कॉफीचा आपल्या झोपेवर आणि स्वप्नांवर काय परिणाम होतो? विज्ञान काय सांगतं? वाचा

कॉफीचा आणि स्वप्नांचा संबंध

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, शार्लोट गुप्ता आणि करिसा गार्डिनर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कॉफी पिण्याचं प्रमाण कमी केल्यानंतर काही दिवसांतच अधिक स्पष्ट स्वप्नं पडू लागल्याचं काहीजण सांगतात. अशावेळी नेमकं काय होतं?

तुम्ही अलीकडेच कॉफी पिण्याचं प्रमाण कमी केलं आहे का? आणि तुम्हाला आयुष्यातील सर्वात सुस्पष्ट स्वप्नं पडत असल्यासारखं वाटतं आहे का?

कॉफी कमी पिण्याचे अनेक संभाव्य फायदे असतात. उदाहरणार्थ दात पांढरे होतात आणि शौचालयात कमी वेळा जावं लागतं.

मात्र कॉफी पिणं कमी केल्यावर एका तोट्याबद्दल आपण अनेकदा ऐकतो. तो म्हणजे अतिशय सुस्पष्ट (काहीवेळा भीतीदायक) स्वप्नं पडू लागतात.

कॉफी पिण्याचं प्रमाण कमी केल्यानंतर काही दिवसांतच हा एक विचित्र आणि विशिष्ट परिणाम होण्यास सुरुवात होते, असं अनेकजण सांगतात.

मात्र यामागे खरोखरंच एखादं विज्ञान असतं का? संशोधनातून काय समोर येतं, ते जाणून घेऊया.

कॉफीचा झोपेवर कसा परिणाम होतो?

कॉफीमधील कॅफिन हा एक उत्तेजक घटक असतो. तो आपल्याला सतर्क आणि जागा ठेवतो.

आपल्या मेंदूत ॲडेनोसिन नावाचं रसायन असतं. या रसायनात अडथळा निर्माण करून कॉफी आपल्याला सतर्क ठेवते.

आपण जागे झाल्यावर आणि सक्रिय असताना दिवसभरात ॲडेनोसिन तयार होतं. संध्याकाळपर्यंत, आपल्या मेंदूतील ॲडेनोसिनचा साठा आपल्याला झोप येण्यास मदत करतो.

आपण जेव्हा झोपतो तेव्हा ॲडेनोसिन बाहेर पडतं. आपण ताजेतवाने होऊन जागे होतो, तेव्हा ॲडेनोसिनचा साठा तयार होण्यास पुन्हा सुरुवात होते.

झोपण्यापूर्वी किमान 8 तास आधी कॅफिनचं सेवन टाळल्यामुळे चांगली झोप येऊ शकते आणि अधिक आश्चर्यकारक स्वप्नंदेखील पडू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झोपण्यापूर्वी किमान 8 तास आधी कॅफिनचं सेवन टाळल्यामुळे चांगली झोप येऊ शकते आणि अधिक आश्चर्यकारक स्वप्नंदेखील पडू शकतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आपण जेव्हा कॉफी पितो, तेव्हा ती आपल्या मेंदूतील ॲडेनोसिनचा संदेश अडवते. त्यामुळे शरीरात ॲडेनोसिन असतानाही, आपल्याला झोपेची तीव्रता जाणवत नाही. मात्र जेव्हा कॉफीचा प्रभाव कमी होतो, तेव्हा आपल्याला झोप येऊ लागते (कॅफिन क्रॅश).

कॅफिनचा हाफ लाईफ म्हणजे अर्ध आयुकाल जवळपास तीन ते सहा तास असतो. म्हणजेच तीन ते सहा तासानंतर देखील आपण जी कॉफी प्यायलेलो असतो त्याचा अर्धा भाग आपल्या शरीरात असतो.

त्यामुळे यातील महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा अजूनही शरीरातील ॲडेनोसिनवर परिणाम होत असतो. त्यामुळेच दुपारी किंवा संध्याकाळी कॉफी पिणाऱ्या अनेकांना रात्रीच्या वेळी झोप लागण्यात अडचणी येऊ शकतात.

आपल्या शरीरातील ॲडेनोसिनच्या संदेशात व्यत्यय आणून, कॅफिन आपली झोप अधिक विस्कळीत करू शकतं. तसंच आपल्या एकूण झोपेचं प्रमाणीदेखील त्यामुळे कमी होऊ शकतं.

