लहान मुलांना केवळ व्हिगन आहार देत असाल तर नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जॅस्मिन फॉक्स स्केली
- Role, बीबीसी न्यूज
जगभरात व्हिगन जीवनशैलीचा प्रसार होतो आहे. व्हिगन जीवनशैली म्हणजे आहारात मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ (डेअरी प्रॉडक्ट्स) यांचा अजिबात समावेश नसणं. केवळ वनस्पतींपासूनच तयार झालेले अन्नपदार्थ खाण्या-पिण्याला वीगन जीवनशैली म्हणतात.
अर्थात यासंदर्भातील आकडेवारी मर्यादित आहे. मात्र 2018 मध्ये जगभरातील जवळपास तीन टक्के लोकं व्हिगन जीवनशैलीचा अवलंब करत होते.
व्हिगन आहारात प्राण्यांपासून तयार होणारे अन्नपदार्थ किंवा आहार व्यर्ज असतो. म्हणजेच मांसाहार आणि दुग्धजन्य उत्पादनं, तसंच प्राण्यांपासून तयार केलेल्या उत्पादनांचं (ॲनिमल प्रॉडक्ट) अजिबात सेवन केलं जात नाही. फक्त शाकाहारी आहारच घेतला जातो.
2023 मध्ये अमेरिकेत एक गॅलप पोल म्हणजे लोकांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात एक टक्का लोकांनी सांगितलं की ते व्हिगन आहार घेतात.
अर्थात द व्हिगन सोसायटीच्या सर्वेक्षणात म्हटलं आहे की ब्रिटनमधील जवळपास तीन टक्के लोक म्हणजे जवळपास 20 लाख लोक पूर्णपणे व्हिगन आहार घेतात.
व्हिगन आहार घेतल्यामुळे होणाऱ्या फायद्यांना दुजोरा मिळाला आहे. यातील पहिला मुद्दा म्हणजे व्हिगन आहारात मांस आणि दुग्धजन्य उत्पादनांचा वापर केला जात नाही. मांस आणि दुग्धजन्य उत्पादनांमुळे पर्यावरणाची हानी होते असं मानलं जातं.
दुसरा मुद्दा म्हणजे, वनस्पती किंवा भाजीपाल्यातून मिळणारं अन्न हा अधिक टिकाऊ, योग्य पर्याय मानला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
संतुलित आणि वैविध्यपूर्ण व्हिगन आहार आरोग्यासाठी लाभदायी असतो, याचे पुरावेदेखील समोर आले आहेत.
अर्थात काही बालकांच्या बाबतीत व्हिगन आहारामुळे गंभीर स्वरुपाचं कुपोषण झाल्याची बाब समोर आल्यानंतर, व्हिगन आहार मुलांसाठी चांगला नसल्याचं लोक म्हणू लागले आहेत.
मात्र, व्हिगन आहारामुळे मुलांच्या आरोग्याला अपाय होतो का, यावर तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत.
अमेरिका आणि ब्रिटनमधील अधिकृत पोषण संस्थांचं म्हणणं आहे की योग्यप्रकारे जर व्हिगन आहाराचं नियोजन केलं, तर तो बालकांसाठी आणि मुलांसाठी सुरक्षित किंवा आरोग्यदायी ठरू शकतो.
मात्र फ्रान्स, बेल्जियम आणि पोलंडमधील आरोग्य अधिकारी याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
दुर्दैवानं आतापर्यंत व्हिगन आहाराचा मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, यावर खूप कमी संशोधन झालं आहे. अर्थात आता यावर जो अभ्यास होतो आहे, त्यातून यासंदर्भात नवीन माहिती समोर येते आहे.
व्हिगन आहार घेणारे कोणत्या गोष्टी किंवा पदार्थ खात नाहीत.
व्हिगन जीवनशैलीचं पालन करणारे, प्राण्यांपासून मिळणारे अन्नपदार्थ म्हणजे ॲनिमल प्रॉडक्ट खात नाहीत. या आहारात मांस, मासे, अंडी आणि दूध व्यर्ज्य असतं. व्हिगन आहारात फळं, फुलं, भाजीपाला, सुकामेवा, बिया, डाळी, ब्रेड, पास्ता यासारख्या गोष्टींचा समावेश असतो.
