'कपाळी आडवी चिरी, दारी ज्ञानाची पणती', काय आहे सावित्री उत्सव? कसा साजरा होतो?

या फोटोत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी त्यांच्या मुलीसोबत सावित्री उत्सव साजरा करताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Instagram/SonaliKul

फोटो कॅप्शन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी त्यांच्या मुलीसोबत सावित्री उत्सव साजरा करताना.
    • Author, प्रविण सिंधू
    • Role, बीबीसी मराठी

आपण सार्वजनिक ठिकाणी समाजसुधारकांच्या जयंती आणि पुण्यातिथी साजऱ्या होताना अनेकदा पाहतो. मात्र, सध्या महाराष्ट्रात एका समाजसुधारकाच्या जयंतीचा उत्सव सणाप्रमाणे साजरा केला जात आहे. त्या आहेत स्त्रीशिक्षणाची सुरुवात करणाऱ्या आणि पहिल्या महिला शिक्षिका अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले.

काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये, शाळा, महाविद्यालयांमध्ये नवीन वर्षातला पहिला उत्सव म्हणून सावित्री उत्सव साजरा केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर हा सावित्री उत्सव कधीपासून साजरा होत आहे? हा उत्सव सुरू करण्यामागे कोण आहेत? यामागे त्यांचा विचार काय? हा उत्सव का साजरा केला जातो? आणि या उत्सवाचं स्वरुप काय आहे? जाणून घेऊयात.

सावित्री उत्सव कधीपासून सुरू झाला?

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीला उत्सवाचं रुप यावं आणि हा उत्सव घराघरात साजरा व्हावा, ही कल्पना सर्वप्रथम 2008 मध्ये राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते शरद कदम यांना सुचली.

या फोटोत सावित्री उत्सवानिमित्त काढलेली रांगोळी दिसत आहे.
फोटो कॅप्शन, सावित्री उत्सवानिमित्त काढलेली रांगोळी

त्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदा घाटकोपरला 3 जानेवारीला एक मोठा मेळावा आयोजित करण्यात आला. तिथूनच सावित्री उत्सवाची सुरुवात झाली.

पुढे सावित्रीबाई फुलेंबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, सुहिता थत्ते यांनीही सावित्री उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला.

तसेच नागरिकांना या उत्सवात सहभागी होत घरोघरी सावित्रीबाईंच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन केलं. यानंतर सावित्री उत्सवाला अधिक व्यापक रुप आलं.

सावित्री उत्सव का साजरा केला जातो?

शरद कदम याबाबत बोलताना म्हणाले की, "सावित्रीबाईंमुळे माझी आई शिकली, बायको शिकली, मुलगी शिकली आणि एकूणच महिलांना मोठ्या प्रमाणात शिक्षण मिळालं. पण त्या सावित्रीबाईंचं फार कौतुक होत नाही, असा विचार आला. त्या विचारातूनच सावित्री उत्सवाचा जन्म झाला."

अमेरिकेतील शार्लेट येथे सावित्री उत्सव साजरा करताना सुप्रिया महेश भोर आणि त्यांच्या मुली.

फोटो स्रोत, Facebook/savitriutsav

फोटो कॅप्शन, अमेरिकेतील शार्लेट येथे सावित्री उत्सव साजरा करताना सुप्रिया महेश भोर आणि त्यांच्या मुली.

"घाटकोपर इथं पहिल्यांदा आयोजित केलेल्या सावित्री उत्सवाला जवळपास 6-7 हजार माणसं आली होती. तोपर्यंत सावित्रीबाई जयंती किंवा पुण्यतिथी साजरी केली जायची. मात्र त्याच्या मर्यादा होत्या.

जयंती-पुण्यतिथीचं स्वरुप सार्वजनिक स्वरुपाचं होतं. त्यामुळे सावित्रीबाईंचा विचार घराघरात जावा, तो घरातील प्रत्येकाने साजरा करावा म्हणून त्याला उत्सवाचं रुप दिलं," असं शरद कदम यांनी सांगितलं.

"आपण महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा म्हणतो. पण तरी या समाजसुधारकांचे दिवस घरात साजरे केले जात नाहीत. सार्वजनिक कार्यक्रम होतात, भाषणं होतात आणि लोक निघून जातात. त्यामुळे सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम घरा-घरांत झाला पाहिजे असा आम्ही आग्रह धरला," असंही कदम नमूद करतात.

लाल रेष
लाल रेष

सावित्रीबाई फुले या स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट चालत राहिल्यामुळेच आज बहुजनांची, स्त्रियांची वाट प्रशस्त झाली, असं मत राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या सिरत सातपुते यांनी व्यक्त केलं.

मालती माने विद्यालय इचलकरंजी येथे सावित्री उत्सव साजरा करताना मुख्याध्यापक संजय रेंदाळकर आणि इतर शिक्षक.