विशेषकरून आपल्या नॉन-रॅपिड आय मूव्हमेंट (एनआरईएम) या झोपेच्या बाबतीत ते खरं असतं.

एकूणच संशोधनातून स्पष्ट दिसतं की आपण जितक्या उशीरा कॉफी पितो आणि ती जितक्या अधिक प्रमाणात पितो, ते आपल्या झोपेसाठी तितकंच वाईट असतं.

आपण कॉफीचे सेवन कमी केल्यामुळे आपल्याला अधिक सुस्पष्ट स्वप्नं पडतात का यावर अद्याप फारसं थेट स्वरुपाचं संशोधन झालेलं नाही. बहुतांश संशोधनात कॅफिनचा आपल्या स्वप्नांवर काय परिणाम होतो यापेक्षा आपल्या झोपेवर काय परिणाम होतो यावर भर दिलेला असतो.

मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की आपल्याला याबाबत अजिबातच माहिती नाही. आपल्याला हे माहित आहे की झोपेची गुणवत्ता आणि स्वप्नं पडणं याचा जवळचा संबंध असतो.

कॅफिनचं कमी सेवन म्हणजे अधिक सुस्पष्ट पडू शकतात का?

याबद्दल कोणताही थेट पुरावा नसला तरी, लोक हीच गोष्ट सांगत राहतात. त्यांनी कॅफिनचं प्रमाण कमी केलं की काही रात्रींमध्येच त्यांना अधिक सुस्पष्ट, तपशीलवार किंवा काहीवेळा विचित्र स्वप्न पडू लागतात.

कॉफीचं सेवन कमी केल्याचा थेट परिणाम होत सुस्पष्ट स्वप्नं पडू लागणार नाहीत. मात्र त्यामध्ये एक तर्कसंगत संबंध आहे.

झोपेची गुणवत्ता आणि स्वप्नं पडणं यांचा जवळचा संबंध असतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, झोपेची गुणवत्ता आणि स्वप्नं पडणं यांचा जवळचा संबंध असतो.

कॅफिनमुळे आपली एकूणच झोप कमी होते आणि रात्रीच्या वेळेस जाग येण्याचं प्रमाण वाढू शकतं.

विशेषकरून जर दिवसा उशीरा कॉफी घेतल्यास, त्याचं प्रमाण कमी केल्यास आपलं शरीर पुन्हा 'सतर्क' होऊ शकतं. आपण जेव्हा अधिक झोपतो, तेव्हा त्यामुळे आपल्या झोपेतील रॅपिड आय मूव्हमेंटचं (आरईएम) प्रमाण वाढतं.

सुस्पष्ट स्वप्नं म्हणजे काय?

सुस्पष्ट स्वप्नं म्हणजे अशी स्वप्नं जी आपल्याला अगदी खरीखुरी वाटतात. अशा स्वप्नं अतिशय तपशीलवार आणि अतिशय स्पष्ट असू शकतात.

यातील प्रतिमा अतिशय तीव्र असतात, भावना अत्यंत तीव्र असू शकतात. ते इतकं तीव्र असू शकतं की त्यामुळे काहीवेळा आपण जागं झाल्यानंतर देखील अशी स्वप्नं आपल्याला आठवू शकतात.

रॅपिड आय मूव्हमेंटचं (आरईएम) हा आपल्या झोपेचा असा टप्पा असतो, ज्यात आपलं शरीर शिथिल अवस्थेत अशतं मात्र आपला मेंदू खूपच सक्रिय असतो.

झोपेच्या या टप्प्याचाच स्वप्नांशी संबंध असतो. रॅपिड आय मूव्हमेंटचं (आरईएम) झोप जितकी अधिक प्रमाणात असेल तितकीच आपल्या मेंदूला सुस्पष्ट आणि तपशीलवार स्वप्न निर्माण करण्याची अधिक संधी मिळू शकते.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

(वयस्कर किंवा वृद्धांवरील संशोधनातून असं आढळून आलं आहे की ज्या लोकांमध्ये रॅपिड आय मूव्हमेंट झोपेचं प्रमाण अधिक असतं, त्यांना सुस्पष्ट स्वप्नं पडण्याची शक्यता अधिक असते.)

रॅपिड आय मूव्हमेंट प्रकारच्या झोपेच्या स्थितीत आपण रात्रीच्या वेळेस जागं होण्याची अधिक शक्यता असते. जर आपण रॅपिड आय मूव्हमेंट झोपेतून जागे झालो तर आपल्याला आपली स्वप्नं आठवण्याची शक्यता असते. कारण ती स्वप्नं आपल्या स्मृतीमध्ये 'ताजी' असतात.

