ब्रिटनमध्ये 4 जुलैला निवडणुका, पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा

पुढच्या आठवड्यातच संसद बरखास्त करून, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल आणि 4 जुलै रोजी प्रत्यक्ष निवडणुका होतील.

थोडक्यात

  • भविष्यात लष्करामध्ये रामायण-महाभारताचे धडे दिले जाणार असल्याचं वक्तव्य लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी केलं आहे.
  • अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या प्लेऑफ मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या क्रमांकावरील सनरायझर्स हैदराबादला एकतर्फी सामन्यात 8 गडी राखून पराभूत केलं.
  • रमजानच्या महिन्यात विशेष दूत पाठवून भारतानं गाझामधील इस्रायली हल्ले थांबवले होते असा दावा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयाने यावर टीप्पणी टाळली आहे.
  • इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहाण्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड रवाना झाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

अमृता कदम

  1. पुणे अपघात प्रकरणी 2 कर्मचारी निलंबित, पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?

  2. ब्रिटनमध्ये 4 जुलैला निवडणुका, पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा

    ऋषी सुनक

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, ऋषी सुनक

    ब्रिटनमध्ये येत्या 4 जुलै रोजी निवडणुका होतील, अशी घोषणा पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केलीय. '10 डाऊनिंग स्ट्रीट' या सरकारी निवासस्थानाबाहेर भर पावसात माध्यमांसमोर ऋषी सुनक यांनी आगामी निवडणुकांची घोषणा केली.

    "गेल्या पाच वर्षात दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वाधिक आव्हानं आमच्यासमोर होती, असं म्हणत ऋषी सुनक म्हणाले की, "येत्या काही दिवसात तुमच्यासमोर मतांसाठी संघर्ष करेन. आमच्याकडे एक स्पष्ट प्लॅन आहे."

    "आमच्या सरकारनं आतापर्यंत जे काही केलं, त्याचा मला अभिमान आहे," असंही निवडणुकांच्या घोषणेवेळी ऋषी सुनक म्हणाले.

    पंतप्रधान ऋषी सुनक यांनी राजे चार्ल्स यांना 30 मे 2024 रोजी संसद बरखास्त करण्याची विनंती केली. ही विनंती राजे चार्ल्स यांनी मान्य केली.

    त्यामुळे पुढच्या आठवड्यातच संसद बरखास्त करून, निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल आणि 4 जुलै रोजी प्रत्यक्ष निवडणुका होतील.

    ऋषी सुनक

    फोटो स्रोत, PA Media

    फोटो कॅप्शन, ऋषी सुनक निवडणुकांची घोषणा करत असताना पावसानं हजेरी लावली.

    ब्रिटनमध्ये साधारणत: नव्या संसदेच्या पहिल्या बैठकीच्या पाचव्या वर्षपूर्तीनंतरच संसद बरखास्त केली जाते. विद्यमान संसदेच्या पहिल्या बैठकीची वर्षपूर्ती 17 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच संसद बरखास्त करून, निवडणुकांची घोषणा झालीय.

    नियमानुसार, संसद बरखास्त झाल्यानंतरचे 25 चालू दिवस (Working Days) आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी दिले जातात.

    नियोजित प्रक्रियेचं पालन झालं असतं, तर ब्रिटनमध्ये 28 जानेवारी 2025 पूर्वीपर्यंत निवडणुका होणं अपेक्षित होतं. मात्र, आताच संसद बरखास्त केल्यानं त्यानुसार निवडणुका होतील आणि तशी घोषणा पंतप्रधान सुनक यांनी केलीय.

  3. ते काय असतं?

    ते काय असतं?

    व्यंगचित्र
  4. अरविंद केजरीवालांच्या 'निष्पक्ष' चौकशीच्या विधानावर स्वाती मालिवाल म्हणतात...

    स्वाती मालिवाल

    फोटो स्रोत, Getty Images

    आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘निष्पक्ष तपासा’संबंधीच्या विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे.

    पीटीआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं की, स्वाती मालिवाल प्रकरणाच्या दोन बाजू आहेत आणि या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास व्हावा असं मला वाटतं.

    स्वाती मालिवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्स वर लिहिलं आहे, “माझ्या मागे नेते आणि स्वयंसेवकांची फौज लावल्यानंतर, मला भाजपची एजंट म्हटल्यानंतर, माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्यानंतर, एडिटेड व्हीडिओ लीक केल्यानंतर आता त्यांना या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करायची आहे. आरोपीसोबत फिरल्यानंतर, जिथे अपराध घडला त्या जागी जाऊन पुराव्यांसोबत छेडछाड केल्यानंतर आणि ज्या मुख्यमंत्र्यांच्या ड्राइंग रुममध्ये मला मारहाण करण्यात आल्यानंतर ते सांगत आहेत की या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करायची आहे.

