(COPY)

राहुल गांधी एक ब्रँड म्हणून समोर येऊ शकले आहेत?

फैसल मोहम्मद अली
बीबीसी प्रतिनिधी, दिल्ली

भारतात यंदा थंडी जसजशी कमी होते आहे, तसं निवडणुकीचं वातावरण तापत चाललं आहे.  एका बाजूला NDA दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी एकत्र येऊन उघडलेली INDIA आघाडी कमकुवत होत असल्याचं म्हटलं जात आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुख्य सामना होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्ताधारी भाजप विरुद्ध 50 हून कमी जागा जिंकू शकलेल्या काँग्रेस पक्षामध्ये.

कदाचित म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बहुतेक राजकीय भाषणांमध्ये नेहरू-गांधी घराण्याला, राहुल गांधींना आणि काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

मोदी आणि त्यांच्या पक्षाचे इतर नेते काँग्रेसवर आणि खास करून राहुल गांधींवर अखंड शरसंधान करत आहेत. राहुल गांधी यांची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. आता प्रश्न असा आहे की, असं करण्यामागे नेमकं काय कारण असू शकेल?

काँग्रेस अजूनही सत्तारूढ भाजपनंतरचा देशातला सर्वांत मोठा पक्ष आहे, हे यामागचं एक कारण असू शकतं. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला कमी जागा जिंकता आल्या पण त्यांना जवळपास 20 टक्के मतं मिळाली होती.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी राहुल गांधी यांच्यावर सातत्याने होणाऱ्या राजकीय हल्ल्यांविषयी बीबीसीशी बोलताना सांगितलं :

"सध्याच्या काळात राहुल गांधी हे त्या मोजक्या नेत्यांपैकी आहेत जे देशाच्या परिस्थितीचा दूरदृष्टीने विचार करत आहेत आणि भाजपला आव्हान देत आहेत."

ब्रँड गुरू संदीप गोयल यांच्या मते

"राहुल गांधी काहीतरी योग्य करत आहेत. आणि काँग्रेस आज मैदानात आहे त्यामागचं सगळ्यात मोठं कारण ब्रँड राहुल हे आहे."

मुंबईहून फोनवर बोलताना संदीप गोयल म्हणाले की:

"नरेंद्र मोदींच्या मानाने खरं तर ब्रँड राहुल गांधी हा खूपच छोटा ब्रँड आहे."

नरेंद्र मोदी ते ‘ब्रँड मोदी’ पर्यंत

पण या बरोबरच एक प्रश्नही ते मांडतात - सध्याच्या परिस्थितीत राजकीय मैदानात कुठलीही व्यक्ती नरेंद्र मोदींच्या समोर लढण्यासाठी उभी ठाकू शकते का?

तारिक अन्वर किंवा संदीप गोयल यांच्या दाव्यांना आपण खरं मानलं तर पुढचा प्रश्न येतो की, राहुल गांधी नेमकं कोणत्या पद्धतीने भाजपला शह देण्याचा प्रयत्न करत आहेत?

जेव्हा पंतप्रधान मोदीही आश्चर्यचकित झाले होते...

साधारण सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू होती.राहुल गांधी बोलत होते-

"तुम्ही माझा तिरस्कार करता. तुम्ही माझा राग राग करता. मी तुमच्यासाठी पप्पू आहे. तुम्ही मला अशा कुठल्याही शिव्या देऊ शकता. नावं ठेवू शकता. पण मी तुमच्याबद्दल एवढासाही राग धरलेला नाही. तिरस्कार केलेला नाही. मी तुमच्यावर अजिबात संतापत नाही, कारण मी काँग्रेस आहे. हे सगळे काँग्रेस आहेत. काँग्रेसने  याच भावनेने आजपर्यंत देशाला आकार दिला आहे."

भाषण संपताच ते लगोलग पंतप्रधान मोदींच्या जागेजवळ गेले आणि त्यांना मिठी मारली.

समाजशास्त्रज्ञ शिव विश्वनाथन या क्षणाचं (मिठी मारल्याचा प्रसंग) वर्णन करताना इतिहासाची पुनरावृत्ती असं करतात :

"विरोधी पक्ष जेव्हा ऐन मोक्याच्या क्षणी भेदभाव विसरून गेले होते, असे आधीही घडले आहे. अटलबिहारी वाजपेयी सोनिया गांधींचा खूप आदर करत असत. आज राहुल गांधींनी याच इतिहासाची आठवण दिली. यावरून हेच दिसतं की असा बराच इतिहास आहे जो मोदींनी समजून घेतला पाहिजे."

 

त्यावेळी नंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात राहुल गांधींची मिठी म्हणजे गळ्यात पडणं असल्याचं सांगितलं होतं.

मोहब्बत की दुकान

राष्ट्रीय सुरक्षा आणि आक्रमक राष्ट्रवाद विशेषतः सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भाजपच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधी यांच्या भाषणांमधून 'मोहब्बत की दुकान' आणि 'विचारधारांची लढाई' असे शब्द गेल्या काही वर्षात वारंवार ऐकायला येऊ लागले आहेत.

काही लोकांचं असं म्हणणं आहे की, या माध्यमातून ते राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीची नवी व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.


राहुल गांधींच्या दोन्ही यात्रा-  'भारत जोडो यात्रा' आणि 'भारत जोडो न्याय यात्रा' यांच्यामागे कदाचित हेच विचार असल्याचं मानलं जात आहे.

