"महाराष्ट्राचा विचार करता भाजपला शिंदे किंवा अजित पवारांची गरज नाही. तर त्यांना भाजपची गरज आहे. कारण भाजपकडं मोदी आणि यंत्रणा मजबूत आहे," असं स्पष्ट मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे.
देशात आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या चार राज्यांतील या निवडणुकीकडं लिटमस टेस्ट म्हणून पाहण्यात येत होतं. त्यामुळं या निकालाकडं सर्वांचच लक्ष लागलं होतं.
चार राज्यांच्या निवडणुकांचे निकालाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे.मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तरेतील तिन्ही महत्त्वाच्या राज्यांत सत्ता मिळवत भाजपनं बाजी मारली, तर काँग्रेसनं तेलंगणात केसीआर यांना धोबीपछाड दिली आहे.
या संपूर्ण निकालाचा नेमका अर्थ काय आहे आणि भविष्यातील घडामोडी आणि राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने त्याचे काय पडसाद उमटणार आहेत याचं विश्लेषण 'लोकसत्ता'चे संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक गिरीश कुबेर यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना केलं आहे.

मध्य प्रदेशातही काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर त्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रकार घडला. तरीही मध्य प्रदेशात कौल भाजपाच्याच बाजूने लागला.
त्यामुळे आता या निकालाचा महराष्ट्रात काय परिणाम होईल, एकनाथ शिंदे-अजित पवारांसाठी हा निकाल किती महत्त्वाचा आहे, यावरही गिरीश कुबेर यांनी भाष्य केलं.
सध्या विरोधी पक्षात राहण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही. त्यात जुनी प्रकरणं बाहेर निघण्याचा धाक, भीती किंवा इतर काहीही कारणं असू शकतात. पण भाजपला आणखी यश मिळालं तर हे प्रकार जास्त वाढतील, असं मत कुबेर यांनी मांडलं.
"महाराष्ट्राचा विचार करता भाजपला शिंदे किंवा अजित पवारांची गरज नाही. तर त्यांना भाजपची गरज आहे. कारण भाजपकडं मोदी आणि यंत्रणा मजबूत आहे.
पण गरज नसतानाही त्यांच्यासोबत राहावं लागणं हे भाजपचं राजकीय यश आणि विरोधकांचा पराभव आहे."
त्यामुळं हे चित्र असंच राहिलं तर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही त्याचा फायदा होईल आणि निकाल कसा लागेल हे वेगळं सांगावं लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
राज्यात पाच वर्षांपूर्वी काय झालं ते झालं. पण जनतेची स्मरणशक्ती कमी असते. मतदार त्याचा राग ते मनात धरून ठेवत नाहीत, असं मत कुबेर यांनी मांडलं.
"लोकांच्या मनात राग आहे, यात शंकाच नाही. त्यामुळंच राज्यात अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. पण हा राग शांत करण्याचा मार्ग भाजपकडं आहे. भाजप तो प्रयत्न करत आहे. जितक्या निवडणुका होत जातील तितका तो राग शांत होत जाईल आणि राग निवळला तर काय होतं ते मध्य प्रदेशात दिसून आलं."
