त्यामुळेच कॅफिनचं सेवन कमी केल्यावर आपल्याला रॅपिड आय मूव्हमेंट प्रकारातील अधिक झोप मिळू शकते. त्याचाच अर्थ आपल्याला स्वप्नं पडण्याची अधिक संधी असते आणि ती स्वप्नं आठवण्याची अधिक संधी असते.

अर्थात झोप ही खूप गुंतागुंतीची बाब असते आणि आपल्याला पडणारी स्वप्नं ही गोष्टदेखील खूप गुंतागुंतीची असते.

कॅफिनचं प्रमाण कमी केल्यानं सर्वांनाच अचानक सुस्पष्ट स्वप्नं पडत नाहीत. त्याचा प्रभाव कदाचित काही दिवस किंवा आठवडे राहू शकतो.

यातील लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे, कॅफिनचं सेवन कमी करण्याचा आणि सुस्पष्ट स्वप्नं पडण्याचा संबंध असल्याचे ठोस पुरावे नाहीत. मात्र या दोन्हीमध्ये संबंध असू शकतो. कॅफिनचा आपल्या झोपेवर परिणाम होतो. झोपेचा स्वप्नं पडण्यावर परिणाम होतो.

जेव्हा आपण कॅफिनचं सेवन कमी कतो, तेव्हा त्याचा परिणाम होत आपल्या मेंदूला रॅपिड आय मूव्हमेंट प्रकारची अधिक झोप घेण्याची संधी मिळू शकते.

सर्वकाही वेळेवर अवंलबून

आपण जेव्हा कॅफिनबद्दल विचार करतो तेव्हा सामान्यपणे कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्सबद्दल विचार केला जातो. मात्र शीतपेयांसारख्या काही विशिष्ट पेयांमध्ये, चॉकलेट, चहा, व्यायामाआधी घ्यायच्या सप्लिमेंट आणि काही औषधांमध्येदेखील कॅफिन असू शकतं.

कॅफिनचे अनेक फायदे असतात. यात आकलन वाढणं आणि मानसिक आरोग्याचा समावेश असतो. उदाहरणार्थ, काही अभ्यासांमधून असं आढळून आलं आहे की कॉफी पिणाऱ्यांना नैराश्याचा धोका कमी असतो.

तसंच कॅफिनचा संबंध पार्किसन्स सारख्या न्युरोजनरेटिव्ह आजारांचा धोका कमी होण्याशी असू शकतो.

कॉफीमध्ये व्हिटामिन बी आणि अँटिऑक्सिडंट्सदेखील असतात. हे आपल्या निरोगी आहारातील आवश्यक घटक असतात.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या बाबतीत, विशेषकरून रात्रपाळीत काम करणाऱ्यांसाठी, कॅफिनचं सेवन करणं हा थकवा हाताळण्याचा एक मार्ग असतो.

अगदी जे लोक शिफ्टमध्ये काम करत नाहीत, तेदेखील काफीचा पहिला (किंवा दुसरा) कप घेतल्याशिवाय दिवसाचं काम सुरू करू शकत नाहीत.

जर तुम्हाला कॅफिनचं सेवन पूर्णपणे बंद करायचं नसेल, मात्र तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारायची असेल, तर मग ते सर्वकाही कॉफी पिण्याच्या वेळेवर अवलंबून आहे.

झोपण्याआधी किमान 8 तास आधी कॅफिनचं सेवन करणं टाळा. झोपायच्या 12 तासांच्या आत जास्त प्रमाणात कॉफी पिणं टाळा. असं केल्यानं तुम्हाला चांगली झोप लागू शकते आणि तुमची स्वप्नंदेखील तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात.

(शार्लोट गुप्ता ऑस्ट्रेलियातील सीक्यू विद्यापीठात झोपेवरील संशोधक आहेत. कॅरिसा गार्डिनर ऑस्ट्रेलियन कॅथलिक विद्यापीठात क्रीडा कामगिरी, दुखापतीतून सावरणं, दुखापती आणि नवीन तंत्रज्ञानाच्या पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलो आहेत.)

द कॉन्व्हर्सेशनमध्ये प्रकाशित झालेल्या मूळ लेखावरून हा लेख घेण्यात आला आहे आणि तो क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सच्या अंतर्गत पुन्हा प्रकाशित करण्यात आला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)