इलॉन मस्क यांच्याकडून 'या' नव्या राजकीय पक्षाची घोषणा, त्यांना अमेरिकेतील राजकारणात किती यश मिळू शकतं?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील धनाढ्य उद्योगपती इलॉन मस्क यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या नव्या पक्षाचं नाव 'अमेरिका पार्टी' असं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वाद झाल्यानंतर काही आठवड्यांतच इलॉन मस्क यांनी ही घोषणा केली आहे.
इलॉन मस्क यांनी एक्स या त्यांच्याच मालकीच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. त्यांचा पक्ष अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रॅटिक पार्टी यांच्या द्वि-पक्षीय राजकारणाला आव्हान देईल.
अमेरिकेतील जे लोक या दोन प्रमुख राजकीय पक्षांच्या (रिपब्लिकन-डेमोक्रॅटिक) बाबतीत समाधानी नाहीत, असे 80 टक्के मतदारांसाठी 'अमेरिका पार्टी' हा पर्याय असल्याचा इलॉन मस्क यांचं म्हणणं आहे.
अर्थात, अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की, या नव्या राजकीय पक्षाची अमेरिकेतील निवडणूक आयोगाकडे अधिकृतपणे नोंदणी करण्यात आलेली आहे की नाही.
इलॉन मस्क यांनी हे देखील जाहीर केलेलं नाही की, या पक्षाचं नेतृत्व कोण करणार आहे, तसंच पक्षाची रचना कशी असणार आहे.
मस्क यांचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जेव्हा वाद झाला होता, तेव्हा त्यांनी नव्या पक्षाचा मुद्दा पहिल्यांदा मांडला होता. या वादानंतर मस्क, ट्रम्प सरकारपासून वेगळे झाले होते. त्यानंतर मस्क आणि ट्रम्प यांनी एकमेकांवर उघडपणे जोरदार टीका-टिप्पणी केली होती.
इलॉन मस्क यांनी त्यांच्या पक्षाची घोषणा करताना म्हटलं आहे की, सध्या ते फक्त सिनेटच्या 2 ते 3 जागा आणि 8 ते 10 हाऊस डिस्ट्रिक्टवरच लक्ष केंद्रीत करणार आहेत.
अमेरिकेत दर 2 वर्षांनी सर्व 435 यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज जागांसाठी निवडणुका घेतल्या जातात.
याशिवाय सिनेटच्या 100 सदस्यांपैकी जवळपास एक तृतियांश सदस्य दर 2 वर्षांनी निवडले जातात. कारण त्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असतो. याच सदस्यांवर इलॉन मस्क यांचं लक्ष आहे.
इलॉन मस्क यांनी नवा राजकीय पक्ष का बनवला?
डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वाद झाल्यानंतर मस्क यांनी एक्सवर एक पोल घेतला होता. त्यात त्यांनी लोकांना विचारलं होतं की, अमेरिकेत एक नवीन राजकीय पक्ष असायला हवा का? यात बहुतांश युजर्सनं नव्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिला होता.
शनिवारी (5 जुलै) त्याच पोलचा उल्लेख करत मस्क यांनी लिहिलं, "पोलनुसार तुम्हाला एक नवा राजकीय पक्ष हवा आहे आणि आता तो तुम्हाला मिळेल!"
"आपल्या देशात अनावश्यक खर्च आणि भ्रष्टाचारानं उद्ध्वस्त करणारी 'पार्टी सिस्टम' आहे, लोकशाही नाही. तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं स्वातंत्र्य मिळावं यासाठी आज 'अमेरिका पार्टी' बनवण्यात आली आहे."
शनिवारपर्यंत (5 जुलै) या नव्या पक्षाची अधिकृतपणे नोंदणी झाल्याचं लक्षात येईल अशी कोणतीही कागदपत्रं अमेरिकेच्या फेडरल इलेक्टोरल कमिशननं (एफईसी) प्रकाशित केली नव्हती.
