तपोवन: 'जे काही करायचं आहे त्यासाठी झाडं का तोडायची?'; 'माईस हब'चा नवा वाद काय आहे?

नाशिकमध्ये गोदावरीचा पूल ओलांडून तपोवनात पोहोचलं की मोठी झाडांची गर्दी दिसू लागते. मुख्य रस्ता सोडून एक छोटा पायवाटेसारखा रस्ता आत शिरतो.
काही पावलं पुढे गेल्या एक जुनं पुराणवृक्षासारखं वडाचं झाड उभं आहे. त्याच्या असंख्य पारंब्या त्याच्या आयुष्याचा जरासा अंदाज आपल्याला देतात.
या वडाच्या पायाशी एक छोटं मंदिर आहे. समोर एक विस्तीर्ण पटांगण झाडांच्या सावलीत उभं आहे. यापंटांगणावर अनेकांची गर्दी आहे. बरेचसे नाशिककर आहेत. कोणी आजूबाजूच्या गावांमधून आले आहेत. काही अगदीकुटुंबासहित आले आहेत. काही शाळकरी मुलं आहेत.
काही सोशल मीडिया कन्टेन्ट क्रिएटर्स आहेत, रील्स शूट करत आहेत, काही जण संस्था-संघटनांचे आहेत, काहीजण हातात बोर्डस घेऊन उभे आहेत. झाडं वाचवण्याबद्दलचा संदेश त्यावर लिहिला आहे.
काही झाडांच्या बुंध्यांवर 'मला माराल तर तुम्ही मराल' असं लिहून फलक गुंडाळले आहेत. कुठं 'क्यू आर कोड' छापून तुमचा पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संध्याकाळच्या वेळेस तिथं एक टी-शर्ट विकणाराही येतोज्याच्याकडे झाडांविषयीचे संदेश देणारे टी-शर्ट्स आहेत.
नाशिकच्या या तपोवनात एक माहोल तयार झाला आहे. काहीही झालं तरीही झाडं वाचवण्याचा माहोल. पार्श्वभूमीआहे तपोवनातली काही झाडं तोडली जाण्याच्या शक्यतेची. जेव्हापासून ही बातमी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, तेव्हापासून हे ऐतिहासिक तपोवन संघर्षाचं ठिकाण बनलं आहे. नागरिक आणि सरकारचा संघर्ष.
हा संघर्ष या वनातली झाडं वाचवण्यासाठी आहे. पुढे नेमकं काय होणार या प्रश्नाबद्दल अजूनही संदिग्धता आहे. पण बघता बघता नाशिकच्या तपोवनाची बातमी देशभर पोहोचली आहे.
एका शहराचा संघर्ष
साधारण पंधरवड्यापासून सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. त्यात एका तरुणाचा एक व्हीडिओ होता, ज्यात जुन्या चिंचेच्या वृक्षावर चढून काही सांगतो आहे. तो सांगतो आहे या तपोवनातल्या झाडांच्या होणाऱ्या संभाव्य कत्तलीबद्दल.
ही झाडं का तोडली जाऊ शकतात हे तो पोटतिडकीनं सांगतो. ते थांबवायला पाहिजे असंही सांगतो. तो व्हीडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यानंतर ही बातमी सर्वत्र चर्चेचा विषय बनली.
त्या व्हिडिओतल्या त्याच चिंचेच्या झाडाखाली आम्हाला रोशन केदार भेटतो. तपोवनातल्या झाडांसाठी झगडणाऱ्या नाशिकच्या अनेक तरुणांपैकी तो एक आहे.
"या चिंचेच्या झाडावरही फुली मारलेली होती. त्या दिवशी हरकती घेण्याचा सेकंड लास्ट दिवस होता. मला वाटलं कीहे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मग आम्हाला जे जमतं ते आम्ही केलं. झाडावर चढलो आणि एक व्हिडिओकेला. आणि तो लोकांपर्यंत पोहोचला," रोशन सांगतो. त्याच्या हातात एक निळी फाईल आहे. त्यातले सगळे कागददाखवत काय काय झालं हे समजावतो.

नाशिकच्या तपोवनाचा प्रश्न हा जवळपास 1,800 झाडांचा आहे. तपोवनाच्या या परिसराला एक धार्मिक महत्व आहे. रामायणातल्या उल्लेखांनी तर नाशिक परिसरातल्या अनेक जागा भरलेल्या आहेत. त्याशिवाय दडकारण्याचा प्रांतमानलेला हा भाग इतरही अनेक पौराणिक आणि धार्मिक कारणांसाठी पवित्र मानला जातो. तपोवन ही अशीच जागा. गोदावरीच्या काठानं दोन्ही बाजूंना पसरलेला हा दाट वनराजीचा प्रदेश.
दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळ्याला देशभरातून येणाऱ्या विविध आखाड्यांच्या साधूंसाठी साधुग्राम उभारलंजातं. ते तपोवनाच्या परिसरातच उभारलं जातं. आजही इथं अनेक आखाडे, त्यांचे मठ, मंदिर या परिसरात आहेत. यासाधुग्रामसाठी तीनशे-साडेतीनशे एकर जागा लागते. इथली मोकळी जागा, शेतजमिनी असं सारं घेऊन महापालिका हेसाधुग्राम उभारत असते.
त्याच तपोवनातल्या आता गोदातीराजवळ असलेल्या साधारण 54 एकर दाट वृक्षराजीतल्या झाडांवर जेव्हा खुणा(काही ठिकाणी फुल्या आहेत, तर काहींवर बरोबरची खूण आहे) झालेल्या नागरिकांनी पाहिल्या, तेव्हा शंका बळावल्या आणि लवकरच त्या संतापात रुपांतरित झाल्या.

जेव्हा या खुणा पाहिल्या, त्यावर हरकतींसाठी लावलेल्या सूचना पाहिल्या आणि बातम्याही येणं सुरू झालं. तेव्हा साधुग्रामसाठी इथल्या झाडांवर गदा येणार असल्याचं नागरिकांच्या ध्यानात आलं. सामान्य नाशिककर पर्यावरणासाठी आग्रही मानला जातो. ते गोदावरीच्या स्वच्छतेविषयीही आग्रही असतात आणि तपोवनातल्या झाडांविषयीसुद्धा. त्यामुळेच जशी ही बातमी पसरली, झाडं वाचवण्याच्या ईर्ष्येची लाट पसरत गेली.
इथं भेटणाऱ्या नाशिकच्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हाच आहे की जे काही करायचं आहे त्यासाठी झाडं का तोडायची?
"2015 पूर्वी नाशिक किती मोठं होतं? तेव्हापासून नाशिकची लोकसंख्या वाढली आहे आणि कोणतीही विकास कामं करायची असतील तर पहिल्यांदा झाडांवर कुऱ्हाड पडते आहे. त्यामुळं नाशिकचं पर्यावरण कमी होत चाललं आहे. आपण पहाल की नाशिकचं तापमान 40 पर्यंत कधीच गेलं नव्हतं. 2015 च्यापूर्वीही नव्हतं जेव्हा कुंभमेळे झाले. आज नाशिकचं तापमान 40 च्या वर गेलं आहे. त्यामुळं आमची मागणी ही आहे की तुम्ही झाडं तोडू नका," अमित कुलकर्णी म्हणतात. ते 'निसर्गसेवक युवा मंच' या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
"साधुग्रामला किंवा कुंभमेळ्याला सामान्य नाशिककरांचा कुठंच विरोध नाही आहे. पण तुम्ही जर काँक्रिटीकरण करुन साधुग्राम उभारणार आहात तर त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही इथं तंबू उभारा. त्याला कोण विरोध करणार आहे? पण तुम्ही झाडं तोडून जे काही करत आहात त्याला आमचा विरोध आहे," कुलकर्णी सांगतात.
सरकारी यंत्रणांवरचा अविश्वास
राज्य सरकार आणि नाशिक महापालिकेनं आजवर अनेकदा विविध कारणं आणि खुलासे या साधुग्रामबद्दल केले. पण त्यावर नाशिककरांचा असलेला अविश्वास लगेचच जाणवून येतो.
"आजवर त्यांची जी बाजू आम्ही ऐकली आहे ती माध्यमांमधून आणि बातम्यांमधून. त्यांनी आम्हाला काहीही लिखित दिलेलं नाही," रोशन केदार सांगतो.
या नागरिक आणि सरकारी यंत्रणा यांच्यातल्या अविश्वासाच्या दरीदरम्यान आंदोलन मोठं होत गेलं आणि भर हिवाळ्यात नाशिकचं वातावरण झाडांच्या मुद्यावरुन तापत गेलं. महानगरपालिकेनं जेव्हा हरकतींसाठी जनसुनावणी घेतली, तेव्हा हा रोष उघडपणे बाहेर आला. आयुक्तांचं म्हणणं आहे की जुनी झाडं आम्ही कधी तोडणार नाही आणि झाडांवरच्या खुणा या केवळ सर्वेक्षणाच्या आहेत.
'बीबीसी मराठी'शी बोलतांना महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री म्हणाल्या की त्या झाडांवर केलेल्या खुणा या केवळ सर्वेक्षणाच्या होत्या कारण कुंभमेळा जवळ येतो आहे तसं साधुग्रामसाठी तयारी सुरू झाली. पण त्यांचा दावा आहे की झाडं तोडायची म्हणून त्या खुणा नव्हत्या.
