अरविंद केजरीवाल : 'मोदीजी तुमचा संघर्ष माझ्याशी आहे, माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका'

23 मे रोजीच्या बातम्या आणि घडामोडी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील.

थोडक्यात

  • बांगलादेशातील खासदाराची भारतात सुनियोजित पद्धतीने हत्या झाल्याचे बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
  • INDIA आघाडीचा निवडणुकीत विजय झाला तर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी दिलं आहे.
  • युनायटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी UK मध्ये निवडणुकांची घोषणा केली आहे.

लाईव्ह कव्हरेज

नितीन आणि तुषार

  1. विराट कोहलीचं आयपीएलमधलं ते स्वप्न जे अपूर्णच राहिलं...

  2. 966 कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी करणाऱ्या कंपनीला राज्यात 4 कंत्राटं, जाणून घ्या मेघा इंजिनिअरिंगबद्दल

  3. युक्रेन: रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे युक्रेनमधील खारकिव्हमध्ये सात जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

    खारकिववरील रशियन हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे

    फोटो स्रोत, TELEGRAM: VOLODYMYR ZELENSKY

    फोटो कॅप्शन, खारकिववरील रशियन हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे

    युक्रेनमधील खारकिव्ह शहरावर रशियानं क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून डझनावारी लोक जखमी झाले आहेत.

    खारकिव्हचे गव्हर्नर ओलेह सिन्येहुबोव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. दोन जण बेपत्ता झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    ओलेह यांनी स्थानिकांना घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला आहे. युक्रेनच्या सरकारी रेल्वे कंपनीने दावा केला आहे की, रशियन हल्ल्यामुळे त्यांच्या अनेक ठिकाणांचं नुकसान झालं आहे आणि त्यांचे अनेक कर्मचारी जखमी देखील झाले आहेत.

    युक्रेनला कमकुवत करण्यासाठी रशियाने खारकिव्हवरील हल्ल्यांचं प्रमाण वाढवलं आहे. ओलेह म्हणाले की वोवचांस्क च्या आसपास युद्ध सुरू आहे.

    मात्र तेथील परिस्थिती युक्रेनच्या सैन्याच्या नियंत्रणात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी सांगितलं की, रशिया युक्रेनच्या कमकुवत हवाई संरक्षणाचा फायदा घेतो आहे.

    युक्रेनचं हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी, झेलेंस्की आपल्या मित्रराष्ट्रांकडे सातत्याने आधुनिक लढाऊ जेट विमानांची मागणी करत आहेत.

    तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दावा केला आहे की, खारकिव्हवर कब्जा करण्याचा त्यांचा इरादा नाही. त्यांना रशियाच्या सीमेवर संरक्षक फळी तयार करायची आहे.

  4. माऊंट एव्हरेस्ट : मुंबईतल्या बापलेकीनं एकत्र सर केलं जगातलं सर्वात उंच शिखर

    एस कार्तिकेयन आणि काम्या कार्तिकेयन

    मुंबईची युवा गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन हिने 16 वर्षांच्या वयात माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर सर केलं आहे.

    20 मे रोजी काम्या आणि तिचे वडील कमांडर एस कार्तिकेयन यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं.

    एस कार्तिकेयन भारतीय नौदलात काम करतात तर काम्या मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रेन्स स्कूलमध्ये बारावीत शिकते आहे, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. काम्या एव्हरेस्ट सर करणारी भारताची दुसरी सर्वात युवा गिर्यारोहक ठरली आहे.

    याआधी मालवत पूर्णानं 2014 साली 13 वर्ष आणि 11 महिन्यांच्या वयात एव्हरेस्ट सर केलं होतं. पण पूर्णानं तिबेटकडून एव्हरेस्टवर चढाई केली होती.

    त्यामुळे नेपाळ कडून एव्हरेस्ट सर करणारी काम्या सर्वात युवा भारतीय ठरली आहे. पूर्णा प्रमाणेच काम्यालाही सेव्हन समिट्स पूर्ण करायचे आहेत, म्हणजे जगातल्या सात खंडांमधली सर्वोच्च शिखरं सर करायची आहेत.