2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत मस्क यांनी ट्रम्प यांच्यासाठी 25 कोटी डॉलर्स खर्च केले होते.
निवडणुकीनंतर मस्क यांना 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी'चा (डॉज) प्रमुख करण्यात आलं होतं. या विभागाचं काम अमेरिकन सरकारला खर्चात कपात करण्यासाठी सूचना देण्याचं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मे महिन्यात ट्रम्प सरकारमधून बाहेर पडल्यावर मस्क यांनी ट्रम्प यांच्या कर आणि खर्चावरील योजनांवर उघडपणे टीका केली होती. त्यानंतर मस्क आणि ट्रम्प यांच्यात मतभेद होण्यास सुरुवात झाली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या विधेयकाला 'बिग, ब्युटीफुल बिल' म्हटलं होतं, ते विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मोठ्या प्रयत्नानं मंजूर झालं होतं. या आठवड्यात ट्रम्प यांनी त्यावर सही करून त्याचं रूपांतर कायद्यात केलं.
मस्क यांनी या विधेयकाला 'देशाला दिवाळखोर बनवणारं विधेयक' म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना ट्रम्प यांनी मस्क यांच्या टेस्ला, स्पेसएक्ससारख्या कंपन्यांचं सरकारी अनुदान बंद करण्याची आणि त्यांना देशाबाहेर काढण्याची धमकीदेखील दिली होती.
'बिग, ब्युटीफुल' कायद्यात मोठ्या प्रमाणात सरकारी खर्च आणि करामध्ये कपातीचा समावेश आहे. पुढील 10 वर्षांमध्ये यामुळे अमेरिकेच्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये 3 ट्रिलियन डॉलरहून अधिकची भर पडण्याचा अंदाज आहे.
राजकारण बदलण्याचा खरा प्रयत्न की दबावतंत्र?
सीएनएन, सीबीएस आणि न्यूयॉर्क टाइम्ससारख्या अमेरिकेतील प्रमुख प्रसारमाध्यमांना वाटतं की, मस्क आणि ट्रम्प यांच्यामधील वादामुळेच या नव्या राजकीय पक्षाची घोषणा झाली आहे.
वॉशिंग्टन पोस्टनं लिहिलं आहे की, ट्रम्प समर्थक असलेले मस्क आता त्यांचे टीकाकार झाले आहेत. हा मस्क यांच्या राजकीय भूमिकेत मोठा बदल आहे. कारण आधी त्यांचा कल रिपब्लिकन पार्टीकडे होता.
'डॉज'वरील टीका आणि विस्कॉन्सिन सर्वोच्च न्यायालयाच्या निवडणुकीत अयशस्वी हस्तक्षेपानंतर हा बदल झाला.
न्यूजवीक मासिकानं मस्क आणि ट्रम्प यांच्यात एक्स आणि ट्रूथ सोशलवर उघडपणे झालेल्या वादाचा उल्लेख केला.
या मासिकानं म्हटलं आहे की, ट्रम्प यांचा दावा होता की, मस्क यांचा विरोध इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी करातील सूट थांबवण्याशी संबंधित होता. कारण ही सूट थांबवल्यामुळे टेस्ला कंपनीचं नुकसान होऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
कतारमधील प्रसार माध्यम असलेल्या अल जजीरानं राजकीय तज्ज्ञ थॉमस गिफ्ट यांचा संदर्भ दिला आहे. थॉमस गिफ्ट यांनी मस्क यांच्या नवा राजकीय पक्ष बनवण्याला एक 'चाल' म्हटलं आहे. म्हणजेच मस्क यांना प्रत्यक्षात राजकीय पक्ष बनवायचा नाही, तर रिपब्लिकन पार्टीवर दबाव निर्माण करायचा आहे.
थॉमस गिफ्ट यांनी अल जजीराला सांगितलं, "हा इलॉन मस्क यांचा एक डाव आहे. मस्क यांना चांगलंच माहीत आहे की, डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्टीच्या मजबूत संघटनात्मक शक्तीसमोर टिकणं खूपच कठीण आहे."
