इस्रायलने गाझावरील आक्रमण तात्काळ थांबवावे - आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश

थोडक्यात

  • पापुआ न्यू गिनीमधील एका दुर्गम गावात भूस्खलन झाले असून गावकरी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढत आहेत.
  • सिंगापूर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये झालेल्या भीषण टर्ब्युलन्समुळे 20 जणांना पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे.
  • पश्चिम बंगालमधील तमलूक लोकसभा मतदारसंघातील नंदीग्राममध्ये 22 मे रोजी भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
  • डोंबिवली एमआयडीसीमधल्या एका केमिकल कंपनीत गुरुवारी (23 मे) दुपारी भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक-एक मत मिळवण्यासाठी लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर करताना हा निर्धार व्यक्त केला.

लाईव्ह कव्हरेज

नितीन सुलताने

  1. टी-20 वर्ल्ड कप 2024 : आयसीसीने समालोचकांची यादी केली जाहीर, चार भारतीयांना संधी

    आयसीसीची पोस्ट

    फोटो स्रोत, ICC

    आगामी टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीने समालोचकांच्या नावांची घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषक 2024साठी भारतातील चार समालोचकांची निवड करण्यात आलेली आहे.

    हर्षा भोगले, दिनेश कार्तिक, रवी शास्त्री आणि सुनील गावसकर यांना विश्वचषकात समालोचन करण्याची संधी मिळाली आहे. यासोबत इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन, इयान स्मिथ, मेल जोन्स आणि वेस्ट इंडिजच्या इयान बिशप यांनाही या टीममध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे.

    याव्यतिरिक्त डेल स्टेन, ग्रॅहम स्मिथ, मायकल अथरटन, वकार युनूस, सायमन डूल, शॉन पोलॉक आणि केटी मार्टिन यांनाही यात संधी देण्यात येणार आहे.

  2. पुण्यातील अपघातावर पालकमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली?

    पुण्यात 18 मे 2024 रोजी पहाटे जे घडलं, त्याची संतप्त प्रतिक्रिया केवळ पुण्यात नाही, तर देशभर उमटली. एका नंबर प्लेट नसणाऱ्या, भरधाव वेगानं जाणाऱ्या, अलिशान पोर्शे कारनं पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास एका दुचाकीला उडवलं.

    त्या दुचाकीवर चाललेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

    माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, “पुण्यातील घटनेवर मी लक्ष ठेऊन आहे. माझं यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी याप्रकरणात जातीने लक्ष घातलं आहे. खरं तर कारण नसताना असा प्रकाराच गैरसमज केला जातो की यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही.

    मुळात मी माझं काम करत असतो, मला माध्यमांच्या पुढे यायला आवडत नाही. 21 तारखेला ही घटना घडली तेव्हा मंत्रालयात होतो की नाही, हे कोणीही जाऊन बघू शकतो.”

    अजित पवार

    फोटो स्रोत, NCPSpeaks_Official

    अजित पवार पुढे म्हणाले की, "याप्रकरणात कोणत्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नाही. ही घटना गंभीर आहे. याप्रकारच्या घटना यापुढे घडू नये. कायदा सुव्यवस्था राखणं हे पोलिसांची जबाबदारी आहे. याप्रकरणी जे दोषी असतील, त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी, यासंदर्भातील मी वेळोवेळी पोलीस आयुक्तांकडून माहिती घेत आहे. आज सकाळीसुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केली."

  3. पुणे अपघात प्रकरणी 2 कर्मचारी निलंबित, पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?

  4. इस्रायलने गाझावरील आक्रमण तात्काळ थांबवावे - आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश

    आंतरराष्ट्रीय न्यायालय

    आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला गाझावर रफामार्गे होणारे आक्रमण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

    पॅलेस्टिनी लोकांना असणारा धोका लक्षात घेऊन इस्रायलने इस्रायलने रफाहमधील लष्करी आक्रमण आणि इतर कारवाया ताबडतोब थांबवल्या पाहिजेत, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला आहे.