माजी काँग्रेस अध्यक्षांनी डिसेंबरमध्ये झालेल्या पक्षस्थापना दिवसाच्या रॅलीदरम्यान नागपूरमधल्या भाषणात म्हटलं होतं :

"लोकांना वाटतंय की ही राजकीय लढाई आहे. सत्तेसाठी चाललेली आहे. पण या लढाईचा पाया विचारधारा आहे."

प्रेम वाटत चला पण...

राहुल गांधी त्यांच्या काँग्रेस पक्षाला धर्मनिरपेक्ष विचारधारेने चालणारा पक्ष याच चौकटीत ठेवतात. त्यानुसार, 'संघ-भाजपसारख्या द्वेष पसरवणाऱ्या शक्तींच्या' विरोधात त्यांचा पक्ष उभा आहे.

 राहुल गांधींचं म्हणणं आहे की, त्यांची विचारधारा प्रेमावर विश्वास ठेवते. म्हणूनच त्यांनी 'मोहब्बत की दुकान' - प्रेमाचं दुकान उघडलं आहे.

ते म्हणतात :

"विद्वेषाच्या बाजारात प्रेमाचं दुकान उघडत आहे. तुम्ही माझा तिरस्कार करा. तुम्ही मला शिव्या द्या. ही तुमच्या मनातली गोष्ट झाली. तुमच्या बाजारात द्वेष आहे, माझ्या दुकानात प्रेम आहे, आणि हे मी फक्त माझ्यापुरतं बोलत नाहीये."

ते म्हणतात :

"हे फक्त राहुल गांधी बोलत आहे, असं समजू नका. ही संपूर्ण संघटना- ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, महात्मा गांधींसारखे लोक त्यात होते. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, आंबेडकर, आझाद, या सगळ्यांनी प्रेमाचं दुकान उघडलं होतं. आम्ही तेच करत आहोत."

याच भाषणात बोलताना त्यांनी भाजपच्या लोकांनाही प्रेमाचं दुकान उघडण्याचं आवाहन केलं, निमंत्रण दिलं.

भाजपने राहुल गांधींच्या या 'मोहब्बत की दुकान'ला 'नफरत का मॉल' असं म्हटलं. भाजपने सांगितलं की, ही अशी जागा आहे ज्या जागेत फक्त घराणेशाही, जातीयवाद, द्वेष आणि लांगूलचालन अशा गोष्टींना स्थान मिळतं.

'हिंदुस्तान टाइम्स' या इंग्रजी वृत्तपत्राचे राजकीय संपादक विनोद शर्मा सांगतात की, राहुल गांधींना वाटतं की, भारत याच विचारांच्या पायावर उभा आहे.

प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज अभियानाचे संयोजक प्रशांत किशोर मात्र राहुल गांधींची या वेळी सुरू असलेली यात्रा योग्य नसल्याचं सांगतात.

ते म्हणतात :

ते म्हणतात, "तुम्ही जेव्हा तुमच्या मुख्यालयात (दिल्ली)असायला हवं होतं, त्यावेळी तुम्ही यात्रा काढत बाहेर राहताय."

जनता दल (युनायटेड) चे सरचिटणीस के. सी. त्यागी म्हणाले :

"धर्मनिरपेक्षता म्हणजे फक्त आरएसएसला शिव्या देणं नाही, किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे मुस्लिमांचे लांगूलचालन असंही नाही. ही एक अखंड प्रक्रिया आहे ज्याची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीपासून झालेली आहे."



बीबीसीशी बोलताना त्यागी म्हणाले :

"यासाठी वॉक द टॉकची आवश्यकता आहे. म्हणजे जे बोलताय ते करून दाखवा."


या बाबतीत के. सी. त्यागी मुलायमसिंह यादवांचं उदाहरण देतात. ते सांगतात की, बाबरी मशीद वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्यामुळे त्यांना मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. व्ही. पी. सिंग यांनीसुद्धा मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करताना कठीण परिस्थितीचा सामना केला होता. इतकी कठीण परिस्थिती होती की, त्यांचं सरकारही कोसळलं.

के.सी. त्यागींचा पक्ष खरं तर काँग्रेसच्या बरोबर INDIA आघाडीचा भाग होता. पण त्यांचे नेते नितीशकुमार यांनी नुकताच भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि आता JDU हा NDA चा भाग आहे. बीबीसीने के.सी. त्यागी यांच्याशी बातचीत केली होती, त्या वेळी त्यांचा पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग होता.

राहुल गांधी भलेही संघावर आणि भाजपवर हल्ला करोत, पण त्यांच्या स्वतःच्या पक्षावर सॉफ्ट हिंदुत्वाचा मार्ग पत्करल्याचा आरोप होत असतो.

काँग्रेस आणि सॉफ्ट हिंदुत्व

ज्येष्ठ पत्रकार कुर्बान अली धर्मनिरपेक्षता आणि सॉफ्ट हिंदुत्वाचा विषय राहुल गांधींच्या वडिलांपासून सुरू करतात. राजीव गांधी यांनी एकाच वेळी हिंदू-मुस्लीम कार्ड खेळणं सुरू केलं होतं.

बीबीसीशी बोलताना कुर्बान अली म्हणाले :

"राजीव गांधी यांनी आधी गरीब मुस्लीम महिला शाहबानो केस प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय फिरवण्यासाठी कायदा आणला. मग त्यांच्यावर मुस्लिमांचं तुष्टीकरण किंवा लांगुलचालन करण्याचा आरोप झाला. तर त्यांनी अनेक दशकांपासून बंद असलेल्या बाबरी मशिदीचं टाळं उघडण्याचा निर्णय घेतला."

