Add your title (COPY)

Combine large, bold images with the beautifully crafted words of your story.

नरेंद्र मोदी ते 'ब्रँड मोदी'

झुबेर अहमद

22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रोच्चारांच्या साक्षीने राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली तेव्हा ते त्यांच्या ‘हिंदूहृदयसम्राट’ या त्यांच्या प्रतिमेशी तंतोतंत मेळ खात आहेत हे अतिशय स्पष्ट होतं.

त्यांनी अशी प्रतिमा अत्यंत विचारपूर्वक उभी केली आहे असं भारतातले बहुसंख्य लोक मानतात. हा एका मोठ्या नॅरेटिव्हचा भाग आहे. हिंदू राष्ट्रवाद आवडणाऱ्या बहुसंख्य जनतेशी जोडलं जाणं हाच त्यांचा उद्देश आहे.

टीव्हीवर हा सोहळा लाईव्ह दाखवला गेला तेव्हा हा सगळा हिंदू मतदारांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न होता असं मोदींच्या टीकाकारांनी आणि विरोधी पक्षांनी म्हटलं होतं.

पुढील काही महिन्यांत भारतातले 90 कोटी मतदार लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करतील. तो जगातील सर्वांत मोठा लोकशाहीचा सोहळा मानला जातो. नरेंद्र मोदी यांनी भाजपला गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला आहे. त्यांना पक्षाचा सर्वांत महत्त्वाचा चेहरा म्हणून कायमच सादर केलं जातं. राजकारणातील अनेक लोक त्यांना धार्मिक आधारावर ध्रुवीकरणाला प्रोत्साहन देणारे मानतात, तरीही ते इतके यशस्वी आणि लोकप्रिय का आहेत हा प्रश्न उरतोच.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांचं असं मत आहे की गेल्यावर्षी जून महिन्यात त्यांना व्हाईट हाऊस मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा क्षण होता. अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त सदनात त्यांच्या भाषणावेळी वारंवार टाळ्यांचा कडकडाट झाला होता.

हा सन्मान त्यांच्यासाठी वैयक्तिक विजयासारखा होता. कारण गुजरात दंगलीनंतर मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली होती.

मोदी समर्थकांनी पाहिलं की अमेरिकेत मोदींच्या गौरवाच्या गाथा वाचल्या गेल्या. त्यांचं जोरदार स्वागत झाल्यामुळे कधी काळी बहिष्कृत झालेल्या मोदींना आता पाश्चिमात्य देशही सलाम करत आहेत असं चित्र जगासमोर उभं राहिलं.

फ्रान्समधील प्राध्यापक क्रिस्टॉफ जॅफरलो यांनी मोदींवर ‘मोदीज इंडिया’ हे पुस्तक लिहिलं आहे. ते म्हणतात की पाश्चिमात्य देशात मोदींबाबत संमिश्र मत आहे.

क्रिस्टॉफ जॅफरलो

क्रिस्टॉफ जॅफरलो

ते म्हणतात:

“मागच्या वर्षी जेव्हा ते फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले तेव्हा त्यांच्याबाबत एक संमिश्र मत होतं. त्याचदरम्यान युरोपियन संसदेने मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत एक प्रस्ताव संमत केला होता. त्याची भाषा अतिशय कठोर होती. दुसरी गोष्ट अशी की पाश्चिमात्य देशात त्यांना जो मान मिळतोय तो त्यांचा स्वत:चा विजय नाही. पाश्चिमात्य देशांना चीनच्या स्पर्धेत भारताला उभं करायचं आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळं महत्त्व आहे. काही लोकांसाठी ते भारताचे सगळ्यात प्रभावी पंतप्रधान आहेत. काही लोकांच्या नेत्यांच्या नजरेत ते एक ‘निरंकुश नेते’ आहेत. त्यांच्या नेतृत्वात भारताची पत वाढली आहे असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

मोदींचे टीकाकार दावा करतात की त्यांच्या सरकारने ‘विरोधकांचा आवाज दाबून’ आणि ‘प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर लगाम लावून’ त्यांनी भारताची लोकशाही कमकुवत केली आहे. मोदींच्या टीकाकाराचं म्हणणं आहे की हिंदुत्व आणि आक्रमक राष्ट्रवादावर त्यांचा असलेला भर हा भारताच्या संस्कृतीला साजेसा नाही.

काही लोकांचं असं मत आहे की मोदी स्वत:ला एक टेक्नोक्रॅटच्या रुपात स्वत:ला सादर करतात, ज्यांच्या कामकाजाची पद्धत, कारभार, गुंतवणूक आणि विकासाला चालना देणारी असते. भारत एक मोठी बाजारपेठ असल्यामुळेच भारताचा पाश्चिमात्य देशांमध्ये दबदबा वाढत आहे.