संशोधनातून काय समोर आलं?
फेडेरिका अमाती, लंडनच्या इंपेरियल कॉलेजमध्ये पोषण वैज्ञानिक आणि जेओई कंपनीत प्रमुख पोषणतज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात, "आम्हाला आढळलं आहे की या आहाराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यामुळे ह्रदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत होते."
"जे लोक व्हिगन आहार घेतात, त्यांच्या शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉलचं (वाईट कोलेस्ट्रॉल) प्रमाण कमी असतं. रक्ताच्या धमन्यांमधील ब्लॉकेज कमी होतात. त्यामुळे हृदयविकार आणि हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो."
"व्हिगन आहार घेणारे लोक सर्वसाधारणपणे सडपातळ शरीरयष्टीचे असतात. त्यांना लठ्ठपणाचा धोका कमी असतो."
व्हिगन आहारामुळे टाईप 2 मधुमेह आणि कोलोरेक्टर कर्करोगासारख्या काही कर्करोगांचा धोका देखील कमी होतो.

फोटो स्रोत, Getty Images
याचं कारण व्हिगन आहारात भाजीपाल्याचा वापर अधिक होतो. भाजीपाल्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. फायबर हा एक महत्त्वाचा पोषक घटक आहे. मात्र 90 टक्के लोकांमध्ये त्याची कमतरता असते.
वनस्पती किंवा भाजीपाल्यामध्ये पॉलीफेनॉल असतं. यात अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे ह्रदयविकाराचा झटका, हृदयरोग आणि मधुमेहसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
मांस आणि दुग्धजन्य उत्पादनांमध्ये सर्वसाधारणपणे सॅच्युरेटेड फॅट असतं. या अन्नपदार्थांचं जास्त सेवन केल्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं. त्यातून हृदयरोगाचा धोका वाढतो.
अमाती म्हणतात, "आपण जे अन्न खातो, त्यातून आपल्या शरीराला काय मिळतं आहे आणि कशाप्रकारे मिळतं आहे, हे पाहणं आवश्यक असतं."
"जर तुम्ही मांसाहार करत असाल, तर त्यातून तुम्हाला प्रोटीन, आयर्न, झिंक आणि काही मायक्रो न्युर्टिएंट्स मिळतात. मात्र त्याचबरोबर तुम्हाला सॅच्युरेटेड फॅट आणि कार्निटिन सारखी रसायनांचं सेवनदेखील करत असता."
"या प्रकारच्या अन्नामुळे तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढू शकते, मात्र त्यामुळे आतड्यांची सूज वाढू शकते, असं मानलं जातं."

फोटो स्रोत, Getty Images
अमाती म्हणतात, "मात्र जर तुम्ही एडामेमे (एक प्रकारचा सोयाबीन) खात असाल तर त्यात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. शिवाय त्यात फायबर, प्रोटीन, व्हिटामिन, खनिजं आणि पॉलीफेनॉलसारखे आरोग्यदायी घटकदेखील असतात."
मात्र व्हिगन आहार जर संतुलित असला तरच चांगला ठरू शकतो.
आहारासाठी फळं, भाजीपाल्यावर जास्त अवलंबून राहिल्यामुळे तुमच्या शरीरात काही पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. हे पोषक तत्वं मांस, मासे, अंडी आणि दुधातून मिळतात.
व्हिटामिन बी-12 ची कमतरता
शरीराला आवश्यक असलेलं व्हिटामिन बी-12 चं प्रमाण राखणं हे एक मोठं आव्हान असतं. हे एकप्रकारचं मायक्रो न्युट्रिएंट आहे. प्राण्यांच्या शरीरात आढळणारे जिवाणूच फक्त त्याची निर्मिती करतात.
मांस, मासे, अंडी, दुग्धजन्य उत्पादनं इत्यादीमध्ये व्हिटामिन बी-12 असतं.
