मुंबईत किंग एडवर्ड यांच्या नावाने रुग्णालय का बनलं? काय आहे या हॉस्पिटलचा इतिहास?

फोटो स्रोत, KEM HOSPITAL/BMC
- Author, दिग्विजय जिरगे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
'रुग्णसेवार्थे समर्पित' मुंबईतील परळ येथील केईएम हॉस्पिटल म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलचं शताब्दी वर्षानिमित्तचं हे घोषवाक्य. 2026 हे वर्ष केईएम हॉस्पिटलसाठी विशेष आहे. कारण हे वर्ष या हॉस्पिटलचं शताब्दी वर्ष आहे. बरोबर 100 वर्षांपूर्वी या हॉस्पिटलने मुंबईतील सामान्य रुग्णांची, गिरणी कामगारांची रुग्णसेवा सुरू केली होती.
आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल हे हॉस्पिटल सर्वांना माहीत आहेच. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या हॉस्पिटलची वेगळ्या कारणामुळे चर्चा होताना दिसत आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीने केईएमचे नाव 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' करण्यास मंजुरी दिली आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएमचे नाव बदलण्यासाठी पत्र दिले होते.
परंतु, या नामांतरास डॉक्टरांची संघटना मार्ड, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांनी तीव्र विरोध केला आहे. याप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे.
'अज्ञात मुंबई' या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांनी केईएमचं नाव बदलण्यास विरोध केला आहे. या हॉस्पिटलचं नाव बदललं जाऊ नये. नाव बदललं की इतिहास पुसला जातो. त्या ऐवजी नवीन हॉस्पिटल उभा करा आणि त्या तोडीचं नाव द्या, असं माझं स्पष्ट मत आहे, असं त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
बॅरिस्टर मोहम्मद जिनाही होते समितीत
केईएमचा इतिहास हा फक्त त्या हॉस्पिटलचा इतिहास नाहीये. तो फिरोजशहा मेहता यांनी दिलेल्या लढ्याचा इतिहास आहे, महानगरपालिकेचा इतिहास आहे, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचाही इतिहास आहे, असं साळुंखे पुढे म्हणाले.
त्यांनी सांगितलं की, "केईएम 1926 साली जरी सुरू झालं असलं तरी त्याची बीजे ही 1910-11 मध्ये रोवली गेली होती. त्या काळी एखादी मोठी व्यक्ती मरण पावली किंवा त्या व्यक्तीने मुंबईला भेट दिली असेल तर त्याच्यासाठी काही ना काही स्मृती उभारल्या जायच्या."
"मग किंग एडवर्ड यांच्या स्मरणार्थ मुंबईतील नामांकित खासगी लोकांनी एकत्र येऊन हॉस्पिटल उभा करण्यासाठी समिती स्थापन केली. त्यात मोहम्मद अली जिना पण होते. त्यांच्याबरोबर समितीत चंदावरकर, भाटवडेकर आणि काही पारसी मंडळीही होती."

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई शहराचे इतिहास अभ्यासक आणि खाकी टुर्सचे संस्थापक भारत गोठोसकर यांनी सांगितलं की, हॉस्पिटलसाठी सुरुवातीचा निधी मेमोरियल फंड समितीने जमा केला. त्यानंतर किंग जॉर्ज (पाचवे) यांच्या 1911 मधील मुंबई भेटीच्या स्वागत निधीतून उरलेली रक्कम आणि तत्कालीन मुंबई प्रांताच्या सरकारकडून मदत मिळाली.
किंग एडवर्ड यांच्या नावाने हॉस्पिटलच का?
किंग एडवर्ड यांच्या नावाने हॉस्पिटलच का बनवण्यात आलं?
याला देखील कारण असल्याचे साळुंखे यांनी सांगितलं. ते म्हणाले की, किंग एडवर्ड यांना हॉस्पिटलविषयी ममत्व होतं. मुंबईतील लोकांसाठी त्यांनी विशेष असं काही केलं नव्हतं. परंतु, इंग्लंडमध्ये त्यांनी रुग्णालयांना सढळ हाताने मदत केली होती.
