महिन्यांमध्ये टप्याटप्याने दिली जाते.
केमोथेरपीचे दुष्परिणाम काय?
झपाट्याने वाढणाऱ्या तसेच विघटित होणाऱ्या पेशींवर आक्रमण करण्यासाठी केमोथेरपीचा उपयोग होत असल्याने, त्या जवळच्या निरोगी पेशींनाही बाधा पोहोचते.
उदाहरणार्थ केसांची निर्मिती करणाऱ्या पेशींवर त्यांचा विपरित परिणाम होतो. म्हणूनच केमोथेरपीदरम्यान केसगळतीचा त्रास होतो. मात्र केमोथेरपीचे उपचार बंद झाल्यावर केस पुन्हा येतात.
वेगाने वाढणाऱ्या पेशी पोट आणि आतड्यांमध्ये आढळतात. केमोच्या वेळेस कॅन्सरच्या बरोबरीने या दोन अवयवांमधल्या निरोगी पेशींवरही आक्रमण होतं. यामुळे भूक लागेनाशी होते, अतिसाराचा त्रास होतो.

फोटो स्रोत, Getty Images
हे रोखण्यासाठीही औषधं आहेत. औषध घेण्याच्या वेळेस पोट भरलेलं असू नये यासाठी वेळेवर जेवण हा उपाय काही रुग्णांसाठी प्रभावी ठरतो.
रक्तपेशींनाही केमोथेरपीचा फटका बसतो.
ऑक्सिजनचं वहन होण्यासाठी लालपेशी आवश्यक असतात. अन्य रक्तपेशी जंतूसंसर्ग होऊ न देण्यादृष्टीने महत्त्वाच्या असतात.
म्हणूनच केमोथेरपींना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना इन्फेक्शनचा त्रास होतो. त्याच्याशी मुकाबला करणंही अवघड असतं.
केमोथेरपीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची वारंवार रक्तचाचणी केली जाते जेणेकरून शरीरात कोणत्या पेशी किती प्रमाणात आहेत हे समजू शकतं. याला फुल ब्लड काऊंट म्हटलं जातं.
केमोथेरपीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांना प्रचंड थकवा जाणवतो. केमोथेरपीमुळे पुरुष तसेच स्त्रीच्या लैंगिक क्षमतेवरही परिणाम होतो. आता पुरुष त्यांचे वीर्य तर महिला स्त्रीबीज गोठवून त्याचं संवर्धन करू शकतात. नंतर टेस्ट ट्यूब बेबीसाठी याचा वापर होऊ शकतो.
केमोथेरपीमुळे गळून गेलेले केस पुन्हा येतात का?
कॅन्सरच्या उपचाराचे तीन मुख्य प्रकार आहेत - शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी.
यापैकी, औषधांच्या मदतीने कॅन्सर पेशींना नष्ट करणे म्हणजे केमोथेरपी. तर रेडिएशनचा (किरणांचा) वापर करून कॅन्सर पेशींना नष्ट करणे म्हणजे रेडिएशन थेरपी.

फोटो स्रोत, Getty Images
केमोथेरपी करताना गळालेले केस पुन्हा वाढतील का? असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर डॉ. अय्यप्पन म्हणाले, "केमोथेरपीमुळे केस गळाले तरी, उपचारानंतर काही महिन्यांत ते नक्की परत चांगल्या पद्धतीने वाढतात."
कॅन्सरबद्दल जागरूक राहणे खूप महत्त्वाचे आहे, असे डॉ. अय्यप्पन यांनी सांगितले. लवकर ओळखणे म्हणजे लवकर निदान, योग्य उपचार घेणे आणि जीवनशैली बदलणे हे कॅन्सरला सामोरे जाण्याचे मुख्य उपाय आहेत.
लसीकरण, नियमित तपासण्या आणि निरोगी जीवनशैली कॅन्सर प्रतिबंधात महत्त्वाची भूमिका बजावतात.
डॉ. अय्यप्पन म्हणाले की, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि पद्धतींमुळे कॅन्सरच्या उपचारात मोठी प्रगती झाली आहे. जर कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखला गेला, तर पूर्णपणे बरा होणे शक्य आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











