पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईनंतर टीआरएफ अर्थात द रेझिस्टन्स फ्रंट ही संघटना चर्चेत आली आहे.
7 मे रोजी सकाळी भारताच्या संरक्षण विभागानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारतानं केलेल्या कारवाईमागचं कारण स्पष्ट करताना टीआरएफचं नाव घेतलं.
टीआरएफ ही संघटना लष्कर ए तोयबा या पाकिस्तानस्थित कट्टरवादी संघटनेचा मुखवटा असल्याचं मिस्री म्हणाले आहेत.
2019 मध्ये भारताने कलम 370 रद्द केलं त्यानंतर TRF हा गट उदयास आला.. सुरुवातीला त्यांचा भर ऑनलाईन प्रचारावर होता. पण नंतर हा गट सशस्त्र कारवायांकडे वळल्याचं सांगितलं जातं.
गेल्या काही वर्षांत या गटाने काश्मीरमध्ये आलेले स्थलांतरीत आणि भारतीय सैन्यावर हल्ले केल्याचा दावा केला.
मार्च 2020 मध्ये, उत्तर काश्मीरच्या छिंदवाडा शहरात झालेल्या हल्ल्यात लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि एक पोलीस उपनिरीक्षक मृत्युमुखी पडले होते.
5 ऑगस्ट 2023 रोजी कुलगाम जिल्ह्यातील हलान मंजगाम भागात टीआरएफच्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान मारले गेले होते.
सप्टेंबर 2023 मध्ये अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागवर झालेल्या कट्टरपंथी हल्ल्यात एक कर्नल, भारतीय लष्करातील एक मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलीस प्रशासनातील डीएसपी मृत्युमुखी पडले.
तर 20 ऑक्टोबर 2024 रोजी भारत प्रशासित काश्मीरच्या गांदरबल इथे एका बोगद्याचं काम करणाऱ्या सहा स्थलांतरित कामगार आणि एका डॅाक्टरचा गोळीबारात मृत्यू झाला होता. TRF या संघटनेनं या हल्ल्यांची जबाबदारी घेतली होती.
भारत सरकारने 2023 साली UAPA कायद्या अंतर्गत या गटाला दहशतवादी संघटना घोषित केलं आहे. तसंच TRF चा संस्थापक शेख सज्जाद गुलला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं.
तरुणांना भडकावून आपल्यात सहभागी करून घेणे, इंटरनेटवर दहशतवादी माहितीचा प्रसार करणे तसंच जम्मू-काश्मिरमध्ये अवैधरित्या हत्यारांची तस्करी करणे असे आरोप TRF वर आहेत.
"TRF च्या कारवाया भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचवणाऱ्या आहेत," असं तेव्हा भारत सरकारने म्हटलं होतं.
पण काश्मीरमध्ये आधीपासूनच काही कट्टरवादी संघटना कार्यरत असताना नव्यानं असा गट स्थापन करण्याची गरज का भासली असावी?
त्याविषयी जम्मू-काश्मीर पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, 2016 नंतर आंतरराष्ट्रीय दहशतवादाशी संबंधित फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मते जागतिक सत्ता पाकिस्तानला ब्लॅक लिस्ट करण्याचा धोका देखील होता.
अशा परिस्थितीत काश्मीरमधील सशस्त्र हिंसाचाराला स्थानिक रंग देता यावा आणि त्याला धार्मिक चळवळीऐवजी स्थानिक विरोधी गट म्हणून सादर करता यावं यासाठी लष्कर-ए-तैय्यबा ही टीआरएफच्या स्वरूपात आणि जैश-ए-मोहम्मद ही संघटना पीपल्स अँटी फासिस्ट फ्रंटच्या स्वरूपात सक्रिय झाली.
स्थानिक पोलिसांच्या दाव्यानुसार, टीआरएफ काश्मीर खोऱ्यात जास्त सक्रिय आहे तर पीएएफएफ जम्मूच्या राजौरी आणि पूंछमध्ये जास्त सक्रिय आहे.
सैन्यविषयक इतिहासाचे अभ्यासक श्रीनाथ राघवन यांनी बीबीसी प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांच्याशी बोलताना TRF हा गट म्हणजे लष्कर-ए-तोयबाशी निगडीत एक शाखा असल्याचं सांगितलं होतं.