    स्वाती मालीवाल यांनी आरोप केला की, 13 मे रोजी जेव्हा मी अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांचे पीएस बिभव कुमार यांनी मारहाण केली होती.

    त्याची तक्रार त्यांनी दिल्ली पोलिसांतही केली होती. त्यानंतर बिभव कुमार यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.

    बिभव कुमार यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत..

  5. पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी 2 FIR का दाखल केले?

    व्हीडिओ कॅप्शन, पुणे पोर्शे अपघात प्रकरणात पोलिसांनी 2 FIR का दाखल केले?
  6. मान्सूनची आगेकूच, पुढील 24 तासांसाठी राज्यात काय आहे हवामानाचा अंदाज?

    मान्सून

    फोटो स्रोत, Getty Images

    पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळच्या वेळी हवामान अंशतः ढगाळ राहील, तर दुपार आणि संध्याकाळपर्यंत मुख्यतः निरभ्र राहील.

    शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

    दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) राहील.हलका तेमाध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    मान्सूनची आगेकूच

    फोटो स्रोत, IMD

    फोटो कॅप्शन, मान्सूनची आगेकूच

    दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे आणखी पुढे सरकले आहेत. 22 मे रोजी हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अंदमान आणि निकोबार बेटांचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे.

    श्रीलंकेच्या मध्यावरून मान्सूनची सध्याची सीमा जाते आहे. येत्या काही दिवसांत मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होईल अशी अपेक्षा आहे.

  7. नॉर्वे, स्पेन, आर्यलंड देणार पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता, इस्रायलनं म्हटलं...

    आमचा देश हा पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देत असल्याचं नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्तोर यांनी म्हटलं आहे.

    त्यांनी म्हटलं की, येत्या 28 मे रोजी नॉर्वे पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देईल.

    नॉर्वेपाठोपाठ आर्यलंड आणि स्पेनही पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊ शकतात.

    या निर्णयाच्या विरोधात इस्रायलने आर्यलंड आणि नॉर्वेमधून आपल्या राजदूतांना माघारी बोलावलं आहे.

    नॉर्वेचे पंतप्रधान स्तोर यांनी म्हटलं की, गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाने हे स्पष्ट केलं आहे की, शांतता आणि स्थैर्यासाठी पॅलेस्टाईनची समस्या सोडविणं आवश्यक आहे. द्विराष्ट्र सिद्धांत इस्रायलसाठीही योग्य असल्याचं नॉर्वेचं मत असल्याचं त्यांनी म्हटलं.

    या निर्णयामुळे इतर देशांनाही याच मार्गावरून चालण्याचा ‘कठोर संदेश’ मिळेल.

    या निर्णयानंतर इस्रायलने तात्काळ प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ते आयर्लंड आणि नॉर्वेमधल्या आपल्या राजदूतांना विचारविमर्श करण्यासाठी तातडीने परत बोलावत आहेत.

    नॉर्वेचे पंतप्रधान जोनस स्तोर
    फोटो कॅप्शन, नॉर्वेचे पंतप्रधान जोनस स्तोर

    इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅत्झ यांनी ट्वीट करून म्हटलं की, “मी आयर्लंड आणि नॉर्वेला स्पष्ट संदेश पाठवत आहे. जे आमची अखंडता आणि सार्वभौमत्वाला कमकुवत करत आहे, त्याला धोका निमाण करत आहेत; त्यांच्यासमोर इस्रायल झुकणार नाही. इस्रायल या मुद्द्यावर शांत बसणार नाही. याचे परिणाम गंभीर होतील. जर स्पेननेही पॅलेस्टाइनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली, तर त्यांच्याविरोधातही पावलं उचलली जातील.”

    इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असंही म्हटलं की, पॅलेस्टाइनला राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचा अर्थ म्हणजे ‘दहशतवादाला प्रशस्तीपत्रक’ मिळतं.

    त्यांनी म्हटलं,“दहशतवादी संघटना हमासने ज्यू लोकांवर इतके हल्ले, निर्घृण अत्याचार केल्यानंतर या देशांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता देणं हे हमासला बक्षीस देण्यासारखं आहे. हा 7 ऑक्टोबरच्या पीडितांवर अन्याय आहे. 128 अपहृतांना परत आणण्याच्या प्रयत्नांना धक्का आहे.”