व्हिगन आहारात व्हिटामिन बी-12 मिळवायचं असेल तर त्यासाठी न्युट्रिशनल यीस्ट, मार्माइट, नोरी सीविड फोर्टिफाइड दूध किंवा तृणधान्य आणि सप्लीमेंट्स हे पर्याय आहेत.
मात्र व्हिगन आहार घेणारे अनेकजण सप्लीमेंट घेत नाहीत. अशा लोकांमध्ये व्हिटामिन बी-12 ची कमतरता असते.

फोटो स्रोत, Getty Images
व्हिटामिन बी-12 मेंदूच्या नसांसाठी आवश्यक असतं. निरोगी लाल रक्तपेशी तयार होण्यासाठीदेखील ते उपयुक्त असतं.
प्रौढांमध्ये याची कमतरता उशीरानं लक्षात येते. कारण त्यांचं शरीर हे व्हिटामिन साठवून ठेवतं. मात्र मुलांमध्ये याची कमतरता लवकर दिसू शकते.
उदाहरणार्थ, काही अहवालांमध्ये आढळून आलं आहे की व्हिगन आहार घेणाऱ्या मातांच्या स्तनपानावर अवलंबून असलेल्या बाळांमध्ये व्हिटामिन बी-12 च्या कमतरतेमुळे न्युरोलॉजिकल अडचणी निर्माण झाल्या.
अमाती म्हणतात, "मुलांना पोषणाची सर्वाधिक आवश्यकता असते. कारण त्यांच्या शरीरात नवीन पेशी तयार होत असतात. तुमच्यासमोर त्यांचं शरीर तयार होत असतं."
त्या म्हणतात, "जर मुलांच्या शरीराची वाढ होण्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांना व्हिटामिन बी-12 सारखे पोषक तत्वं मिळाले नाहीत, तर त्यामुळे मज्जासंस्था आणि लाल रक्तपेशींचं नुकसान होतं. यामुळे त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर आणि मेंदूच्या विकासावर परिणाम होऊ शकतो."
ओमेगा-3 च्या कमतरतेची शक्यता
व्हिगन आहार घेणाऱ्या मुलांमध्ये ओमेगा-3 ची कमतरता दिसू शकते. या पॉली अनसॅच्युरेटेड फॅटमुळे बायलिपिड मेंब्रेन तयार होतं. शरीरातील प्रत्येक पेशीचं त्यातून आवरण तयार होतं. मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी हे खूप आवश्यक असतं.

फोटो स्रोत, Getty Images
ओमेगा-3 मुळे आरोग्याला हा फायदा होतो. मात्र ईपीए (इकोसापेंटेनॉइक ॲसिड) आणि डीएचए (डोकोसाहेक्सॅनॉइक ॲसिड), फक्त मासे आणि शेवाळांमध्येच असतं.
अल्फा-लिनोलेनिक ॲसिड (एएलए) हा ओमेगा-3 चा प्रकार चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्सबरोबर पानं असलेल्या हिरव्या भाज्यांमध्ये असतो.
अर्थात ईपीए आणि डीएचए जितकं आरोग्यासाठी चांगलं असतं तितकं एएलए नसतं.
भाजीपाल्यातून कॅल्शियम, व्हिटामिन डी आणि आयोडीनसारखे पोषक तत्वदेखील मिळतात. मात्र त्यांचं प्रमाण कमी असतं.
मुलांमध्ये पोषणाचा अभाव
व्हिगन आहार घेणाऱ्या मुलांमध्ये पोषणाच्या संदर्भात वेगवेगळ्या गंभीर बाबी समोर आल्या आहेत.
2016 मध्ये इटलीच्या मिलान शहरात एक वर्षाच्या व्हिगन मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. कारण त्याच्या रक्तात कॅल्शियमचं प्रमाण गंभीररित्या कमी झालं होतं.
2017 मध्ये बेल्जियममध्ये एका सात महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. कारण त्याचे आई-वडील त्याला फक्त व्हिगन दूध (ओट्स, धान्य, तांदूळ, किनोआपासून तयार करण्यात आलेलं) पाजत होते.

