आमिर खानची नवी गर्लफ्रेंड 'गौरी प्रॅट' कोण आहे? तिच्याबद्दल आमिरनं काय माहिती दिली?

आमिर खान

फोटो स्रोत, Getty Images

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खान नुकताच 60 वर्षांचा झाला. त्याच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीत त्याने नव्यानं रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं.

गुरुवारी (13 मार्च) आमिर खानने त्याचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान त्यानं पत्रकार परिषदेत त्यांच्या आयुष्याबद्दल आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा केली.

यावेळी त्याने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी प्रॅट असल्याचं आणि तिच्यासोबत तो 18 महिन्यांपासून रिलेशनमध्ये असल्याचं माध्यमांना सांगितलं.

आमिर खाननं या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, "माझ्यासाठी नाती खूप महत्त्वाची आहेत."

आमिर खानचं यापूर्वी दोनदा लग्न झालं आहे. त्यानं पहिली पत्नी रीना दत्ताशी 2002 साली घटस्फोट घेतला. दोघांना दोन मुलं आहेत.

यानंतर 2005 मध्ये आमिरनं किरण रावशी लग्न केलं. 2021 मध्ये आमिर आणि किरण राव दोघेही वेगळे झाले. आमिर आणि किरण राव यांचा एक मुलगा आहे.

आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेतला असला तरी दोघांमध्ये चांगली मैत्री आहे आणि दोघेही त्यांच्या मुलाला एकत्र वाढवत आहेत, असंही आमिर खान नमूद केलं. दोघांनी 'लपता लेडीज' चित्रपटासाठीही एकत्र काम केले होते.

गौरी प्रॅट कोण आहे?

वाढदिवसाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमिर खानने गौरी प्रॅटची ओळख करून देताना त्याचा जुना चित्रपट 'लगान'चा उल्लेख केला. तसेच, "भुवनला त्याची गौरी सापडली आहे" असं नमूद केलं.

2001 मध्ये आलेल्या 'लगान' चित्रपटात आमिर खान आणि ग्रेसी सिंग यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटातील आमिरच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव 'भुवन' होते, तर ग्रेसीच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव गौरी होते.

पत्रकार परिषदेत आमिर खाननं "राजा को रानी से प्यार हो गया" हे गाणे देखील गायलं. यावेळी त्याने गौरीबद्दल अधिक माहिती शेअर केली. मात्र, यावेळी त्यांनी माध्यमांना त्यांचे फोटो न काढण्याची विनंतीही केली.

आमिर माध्यमांना म्हणाला, "तुम्हाला तिला एका चांगल्या प्रसंगी भेटण्याची संधी मिळेल. आम्हालाही हे गुप्त ठेवायचं नाही. मी सलमान खान आणि शाहरुख खानसोबत गौरीच्या भेटीचं नियोजन केलं आहे."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

विशेष म्हणजे, आमिर खानच्या वाढदिवसानिमित्त सलमान खान आणि शाहरुख खान त्याच्या घरी पोहोचले होते.

आपल्या प्रेयसीबद्दल अधिक माहिती देताना आमिर खान म्हणाला, "ती बंगळुरूची आहे. खरंतर आम्ही दोघेही एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतो. मात्र, आम्ही फक्त दीड वर्षांपूर्वी भेटलो होतो."

"ती काही कामासाठी मुंबईत होती आणि आम्ही अचानक भेटलो. तेव्हापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात राहिलो आणि सगळं जसं घडतं तसं घडलं."

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, गौरी ही रीता प्रॅटची मुलगी आहे आणि तिच्या आईचे बेंगळुरूमध्ये एक सलून आहे. गौरीनं तिचं संपूर्ण आयुष्य शहरात घालवलं आहे.

लाल रेष
लाल रेष

आमिर खान त्याच्या नात्याबद्दल काय म्हणाला होता?

आमिर खान त्याच्या आयुष्यातील नात्याबद्दल म्हणाला होता, "मी चांगल्या नात्यांमध्ये होतो, यासाठी मी भाग्यवान आहे. रीनासोबतचे माझे नाते सुमारे 16 वर्षे टिकले. त्यानंतर मी किरणसोबत 16 वर्षे राहिलो आणि एकप्रकारे आम्ही अजूनही एकत्र आहोत. मी आयुष्यात खूप काही शिकलो आहे. गौरीसोबत मला शांतता अनुभवायला मिळते."

आमिर खान आणि किरण राव

फोटो स्रोत, Puja Bhatia/Getty Images

गौरीबद्दल अधिक माहिती देताना आमिरनं सांगितलं की, "तिला 6 वर्षांचा मुलगा आहे. तो हुशार आहे आणि त्यांना भेटून आनंद झाला."

डेक्कन हेराल्डमधील एका वृत्तानुसार, आमिर खानच्या कुटुंबाने गौरीचे आनंदाने स्वागत केले आणि सर्वजण तिच्याशी चांगले वागले, अशी माहिती गौरीने माध्यमांना दिली.

गौरी सध्या आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करत असल्याचंही आमिरनं नमूद केलं.

लग्नाच्या प्रश्नावर आमिर खान म्हणाला, "वयाच्या साठव्या वर्षी लग्न करणं मला शोभेल की नाही हे मला माहित नाही. मात्र, माझी मुलं आनंदी आहेत आणि मी खूप भाग्यवान आहे की माझे माझ्या आधीच्या पत्नींशी चांगले संबंध आहेत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)