    काम्यानं एव्हरेस्ट सर करून यातले सहा समिट्स गाठले आहेत. यंदा डिसेंबरमध्ये अंटार्क्टिकातील माऊंट व्हिन्सन मॅसिफ सर केलं, तर काम्या सेव्हन समिट मोहिम पार पाडणारी सर्वात युवा गिर्यारोहक ठरेल.

    काम्यानं वडिलांसोबत सह्याद्री पर्वतराजीत गिर्यारोहणाचे पहिले धडे गिरवले असं तिची आई सांगते.

  5. अरविंद केजरीवाल : 'मोदीजी तुमचा संघर्ष माझ्याशी आहे, माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नका'

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान मोदीजी तुमचा संघर्ष माझ्याबरोबर आहे. कृपया माझ्या म्हाताऱ्या आणि आजारी आई-वडिलांना त्रास देऊ नका.'

    अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दावा केला होता की स्वाती मालीवाल यांना झालेल्या कथित मारहाणीच्या प्रकरणात दिल्ली पोलिस गुरुवारी (23 मे) त्यांच्या आई-वडिलांची चौकशी करतील.

    अरविंद केजरीवाल यांनी व्हीडिओ प्रसिद्ध करत म्हटलं की, "पंतप्रधान मोदी यांनी मला नमवण्याचा आणि खच्चीकरण करण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आलं नाही. मग मला अटक करण्यात आली. तिहार तुरुंगात मला वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मी खचलो नाही."

    "मात्र, आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडली आहे. मला नमवण्यासाठी तुम्ही माझ्या म्हाताऱ्या आणि आजारी आई-वडिलांना टार्गेट केलं आहे. माझी आई खूप आजारी असते. मोदीजी 21 मार्चला ज्यावेळेस तुम्ही मला अटक केली होती, त्याच रात्री माझी आई हॉस्पिटलमधून परतली होती. माझे वडील 85 वर्षांचे आहेत. त्यांना नीट ऐकू देखील येत नाही."

    अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, "माझे आई-वडील गुन्हेगार आहेत असं तुम्हाला वाटतं का? पोलिस त्यांची चौकशी का करत आहेत. माझ्या म्हाताऱ्या आणि आजारी आई-वडिलांना त्रास का देत आहेत." 'तुमचा संघर्ष माझ्याबरोबर आहे. माझ्या आई-वडिलांना त्रास देणं बंद करा."

    अरविंद केजरीवाल

    फोटो स्रोत, Getty Images

    अरविंद केजरीवाल यांनी दुपारी एक्सवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "माझे आई-वडील आणि पत्नीसोबत मी पोलिसांची वाट पाहतो आहे. काल पोलिसांनी फोन करून माझ्या आई-वडिलांकडे चौकशीसाठी वेळ मागितली होती. मात्र ते येणार आहेत की नाही, याबद्दलची कोणतीही माहिती त्यांनी अद्याप दिलेली नाही."

    आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी 13 मे ला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी कथितरित्या मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

    आम आदमी पार्टीनं स्वाति मालीवाल यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. बिभव कुमार यांचे वडील महेश्वर राय यांनी म्हटलं आहे की त्यांचा मुलगा पूर्णपणे निर्दोष आहे.

  6. बंगालला चक्रीवादळाचा इशारा, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

    बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे.24 मे पर्यंत या वादळाचं आधी डिप्रेशन आणि मग डीप डिप्रेशनमध्येे रुपांतर होईल. त्याची तीव्रता वाढूून 25 मे पर्यंंत इथे सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे चक्रीवादळ निर्माण होईल तसंच 26 मे पर्यंंत त्याचं सिव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म अर्थात तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल.

    मान्सूनची परिस्थिती

    फोटो स्रोत, IMD

    या वादळाचं चक्रीवादळात रुपांंतर झालं, तर ते रिमाल या नावानं ओळखलं जाईल. हे ओमाननं सुचवलेलं नाव असून त्याचा अर्थ ‘वाळू’ असा होतो.

    सध्या या वादळाच्या प्रभावामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगवान वारे वाहात आहेत.