फोटो स्रोत, Getty Images
व्हिगन लोकांच्या बाबतीतील चांगली बाब म्हणजे, या न्युट्रिएंट्सची कमतरता सप्लीमेंट्स आणि फोर्टिफाईड धान्य आणि दूधाद्वारे दूर केली जाऊ शकते.
मालगोर्टजा डेसमंड, लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधील क्लिनिकल डायटेशियन आणि मानद रिसर्च फेलो आहेत. त्या म्हणतात, "शरीरातील व्हिटामिन बी-12 ची कमतरता आपण सप्लीमेंट घेऊन पूर्णपणे दूर करू शकतो. हा सर्वात सोपा मार्ग आहे."
मात्र आयर्न आणि झिंक सारख्या पोषक तत्वांवर अधिक लक्ष दिलं पाहिजे.
हिरव्या भाज्यांमध्ये हे पोषक घटक असतात. मात्र मांस किंवा दुग्धजन्य उत्पादनांच्या तुलनेत शरीरात त्यांचं शोषण कमी प्रमाणात होतं.
एखाद्या मुलाला सर्व आवश्यक पोषक घटक सप्लीमेंट्स आणि सर्व गोष्टींचा विचार करून तयार करण्यात आलेल्या आहारातून मिळू शकतात. मात्र अभ्यासातून दिसून येतं की नेहमी असं होत नाही.
सावधपणे करायला हवं आहाराचं नियोजन
2021 मध्ये डेसमंड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलंडमध्ये 187 मुलांचा अभ्यास केला. ही मुलं एकतर व्हिगन होते किंवा शाकाहारी होते किंवा ते वीगन आणि बिगर वीगन आहार दोन्ही घेत होते.
दोन-तृतियांश व्हिगन आणि शाकाहारी मुलांनी बी-12 च्या सप्लीमेंट्स घेतल्या होत्या. मात्र एकूणच व्हिगन मुलांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं. तसंच ते आयर्न, व्हिटामिन डी आणि बी-12 ची कमतरतेला तोंड देत होते.

फोटो स्रोत, Getty Images
या अभ्यासानुसार, व्हिगन आणि ॲनिमल प्रॉडक्ट खाणाऱ्या मुलांच्या तुलनेत फक्त व्हिगन आहार घेणाऱ्या मुलांचं आरोग्य काही बाबतीत वेगळं होतं.
मात्र यातील चांगली गोष्ट अशी होती की व्हिगन आहार घेणारी मुलं सडपातळ होती. त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे भविष्यात त्यांना हृदयरोग होण्याचा धोका कमी होता. त्यांच्या शरीरात सूज असण्याची चिन्हं फार कमी आढळली.
मुलांच्या उंचीवर होणारा परिणाम
अभ्यासानुसार, ॲनिमल प्रॉडक्ट खाणाऱ्या मुलांच्या तुलनेत व्हिगन आहार घेणाऱ्या मुलांची उंची कमी दिसून आली.
वीगन आहार घेणाऱ्या मुलांची उंची तीन ते चार सेंटीमीटर कमी होती. अर्थात व्हिगन आहार घेणाऱ्या मुलांची उंची त्यांच्या वयानुसार सामान्य होती.
डेसमंड म्हणतात, "ते (व्हिगन आहार घेणारी मुलं) थोडे कमी उंचीचे आणि कमी वजनाचे असू शकतात. मात्र, किशोरावस्थेत येईपर्यंत व्हिगन मुलं ॲनिमल प्रॉडक्ट खाणाऱ्या मुलांच्या बरोबरीचे होतील की नाही हे आम्हाला माहित नाही."
मात्र यात अधिक चिंतेची बाब म्हणजे शाकाहारी मुलांच्या हाडांची घनता, ॲनिमल प्रॉडक्ट खाणाऱ्या मुलांच्या तुलनेत सहा टक्के कमी होती.
याचा अर्थ, भविष्यात व्हिगन आहार घेणाऱ्या मुलांना ऑस्टियोपोरोसिस आणि फ्रॅक्चरचा अधिक धोका असू शकतो.