"आम्ही झाडं कापत नाही. झाडं ठेवून पण आम्ही करतोय ना? म्हणजे आम्ही काय काढणार तर फक्त झुडपं, जी मागच्या सिंहस्थानंतर आली आहेत. पुरावे उपलब्ध आहेत. गुगल इमेजेस आहेत. 2015, 2016, 2017, 2018 च्याआणि आज रोजीच्या फक्त क्लिअरिंग ओफ साईट, तेवढंच," मनिषा खत्री म्हणाल्या.

पण नाशिककरांच्या मनात अद्यापही या सांगण्यावर विश्वास नाही. शेखर गायकवाड यांना 'जंगल मॅन' म्हटलं जातं कारण त्यांनी तपोवन परिसरासह नाशिकच्या परिसरात हजारो झाडं लावली आहेत, जगवली आहेत. 'आपलं पर्यावरण' ही त्यांची संस्था अनेक वर्षं वृक्ष संवर्धनाचं काम करते. त्यांनाही वाटतं की सरकार दरबारी निर्णयाची स्पष्टता नसल्यानं वाद आणि राग वाढत गेला.
"बरोबर आहे लोकांचा गैरसमज. कारण महापालिका नीट खुलासा देत नाही. तुम्हाला जर काही करायचं नाही तर तुम्ही स्पष्ट सांगा, काळजी करू नका एकही झाड तुटणार नाही. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक समिती संघटित करा. ती समिती आणि महानगरपालिका मिळून एक सर्व्हे करा. एक दोन दिवसाचं काम होतं. त्या सर्व्हेत हे सांगितलं असतं की हे झाड तुटणार आहे किंवा नाही तर विषय तिथेच संपला असता," शेखर गायकवाड म्हणतात.
"आजपर्यंत जी मुलं व्यक्त होत आहेत, आंदोलन करत आहेत की आम्हाला ही झाडं वाचवायची आहेत, त्यांच्याशी ना सत्ताधारी ना महापालिका, कोणीच चर्चा करत नाही आहे. आपण बसून बोलू, याच्यातून मध्यममार्ग काढू. असा संवाद होतांना दिसत नाही आहे. किंबहुना दूरी मात्र मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे," 'दिव्य मराठी' वृत्तपत्राच्या नाशिकच्या निवासी संपादक दीप्ती राऊत म्हणतात.
सरकारी धोरणात झाडांबद्दल, ती वाचवण्याबद्दल अनास्था का, याबद्दल बोलतांना पर्यावरणविषयक लेखक आणि पत्रकार अतुल देऊळगावकर म्हणतात, "आपल्या एकंदरीत आर्थिक विचारांमध्ये पर्यावरणाची जाणीव नसल्याने तपोवनासारखे वाद उद्भवतात. म्हणजे तपोवनातलं एक झाड जरी गेलं तरी पूर येऊ शकतो हा तो विचार आहे. झाडं, त्यांची मुळं पाणी शोषतात आणि जमिन घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जर समजा तपोवनासारख्या परिसरात अतिवृष्टी झाली तर हीच वनराई येऊ शकणाऱ्या पुरापासून वाचवणार आहे. हा विचार कोणी करतच नाही. हवामान बदलाशी लढायचं असेल तर जैवविविधता टिकवायला पाहिजे असा विचार जगभरची शहरं करत आहेत. तो आपल्याकडे होत नाही. नाशिकमध्ये तेच होतांना आपण पाहत आहोत."
'माईस हब'चा नवा वाद
वाद अधिक चिघळला जेव्हा हे बाहेर आलं की साधुग्रामच्या या भागात कुंभमेळ्यानंतर खाजगी भागिदारीतून 'माईस हब' या नावानं एक एक्झिबिशन सेंटर उभारण्यचा महापालिकेचा प्रस्ताव आहे आणि त्याची टेंडर प्रक्रियाही सुरू झालीआहे. सरकारी वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या हा निविदेचा प्रस्ताव इथं काय काय असेल हे विस्तारानं सांगतो.
"दोन कुंभमेळ्यांमध्ये जो काळ असतो, तेव्हा महापालिका म्हणते की ही जागा मोकळी पडून असते, तेव्हा त्यातून पैसा कमावण्यासाठी त्यांनी हे 'माईस हब'ची कल्पना आणली आहे," रोशन केदार सांगतात.

"इथं एक्झिबिशन सेंटर बनायचं असेल, डोम बनवायचा असेल किंवा तसं इतर तत्सक कोणतंही काम तर ते झाडंतोडल्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे हे आता स्पष्ट झालं आहे की साधुग्रामच्या नावावर झाडं तोडून त्यांना 'माईस हब' आणायचं आहे," रोशन पुढे सांगतो.