राहुल गांधींचा धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सुरू असलेला संघविरोध हा सुद्धा विरोधाभास असल्याचं कुर्बान अली यांचं म्हणणं आहे.

बीबीसीशी बोलताना अली सांगतात, "एकीकडे ते धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ते आरएसएसला विरोध करतात.  दुसरीकडे गुजरात विधानसभेसाठी आपल्या प्रचाराची सुरुवात एका मंदिरापासून करतात. स्वतःला शिवभक्त म्हणवतात आणि आपण कसे जानवंधारी ब्राह्मण आहोत हे सांगतात आणि दुसरीकडे तेच आजकाल जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सरसावले आहेत."

आपण उच्च कुळातील दत्तात्रेय ब्राह्मण असल्याचं सांगण्याचा राहुल गांधींचा हा काही एकमेव प्रयत्न नाही. साधारण पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीला काही महिने बाकी होते. तेव्हा काँग्रेसचं लोकसभेतलं संख्याबळ 44 होतं आणि राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते.

पीटीआय वृत्तसंस्थेने त्यावेळी एक छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं. राजस्थानात पुष्करच्या मंदिरात कपाळावर टिळा लावलेले, पंडितांच्या घोळक्यात पोथी बघत असलेले राहुल गांधी त्यात दिसले.

नंतर मंदिरातल्या एका पुजाऱ्याच्या हवाल्याने छापलेल्या बातमीत राहुल गांधींनी आपलं गोत्र दत्तात्रेय असल्याचं सांगितल्याचा उल्लेख होता. आपण काश्मिरी ब्राह्मण असल्याचं राहुल म्हणाल्याचं बातमीत लिहिलं होतं. राहुल गांधींचं गोत्र आणि जात सांगणारं छायाचित्र शेअर करत पक्षाचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी 'भाजपला आता आणखी किती दाखले पाहिजेत?' असा संदेशही लिहिला.

राहुल गांधींवर आरोप आहे की, ते जातनिहाय जनगणना व्हायला हवी असा आग्रह धरतात कारण समाजातून जातीवर आधारित भेदभाव नष्ट करण्यासाठी ते आवश्यक असल्याचे मानतात. दुसरीकडे ते स्वतः ब्राह्मण असल्याचं सांगत पारंपरिक जातिवादाच्या रेषेला ठळक करत राहतात.

बिहार सरकारने जातीआधारित जनगणना करण्याचा आणि त्याच्या आधारावर आरक्षण वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राहुल गांधी म्हणत आहेत की, केंद्रात त्यांचं सरकार आलं तर ते देशभरात जातिनिहाय जनगणना करून घेतील.

ज्याप्रमाणे जातिभेदाच्या प्रश्नांवर राहुल गांधींचं धोरण सुस्पष्ट दिसत नाही तसंच धार्मिकतेच्या वादावरही त्यांच्या पक्षाचा कल बहुतेकदा मौन बाळगण्याचा असतो.

उदाहरण द्यायचं झालं तर छत्तीसगढमध्ये काँग्रेसच्या तत्कालीन भूपेश बघेल सरकराने हिंदू-मुस्लीम हिंसाचाराच्या प्रकरणात नुकसान भरपाई देताना दोन समुदायांच्या लोकांमध्ये भेदभाव केल्याचा आरोप होतो.

बस्तरमध्ये ख्रिश्चन धर्म मानणाऱ्या आदिवासी गावांमध्ये मृतदेहाचं दफनसुद्धा रोखलं जात होतं आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हिंदूराष्ट्राचे पुरस्कर्ते असणाऱ्या वादग्रस्त गुरू धीरेंद्र शास्त्रींच्या पायाशी बसलेले दिसून आले.

या प्रकरणांमध्ये कधी राहुल गांधींकडून कुठलंच स्पष्ट वक्तव्य समोर आलेलं नाही. या सगळ्या कारणांमुळेच काँग्रेसवर सॉफ्ट हिंदुत्वाचा आरोप होत असतो.

वास्तविक जाणकारांचं हेदेखील म्हणणं आहे की, काँग्रेस असा पक्ष आहे की, स्वातंत्र्य आंदोलनापासूनच या पक्षात डाव्या विचारांचे नेते आणि उजवीकडे झुकणारे नेते बरोबरीने काम करत आले आहेत.

कॉर्पोरेट जग आणि राहुल गांधी

पण यातून असा संदेश गेला किंवा पसरवला गेला की, राहुल गांधी कॉर्पोरेट विरोधी आहेत.

दिल्लीच्या जवळ असलेली दोन गावं भट्टा परसोलच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यांचं प्रकरण असो किंवा ओडिशाच्या नियमगिरी येथील खाणकाम रोखणं असो, अशा आंदोलनांमध्ये राहुल गांधी आघाडीवर दिसले होते. पण दोन्ही आंदोलनांमध्ये ते सामील होत असताना केंद्रात त्यांच्याच पक्षाचं सरकार होतं. दोन्ही प्रकरणात खरं तर केंद्र सरकारचा थेट संबंध नव्हता.

राहुल गांधी 1960-70 च्या दशकात व्हायचं तसं राजकारण करत असून भारताच्या प्रगतीचं कोणतंही प्रारुप त्यांच्याकडे नसल्याचं भारतातल्या एका बड्या कॉर्पोरेट घराण्यात उच्चपदावर असलेली एक व्यक्ती सांगते.

मुंबईतल्या उद्योजक घराण्यातील अधिकारी असलेली व्यक्ती सांगते की, हा भांडवलशाहीनंतरचा काळ आहे. यात प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं, आकांक्षा असते. भारत येणाऱ्या काळात कुठे दिसेल या प्रश्नाचं उत्तर राहुल गांधींकडे नाही. आणि नरेंद्र मोदी हे प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्षम आहेत.

कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडित आणि काही मॅनेजमेंट स्कूल्समध्ये अध्यापनाचं काम करणाऱ्या जयश्री सुंदर सांगतात की, उद्योग घराणी या सगळ्यामुळे थोडी चिंतित निश्चितच झाली असणार.

याला उत्तर देताना काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह काँग्रेस पक्ष भांडवलदारांच्या विरोधात नसल्याचं सांगतात. ते म्हणतात, "त्यांच्यामुळे रोजगार निर्मिती होते, हे आम्ही जाणतो. आमच्याच पक्षाचं सरकार असताना आर्थिक उदारीकरण सुरू झालं आणि तेच धोरण आम्ही पुढेही नेलं."

आज राहुल गांधी ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदींवर गौतम अदानींबद्दल पक्षपाती असल्याचा आरोप करत आहेत, त्याच पद्धतीचे प्रश्न एके काळी काँग्रेस आणि धीरुभाई अंबानी यांच्या संबंधांवरून विचारले जात होते असा प्रश्न दिग्विजय सिंह यांना आम्ही विचारला होता. 

याचं उत्तर देताना दिग्विजय सिंह म्हणाले :

"आम्ही (काँग्रेस पक्ष) कुणा एकाच्या हातीच संपत्ती एकवटण्याच्या विरोधात आहोत. उद्योग आणि व्यापारी घराण्यांबद्दल आमचं धोरण नेहमीच स्पष्ट राहिलं आहे. तेच धोरण पुढे नेण्याची आमची इच्छा आहे."

2023 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी छत्तीसगडच्या बस्तर भागात आणि दुसऱ्या काही जागा डाव्या पक्षांना सोडण्यास काँग्रेसने विरोध केला कारण त्यांच्या पक्षाची खाण उद्योगातल्या लॉबीला साथ असल्याचा आरोप दुसरीकडे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते अतुल अंजान करतात. 

काँग्रेस त्यांच्या विचारधारेपासून ढळत असल्याचं ते प्रकर्षाने सांगतात :

" नेहरूंचा समाजवाद स्वीकारायचा की मनमोहन सिंहांच्या काळात लागू केलेला भांडवलवाद हा त्यांच्यासमोरचा पेच आहे."

राहुल गांधी: सत्तेचे दावेदार की विचारवंत

'24 अकबर रोड'  हे काँग्रेसवरचं प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई सांगतात :

"राहुल गांधींनी स्वतःची राजकीय स्थिती किंवा सामर्थ्य काय हे ठरवायला हवं. ते पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत की फक्त एक खासदार, की त्यांच्याकडे पक्षातील विचारवंत म्हणून पाहायला हवं?"

किडवईंचं म्हणणं आहे :

"2014 मध्येदेखील ते पंतप्रधानपदाचे दावेदार नव्हते. आजही नाहीत. पण ते याविषयी स्पष्टपणे नकारही देत नाहीत."

काँग्रेसला तपशीलवार समजून घेणारे रशीद किडवई सांगतात:

"प्रत्येक ब्रँडचा एक रोल असतो आणि त्याचा एक ठराविक वापर किंवा उद्देश अपेक्षित असतो. म्हणजे जसं नरेंद्र मोदींच्या बाबतीत आहे. राहुल गांधी ब्रँडचा उद्देश काय आहे? हा ब्रँड कुठे उपयोगात आणता येईल? हा ब्रँड का तयार केला गेला आहे? "

किडवई सांगतात:

"आधी लक्ष्य ठरवायला हवं. त्यानंतर त्यांना हे ठरवावं लागेल की तिथपर्यंत पोहोचायचं कसं? एक प्रतिमा किंवा नरेटिव्ह तयार करावं लागेल. मोदींच्या बाबतीत तसं दिसतं त्यांच्या त्रिकोणी रणनीतीमधून - एक नॅरेटिव्ह - सबका साथ सबका विकास, पण मग त्यात हिंदूंचा दर्जा थोडा वरचा असतो. याशिवाय भारताचा आर्थिक विकास आणि जगाच्या नजरेतून देशाचं स्थान."

या सगळ्याला राहुल गांधींकडे काय प्रत्युत्तर आहे? किडवई विचारतात.

ब्रँडच्या प्रतिमेचा प्रश्न

दिल्ली विद्यापीठातील मॅनेजमेंट स्कूलचे प्रोफेसर हर्ष वर्मा सांगतात, "प्रत्येक ब्रँडची आपली एक ओळख असते आणि एक प्रतिमा किंवा इमेज असते. जसं क्लोजअप टूथपेस्ट ग्राहकांना ताजेपणाशी जोडते किंवा लक्स साबण सौंदर्याशी."

प्रा. वर्मांना राहुल गांधी 'अस्थिर' वाटतात.

ते म्हणतात, "राहुल कधी शेतकरी, आदिवासींविषयी बोलायला लागतात. मग काही दिवसांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा ते उचलून धरतात. पण त्याच्याबरोबर ते प्रदीर्घ काळ टिकून राहात नाहीत. जातीनिहाय जनगणनेसारखे बरेच मुद्दे मुळात त्यांचे नाहीतच. ते व्ही पी सिंग, मुलायम, लालू यांचे मुद्दे आहेत जे तुम्ही आता आपलेसे करू पाहात आहात."

ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा सांगतात की, आपल्या मुद्द्यांवर प्रदीर्घ काळ ठाम राहण्याची सवय राहुल गांधींना लावून घ्यायला हवी. पण यासाठी ते राहुल गांधींपेक्षा अधिक त्यांच्या काँग्रेस पक्षाला जबाबदार धरतात.


गेल्या वर्षी झालेल्या राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेविषयी बोलताना विनोद शर्मा सांगतात, "यात्रेच्या सुरुवातीला किंवा यात्रा संपल्यानंतर काही कशाची ब्लू-प्रिंट तयार केली होती का? की 4500 किमी भारत जोडो यात्रेदरम्यान ते ज्या ज्या लोकांना भेटले त्यांना नंतर पक्षाचा कुठला कार्यकर्ता भेटणार आहे किंवा त्यांचे विचार जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे, आपले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे, असा काही प्रकारचा फॉलो-अप झाला का?"

राहुल गांधींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीलाही भेट दिली आणि त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या घरी जाऊन मटणही शिजवलं. पण राहुल गांधींची मीडिया टीम या दोन्ही महत्त्वाच्या प्रतिकात्मक कृतींचा योग्य तो अर्थ पोहोचवू शकली नाही.

राहुल गांधी सांगत राहिले की, त्यांची लढाई विचारधारेशी आहे आणि वैयक्तिक नाही. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या घरी जाऊन मटण शिजवण्याची त्यांची प्रतिमा खरं तर जबरदस्त सिम्बॉल मानत ठसली गेली पाहिजे. विशेषतः अशा काळात जेव्हा आहाराच्या नावाखाली कित्येक मुस्लिमांचं लिंचिंग झालेले आहे. पण काँग्रेसने याचा फायदा घेणं तर दूर भाजपने या प्रकरणात राहुल गांधींवरच निशाणा साधला.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी प्रश्न उपस्थित केला की, कुणीही सच्चा सनातनी हिंदू श्रावणाच्या पवित्र महिन्यात मांसाहारी भोजनाविषयी विचारही कसा करू शकतो? भाजपच्याच संबित पात्रा यांनीही प्रश्न विचारला की, राहुल गांधी जानवे घालणारे ब्राह्मण आहेत तर श्रावण महिन्यात बकऱ्याचे मांस कसं काय खाऊ शकतात?

'राहुल गांधींपासून भाजपला धोका'

नरेंद्र मोदींची प्रतिमा मोठी करून पुढे आणणं आणि राहुल गांधींची प्रतिमा मलीन करत राहणं हे 2012-13 पासून भाजपशी निगडित यंत्रणेचं एकच मिशन असल्याचा आरोप काँग्रेस नेते तारिक अन्वर आरोप करतात.

ही खरी गोष्ट आहे की, राहुल गांधींचे राजकीय विरोधक त्यांची ठराविक प्रतिमा निर्माण करण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले आहेत.

तारिक अन्वर सांगतात की, नुकत्याच राहुल यांनी ज्या यात्रा केल्या त्या बघता सामान्य नागरिकांना राहुल गांधींची ती इमेज खरी नसल्याचं लक्षात येऊ लागलं आहे.

सिंगापूरची जाहिरात कंपनी कॉम्प इन्फॉर्मोचे भारतीय विभागाचे संचालक अनिल अल्हाम त्यांचं मत सांगतात. "राहुल गांधींची प्रतिमा बिघडवण्यासाठी विरोधकांनी 8-10 वर्षांचा वेळ घेतला. ते सातत्याने या कामात होते. याचा अर्थ राहुल गांधी असा ब्रँड आहे ज्यापासून त्यांना धोका असल्याचं दिसत आहे."

बीबीसीशी बोलताना ते पुढे सांगतात :

"या निर्माण केलेल्या चुकीच्या प्रतिमांनंतरही तरुणाईचा एक भाग राहुल गांधींशी जोडलेला राहतो."

बंगळुरूचे  रहिवासी अनिल अल्हाम यांनी नुकत्याच झालेल्या कर्नाटक आणि तेलंगणाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी काम केलं आहे.

जयश्री सुंदर म्हणतात की, "भारतात असाही एक मोठा वर्ग आहे जो प्रत्युत्तराच्या नॅरेटिव्हची वाट पाहत आहे. लोकांनाही वाटतंय की, देशाला एका मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे."

‘बंदे में है दम’

काँग्रेस नेते तारिक अन्वर म्हणतात :

"भारत जोडो यात्रा सुरू झाली तेव्हासुद्धा ही यात्रा ते पूर्ण करू शकणार नाहीत, असं बोललं जात होतं. पण त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की, ऊन-पाऊस असो वा कडाक्याची थंडी त्यांनी जी गोष्ट ठरवली आहे ती ते पूर्ण करणारच."

'स्ट्रेंज बर्डन्स, द पॉलिटिक्स अँड प्रेडिकामेंट ऑफ राहुल गांधी' या नावाचं पुस्तक लिहिणारे सुगाता श्रीनिवासराजू म्हणतात, "राहुल गांधींबरोबर सेल्फी घेणाऱ्या लोकांना त्यांची ही प्रतिमा मोदींच्या प्रतिमेच्या बरोबर उलट दिसते, ज्यामध्ये स्वतःला फकीर म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधान मोदींवरच सगळा फोकस असतो. फ्रेममध्ये फक्त तेच दिसतात -  वेगवेगळ्या पेहरावात, वेगवेगळ्या आविर्भावात. कोणी त्यांच्या फोटो-शूटमध्ये चुकून जरी फ्रेममध्ये दिसला तरी त्याला बाहेर काढलं जातं."