  8. उजनी धरणात 7 जणांची बोट उलटली, एक जण पोहून बाहेर आला, 6 जण अजूनही बेपत्ता

    व्हीडिओ कॅप्शन, उजनी धरणात बोट उलटली: एक जण पोहून बाहेर आला, 6 जण अजूनही बेपत्ता
  9. कडक उन्हाळ्यात फक्त पाणी पिऊन चालणार नाही, 'या' गोष्टींकडेही लक्ष द्या

    कडक उन्हाळ्यात फक्त पाणी पिऊन चालणार नाही, 'या' गोष्टींकडेही लक्ष द्या

    फोटो स्रोत, Getty Images

    उन्हाळ्यात पाणी कमी प्यायल्याने घशाला सतत कोरड पडणं, चक्कर आल्यासारखं होणं, डोळे लाल होणं किंवा लघवी पिवळसर होणं, यातलं एखादी गोष्ट तरी तुमच्याबाबत सतत घडत असेल, तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असू शकते.

    तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी आणि क्षार (Electrolytes) कमी झाल्यास तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम हाेऊ शकतात. या परिणामांना निर्जलीकरण (डिहायड्रेशन) म्हणतात.

    डिहायड्रेशनची तीव्रता वाढली, तर जिवावरही बेतू शकतं, असं इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

    सध्या उन्हाळा सुरू आहे आणि यादरम्यान आपल्याला सतत घाम येतो. या सततच्या घामामुळे शरीरातील केवळ पाण्याचं प्रमाण कमी होत नाही, तर त्यासोबत शरीरातील क्षारही कमी होतात.

    कडक उन्हाळ्यात फक्त पाणी पिऊन चालणार नाही, 'या' गोष्टींकडेही लक्ष द्या

    फोटो स्रोत, Getty Images

    आता तुम्ही म्हणाल, एसीमध्ये राहिल्यास असा काही घाम वगैरे येत नाही, तर कायम एसीमध्ये राहून नैसर्गिक तहान कमी होते. त्यामुळे तुमच्या शरीरावर विपरित आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असं आरोग्य क्षेत्रातील जाणकार सांगतात.

    डिहायड्रेशनच्या समस्येबाबत बीबीसी मराठीनं सविस्तर जाणून घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांशी बातचित केली.

    सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा-डिहायड्रेशनची लक्षणं स्वतः कशी ओळखायची?

  10. मोदींनी 'मन की बात'मध्ये कौतुक केलं, त्या शेतकऱ्याच्या 'मन की बात' ऐका...

  11. कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या फायनलमध्ये

    कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलच्या फायनलमध्ये

    फोटो स्रोत, Getty Images

    आयपीएल 2024च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आपला प्रवेश निश्चित केला आहे.

    अहमदाबादमध्ये झालेल्या पहिल्या प्लेऑफ मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दुसऱ्या क्रमांकावरील सनरायझर्स हैदराबादला एकतर्फी सामन्यात 8 गडी राखून पराभूत केलं.

    प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला 20 ओव्हर्स पूर्ण खेळता आल्या नाहीत. त्यांचा संघ 159 धावांवर तंबूत परतला.

    मिचेल स्टॉर्कने तीन विकेट घेऊन हैदराबादच्या टॉप ऑर्डरचं कंबरडं मोडलं तसेच कोलकाताच्या इतर गोलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली.

    फलंदाजीसाठी उत्तम असलेल्या खेळपट्टीवर कोलकाताने हे आव्हान सहज पूर्ण केलं. 38 चेंडू शिल्लक असतानाच सामना ताब्यात घेतला. कोलकातासाठी व्यंकटेश अय्यर आणि कप्तान श्रेयस अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली.

    या दोघांचीही अर्धशतकं पूर्ण झाली आणि कोलकाताला चौथ्यादा आयपीएल फायनलमध्ये संधी मिळाली.

  12. लष्करप्रमुख वेद, पुराण आणि महाभारताबद्दल काय म्हणाले?

    ANI

    फोटो स्रोत, ANI

    भारतीय सैन्य प्रोजेक्ट उद्भव अंतर्गत महाभारतातील युद्ध, प्रतिष्ठित सैनिकांच्या वीरश्रीपूर्ण कार्य आणि प्रशासनकलेतला भारताचा असणारा समृद्ध वारसा यांचा अभ्यास करत आहे असं लष्कर प्रमुख मंगल पांडे यांनी सांगितलं.

    पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जनरल पांडे म्हणाले, उद्भव योजनेचं उद्घाटन गेल्या वर्षी करण्यात आलं होतं. यानुसार वेद, पुराण, उपनिषदं आणि अर्थशास्त्रासारख्या प्राचिन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला जात आहे.

    एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख म्हणाले, “प्राचीन भारतातील ज्ञानाची मुळं 5000 वर्षं जुन्या नागरी संस्कृतीपर्यंत जातात. जेव्हा ज्ञान आणि मूल्यांमध्ये लढा सुरू होता. या वारशाचं उदाहरण बौद्धिक साहित्याचं विशाल भांडार, प्राचीन लिप्यांमध्ये बद्ध असलेलं साहित्य आणि विविध क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ प्रचारक आणि संस्थामधून पाहायला मिळतं."

    लष्कर प्रमुखांनी हे विधान हिस्टॉरिकल पॅटर्न्स इन इंडियन स्ट्रॅटेजिक कल्चर या संमेलनात केलं.

    ते म्हणाले, “प्रोजेक्ट उद्भव अंतर्गत वेद, पुराण, उपनिषदं आणि अर्थशास्त्रासारख्या प्राचीन ग्रंथांचं सखोल अध्ययन केलं आहे. ते परस्पर संबंध, धार्मिक विचार आणि नैतिक मूल्यांवर आधारित आहेत. यामध्ये महाभारतातील युद्धं, मौर्य, गुप्त आणि मराठा शासनकाळातील सामरिक कौशल्यांचं अध्ययन केलं गेलं आहे, ज्याने भारताच्या समृद्ध सैन्य वारशाला आकार दिला आहे.”

  13. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसींच्या अंत्यसंस्कारासाठी उपराष्ट्रपती धनखड रवाना

    MEA

    फोटो स्रोत, MEA

    इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहाण्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड रवाना झाले आहेत.

    भारतातर्फे उपराष्ट्रपती जगदीप धनखड या विधीसाठी उपस्थित राहातील.

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधिर जयस्वाल यांनी एक फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला असून

    इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री हुसैन अमिर अब्दुल्लाहियान यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त करण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड तेहरानला रवाना झाले आहेत.

  14. गाझातलं युद्ध थांबवण्याच्या मोदींच्या विधानावर अमेरिकेची प्रतिक्रिया काय आली?

    गाझातलं युद्ध थांबवण्याच्या मोदींच्या विधानाबद्दल अमेरिकेची प्रतिक्रिया काय आली?

    फोटो स्रोत, Getty Images

    रमजानच्या महिन्यात विशेष दूत पाठवून भारतानं गाझामधील इस्रायली हल्ले थांबवले होते असा दावा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयाने यावर टीप्पणी टाळली आहे.

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांना पत्रकार परिषदेत मोदींनी तेल अवीवमध्ये दूत पाठवून रमजानच्या महिन्यात हल्ले थांबववले होते असं विधान एका मुलाखतीत केलं होतं, याची माहिती तुम्हाला होती का असं विचारण्यात आलं

    त्यावर मॅथ्यू मिलर म्हणाले, या विधानाबद्दल आपल्याला माहिती आहे मात्र मी त्यावर टिप्पणी करणार नाही.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं, मी आताच गाझामध्ये रमजानचा महिना होता तेव्हा मी आपला विशेष दूत इस्रायलला पाठवला. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांना भेटून किमान रमजानमध्ये बॉम्बहल्ले करू नयेत असं समजवून सांगा असं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी खूप प्रयत्न केले.

    पंतप्रधान मोदी म्हणाले होते, “इथं तुम्ही मुसलमानांच्या मुद्द्यावर मला कोंडीत पकडता. परंतु मोदींनी गाझात रमझानच्या काळात बॉम्बफेक.... परंतु मी याची प्रसिद्धी करत नाही कारण यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असतील.”

  15. नमस्कार

    बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर आपले स्वागत आहे. देशात उन्हामुळे तापमान वाढलं आहे तर निवडणुकीमुळे देखील राजकारण वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. पाच टप्प्यातील मतदान संपले असले तरी देशातील अनेक ठिकाणी मतदान अजून बाकी आहे.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाच्या बातम्या येत आहेत. या सर्व बातम्या तुम्हाला एकाच ठिकाणी बीबीसी मराठीच्या लाइव्ह पेजवर वाचायला मिळतील.

    21 मे रोजीच्या बातम्या वाचण्यासाठी या पेजला भेट द्या.