जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर; कोण विजयी, कोण पराभूत?

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर आज (9 फेब्रुवारी) निकाल जाहीर होत आहेत.
12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) मतदान झालं. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे.
निवडणुकीसाठी 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीआधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधे महायुतीच्या 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधून मंगेश साबळेंचा पराभव
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या वडोद बाजार गटातून शिंदेसेनेचे मंगेश साबळे यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे गोपाल वाघ 1150 मतांनी विजयी झाले आहेत.

फोटो स्रोत, Mangesh Sable/ Facebook
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मंगेश साबळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता तसेच मंगेश साबळे त्यांच्या आंदोलनाच्या स्टाईलमुळे देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात.
संभाजीनगर तालुक्यातील वडगाव कोल्हाटी गटात भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांनी शिंदे गटाचे हनुमंत भोंदवे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला.
धाराशिवमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार फक्त एका मताने जिंकला
धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीत अत्यंत धक्कादायक निकाल समोर आला आहे. निवडणुकीत एका मताची किंमत किती या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या या निकालाची सध्या चर्चा होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समितीच्या ढोकी गणात निकालाचा थरार पाहायला मिळाला. शिवसेना (उबाठा)चे उमेदवार अमर अनंतराव समु्द्रे यांनी भाजपचे उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. अमर समु्द्रे यांना 3 हजार 187मते मिळाली, तर निहाल काझी यांना 3 हजार 186 मते मिळाली.

फोटो स्रोत, Mustan Mirza
विशेष म्हणजे, पहिल्या फेरीत निहाल काझी हे 15 मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोषही सुरू केला होता. मात्र, पुन्हा झालेल्या मतमोजणीत चित्र पूर्णपणे बदलले आणि अवघ्या दहा मिनिटांत निकाल उलटला.
तेर जिल्हा परिषद गटातून भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या विजयी झाल्या असून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांचा पराभव केला आहे.
लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसची सरशी, जाणून घ्या कुणाला किती जागा
लातूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर प्रतिष्ठेच्या बनलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आघाडी मिळवली आहे. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही काँग्रेसने ही निवडणूक जिंकून लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर चांगली पकड मिळवली आहे.
59 सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांचे 23 उमेदवार निवडून आले आहेत. त्याखालोखाल भाजपचे 18, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 12, तर शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेला प्रत्येकी एक जागा निवडून आणण्यात यश मिळालं आहे.
जिल्हा परिषदेच्या 02 जागांवर अपक्षांनी बाजी मारली असून, लातूर जिल्हा परिषदेत अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
कामखेडा गटात काँग्रेस उमेदवाराने फक्त 2 मतांनी केला जाऊबाईंचा पराभव

फोटो स्रोत, Mustan Mirza/BBC
लातूर जिल्ह्यातील कामखेडा जिल्हा परिषद गटाचा निकाल अत्यंत काठावर लागला आहे.
इथे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या दोन्ही बंधूंच्या पत्नी या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. यामध्ये अवघ्या दोन मतांनी काँग्रेसच्या तिकिटावर आपलं नशिब आजमावणाऱ्या आशा भिसे यांचा विजय झाला आहे.
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या या लढतीमध्ये काँग्रेसच्या आशाताई भिसे यांनी त्यांच्या मोठ्या जाऊबाई सरिता भिसे यांचा अवघ्या 2 मतांनी पराभव केला आहे.
कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या?
राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली. त्यात खालील जिल्हा परिषदांचा समावेश आहे :
1) रायगड
2) रत्नागिरी
3) सिंधुदुर्ग
4) पुणे
5) सातारा
6) सांगली
7) कोल्हापूर
8) सोलापूर
9) छत्रपती संभाजीनगर
10) धाराशीव
11) लातूर
12) परभणी
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशी दोन मतं द्यावी लागली होती.
पंचायत समिती निवडणूक
जिल्हा परिषदांसोबतच 125 पंचायत समित्यांसाठी 1462 सदस्यांची निवडणूक झाली. त्यातील 431 जागा महिलांसाठी, 166 जागा अनुसुचित जातींसाठी आणि 38 जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव होत्या. मागास प्रवर्गासाठी 342 जागा राखीव होत्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