फोटो स्रोत, Facebook/savitriutsav

फोटो कॅप्शन, मालती माने विद्यालय इचलकरंजी येथे सावित्री उत्सव साजरा करताना मुख्याध्यापक संजय रेंदाळकर आणि इतर शिक्षक. यावेळी शिक्षकांना पुस्तके देवून आनंद व्यक्त केला.

या वाटेवरुन चालताना सावित्रीबाईंची आठवण घराघरांत जागवायलाच हवी, या उद्देशाने सावित्री उत्सव साजरा केला जातो, असंही त्यांनी सांगितलं.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मोठ्या उत्साहात सावित्री उत्सव साजरा करतात. त्या म्हणाल्या की, "भारतातील स्त्रियांना सावित्रीबाईंनी शिक्षणाची वाट दाखवली. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी शेण, दगडधोंडे, तोंडाला काळं फासणं सहन केलं. ही सर्व मुस्कटदाबी होत असतानाही त्यांनी ज्ञानाच्या हक्काची कास कधी सोडली नाही."

"नववर्ष सुरू होताना सावित्रीबाईंची आठवण काढणं, त्यांच्या स्मरणाने नव वर्ष सुरू करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व वयाच्या माणसांनी सावित्री उत्सव साजरा केला पाहिजे," असंही सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनीही सावित्रीबाई फुलेंच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, "सावित्री उत्सव साजरा करणं ही माझ्यासारख्या बाईकडून आदरांजली आहे. आज मला जो माणूसपणाचा दर्जा मिळाला तो माझ्या शिक्षणामुळे मिळाला आहे. हे शिक्षण ज्या बाईने सुरू केलं, ज्या मातेनं सुरू केलं तिची आठवण करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, असं मी समजते. त्यांचं स्मरण करणं आणि स्मरण करून देण्यासाठी प्रत्येक वर्षातील माझा सर्वात पहिला सण 3 जानेवारीला असतो."

कसा साजरा केला जातो सावित्री उत्सव ?

सावित्री उत्सव साजरा करताना घरासमोर कंदील लावला जातो, दाराला फुलांचं तोरण बांधलं जातं, रांगोळी काढली जाते, घरात गोडधोड बनवलं जातं, उंबऱ्यावर ज्ञानाची पणती लावून आणि सावित्रीबाईंसारखी कपाळावर आडवी चिरी लावून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते.

जळगावमधील यावल तालुक्यात पिंपरुड जिल्हा परिषद शाळेतही सावित्री उत्सव साजरा करण्यात आला.

फोटो स्रोत, Facebook/savitriutsav

फोटो कॅप्शन, जळगावमधील यावल तालुक्यात पिंपरुड जिल्हा परिषद शाळेतही सावित्री उत्सव साजरा करण्यात आला.

सामाजिक कायकर्ते आणि सिनेकलाकारांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आता अनेक घरांमध्ये या दिवशी सणासारखे वातावरण असते.

अनेक महिला, विद्यार्थीनी सावित्रीबाईंसारखी कपाळावर आडवी चिरी लावून शाळेत, ऑफिसमध्ये जातात. तिथेही सावित्री उत्सव साजरा करतात. तसेच हा उत्सव साजरा केल्याबाबत समाज माध्यमांवर आपल्या भावना व्यक्त केल्या जातात.

सावित्री उत्सवात सहभागी झालेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुहिता थत्ते, मुक्ता दाभोलकर व इतर
फोटो कॅप्शन, सावित्री उत्सवात सहभागी झालेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुहिता थत्ते, मुक्ता दाभोलकर व इतर

2014-15 मध्ये रविंद्र नाट्य मंदिर येथील सावित्री उत्सवाच्या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी, मुक्ता दाभोलकर, सुहिता थत्ते यांनी सावित्रीबाई जशा आडवी चिरी लावायच्या तशी आडवी चिरी लावून सावित्री उत्सव साजरा केला तर प्रतिकात्मक संदेश देता येईल, अशी सूचना केली.

त्या स्वतःही चिरी लावून आल्या. तेव्हापासून सावित्री उत्सव साजरा करताना इतर महिलांनीही चिरी लावण्यास सुरुवात केली, अशी माहिती शरद कदम यांनी दिली.

या फोटोत अभिनेत्री चिन्मयी सुमीत सावित्री उत्सव साजरा करताना दिसत आहे.
फोटो कॅप्शन, अभिनेत्री चिन्मयी सुमीत सावित्री उत्सव साजरा करताना.

सावित्री उत्सवात वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या महिलांना 'सावित्रीच्या लेकी' असा पुरस्कारही देण्यात येतो.

भाषणाऐवजी या पुरस्कारप्राप्त महिलांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली जाते किंवा त्यांची कुणी मुलाखत घेत त्यांना बोलतं केलं जातं.

सावित्री उत्सवाच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं स्वरुपही बदलण्यात आलं. त्यामुळेच यात तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळतो.