    इस्रायलतर्फे गाझामध्ये केल्या जाणाऱ्या कारवायांबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर बराच खल होत आहे. आयर्लंड, नॉर्वे आणि स्पेनने 28मे पासून पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार असल्याची घोषणा केली होती.

    या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जातोय.

    इस्रायलसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने लष्करी कारवाई थांबवण्यासोबतच खालील आदेश दिले आहेत.

    • रफामधील लष्करी कारवाई थांबवा
    • मानवतावादी मदत गाझात पोहोचावी यासाठी इजिप्तला लागून असलेली रफा सीमा खुली करा
    • शोधकार्य आणि मदत पोहोचवण्यासाठी जाणाऱ्यांचा मार्ग खुला करा
    • एक महिन्याच्या आत या उपाययोजना लागू करण्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करा

    इस्रायल-हमास संघर्षात रफा शहर भीतीच्या छायेखाली का आहे?

  5. 'मी समान नागरी कायदा करण्याचे वचन दिले आहे' - पंतप्रधान

    हिमाचल प्रदेशातील मंडी येथील एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा (यूसीसी) उल्लेख केला.

    पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी समान नागरी कायदा करण्याचे वचन दिले आहे."

    "भारताचा नागरिक, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध असो, त्यांच्यासाठी नागरी कायदे समान असले पाहिजेत."

    पंतप्रधान मोदी म्हणाले, "पण काँग्रेसचा समान नागरी कायद्याला विरोध आहे. काँग्रेस मुस्लिम पर्सनल लॉच्या नावावर शरियाचे समर्थन करते. देशाला काँग्रेस कशाला हवी आहे?"

    पंतप्रधान नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, ANI

    भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात समान नागरी कायद्याचे आश्वासन दिले आहे.

    यावर्षी उत्तराखंड विधानसभेत फेब्रुवारीमध्ये समान नागरी कायदा विधेयक मंजूर करण्यात आले.

    समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे.

    उत्तराखंड सरकारच्या या विधेयकाला काँग्रेसने विरोध केला होता. हे विधेयक सभागृहात मांडण्यात आले तेव्हा काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते यशपाल आर्य म्हणाले की, भाजप सरकार लोकशाही समजून घेत नाही, त्यांनी संविधानिक मूल्यांची हत्या केली आहे.

  6. निवडणूक आयोगावर इतकी टीका का होत आहे?

    सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने याआधी कधी नाही झाली इतकी टीका निवडणूक आयोगावर होताना दिसतेय.

    आयोगाच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारले जातायत. त्यामुळे निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.

    त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल आणि त्यावर आयोगाने घेतलेल्या भूमिकेविषयी आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊयात.

    व्हीडिओ कॅप्शन, निवडणूक आयोगाची प्रतिमा सततच्या आरोपांमुळे ढासळतेय का? सोपी गोष्ट
  7. छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 8 माओवादी ठार झाल्याचा दावा, आलोक पुतुल रायपुरहून बीबीसी हिंदीसाठी

    छत्तीसगडमधील माओवादाने प्रभावित नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत आठ संशयित माओवाद्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. शोध मोहीम अजूनही सुरू असून मृतांचा आकडा वाढू शकतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

    एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "बुधवारी रात्री नारायणपूरच्या रेकावाया भागात माओवादी असल्याची बातमी मिळाल्यानंतर, नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडा या तीन जिल्ह्यांतील बस्तर फायटर, एसटीएफ आणि जिल्हा राखीव रक्षक दलाच्या जवानांनी मोहीम सुरू केली. गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभर चकमक सुरू होती."

    दोन्ही बाजूंनी गोळीबार होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून सात संशयित माओवाद्यांचे मृतदेह आणि एक ऑटोमॅटिक रायफल जप्त केली. या कारवाईत सहभागी सुमारे एक हजार सैनिकांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला होता.

    प्रातिनिधीक फोटो

    फोटो स्रोत, Getty Images

    शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी सांगितलं की त्यांनी आणखी एका संशयित माओवाद्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आठवर गेली आहे. पोलिसांच्या मते, चकमक झाली त्या भागातून सैनिक अद्याप परतले नाहीत. ते परतल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

    राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी म्हटलं की, हे आमच्या सैनिकांचं मोठं यश आहे.

    मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, "मी सैनिकांच्या धैर्याला सलाम करतो. नक्षलवाद संपवणं हे आमचं ध्येय आहे." गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडमध्ये संशयित माओवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. गेल्या महिन्यात, 2 एप्रिल रोजी पोलिसांनी गांगलूर भागात 13 माओवाद्यांना मारल्याचा दावा केला होता. त्याचप्रमाणे, 16 एप्रिल रोजी पोलिसांनी सांगितलं की, कांकेरच्या काल्परमध्ये झालेल्या चकमकीत 29 माओवादी मारले गेले. आत्तापर्यंतच्या नक्षल इतिहासात छत्तीसगडमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एकाच चकमकीत एवढे माओवादी कधीही मारले गेले नव्हत"

    पोलिसांनी यापूर्वी 30 एप्रिल रोजी टेकामेटा मध्ये 10 माओवाद्यांना आणि या महिन्यात 10 मे रोजी पेडियामध्ये 12 माओवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता.

  8. निवडणूक आयोगाला प्रत्येक मतदान केंद्राचा डेटा जाहीर करण्याचा आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    निवडणूक आयोगाला प्रत्येक मतदान केंद्राचा डेटा जाहीर करण्याचा आदेश देण्यास, सुप्रीम कोर्टाचा नकार

    फोटो स्रोत, Getty Images

    सर्वोच्च न्यायालयाने सध्या निवडणूक आयोगाला फॉर्म 17 सी च्या नोंदी सार्वजनिक करण्याचे आदेश देण्यास नकार दिला आहे. तसेच याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

    न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यानुसार, सध्याच्या याचिकेत मांडण्यात आलेली अंतरिम मागणी ही 2019 मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या मागणीसारखीच आहे आणि हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.

    असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स एनजीओच्या याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

    या एनजीओने आपल्या याचिकेत आवाहन केलं होतं की, सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावरील मतांची आकडेवारी 4 तासांच्या आत जाहीर करावी. यासाठी फॉर्म 17 सी सार्वजनिक करण्याच्या सूचना देण्याची मागणी करण्यात आली. 17 सी हा फॉर्म असा फॉर्म आहे ज्यामध्ये मतदान केंद्रावर टाकलेल्या मतांची संख्या दिली जाते.

    या प्रकरणी निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान टक्केवारीची आकडेवारी संकेतस्थळावर सार्वजनिक केल्यास निवडणूक यंत्रणेत अडथळा निर्माण होईल. लोकसभा निवडणुकीसाठी ही यंत्रणा आधीच कामाला लागली आहे.

    निवडणूक आयोगाने असंही म्हटलं होतं की "संपूर्ण माहिती देणे" आणि फॉर्म 17 सी सार्वजनिक करणे वैधानिक चौकटीचा भाग नाही. त्यामुळे संपूर्ण निवडणूक क्षेत्रात गोंधळ निर्माण होऊ शकतो. या डेटाचे फोटो मॉर्फ केले जाऊ शकतात.

  9. पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती- ऑस्ट्रेलियन माध्यमांची माहिती

    पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलनात 100 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती- ऑस्ट्रेलियन माध्यमांची माहिती

    फोटो स्रोत, Getty Images

    पापुआ न्यू गिनीमधील एका दुर्गम गावात भूस्खलन झाले असून गावकरी ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढत आहेत.

    ऑस्ट्रेलियातील सरकारी मीडिया एबीसीच्या वृत्तानुसार आणि स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत 100 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही.

    एंगा प्रांतातील काओकलम गावात पहाटे 3 वाजता ही घटना घडली. पोरगेरा वुमन इन बिझनेस असोसिएशनच्या अध्यक्षा एलिझाबेथ लारुमा यांनी एबीसीशी बोलताना सांगितलं की, डोंगरावरील भूस्खलनामुळे घरे जमीनदोस्त झाली आहेत.

    त्या म्हणाल्या, "जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा लोक झोपले होते आणि संपूर्ण गाव जमिनीखाली गाडले गेले. किमान 100 पेक्षा जास्त लोक गाडले गेले असण्याची शक्यता आहे.