    हे वादळ उत्तरेकडे सरकून पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्याला धडकूू शकतं, असा इशारा हवामान खात्यानं दिला आाहे.या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या भागात 26-27 मे रोजी मुसळधार पावससाची शक्यता आहे. तससंच मिझोरम, त्रिपुरा आणि मणिपूरच्या दक्षिण भागातही पाऊस पडेेल.24 ते 27 मे दरम्यान मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नयेे असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.

    मान्सूनची आगेकूच

    फोटो स्रोत, IMD

    या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नाही. पण बंगालच्या उपसागरात वाहणारे वारे विदर्भातल्या हवामानावर परिणाम करू शकतात. तसंच चक्रीवादळामुळेे मान्सूनच्या प्रवासावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळेच या वादळावर लक्ष ठेवणं सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे.

    येेत्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातला हवामानाचा अंदाज असा आहे :

    दक्षिण कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, उत्तर कोंकण आणिउत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) हलका तेमाध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (३0-४0 किमी प्रतितास वेग), हलका तेमाध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    मान्सूनची आगेकूच

    फोटो स्रोत, IMD

    दरम्यान, केरळ आणि दक्षिण भारतातल्या अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. केरळ आणि माहे इथे पावसासाठी रेेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर भारतात राजस्थानसह पंजाब, हरियाणाचा काही भाग, चंदीगड आणि दिल्ली परिसरात उष्णतेेच्या लाटेसाठी रेड अलर्ट दिला आहे. त्याशिवाय गुजरात, मध्यप्रदेश आणि जम्मू-काश्मिरच्या काही भागांतही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

    मान्सून आगेकूच

    फोटो स्रोत, IMD

  7. डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीत स्फोट, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या रवाना

    डोंबिवली आग

    फोटो स्रोत, fire brigade

    कल्याण डोंबिवलीमध्ये आज एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागली

    अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली एमआयडीसीमधील अंबर केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीमध्ये 5 ते 6 कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे.

    स्फोटामुळे अनेक घरांचे आणि वाहनांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

    या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

    डोंबिवली आग

    फोटो स्रोत, Fire Brigade

    दरम्यान, ही घटना दुःखद असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

    त्यांनी 'एक्स'वर म्हटलं आहे की, 'डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

    जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.'

  8. अकोले : बुडालेल्यांच्या शोध मोहिमेदरम्यान बोट उलटली, SDRF च्या 3 जवानांचा मृत्यू

    स्क्रीनग्रॅब

    अकोलेमधील प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीच्या शोधमोहिमेदरम्यान बोट पलटून झालेल्या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर जागा दाखवण्यासाठी गेलेला एक स्थानिकही बुडाल्याची माहिती समोर आली आहे.

    संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा आणि सिन्नर तालुक्यातील घोलवड येथील आठ ते दहा जण बुधवारी सुगांव बुद्रुक गावातील विनायक धुमाळ यांच्या शेतावर कामासाठी गेले होते.

    काम करताना दुपारी प्रचंड उकाडा जाणवू लागल्यानं त्यांच्यापैकी काहीजण वनविभागाच्या नर्सरीजवळच्या प्रवरा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले. तिथं दगडी बंधारा आहे. तिथं पोहताना अर्जुन जेडगुले (वय 18) आणि सागर जेडगुले (वय 25) हे दोघं पाण्याचा अंदाज न आल्यानं तिथं बुडाले.

    या दुर्घटनेनंतर स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य राबवलं त्यात एकाचा मृतदेह सापडला. पण अर्जुन जेडगुलेचा मात्र अंधार पडेपर्यंत थांगपत्ता नव्हता. त्यामुळं एसडीआरएफ मुंबई कार्यालयाशी संपर्क साधून मदतीची मागणी करण्यात आली.

    त्यानुसार एनडीआरएफचं पथक पहाटे सुगांवमध्ये पोहोचलं. त्यांनी पहाटेच शोधमोहीम सुरूही केली. पण एका स्थानिकाला सोबत घेऊन शोध सुरू असतानाच अचानक बोल पालटली. त्यामुळं पथकातील चौघांसह पाचही जण पाण्यात पडले.