सुगाता श्रीनिवासराजू सांगतात की, "भारत जोडो यात्रेत सामील झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी एक फोटो मिळाला होता जो ते आपल्या भिंतीवर लावू शकत होते. कारण सेल्फी क्लिकमध्ये राहुल गांधींबरोबर ते स्वतः फोटोत असतात. पण नरेंद्र मोदींच्या फोटोला देवी-देवतांच्या फ्रेममध्येच स्थान मिळू शकतं."

पुरुषार्थाची एक वेगळी प्रतिमा

या यात्रेदरम्यान 53 वर्षीय राहुल गांधींची एक वेगळी प्रतिमाही समोर आली जी '56 इंची छाती'च्या नॅरेटिव्हपेक्षा वेगळी होती.

फिल्ममेकर आणि लेखिका परोमिता वोहरा लिहितात

"यात्रेच्या व्हीडिओजनी एक वेगळीच पुरुषार्थाची भावना जागवली. हा तो प्रचंड अधिकारवाणीने बोलणारा पुरुष नव्हता ज्याला तुम्ही त्याच्यापुढे झुकण्याची अपेक्षा असते. हा एक असा पुरुषार्थ होता ज्यात मोकळेपणा होता, हास्य होतं, माधुर्य होतं आणि आलिंगन होतं."

त्या पुढे लिहितात :

"यात मैत्री होती. एकत्र असण्याचा भाव होता. स्वतःचा शोध घेण्याची वृत्ती होती. कुठल्याही मोठ्या आश्वासनांऐवजी अनिश्चितता आणि अनेक दोष असूनही उभे राहण्याची जिद्द दाखवणारी ती वृत्ती होती. यामुळे एक भावना जागृत झाली की, नमो ही शक्तिशाली, प्रभावी आणि एकरुपतेचा नारा देणारी प्रतिमा असेल तर राहुलची प्रतिमा संगीतासारखी आहे. ज्याच्याशी ओळख झाल्यानंतर ती हळूहळू आकार घेत पसरत जाते."

परोमिता वोहरा त्यांच्या लेखात असंही लिहितात की, मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ज्या लोकांना राहुल गांधी चांगले वाटू लागले होते त्यांनी असं बोलायला सुरुवात केली की, राहुल एक चांगला माणूस आहे. पण राजकारण त्यांना झेपणारी गोष्ट नाही.

राहुल आणि त्यांचे मित्रपक्ष

काँग्रेसने तर त्यांचा उल्लेख पक्षाला 'विचारधारेचा रस्ता दाखवणारा' पासून ते 'तपस्वी, योगी, अलौकिक पुरुष (सुपरह्युमन)' असा केला. इतर सहयोगी पक्षही मग राहुल यांच्यात देशाचा नेता पाहू लागले. नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला यांना भारत जोडो यात्रा पाहून शेकडो वर्षांपूर्वी आदि शंकराचार्यांनी केलेली धर्म यात्रा आठवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांनी म्हटलं की, राहुल गांधी भविष्यात देशाचं नेतृत्व करणार. 'विरोधी विचारधारे'च्या विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राममंदिर न्यासाचे महासचिव चंपत राय यांनीही एक वक्तव्य केलं की-  एवढ्या थंडीत एक तरुण तीन हजार किलोमीटर अंतर चालत पार करत आहे ही गोष्ट कौतुकास्पद आहे.

वास्तविक 'इंडिया' आघाडीतील सहयोगी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पश्चिम बंगालच्या जागावाटपावरून मतभेद सुरू आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आघाडीच्या एका बैठकीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव 'इंडिया'चे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून समोर ठेवलं. त्यावेळी जाणवलं की, ममता यांच्या मते राहुल गांधी अद्याप तेवढे सामर्थ्यवान आणि आकर्षक ब्रँड नाही झालेत. लेखक आणि राजकीय विश्लेषक रशीद किडवई सांगतात, "त्यांच्या भाषणांचा भर वर्तमान आणि भविष्यातील राजकीय विचारधारा तयार करण्यावर राहिला आहे. निवडणुकीविषयीची रणनीती त्यात बहुतांशी दिसत नाही."

आघाडीचा धर्म न पाळल्याचा आरोप

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अतुल अंजान म्हणतात, "नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. याचं कारण त्यांचा अहंकार हे आहे."

त्यांचं म्हणणं आहे :

"या अहंकारामागचं कारण होतं त्यांच्या यात्रेला जमा होणारी गर्दी. या गर्दीचा अर्थ राहुल, प्रियंका गांधी आणि त्यांच्या पक्षाने लोकांचं समर्थन असा घेतला. राजस्थानमध्ये काँग्रेसने सीपीआय आणि सीपीएमच्या अनेक जागांवर आपला उमेदवार उभा केला होता. छत्तीसगडमध्ये त्यांना आमच्यासाठी जागा सोडा असं सांगितल्यावर आम्ही का सोडायची, असा पवित्रा त्यांनी घेतला होता."

अतुल अंजान सांगतात :

"भाजपविरोधात लढायची त्यांची इच्छा आहे पण तरीही आपल्याच साथीदारांविरोधात ते उमेदवार कसा उभा करतात? हा काही फक्त त्या जागांचा प्रश्न नव्हता. या थोड्याफार जागा त्यांनी सोडल्या असत्या तर राजकारणाच्या पातळीवर लोकांमध्ये एक संदेश गेला असता."


इमेज मॅनेजमेंट कंपनी टॉर्क कम्युनिकेशन्सचे संचालक सुप्रियो गुप्ता यांच्या मते मात्र, या निवडणूक निकालांचा ज्या पद्धतीने अर्थ लावला जात आहे, त्यापेक्षा कितीतरी चांगलं काम राहुल गांधी ब्रँड करत आहे.