त्याचबरोबर त्या काळात मुंबईमध्ये गिरण्यांचा उदय झाला होता. गिरण्यांमध्ये क्षयरोग म्हणजेच टीबीचं प्रमाण जास्त होतं. आणि मुंबईपुरतं बोलायचं म्हटलं तर टीबीवर उपचार करणारं एकही वेगळं आणि विशेष, असं हॉस्पिटल नव्हतं.
महापालिकेचा आरोग्य विभाग होता. ते सरकारच्या म्हणजेच मुंबई प्रांतांच्या सरकारच्या हातात होतं. त्यांच्या आदेशाने तिथे कारभार चालत. सरकारने निर्णय घ्यायचा आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेनं करायची अशी यंत्रणा होती.
त्याचबरोबर महापालिकेकडे पोलीस विभाग होता. पोलीस विभागाचं नियंत्रण देखील सरकारकडेच होतं, पण त्यांचं वेतन महापालिका द्यायची.
त्यावेळी त्यासाठी महापालिकेकडून फिरोजशहा मेहता हे भांडले. त्यांनी आरोग्य विभागाची मागणी केली. ही घटना हॉस्पिटलचा विचार येण्याआधीची आहे. यासाठी मेहता यांनी मोठा लढा दिला. अखेर 1906 साली विभागांची अदलाबदली झाली (पोलीस चार्जेस ऍक्ट).
पोलीस विभाग सरकारकडे गेले. त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या वेतनाचा आणि इतर खर्च आता महापालिकेने आरोग्य विभागावर करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती साळुंखे देतात.

फोटो स्रोत, Getty Images
हे बदल झाल्यानंतर महापालिकेला स्वतःचं हॉस्पिटल उभा करायचं होतं. त्यांचे दवाखाने होते. जीटी हॉस्पिटलला काही प्रमाणात महापालिकेची मदत होती. आणि बाकीची सर्व हॉस्पिटल्स एक तर खासगी, ट्रस्टची किंवा सरकारची होती, असं साळुंखे यांनी सांगितलं.
त्यावेळी आरोग्य अधिकारी म्हणून जॉर्ज टर्नर होते. त्यांना 100 बेडच्या हॉस्पिटलची तत्काळ गरज होती. परळ विभागामधील गिरणी कामगारांची गरज ओळखून टीबीसाठी त्यांना हॉस्पिटल उभा करायचं होतं. एक खासगी हॉस्पिटल घेण्याबाबत चर्चाही सुरू होती.
त्याच काळात म्हणजे 1910 च्या सुमारास किंग एडवर्ड यांचं निधन झालं. त्यावेळी मुंबईतील नामांकित लोकांनी एकत्रित येऊन हॉस्पिटल सुरू करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी वर्गणी जमा केली. नंतर हव्या त्या प्रमाणात पैसे जमा होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग ते महानगरपालिकेकडे गेले.
महानगरपालिकेनं सकारात्मकता दाखवली आणि ते मदतीला तयार झाले. परंतु, त्यांनी त्या हॉस्पिटलवर त्यांचं नियंत्रण राहील असं सांगितलं. मग हे हॉस्पिटल उभा राहिलं, अशी माहिती नितीन साळुंखे यांनी दिली.
मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सुरू
खाकी टुर्सचे भारत गोठोसकर पुढे म्हणाले की, "त्याच काळात डॉ. के.एम. बहादूरजी यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजमधील भेदभावाला विरोध करत भारतीय डॉक्टरांनी चालवलेलं नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्याची कल्पना मांडली होती."
"या दोन्ही प्रयत्नांना एकत्रित रूप मिळालं आणि 1926 मध्ये परळ येथील गव्हर्नर इस्टेटवर किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि शेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज सुरू झालं."