डेसमंड म्हणतात, "आपल्याकडे हाडांना मजबूत करण्याचा फार मर्यादित वेळ असतो. वयाच्या साधारण 25 ते 30 व्या वर्षांपर्यंतच हाडं मजबूत होतात. त्यानंतर आपल्या हाडांमधील मिनरल्सचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं."
"जर तुमच्या हाडांमध्ये वयाच्या 25 वर्षांपर्यंत पुरेसे मिनरल्स तयार झाले नाहीत, तर मग ते कमी होऊ लागतात."

फोटो स्रोत, Getty Images
व्हिगन आहार घेणाऱ्या प्रौढांवर झालेल्या अभ्यासानुसार त्यांच्या हाडांमध्ये देखील ॲनिमल प्रॉडक्ट खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत मिनरल्सची घनता कमी असते. त्यामुळे त्यांना फ्रॅक्चर होण्याचा अधिक धोका असतो.
अर्थात मिनरल्सची कमतरता नेमकी कशामुळे त्यामागच्या योग्य कारणाचं पूर्ण आकलन अद्याप झालेलं नाही.
हाडं मजबूत होण्यासाठी आणि त्यांची झीज टाळण्यासाठी व्हिटामिन डी आणि कॅल्शियम दोघांचीही आवश्यकता असते.
मात्र डेसमंड यांचं म्हणणं आहे की 2021 मध्ये त्यांनी केलेल्या अभ्यासात, व्हिगन मुलांमध्ये कॅल्शियमचं सेवन इतर मुलांच्या तुलनेत कमी होतं. मात्र हा फरक खूप जास्त नव्हता.
डेसमंड म्हणतात, "मला वाटतं की यामागं अनेक कारणं आहेत. फक्त कॅल्शियमची गोळी घेतल्यामुळे ही समस्या सुटणार नाही. कारण भाज्यांमधून मिळणाऱ्या प्रोटीनच्या गुणवत्तेवर देखील ते अवलंबून असू शकतं. ते प्राण्यांमधून मिळणाऱ्या प्रोटीनच्या तुलनेत मुलांचा विकास कमी वेगानं करतं."
असं मानलं जातं की ॲनिमल प्रोटीनमुळे शरीराची अधिक वाढ होऊ शकते. यामुळे मुलांच्या वाढीला अधिक गती मिळू शकते. सर्वसाधारणपणे प्रोटीन शरीराला वेगानं वाढण्याचे संकेत पाठवतात.
हाडांची वाढ आणि दुरुस्ती या दोन्हीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते.
अर्थात अमाती सांगतात की हे निष्कर्ष फक्त एका अभ्यासातून काढण्यात आले आहेत.
त्यामुळे लहान मुलांनी व्हिगन आहार घेणं आणि हाडांची घनता यांचा काही संबंध असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही.
काळजीपूर्वक तयार केलेला व्हिगन आहार किती सुरक्षित असतो?
डेसमंड म्हणतात, "मी असं म्हणेन की आज आपल्याकडे जी माहिती आहे, तिच्या आधारे आम्ही म्हणू शकतो की बालपणात व्हिगन आहार सुरक्षित असू शकतो. मात्र तो आपल्याला अतिशय विचारपूर्वक ठरवावा लागेल."
टॉम सँडर्स, लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये न्युट्रिशन आणि डायटेटिक्सचे मानद प्राध्यापक आहेत. ते 1970 च्या दशकापासून व्हिगन आहारावर संशोधन करत आहेत. डेसमंड यांच्या म्हणण्याशी टॉम सँडर्स देखील सहमत आहेत.
टॉम म्हणतात, "आम्ही अनेक वर्षांपूर्वी पाहिलं होतं की व्हिगन आहारावर मुलांचं संगोपन केलं जाऊ शकतं. फक्त तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की यात काय चुका होऊ शकतात."
मग प्रश्न असा आहे की मांस आणि दुग्धजन्य उत्पादनांमधून मिळणारे पोषक घटक तुम्ही अधिक प्रमाणात कसं मिळवू शकता. विशेषकरून ज्यावेळेस तुम्ही व्हिगन आहार घेत असता तेव्हा हे पोषक घटक कसे मिळवायचे.