    त्यापैकी एका जवानाला वाचवण्यात यश आलं तर तीन जवानांचे मृतदेह हाती लागल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. सोबत असलेल्या स्थानिकाचा अजून शोध लागलेला नाही.

    पाण्याचा पुरेसा अंदाज आला नाही आणि बोटचं मशीन बंद पडल्यामुळं बोट पालटली. त्यामुळं या पथकालीत सदस्यांना पुरेसं प्रशिक्षण दिलेलं नव्हतं, असं सांगितलं जात आहे.

    मृतांमध्ये एसडीआरएफचे उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, कॉन्सटेबल राहुल गोपीचंद पावरा आणि चालक वैभव सुनील वाघ यांचा समावेश आहे.

  9. निवडणुकीच्या घोषणेनंतर सुनक यांनी सुरू केला प्रचार

    ऋषी सुनक

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, ऋषी सुनक

    निवडणुकांची घोषणा केल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भरपावसात केलेल्या भाषणानंतर काही तासांत त्यांनी पहिली सभा घेतली.

    पूर्व लंडनच्या एक्सेल सेंटर याठिकाणी ऋषी सुनक पोहोचले. यावेळी त्यांच्या पत्नी अक्षता मूर्तीदेखिल त्यांच्याबरोबर होत्या. तसंच त्यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश सदस्य आणि पक्षाचे जवळपास 100 सदस्य या सभेला उपस्थित होते.

    गृहसचिन जेम्स क्लेव्हर्ली यांनी प्रस्तावना केल्यानंतर सुनक यांनी सभेत मत मांडलं.

    “आपण ही निवडणूक सुरू होण्यापूर्वीच संपली आहे, असा विचार करावा अशी लेबर पाटीची इच्छा आहे.

    “पण आपण लढणार आहोत. आपण आपली मूल्ये आणि उद्दिष्टांसाठी रोज संघर्ष करणार आहोत,” असं सुनक यांनी म्हटलं.

    ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही सभेसाठी पोहोचल्या होत्या.

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती
  10. बांगलादेशचे गृहमंत्री म्हणाले-भारतात त्यांच्या खासदाराची सुनियोजित हत्या

    बांगलादेशचे गृहमंत्री असदुज्जमान खान यांनी एक आठवड्यापूर्वी बेपत्ता झालेले त्यांचे खासदार अनवारुल अझिम सुनियोजित पद्धतीनं हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

    या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

    गृहमंत्री असदुज्जान खान यांनी बुधवारी ढाक्यातील धानमंडी परिसरात त्यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी "ही हत्या सुनियोजित पद्धतीनं करण्यात आली आहे. 'या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे,' असं बांगलादेश पोलिसांनी म्हटलं.

    सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून भारतीय पोलीसही या प्रकरणात सहकार्य करत असल्याचं गृहमंत्री म्हणाले.

    यापूर्वी कोलकात्यात विधाननगरचे पोलिस उपायुक्त मानव श्रृंगला यांनी बीबीसी बांगलाशी बोलताना म्हटलं होतं की, "चौकशीदरम्यान त्यांच्या ड्रायव्हरनं दिलेल्या माहितीनुसार त्यानं 13 मे रोजी ज्या व्यक्तीला त्यांच्या कारमध्ये बसवलं होतं, त्यांची हत्या केल्यानंतर तुकडे-तुकडे करून फेकून दिले होते."

    पण कोलकाता पोलिसांनी अद्याप या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही.

    बेपत्ता खासदार

    फोटो स्रोत, ANWARUL AZIM ANAR FB

  11. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजमध्ये आपले स्वागत आहे. राज्यात पुणे कार अपघातावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. देशात पाच टप्प्यांचे मतदान संपले आहे.

    युनायटेड किंगडममध्ये निवडणुकांची घोषणा झाली आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन आणि युक्रेन-रशिया संघर्ष सुरू आहे.

    या सर्व घडामोडी, तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर बातम्या तुम्हाला या पेजवर वाचायला मिळतील.