महानगरपालिका आयुक्तांचं म्हणणं आहे की साधुग्राम उभारण्यासाठी जी बांधणी होणार आहे त्यातच हे एक्झिबिशन सेंटर कार्यरत राहील, त्यासाठी झाडांची तोड होणार नाही आणि त्यातून शहराला कुंभमेळ्यानंतरही एक उत्पन्नाचस्त्रोत सुरू राहील.
"आम्ही इथे प्रायव्हेट गुंतवणूक आणतो आहे. त्यांना जागा देत नाही आहोत. जागा आपलीच आहे, आपलीच राहिल. कुठेही जाणार नाही. आपण फक्त त्यांना चालवायला देणार आहोत. तिथून जे उत्पन्न मिळेल ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत. त्या विषयावर, शहराचा फायदा होतो आहे तर मला समजत नाही की लोकांना हे नुकसान कसं वाटतंआहे? आणि आपण यासाठी झाडं पाडतच नाही आहोत. मी कधीच असं म्हटलं नाही की यासाठी झाडं पाडणार. ती पाडणारच नाही तर विषयच येत नाही ना? जी ओपन स्पेस आहे जी साधुग्राम, कुंभनंतर, तिथेच आम्ही हे करणार," आयुक्त मनिषा खत्री 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणतात.
मुख्यमंत्री म्हणतात, मध्यममार्ग काढू
तपोवनाच्या या भागात गोदावरी आणि कपिलेच्या जवळ आजही आपल्याला मोठमोठे वृक्ष दिसतात. काही पुराणवृक्षांसारखे जुने आहेत, काही तुलनेनं लहान आहेत. या वनराईकडे पाहून नाशिककरांचा त्रागा समजण्यासारखा आहे. 'झाडं का तोडायची?' हा एकमेव साधा पण महत्त्वाचा प्रश्न आहे.
नाशिकच्या तपोवनाचं प्रकरण राज्यभर चर्चेत आल्यानंतर अगोदर कुंभमेळा मंत्री गिरिश महाजनांनी तिथं जाऊन बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जेवढी झाडं तोडली जातील त्यापेक्षा जास्त इतर ठिकाणी लावून जंगल करण्याचं आश्वासन दिलं. पण तरीही प्रकरण चिघळत चाललेलं असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीमध्यममार्ग काढण्याबद्दल सुचवलं आहे.
"प्रयागराजचा कुंभमेळा जिथे होतो तिथे 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा शतकानुशतके जिथे होतोआहे तिथे फक्त 300-350 एकर जागा आहे. आपण जर 2015-16 चा गुगल मॅप बघितला तर यातलं कुठलंच झाड आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारनं 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेतला तेव्हा नाशिक महापालिकेनं विचारपूर्वक ही झाडं लावली कारण ती रिकामी जागा होती. आपण 12 वर्षांमध्ये एकदाच ती वापरतो. आता जेव्हा साधुग्रामचा विचार झाला तेव्हा ते तिथं करता येत नाहीत कारण दाट झाडी तिथं तयार झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न तयार झाला आहे," देवेंद्र फडणवीसांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलतांना म्हटलं.

"आता त्यातून मध्यममार्ग काढून, झाडं कापूच नयेत, थोडी बहुत जी कापावी लागतील ती रीप्लान्ट करावीत, जास्तीत जास्त झाडं वाचवावीत, अधिक काय पर्याय आहेत, असा विचार सुरू आहे. कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म्यसाधणारंच आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यामुळे आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातून निश्चितपणे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाही. काहींना कुंभमेळ्यात अडथळे आणायचे आहेत, अशांना आम्ही सांगतो की ते आम्ही येऊ देणार नाही," फडणवीस म्हणाले.
पण तो मध्यममार्ग काय हे गुलदस्त्यात आहे. मुख्य प्रश्न हाच आहे की झाडं तोडण्याची वेळ का यावी? गेल्या काहीवर्षांमध्ये महत्त्वाच्या शहरांमध्ये झाडांच्या प्रश्नांवरुन सरकार विरुद्ध नागरिक हा संघर्ष पहायला मिळतो आहे. अगोदर मुंबई मेट्रो प्रकल्पात 'आरे'च्या जंगलातली झाडं तोडण्यावरुन वादंग झाला. नंतर पुण्यात वेताळ टेकडीवरचीझाडं एका रस्त्याच्या प्रकल्पासाठी तोडली जाणार म्हणून नागरिक रस्त्यावर आले. आता नाशिकमध्ये तपोवनातल्या झाडांवरुन तेच झालं आहे.
प्रश्न हा आहे की 'झाडं वायचायची' या एका कारणासाठी सरकार आणि नागरिक यांच्या एकवाक्यता का असू नये?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