सप्लिमेंट घेणं योग्य असतं का?
बी-12 विचार करता, काही संशोधनातून असं दिसतं की त्याची कमतरता भरून काढण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे सप्लीमेंट घेणं. अर्थात काही फोर्टिफाईड धान्य आणि वनस्पती-भाज्यांमधून मिळणाऱ्या दुधामध्ये (उदाहरणार्थ सोया किंवा बदामाचं दूध) बी-12 मिसळलं जातं.
याच प्रकारे दूध आणि दह्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटामिन डी देखील मिसळलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
अमाती असंदेखील म्हणतात की मुलांचं उन्हात जाणं, तसंच दिवसा अल्ट्राव्हायोलट किंवा अतिनील किरणांचं प्रमाण कमी असताना सूर्यप्रकाश त्वचेवर पडू देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण त्यामुळे शरीराला व्हिटामिन डी बनवता येतं.
डाळी, राजमा, छोले आणि इतर बीन्स या व्हिगन पदार्थांमधून आयर्न चांगल्या प्रमाणात मिळू शकतं.
अमाती म्हणतात, "शरीरात आयर्न शोषून घेण्यास थोडी अडचण येऊ शकते. मात्र जर तुम्ही, जेवताना सिमला मिरची, टोमॅटो आणि खारट फळांसारख्या व्हिटामिन सी युक्त पदार्थांचा समावेश केला तर ही समस्या दूर होऊ शकते."
फ्लेक्स सीड, चिया सीड हे ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे आणि अक्रोड हे एएलएचे चांगले स्त्रोत आहेत. शाकाहारी लोक समुद्री शेवाळापासून तयार करण्यात आलेल्या ओमेगा-3 च्या सप्लिमेंट घेतल्यास एपीए आणि डीएचए (हे माशांमध्ये आढळतं) ची कमतरता भरून काढली जाऊ शकते.
अल्ट्रा प्रोसेस्ड व्हिगन आहार टाळावा
अमाती म्हणतात की व्हिगन आहाराची निवड करताना वैविध्य लक्षात घेणं सर्वात चांगलं असतं. फक्त बाजारात मिळणाऱ्या खूप प्रक्रिया (पॅक्ड चीज, नगेट्स इत्यादी) केलेल्या पदार्थांवर अवलंबून राहू नये.
त्या म्हणतात, "आम्ही अशा काही लोकांना पाहिलं आहे, जे व्हिगन आहार घेत आहेत. मात्र हे लोक फक्त व्हिगन चीन आणि व्हिगन चिकन नगेट्स सारख्या वस्तू विकत घेतात. त्यामुळे त्यांच्या आहाराचा दर्जा खालावलेला राहतो."
त्या म्हणतात, "जर तुम्ही कमी पोषक तत्वं असलेला असंतुलित व्हिगन आहार घेत असाल आणि सप्लीमेंट घेऊन पोषणाची कमतरता भरू काढू इच्छित असाल तर त्यामुळे तुमच्या आरोग्याला फायदा होणार नाही."
मुलांच्या आहाराबाबत पालकांनी जागरूक असणं आवश्यक
प्रत्येक आहारतज्ज्ञ या गोष्टीवर भर देतात की आई-वडिलांनी व्हिटामिन बी-12, व्हिटामिन डी, कॅल्शियम आणि आयर्न सारख्या पोषक घटकांबद्दल स्वत: माहिती घ्यावी. यामुळे त्यांना सावधपणे त्यांच्या मुलांच्या आहाराचं नियोजन करता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
अमाती म्हणतात, "यासाठी पालकांनी एखाद्या आरोग्यतज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. विशेषकरून नोंदणीकृत बाल पोषण तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांच्या आहाराचं योग्य नियोजन करता येईल."
त्या पुढे म्हणतात, "याचबरोबर, मुलांच्या वाढीवर लक्ष ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. जर त्यांची वाढ हळूहळू होत असेल तर वेळोवेळी त्यामागची कारणं शोधली जाऊ शकतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