गिफ्ट म्हणाले की, नवीन राजकीय पक्ष बनवणं तर शक्य आहे, मात्र अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये जागा जिंकणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.
सीबीएस न्यूज या मुद्द्यावर निवडणूक तज्ज्ञ ब्रॅट कॅपल यांच्याशी बोललं.
कॅपल यांनी सांगितलं, "अमेरिकेतील कायद्यांमुळे डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पार्टीचा फायदा होता. मस्क यांना बॅलेट ॲक्सेससाठी सहीसारख्या कायदेशीर आव्हानांना तोंड द्यावं लागेल. एक राष्ट्रीय पक्ष बनवण्यास अनेक वर्षे लागू शकतात. त्यामुळे 2026 साठी त्यांची ही योजना अव्यावहारिक वाटते."
मस्क यांच्यासमोरील आव्हानं
इलॉन मस्क यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्यासमोर अमेरिकेतील द्विपक्षीय व्यवस्था, राज्य-वार बॅलेट सिस्टम, नोंदणी प्रक्रिया, निधीची जुळवाजुळव आणि मतदारांचा पाठिंबा यासारखी आव्हानं आहेत.
जाणकारांना वाटतं की, मस्क यांच्याकडे संसाधनं तर आहेत, मात्र राजकीय धैर्य आणि प्रत्यक्षातील संघटनेचा अभाव ही त्यांच्यासमोरील मोठी अडचण ठरू शकते.
न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं आहे की, इलॉन मस्क यांनी हे दाखवलं आहे की ते त्यांच्याकडील संसधानांचा वापर मोठे निर्णय घेण्यासाठी करू शकतात. मात्र ते अनेकदा बोललेल्या गोष्टी पूर्ण करत नाहीत, असंदेखील भूतकाळात अनेकदा दिसून आलं आहे.
मस्क यांनी जेव्हा 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सी'चं नेतृत्व केलं होतं, तेव्हा त्यांनी अनेक सरकारी योजना आणि अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये कपात केली होती.
मात्र नंतर ट्रम्प यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्या अमेरिकेतील धोरणांशी निगडीत मोठ्या विधेयकावर टीका केली होती.
गेल्या महिन्यात मस्क यांनी सोशल मीडियावर या कायद्याला 'घृणास्पद आणि भीतीदायक' म्हटलं होतं. ते म्हणाले होते की, 'यामुळे अमेरिकेच्या आधीच वाढलेल्या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये आणखी भर पडेल.'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
अमेरिकेतील निवडणूक व्यवस्था 'विनर टेक ऑल' या सिद्धांतावर आधारित आहे. यात तिसऱ्या पक्षाला स्थान निर्माण करणं कठीण असतं.
जॉर्जटाऊन विद्यापीठाचे प्राध्यापक हान्स नोएल म्हणाले, "अमेरिकेत अशा संस्थाच नाहीत किंवा अशी व्यवस्थाच नाही, ज्या बहुपक्षीय व्यवस्थेला यशस्वी होण्याची संधी देतील."
"इतर लोकशाही देशांप्रमाणे 20-30 टक्के मतं मिळाल्यावर इथे कोणतीही जागा जिंकता येत नाही. त्यामुळे छोटे राजकीय पक्ष टिकणं ही खूपच कठीण गोष्ट आहे."
इलॉन मस्क यांनी शनिवारी (5 जुलै) एक्स या सोशल मीडियावर लिहिलं की, पुढील वर्षाच्या मिड टर्म निवडणुका हे त्यांचं लक्ष्य आहे. ग्रीक सेनापती एपेमिनोंडास यांच्या व्यूहरचनेशी त्यांनी स्वत:च्या रणनीतीची तुलना केली. या व्यूहरचनेनुसार एका विशिष्ट ठिकाणी सर्व शक्ती केंद्रीत करून शत्रूचा पराभव करण्यात आला होता.