स्वीडनहून भारतात आलेल्या तरुणींचा सावित्री उत्सवात सहभाग
फोटो कॅप्शन, स्वीडनहून भारतात आलेल्या तरुणींचा सावित्री उत्सवात सहभाग

सावित्री उत्सवाच्या स्वरुपावर बोलताना शरद कदम म्हणाले, "दिवाळीचं कुणीही कुणाला आमंत्रण देत नाही, त्याचप्रमाणे सावित्री उत्सवाचं आमंत्रण न देता तो उत्स्फुर्तपणे साजरा व्हावा असा विचार होता. त्यानुसार, घरासमोर रांगोळी काढावी, घराला तोरण लावावं, आकाश कंदील लावावा, असं आवाहन नागरिकांना करण्यात येतं."

"पुस्तक वाचा, भाषणाला या म्हटलं की फार मोजकी लोक येतात. अनेकांना वर्तमानपत्र विकत घेऊन वाचणं शक्य नाही, तिथं 200-300 रुपयांचं पुस्तक घेणं अधिक कठीण होतं. त्यामुळे सावित्री उत्सवाचं स्वरुप असं ठेवलं आहे ज्यात सर्वांना सहभागी होता येईल," अशी माहिती शरद कदम यांनी दिली.

सावित्री उत्सव

सिरत सातपुते म्हणाल्या, "महामानवांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातातच, परंतु घराघरांत या निमित्ताने सण साजरा होणारं सावित्री उत्सव हे एकमेव उदाहरण आहे. सावित्री उत्सवच्या निमित्तानं सावित्रीबाईंचे विचार घराघरांत पोहोचत आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त होत आहे."

"आम्ही सावित्रीच्या लेकी असे म्हणत सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या आणि परिवर्तनाच्या वाटेवर अनेकजणी चालत आहेत. म्हणूनच प्रबोधनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ देणारा हा सावित्री उत्सव घराघरांत साजरा करायला हवा," असं सिरत सातपुते नमूद करतात.

सावित्री उत्सवातील प्रतिकात्मकता

सावित्री उत्सवात दिसणाऱ्या प्रतिकात्मकतेवर बोलताना अभिनेत्री चिन्मयी सुमीत म्हणाल्या, "राष्ट्र सेवा दलाने सावित्री उत्सव साजरा करावा असं आवाहन केलं होतं. खरंतर आजूबाजूला वेगवेगळे झेंडे, घोषणा अशी प्रचंड प्रतिकात्मकता सुरू असताना आपणही अशी प्रतिकात्मकता करावी का असा प्रश्न मनात उपस्थित झाला होता.

प्रतिकांमध्ये किती अडकून पडायचं हाही विचार मनात येऊन गेला. मात्र, त्याचवेळी हेही वाटलं की, समाजाला काही गोष्टींची आठवण करून देण्यासाठी हे केलं पाहिजे."

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

"सुरुवातीचा टप्पा म्हणून लोकांना सावित्रीबाई आणि त्यांच्या कामाची जाणीव करून द्यावी म्हणून सावित्री उत्सवाचं स्वरुप साधं प्रतिकात्मक ठेवण्यात आलं. एकदा जाणीव निर्माण झाली की मग हा उत्सव पुढच्या टप्प्याकडे जाईल," असं म्हणत शरद कदम यांनी सावित्री उत्सवाची पुढील दिशा स्पष्ट केली.

सावित्री उत्सव कुठे साजरा केला जातो?

सुरुवातीला अगदी छोट्या स्वरुपात साजरा होत असलेला सावित्री उत्सव आता व्यापक झाला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. इतकंच नाही, तर आता गोव्यातही याची सुरुवात होत आहे. याशिवाय अमेरिका, इंग्लंडसारख्या देशात असलेल्या काही भारतीयांकडूनही हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

कल्याणमध्ये कायद्याने वागा चळवळीचे कार्यकर्ते राज असरोंडकर सावित्री-फातिमा उत्सव साजरा करतात.

इंग्लंडमधील लेमिंक्शन स्पा येथे सावित्री उत्सव साजरा करताना सोनाली दातीर आणि डॉ. मानसी कदम
फोटो कॅप्शन, इंग्लंडमधील लेमिंक्शन स्पा येथे सावित्री उत्सव साजरा करताना सोनाली दातीर आणि डॉ. मानसी कदम

लंडनमधील एका एनएचएस हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या डॉ. मानसी कदम म्हणाल्या, "मराठी माध्यमात शिकल्यानंतर मी जी.एस. मेडिकल कॉलेजमधून डिग्री घेतली. मुंबईच्या नायर रुग्णालयातून मास्टर केले. हे सर्व सावित्रीबाई फुले, जोतिबा फुले, फातिमा शेख यांच्यामुळं शक्य झालं. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आहे."

"3 जानेवारीला सावित्रीबाईंचा जन्म दिवस असतो आणि हा दिवस सावित्री उत्सव म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. मीही इथल्या माझ्या घरी सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी दरवाज्यावर एक दिवा लावणार आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहे. इथल्या माझ्या भारतीय मैत्रीणींनाही मी आवाहन केलं आहे," अशी प्रतिक्रिया मानसी कदम यांनी दिली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)