सुप्रियो गुप्ता कर्नाटक आणि तेलंगणात मिळालेल्या यशाच्या संदर्भात म्हणतात, "राहुल गांधी अशा लोकांना आपल्याबरोबर जोडण्यात यशस्वी झालेत ज्यांचं राजकीय मूल्य त्यांच्याशी मिळतं-जुळतं आहे. पण राज्यातील विधानसभा निवडणुका या बऱ्याच अंशी स्थानिक नेत्यांचं काम, संघटना आणि देण्या-घेण्याची क्षमता यावर अवलंबून असतात. आणि याच गणिताने निकाल स्पष्ट आहे. राहुल गांधींनी मशागत केलेल्या राजकीय जमिनीवर फायदा घेण्यात त्या त्या भागात मजबूत असलेले नेते यशस्वी झाले. आणि जे दुर्बल होते किंवा जे पक्षांतर्गत रस्सीखेच करत राहिले त्यांना असा फायदा उचलता आला नाही."

एकेक करत जवळच्यांनी सोडली साथ

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक छायाचित्र खूप व्हायरल झालं होतं. अनेक वर्षांपूर्वी घेतलेल्या या फोटोत राहुल गांधींचे एकेकाळचे जवळचे मानले गेलेले ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, आरपीएन सिंह, जितिन प्रसाद आणि मिलिंद देवरा एकत्र उभे आहेत आणि कुठल्या तरी संदर्भात हसत हसत बोलत असलेले दिसतात.

मुंबईचे खासदार राहिलेल्या मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून नुकताच भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे) प्रवेश केला.

मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचा मुहूर्त त्याच दिवशीचा निवडला ज्या दिवशी म्हणजे 14 जानेवारी रोजी राहुल गांधींची न्याय यात्रा मणिपूरपासून सुरू होणार होती.

‘राहुल ब्रिगेड’च्या आणखी एका सदस्याने काँग्रेस सोडल्यानंतर माजी पक्षाध्यक्षांच्या लोकांना धरून ठेवण्याच्या क्षमतेविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.

मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता राहुल यांचे जवळचे सहकारी मानल्या जाणाऱ्या युवा ब्रिगेडमधील केवळ सचिन पायलट हे एकच नेते काँग्रेसमध्ये अद्याप राहिलेले आहेत.

आणि अगदी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महत्वाचे नेते अशोक चव्हाण यांनीदेखील काँग्रेसचा हात सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

राजकीय विश्लेषक रशीद किडवई सांगतात, "राहुल स्वतःला राजकीय शक्तीचा वापर करणाऱ्या व्यक्तीऐवजी तिचे ट्रस्टी असल्यासारखं समजतात आणि आपल्या सहकाऱ्यांनीही राजकीय ताकद मानल्या जाणाऱ्या गोष्टींपासून म्हणजे लाल दिव्याची गाडी, प्रतिष्ठा वगैरेपासून स्वतःला दूर ठेवावं अशी त्यांची अपेक्षा असते."

किडवई पुढे सांगतात :

"राजकीय निष्ठा ही मोठ्या प्रमाणावर देण्या-घेण्यावर आधारित असते हे राहुल गांधी अद्याप समजू शकलेले नाहीत किंवा त्यांना ते समजून घ्यायचंच नाही."

पण तारिक अन्वर यांचं म्हणणं वेगळं आहे.

"जे साथ सोडून गेले त्यांना काँग्रेसने खूप दिलं होतं. आणि राहुल गांधींच्या जवळचे असण्याचाही त्यांना फायदा मिळाला. पहिल्यांदा निवडून आलेल्या नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. राहुल गांधींसाठी हे एका अर्थाने चांगलंच झालं की ते सोडून गेले. त्यांचं जाणं कुठल्या विचारधारेशी असलेल्या बांधिलकीतून तर झालेलं नाही. ते एक तर दबावामुळे सोडून गेले किंवा कुठल्या पदाच्या किंवा तत्सम कुठल्या तरी लालसेपोटी गेले."

'तरुण नेत्यांसाठी संधी कमी'

हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांत (मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान) झालेल्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपने ज्या प्रकारच्या चेहऱ्यांना संधी दिली ते उदाहरण म्हणून दाखवत काही लोकांनी असं सांगायला सुरुवात केली की, काँग्रेसमध्ये याची उणीव आहे. याच कारणामुळे तरुण राजकारणी वेगळ्या वाटांच्या शोधात असतात.

लोकसभेतील पक्षाचे उपनेते गौरव गोगोई सांगतात की, आमच्या पक्षात मोठ्या प्रमाणावर 'जनरेशन चेंजेस' झालेले आहेत. उदाहरणार्थ- हिमाचल प्रदेशात सुखविंदर सिंग सुक्खू यांना मुख्यमंत्री केलं. किंवा काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकांनंतर तेलंगणात 54 वर्षांच्या रेवंत रेड्डींना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली.

2018 मध्ये छत्तीसगढमध्येसुद्धा भूपेश बघेल यांना मुख्यमंत्री केलं गेलं, तेव्हा अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावललं गेलं होतं. स्वतःचंच उदाहरण देत गौरव गोगोई सांगतात की, मी केवळ 41 वर्षांचा आहे, पण पक्षाने लोकसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.