विनर टेक ऑल व्यवस्थेव्यतिरिक्त, मस्क यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये उमेदवार उभे करायचे असतील किंवा भविष्यात तिसऱ्या पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार उभा करायचा असेल, तर त्यांना प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या बॅलेट नियमांचं पालन करावं लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
राज्याच्या आणि फेडरल इलेक्शन कमिशनचे (एफईसी) नव्या पक्षाच्या नोंदणीसाठी वेगवेगळे नियम असतात. अनेकदा यात रहिवासाचा पुरावा आणि मतदारांकडून याचिकेवर सहीसारख्या अटींचा समावेश असतो.
मॅक मॅककॉर्कल, ड्यूक विद्यापीठाचे सॅफर्ड स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीचे प्राध्यापक आहेत. त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टीचे सल्लागार म्हणून देखील काम केलेलं आहे.
वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्राशी बोलताना प्राध्यापक मॅक मॅककॉर्कल म्हणाले की, या नियमांमुळे खूप मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. अर्थात मस्क यांच्याकडे इतका पैसा आहे की, ते हे काम करू शकतात.
नताशा लिंडस्टॅड, एसेक्स विद्यापीठात सरकारी विभागात प्राध्यापक आहेत.
अल जजीराशी बोलताना नताशा म्हणाल्या, "रिपब्लिकन पार्टीसाठी डोकेदुखी ठरणारा नवा पक्ष उभा करण्याएवढी आर्थिक ताकद मस्क यांच्याकडे नक्कीच आहे. मात्र ते इतका मोठा धोका पत्करतील की नाही, हे निश्चित नाही."
त्यांनी असंही सांगितलं की, अमेरिकेतील मतदारांमध्ये नव्या पक्षाबद्दल खूप उत्सुकता आहे.
नताशा यांचं म्हणणं आहे, "या विधेयकामुळे अमेरिकेला निव्वळ व्याजापोटीच शेकडो अब्ज डॉलरचा खर्च करावा लागेल. लोकांच्या हे जसजसं लक्षात येईल, तसतसं ते नवा पर्याय शोधू लागतील."
"पारंपारिक पक्षांबाबत जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. कदाचित मस्क याच गोष्टीचा फायदा घेऊ शकतात."
द्विपक्षीय व्यवस्थेव्यतिरिक्त अमेरिकेतील इतर पक्षांचा इतिहास
अमेरिकेत दोन प्रमुख राजकीय पक्षांव्यतिरिक्त (रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक) इतर राजकीय पक्ष प्रदीर्घ काळापासून अस्तित्वात आहेत. मात्र अलीकडच्या वर्षांमध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवर मर्यादित पाठिंबा मिळाला आहे.
याआधी 1968 मध्ये जॉर्ज वॉलेस नावाच्या तिसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रोरल वोट मिळाले होते. त्यावेळेस अमेरिकेतील दक्षिणेकडच्या पाच राज्यांनी जॉर्ज वॉलेस यांना मतं दिली होती. ते अमेरिकन इंडिपेंडंट पार्टीचे उमेदवार होते.
अब्जाधीश व्यावसायिक रॉस पेरोट यांना 1992 मध्ये जवळपास 19 टक्के लोकप्रिय मतं मिळाली होती. मात्र त्यांना कोणतंही इलेक्टोरल कॉलेज वोट मिळालं नव्हतं.
नोएल म्हणाले, "आश्चर्यकारकरित्या पेरोट यांनी चांगली कामगिरी केली होती...मात्र ते कोणत्याही राज्यात पहिल्या क्रमांकावर आले नाहीत. ज्याप्रकारे इलेक्टोरल सिस्टिम काम करते, त्यानुसार त्यांना काहीही मिळालं नाही."

