इरफान खान : साहबजादा इरफान अली खान - छोटं शहर ते हॉलिवुडपर्यंतच्या स्वप्नाची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडणारा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान यांचा आज (7 जानेवारी) जन्मदिन. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
टीव्ही मालिका की हिंदी चित्रपट ते स्लमडॉग मिलेनिअर, ज्युरासिक पार्क, लाईफ ऑफ पाय अशा हॉलिवुडपटांपर्यंत आपल्या भूमिकांमुळे लक्षात राहिलेल्या इरफान यांच्या आयुष्यातले हे काही खास किस्से.
'साहबजादा इरफान अली खान'
राजस्थानातल्या टोंक गावात 7 जानेवारी 1967 ला इरफानचा जन्म झाला. पूर्ण नाव - साहबजादा इरफान अली खान.
त्यांच्या आईचे राजघराण्याशी संबंध होते आणि त्यांच्या वडिलांनी टायरचा उद्योग स्वतः उभारत त्यातून भरपूर पैसा मिळवलेला होता.
आपल्या कुटुंबाची श्रीमंती दाखवणारा 'साहबजादा' शब्द इरफान यांनी मात्र आपल्या नावातून काढून टाकला. त्यामुळे आपल्या स्वप्नांच्या मार्गात अडथळा येईल, असं त्यांना वाटत होतं. त्यांनी स्वतःच्या नावाचं स्पेलिंगही बदलून Irfan ऐवजी Irrfan केलं. या दोन Rमुळे होणारा Irrfanचा उच्चार आपल्याला आवडत असल्याचं त्यांनी एकदा सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
वडील गेल्यानंतर टायर बिझनेसची सूत्रं इरफान आपल्या हाती घेतील, असं घरच्यांचा अंदाज होता. पण त्यांनी तसं केलं नाही. 'अॅक्टर' होण्यावर इरफान ठाम होते.
"मी अॅक्टर होईन अशी कल्पनाही कधी कोणी केली नव्हती. मी अगदी लाजाळू होतो, बारीक होतो. पण माझी अगदी मनापासून इच्छा होती," इरफान यांनी सांगितलं होतं.
1984 मध्ये त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. आपल्याला थिएटरचा अनुभव असल्याचं खोटंच सांगत त्यांनी प्रवेश मिळवला.

फोटो स्रोत, Irfan/Twitter
"प्रवेश मिळाला नाही तर मी गुदमरून जाईन असं मला वाटलं होतं," त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.
याच ड्रामा स्कूलमध्ये त्यांना त्यांची लाईफ पार्टनर मिळाली.
"तो कायम फोकस्ड असायचा. मला आठवतंय, घरी आल्यानंतरही तो थेट बेडरूममध्ये जाई आणि जमिनीवर बसून पुस्तकं वाचायचा. बाकीचे आम्ही मात्र गप्पा टप्पा करत बसायचो," इरफानची पत्नी सुतपा सिकदर यांनी सांगितलं होतं. त्या लेखिका आहेत.
लहान पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत
खरंतर इरफान यांना सिनेमांमध्ये काम करण्यात रस होता. पण त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीतले सुरुवातीचे रोल होते टीव्ही क्षेत्रातले. त्याकाळात केबलवरच्या डझनभर चॅनल्सवर अनेक मालिका सुरू होत्या. काम मिळत होतं, पण त्यातून समाधान मिळत नव्हतं.
इरफान यांनी जवळपास दशकभर झी आणि स्टार वाहिनीच्या मालिकांमध्ये काम केलं. या काळात अगदी अभिनय सोडून देण्याचा विचारही त्यांच्या मनात आला होता.