राजकारण्यांच्या मीडिया मॅनेजमेंटशी जोडलेले व्ही. के. चेरिअन सांगतात की, "राहुल गांधींच्या जवळच्या वर्तुळात असे लोक जास्त आहेत जे त्यांच्या विषयात निष्णात आहेत पण राजकीय बुद्धी त्यांना नाही. म्हणजे असे लोक ज्यांचा राजकीय विचार वाचलेल्या पुस्तकांवर आधारित आहे. त्यांना अशा लोकांची आवश्यकता आहे जे अस्सल हिंदी प्रदेशाचे आहेत आणि राजकारणाला त्या त्या प्रदेशातील जनतेच्या नजरेतूनच ते पाहू शकतात."

बंडखोर, रागीट, गर्विष्ठ?

ज्या व्यक्तीने आपल्याच सरकारने मांडलेल्या विधेयकाच्या प्रती जाहीरपणे फाडल्याने त्याला 'घमंडी' म्हटलं गेलं, 'पप्पू' म्हणून वारंवार ज्या व्यक्तीवर शिक्का मारण्याचे प्रयत्न झाले, ज्या व्यक्तीला वारंवार 'नामदार' म्हणून टोमणे मारले जात असतील ती व्यक्ती कशी असेल?

मॅनेजमेंट विषयाच्या प्राध्यापिका जयश्री सुंदर जोरकसमध्ये त्यांचं म्हणणं मांडतात की, त्यांना राहुल गांधींमध्ये कुठल्याही प्रकारे गर्व किंवा घमेंड दिसत नाही. भाजपचे अनेक नेते जे राहुल गांधींना चांगला राजकीय नेता मानायला तयार नाहीत, ते त्यांना एक चांगला माणूस मानतात असे जयश्री सुंदर सांगतात.

जयश्री सुंदर या लियो ब्रनेट नावाच्या इमेज मॅनेजमेंट कंपनीत दिल्लीच्या प्रमुख होत्या ज्यांनी 2004 साली काँग्रेस पक्षासाठी प्रचार मोहीम आणि रणनीती आखली होती.

काँग्रेसला त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींसारख्या नेत्याला टक्कर द्यायची होती ज्या नेत्याला समाजातला मोठा वर्ग मानणारा होता. उलट काँग्रेस बराच काळ सत्तेबाहेर राहिलेली होती.

'डोण्ट फर्गेट 2024,  अॅडव्हर्टायजिंग सिक्रेट्स ऑफ अॅन इम्पॉसिबल इलेक्शन व्हिक्टरी' या पुस्तकात जयश्री सुंदर यांनी त्या वेळच्या रणनीतीविषयी सगळी माहिती दिली आहे. नेहरू-गांधी परिवार, जयराम रमेश, सलमान खुर्शीद आणि इतर नेत्यांशी झालेल्या भेटी, मुलाखती आणि त्यातून तयार झालेली रणनीती याविषयी या पुस्तकातून समजतं.

 पुस्तकाची सुरुवात होते सहा जानेवारीच्या सकाळपासून... ज्यावेळी त्यांना काँग्रेस कार्यकर्ता शमीम यांचा फोन येत. त्यांना पहिल्यांदा हा एक प्रकारचा गंमतीचा प्रकार वाटतो. कुणी फिरकी घेतंय असं वाटतं.

फिल्टर कॉफीचे घोट घेत जयश्री आम्हाला त्या दिवसाची सगळी आठवण देतात आणि त्यानंतरचा प्लॅन कसा ठरला हेही सांगतात. पहिल्यांदा त्या राहुल आणि प्रियांका यांना कधी भेटल्या, सोनिया गांधींना त्या अगोदरच भेटलेल्या होत्या.

जयश्री सांगतात :

"सोनिया गांधींनी माझी राहुल आणि प्रियांकाशी ओळख करून दिली. मी मनात विचार करत होते की, या दोघांना कोण नाही ओळखत. पण सोनिया गांधींनी हे गृहित धरलं नाही की त्यांच्या मुलांना जग ओळखतं. माझ्यासाठी त्यांच्यातल्या शालीनतेचं ते उदाहरण होतं."

त्यानंतर जयश्री राहुल आणि  प्रियांका यांना वारंवार भेटत राहिल्या. प्रत्येक भेटीत राहुल यांच्या हाती कुठलं न कुठलं पुस्तक असायचं. ते प्रत्येक गोष्ट बारकाईने आणि विस्ताराने समजून घ्यायचा प्रयत्न करताना दिसायचे.

मग राहुल गांधी असा राजकीय ब्रँड आहेत का जो भविष्यात आव्हान म्हणून समोर येऊ शकेल?

प्रत्येक ब्रँडप्रमाणेच राहुल गांधी ब्रँडमध्येही काही नकारात्मक आणि काही सकारात्मक पैलू असल्याचं ब्रँड गुरू संदीप गोयल सांगतात. 

संदीप गोयल यांच्या मते :

" त्यांच्याकडे तरुणांच्या प्रतिकाच्या रूपात पाहण्यात येतं. ते गांधी-नेहरूंच्या वंशातील आहेत आणि त्यांच्या यात्रेदरम्यान त्यांनी अत्यंत सुलभतेने लोकांशी जुळवून घेतलेलं दिसलं. शिवाय त्यांना जनतेचा नेता या स्वरूपात या यात्रेने मांडलं. या दृष्टीने पाहिलं तर राहुल गांधी हा असा ब्रँड आहे जो सध्या 'वर्क इन प्रोग्रेस' आहे."

रिपोर्ट: फ़ैसल मोहम्मद अली
फोटो: गेटी
इलस्ट्रेशन: चेतन सिंह
प्रोडक्शन: शादाब नज़्मी