फोटो स्रोत, Getty Images
2000 मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत राल्फ नेडर यांच्या ग्रीन पार्टीचा प्रभाव फ्लोरिडामध्ये दिसला होता. मात्र त्यांना कोणतंही इलेक्टोरल वोट मिळालं नव्हतं.
1912 मध्ये प्रोग्रेसिव्ह पार्टीचे थियोडोर रुझवेल्ट यांना 27.4 टक्के लोकप्रिय मतं आणि 88 टक्के इलेक्टोरल वोट मिळाले होते. अमेरिकेच्या इतिहासात तिसऱ्या पक्षानं केलेल्या सर्वोत्तम कामगिरींपैकी ती एक आहे.
तिसऱ्या पक्षांनी अनेक निवडणुकांमध्ये मत विभाजनातून प्रभाव टाकला होता. यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचा फायदा किंवा नुकसान झालं होतं. 1920 नंतर फक्त काही वेळाच तिसऱ्या पक्षांना राज्यांमध्ये विजय मिळाला आहे.
अमेरिकेत नवा राजकीय पक्ष बनवतानाची आव्हानं
अमेरिकेत नवा राजकीय पक्ष बनवणं हे ऐकायला सोपं वाटतं, मात्र प्रत्यक्षात ती फारच गुंतागुंतीची आणि प्रदीर्घ प्रक्रिया आहे. इलॉन मस्क यांनी 'अमेरिका पार्टी'ची घोषणा केल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला आहे की एखादा नवीन पक्ष खरोखरंच अमेरिकेच्या राजकारणात पाय रोवू शकतो का?
कोणत्याही नव्या पक्षाला सर्वात आधी एक अधिकृत नाव निश्चित करावं लागतं. त्याचबरोबर त्या पक्षाला एक जाहीरनामा आणि पक्ष संघटनेची आवश्यकता असते. उदाहरणार्थ पक्षाचा अध्यक्ष, खजिनदार आणि इतर पदाधिकारी. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण केली जाते.
जर पक्षाला अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष, सीनेट किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह सारख्या निवडणुकांमध्ये भाग घ्यायचा असेल, तर त्यांना फेडरल इलेक्शन कमिशन (एफईसी) मध्ये नोंदणी करावी लागते. त्याचबरोबर, पक्षाला देणगी मिळवण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी पारदर्शक नियमांचं पालन करावं लागतं.
अमेरिकेत सर्वात मोठं आव्हान असतं - बॅलेट ॲक्सेसचं. म्हणजे निवडणूक मतपत्रिकेवर पक्षाचं नाव येणं. यासाठी प्रत्येक राज्यातील कायदे वेगवेगळे असतात.
अनेक राज्यांमध्ये हजारो कायदेशीर किंवा वैध नागरिकांच्या सह्या गोळा करणं आवश्यक असतं.
काही राज्यांमध्ये, गेल्या वेळच्या निवडणुकीत निश्चित करण्यात आलेली मतांची टक्केवारी मिळवण्याची अट असते.

फोटो स्रोत, Getty Images
पक्ष चालवण्यासाठी, निवडणुकीत उमेदवार उभा करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी पैशांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. यासाठी पक्षाला खासगी देणगीदार आणि पाठिराख्यांकडून पैसे गोळा करावे लागतात.
त्याचबरोबर प्रचार मोहिमेतील खर्चाची मर्यादा आणि पारदर्शकता राखण्यासाठी एफईसीच्या कडक नियमांचं पालन करावं लागतं.
याव्यतिरिक्त, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचार मोहीमेच्या वेळेस टीव्हीवर होणाऱ्या राष्ट्रीय वादविवादांमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराला राष्ट्रीय स्तरावर 15 टक्के पाठिंबा (पोल सर्व्हेच्या आधारे) दाखवावा लागतो.
इलॉन मस्क यांना पैशांची कमतरता नाही. मात्र नवीन राजकीय पक्ष बनवून निवडणूक लढवणं त्यांच्यासाठी सोपं असणार नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