फोटो स्रोत, SOCIAL mEDIA
मोठ्या पडद्यावरचं त्यांचं आगमनही तसं त्यांच्यासाठी कठीणच ठरलं.
सिनेमामधली त्यांना मिळालेली पहिली भूमिका होती मीरा नायर यांच्या 'सलाम बॉम्बे' चित्रपटातली. या सिनेमाला ऑस्करसाठी नामांकनही मिळालं होतं. यातल्या एका तरुणाची भूमिका इरफान यांनी केली, पण दुर्दैवाने या भूमिकेला कात्री लावण्यात आली.
त्यांना यश मिळालं ते 'द वॉरियर' या ब्रिटिश-इंडियन फिल्ममुळे. या सिनेमाचं चित्रीकरण हिमालयात आणि राजस्थानच्या रखरखीत वाळवंटात करण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, The LunchBox
ब्रिटीश दिग्दर्शक आसिफ कपाडियांची ही पहिली फिल्म होती. प्रथितयश बॉलिवुड स्टार परवडणारा नसल्याने ते एका गुणी, पण अनोळखी अभिनेत्याच्या शोधात होते. यातल्या योद्ध्याची भूमिका इरफान यांनी बजावली.
बाफ्ता पुरस्कारांमध्ये या सिनेमाला पुरस्कार मिळाला आणि ऑस्करसाठी युकेकडून ही फिल्म पाठवण्यात येणार होती. पण ही फिल्म हिंदी भाषेत असल्याने असं होऊ शकलं नाही.
या फिल्मच्या यशासोबतच इरफानचं फिल्मी करियर सुरू झालं आणि पुढची दोन दशकं त्यांनी दरवर्षाला पाच वा सहा सिनेमे केले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांना पहिली संधी देणाऱ्या मीरा नायर यांच्यासोबत पुढे 2006 मध्ये त्यांनी नेमसेक आणि 2010 मध्ये 'न्यूयॉर्क, आय लव्ह यू' असे सिनेमेही केले.
'अ मायटी हार्ट' सिनेमात त्यांनी एका पाकिस्तानी पोलिसाची भूमिका बजावली तर फक्त इरफानसोबत काम करता यावं म्हणून वेस अँडरसन यांनी त्यांच्या 'द दार्जिलिंग लिमिटेड' सिनेमात एक लहानसा रोल लिहीला.
2008 मध्ये आलेल्या डॅनी बॉयल यांच्या 'स्लमडॉग मिलियनेर (स्लमडॉग करोडपती)' सिनेमात त्यांनी एका पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका बजावली. इरफानचा अभिनय पाहणं एक पर्वणी होती, असं डॅनी बॉयल यांनी म्हटलं होतं.
भूमिकांची निवड
स्लमडॉगच्या यशानंतर इरफान कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर होते, जिथे ते निवडक भूमिका स्वीकारू शकत होते.
भूमिका निवडण्याविषयी एकदा इरफाननी सांगितलं होतं, "मी अशा फिल्म्स करायचा प्रयत्न करतो ज्याचा परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. असे सिनेमे जे तुमच्याशी बोलतात, आणि एकदा पाहून झाल्यावरही पुन्हा पुन्हा आठवत राहतात. माझं अशा फिल्म्सना प्राधान्य असतं ज्यांच्यासोबत तुमचं नातं दीर्घकाळाचं असतं."

फोटो स्रोत, ANI
पण धर्माशी वा संस्कृतीशी अगदी जवळचा संबंध असलेल्या भूमिका स्वीकारणं, ते टाळत. याच कारणामुळे त्यांनी दीपा मेहतांचा 'मिडनाईट्स चिल्ड्रन' आणि मीरा नायर यांचा 'रिलक्टंट फंडामेंटलिस्ट' सिनेमा नाकारला होता.
इस्लामशी नातं
अमेरिकेवरच्या 9/11 च्या हल्ल्यांनंतर दोनदा त्यांना लॉस अँजलिसच्या विमानतळावर अडवण्यात आलं. त्यांचं नाव आणि या हल्लामागे हात असणाऱ्या संशियताच्या नावात साधर्म्य असल्याचं कारण देण्यात आलं.
यानंतर इरफान यांनी आपलं 'खान' हे आडनाव लावणं सोडलं. सिनेमांच्या नामावलीमध्ये फक्त 'इरफान' असं नाव वापरण्यावर त्यांचा भर असायचा.

फोटो स्रोत, Getty Images
मुहर्रमच्या काळामध्ये देण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या बळीविषयीही त्यांनी मत व्यक्त केल्यानंतर मुस्लीम नेते नाराज झाले होते.
"आपण या सगळ्या प्रथा त्यामागचे अर्थ समजून न घेता पाळतो," इरफान म्हणाले होते.
धर्माबद्दलची अशी वक्तव्य करण्यापेक्षा आपल्या फिल्म करियरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला तेव्हा त्यांना देण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय चित्रपटांतल्या भूमिका
इरफान यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये काम केलं. आंग ली यांच्या 'लाईफ ऑफ पाय' मधली त्यांची पिसीनची भूमिका गाजली. सोबतच त्यांनी 'अमेझिंग स्पायडरमॅन' सिनेमात रजत रत्ना या वैज्ञानिकाची तर ज्युरासिक वर्ल्ड सिनेमात सायमन मसरानी या ज्युरासिक वर्ल्डच्या अब्जाधीश मालकाची भूमिका केली.
हिंदी चित्रपटांतल्या अजरामर भूमिका
लंचबॉक्स, मदारी, पानसिंग तोमर, मकबूल या सिनेमांतल्या इरफान यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या.
अभिनय देव यांच्या 'ब्लॅकमेल' सिनेमातही त्यांची भूमिका होती.

फोटो स्रोत, Twitter / IrrfanK
अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असणारा पिकू, आकर्ष खुराणांचा कारवाँ, होमी अदजानिया यांचा हिंदी मीडियम हे त्यांचे गेल्या काही काळातले गाजलेले चित्रपट.
इरफान यांची प्रमुख भूमिका असणारा 'अंग्रेजी मीडियम' काही काळापूर्वी रिलीज झाला. पण तब्येत बरी नसल्याने इरफान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सहभागी झाले नाहीत.
कला क्षेत्रातल्या त्यांच्या याच योगदानाबद्दल 2011 मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