  10. जळगाव हिट अँड रन प्रकरण: आरोपींना न्यायालयात हजर केले, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    मृतांचे कुटुंबीय

    जळगाव हिट अँड रन प्रकरणी 2 आरोपींना गुरुवारी मुंबईतून अटक करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. 7 मे रोजी झालेल्या अपघातानंतर मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले होते.

    जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास, कारने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला होता.

    अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. तर मृत महिलेचा 12 वर्षीय भाचा गंभीर जखमी होता. पण त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    अखिलेश पवार आणि अर्णव कौल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. अपघात झालेली गाडी अर्णव कौल चालवत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

    पोलिसांना अपघात झालेल्या गाडीमध्ये गांजाही सापडला होता. मात्र, अपघाताला दोन आठवडे उलटल्यानंतरही कारवाई होत नसल्यानं स्थानिकांनी या प्रकरणी रोष व्यक्त केला होता.

    कुटुंबीयांच्या तक्रारीवरून तक्रार दाखल करून घेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच आयपीसी 379,285,427 आणि MPDA अंतर्गत अंमली पदार्थ बाळगणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसून, आरोपी जखमी झाल्यामुंळं त्यांना त्यावेळी अटक झाली नव्हती असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी आरोपींच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत. पण अद्याप त्याचे रिपोर्ट आलेले नाहीत.

  11. इजिप्तच्या पिरॅमिडसाठी भव्य शिळा आणल्या कशा? संशोधकांना सापडले उत्तर

  12. सिंगापूर एअरलाइन्स: एअर टर्ब्युलन्समुळे 20 जणांना पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत

    सिंगापूर एअरलाइन्स: एअर टर्ब्युलन्समुळे 20 जणांना पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत

    फोटो स्रोत, Getty Images

    सिंगापूर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये झालेल्या भीषण टर्ब्युलन्समुळे 20 जणांना पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे. हे लोक अतिदक्षता विभागात असल्याचे बँकॉकमधील रुग्णालयाच्या प्रमुखाने सांगितले आहे.

    बँकॉकच्या रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. लंडनहून उड्डाण केलेल्या या विमानाचे मंगळवारी थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

    एकूण 46 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सवर अजूनही बँकॉकमध्ये उपचार सुरू आहेत, असे एअरलाइनने सांगितले. विमानात बसलेल्या प्रवाशांनी बीबीसीला सांगितले की त्यांना वाटले की विमान अचानक खाली आले आणि ज्या लोकांनी सीट बेल्ट घातला नव्हता ते "छताला धडकले".

    रुग्णालयाचे संचालक समितवेज श्रीनाकरिन यांनी सांगितले की, "41 प्रवासी अजूनही तेथे आहेत, त्यापैकी निम्मे अतिदक्षता विभागात आहेत. 22 जणांना पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे, तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे."

    सिंगापूर एअरलाइन्सची फ्लाइट एसक्यू 321 लंडनहून सिंगापूरला जात असताना तीव्र टर्ब्युलन्समुळे 73 वर्षीय ब्रिटिश व्यक्ती जेफ किचन यांचा मृत्यू झाला आणि इतर लोक जखमी झाले. किचन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले आहे.

  13. नंदीग्राममधील हिंसाचारप्रकरणी ममता बॅनर्जींकडून राज्यपालांनी मागवला अहवाल

    ममता बॅनर्जी

    फोटो स्रोत, GETTY IMAGES

    नंदीग्राममधील वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारकडून अहवाल मागवला आहे. राज्यपालांनी या प्रकरणी टीकाही केली आहे.

    पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली? याचा अहवाल राज्यपालांनी मागवला आहे.

    राज्यपाल बोस यांनी ममता बॅनर्जींना हिंसाचार थांबवण्याचा आणि आदर्श आचारसंहितेच्या आधारे आवश्यक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

    राज्यपालांनी नंदीग्राममध्ये होत असलेल्या हिंसाचार राज्य सरकार पुरस्कृत असल्याचं म्हटलं. संविधानाचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. गुरुवारी सायंकाळी ही बाब राज्य सचिवालयाला कळवण्यात आली.