गोठोसकर यांनी सांगितलं की, या हॉस्पिटल आणि कॉलेजच्या सुरुवातीच्या काळात डॉ. गोपालराव देशमुख यांनी मोठी भूमिका बजावली. ते मुंबई महापालिकेतही सक्रिय होते आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्तीचं काम त्यांनी पाहिली. तसेच पहिले डीन डॉ. जीवराज मेहता पुढे गुजरातचे मुख्यमंत्री झाले.
हॉस्पिटल आणि कॉलेजच्या इमारतींची रचना जॉर्ज विटेट यांनी केली. त्यांना डब्ल्यू.ए. पाईट यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जीवराज मेहता यांच्या सूचनेनुसार दोन्ही इमारती वेगळ्या पण परस्पर जोडलेल्या बांधण्यात आल्या.

फोटो स्रोत, Getty Images
केईएम हे भारतातील पहिलं असं हॉस्पिटल ठरलं, जिथे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) मुख्य इमारतीतच होता. त्याआधी भारतातील शिक्षण देणाऱ्या रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र इमारती असत, अशी माहिती भारत गोठोसकर यांनी दिली.
22 जानेवारी 1926 रोजी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. पहिला रुग्ण फेब्रुवारी 1926 मध्ये घेतला असं लेखक नितीन साळुंखे यांनी सांगितलं. देशातील महापालिकेचं स्वतंत्र अत्याधुनिक हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज असलेली मुंबई ही पहिली महापालिका असल्याचे ते म्हणाले. नितीन साळुंखे हे सध्या केईएमच्या इतिहासावर लेखन करत आहेत.
केईएम हे त्या काळातील सर्वात अत्याधुनिक असं हॉस्पिटल होतं. केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशभरातूनही तिथे रुग्ण उपचारासाठी येऊ लागले. केईएम नावाने केवळ मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भागात हॉस्पिटल्स, डिस्पेन्सरी असल्याचे साळुंखे यांनी यावेळी सांगितलं.
दरवर्षी ओपीडीत 18 लाख रुग्णांवर उपचार
या हॉस्पिटलमध्ये सध्या सुमारे 390 वरिष्ठ डॉक्टर आणि 550 निवासी डॉक्टर सेवेत आहेत. त्यांच्या मदतीने 1800 खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये दरवर्षी सुमारे 18 लाख बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि 85 हजार आंतररुग्णांवर उपचार केला जातो, असं केईएमच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.
येथे सामान्य उपचारांपासून ते अत्याधुनिक वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत. समाजातील गरीब आणि वंचित घटकांना येथे अत्यल्प खर्चात, अनेकदा मोफत आरोग्यसेवा दिली जाते.
केईएम हॉस्पिटलला भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून राष्ट्रीय दुर्मीळ आजार धोरण 2021 अंतर्गत दुर्मीळ आजारांवरील उपचारासाठी देशातील 8 उत्कृष्ट केंद्रांपैकी एक म्हणून मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाच्या कठीण काळात केईएमने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोरोना रुग्णांसाठी विशेष वॉर्ड्स आणि आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
केईएम हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी, स्पोर्ट्स मेडिसिन आणि नवीन आयसीयू सेंटरसारख्या आधुनिक सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे केईएमच्या डीन डॉ. संगीता रावत यांनी माध्यमांना सांगितलं होतं. हॉस्पिटलला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त माध्यमांशी त्यांनी संवाद साधला होता. नवीन सुविधांमुळे रुग्णांना अधिक चांगले आणि प्रगत उपचार मिळतील असंही त्या म्हणाल्या होत्या.
केईएमची रुग्णसेवा परंपरा खूप मोठी आहे. या हॉस्पिटलला मोठा इतिहास आहे. हॉस्पिटल उभं करण्यासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलं आहे. त्यामुळे याचं नाव बदलल्यास तो सर्व इतिहास पुसला जाईल, त्यामुळे नाव बदललं जावू नये असं आग्रही मत लेखक नितीन साळुंखे यांनी मांडलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