    पश्चिम बंगालमधील तमलूक लोकसभा मतदारसंघातील नंदीग्राममध्ये 22 मे रोजी भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, टीएमसीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

    ज्या महिलेची हत्या झाली तिचं नाव रथिबाला आडी असं होतं. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी रास्ता रोको आंदोलन केलं.

    या परिसरात सहाव्या टप्प्यात म्हणजे 25 मे रोजी मतदान होणार आहे.

  14. पुणे अपघात: 'मुलाला पोर्शे गाडी चालवू दे', वडिलांनीच ड्रायव्हरला सांगितलं होतं?

    व्हीडिओ कॅप्शन, पुणे अपघात: 'मुलाला पोर्शे गाडी चालवू दे', वडिलांनीच ड्रायव्हरला सांगितलं होतं?
  15. इराणमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतर पुढे काय होणार?

  16. ऋषी सुनक यांचा ब्रिटनमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचा निर्णय

    ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचा निर्णय का घेतला?

    फोटो स्रोत, Getty Images

    युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी एक-एक मत मिळवण्यासाठी लढणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर करताना हा निर्धार व्यक्त केला. 4 जुलै रोजी युकेमध्ये निवडणुका होत आहेत.

    पंतप्रधान सुनक यांनी 10 ड्राऊनिंग स्ट्रीट या ठिकाणाहून भर पावसात केलेल्या भाषणात या निवडणुकीची घोषणा केली. कंझरव्हेटिव्ह पक्षाला सलग पाचव्यांदा सत्तेत आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

    सुनक यांच्या या पावलामुळं निवडणुका लवकर होणार आहेत. त्यामुळं टोरीस यांची लेबर पक्षाबरोबर जुळवून घेण्याची संधी हुकणार आहे.

    टोरींची (कंझरव्हेटिव्ह) अराजकता दूर करून बदल घडवून आणण्याची ही वेळ असल्याचं लेबर पार्टीचे सर कीर स्टार्मर म्हणाले.

    लेबर पार्टीला देशातील जनमत चाचण्यांमध्ये मोठी आघाडी मिळाली आहे. तसंच प्रचंड नियोजनबद्ध कार्यक्रमासह ते प्रचारासाठी सज्ज झाले आहेत.सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- ऋषी सुनक यांनी ब्रिटनमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचा निर्णय का घेतला?

  17. AI, डीपफेक आणि खोटी माहिती, निवडणुकांत किती धोकादायक ठरू शकते तंत्रज्ञान?

    SAHIXD

    फोटो स्रोत, SAHIXD

    गेल्या काही वर्षात तंत्रज्ञान झपाट्यानं विकसित झालं. परिणामी सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनापासून अगदी सरकारी यंत्रणेवरही त्याचा परिणाम झाला आहे. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाची खूप चर्चा आहे. आत निवडणूक काळात याचा वापर करून खोटी माहितीही पसरवण्यात येत असल्यानं, चिंता व्यक्त केली जात आहे.

    सध्या भारतात निवडणुका सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर AI च्या मदतीनं तयार करण्यात आलेल्या प्रचंड कंटेंटकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. प्रचाराचे व्हीडिओ, सर्व भारतीय भाषांमध्ये लोकांसाठी वैयक्तिक स्वरुपाचे ऑडिओ संदेश आणि इतकंच काय उमेदवारांच्या आवाजामध्ये मतदारांना केला जाणारा ऑटोमॅटिक फोन कॉल सर्वाचा यात समावेश आहे.

  18. AI, डीपफेक आणि खोटी माहिती, निवडणुकांत किती धोकादायक ठरू शकते तंत्रज्ञान? वाचा

  19. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये आपले स्वागत आहे. राज्यात पुणे कार अपघातावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. देशात पाच टप्प्यांचे मतदान संपले आहे.

    युनायटेड किंगडममध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन आणि युक्रेन-रशिया संघर्ष सुरू आहे.

    या सर्व घडामोडी, तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर बातम्या तुम्हाला या पेजवर वाचायला मिळतील.