समर्थक असो की विरोधक, मोदी दोघांमध्येही टोकाच्या भावना जागवतात. त्यांचं संतुलित विश्लेषण क्वचितच कधी पाहायला मिळालं आहे.

नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत आहेत. त्यांनी इतर नेत्यांसाठी अवकाशच सोडलेले नाही असं म्हटलं जातं. यत्र-तत्र-सर्वत्र तेच दिसतात. ते सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आहेत. ते प्रत्येक मंत्रालयाच्या वेबसाईटवर पहिल्या पानावर आहेत. ते रेडिओवर ऐकायला येतात. टीव्हीवरही असतात. प्रत्येक ठिकाणी होर्डिंग आणि कट आऊटवर तेच दिसतात.

तुम्हाला त्यांच्याबरोबर फोटो हवा असेल तर बऱ्याच रेल्वे स्टेशनांवरील सेल्फी पॉईंटवर ते आहेत. साईट आणि अ‍ॅपवर तर ते आहेतच. शहरातील चौक, विमानतळ, पेट्रोल पंप, सरकारी कार्यालयं आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर त्यांचा हसरा चेहरा दिसत असतो. या आधी कोणत्याच पंतप्रधानांची अशी सर्वत्र उपस्थिती कधीही दिसली नाही.

डिसेंबर महिन्यात त्यांनी भाजपला तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला होता. आता पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

त्यांचे विरोधक विखुरलेले आहेत आणि एकमेकांशीच भांडताना दिसतायेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आणि अनेक प्रादेशिक पक्षांनी बारा विरोधी पक्षांची एक आघाडी तयार केली जेणेकरून सर्वजण मिळून त्यांना आव्हान देऊ शकतील. या आघाडीला त्यांनी इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) असं नाव दिलं.

भाजपसाठी ते स्टार प्रचारक आहेत आणि एकटेच पुरेसे आहेत. 73 वर्षींय मोदींचा सोशल मीडियावर असा दबदबा आहे की कोणीही विरोधी नेता त्यांची बरोबरी करू शकत नाही.

अमेरिकेची प्रसिद्ध संशोधन संस्था प्यू रिसर्च सेंटरने ऑगस्ट 2023 मध्ये एक सर्वेक्षण केलं. त्यानुसार भारतातील दहापैकी आठ लोकांचं मोदींबद्दल सकारात्मक मत आहे. त्यात 55 टक्के लोक असे आहेत की जे त्यांना ‘सर्वांत चांगलं’ किंवा ‘फारच चांगलं’ मानतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचं एखाद्या नायकासारखं स्वागत केलं. त्या आधी डोनाल्ड ट्रंप यांनीही केलेलं स्वागत लोकांनी पाहिलं आहे. मात्र प्यू रिसर्चच्या सर्वेक्षणात अमेरिकेच्या 37 टक्के लोकांचं मत त्यांच्यांबद्दल चांगलं नाही. 21 टक्के लोकांचं मत त्यांच्याबद्दल सकारात्मक आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 42 टक्के लोकांनी त्यांच्याबद्दल कोणतंच मत दिलं नाही.

भारतात मोदींची लोकप्रियता आगामी निवडणुकीच्या यशात रुपांतरित होईल का? मोदी समर्थकांना याबद्दल अजिबात शंका नाही की ते पुढची निवडणूक बहुमताने जिंकणार आहेत.

क्रिस्टॉफ जॅफरलो या आत्मविश्वासाबद्दल एक गर्भित इशारा देतात. ते सांगतात की कोणताच लोकप्रिय नेता अपराजित नाही. ते म्हणतात की:

“ब्राझीलमध्ये बोलसोनारो निवडणूक हरले, ट्रंप निवडणूक हरले. जेव्हा गरिबी वाढते, विषमता वाढते तेव्हा सरकार बदलण्याची गरज आहे असा विचार लोक करू लागतात. हा कोणत्याही लोकशाहीचा मूलभूत नियम आहे. कोणताही नेता उत्तरदायित्वापासून दूर पळू शकत नाही. एखादा नेता उत्तरदायित्वाच्या पलीकडे असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तिथे लोकशाही नाही.”

मोदींना कोण आव्हान देऊ शकतं?

मोदींच्या लोकप्रियतेला धक्का लावेल असा कोणताही शक्तिशाली नेता सध्याच्या काळात दिसत नाहीये. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर म्हणतात की त्यांची अपराजित अशी प्रतिमा तयार होण्यामागे विरोधी पक्षांचं कमकुवत असणं हे कारण आहे.

राहुल गांधी काँग्रेस पक्षांचे मोठे नेते आहेत आणि ते पंतप्रधान मोदींना आव्हान देणारा विरोधी पक्षाचा सर्वांत मोठा चेहरा आहे. मात्र राहुल गांधींचा त्यांनी दोन लोकसभा निवडणुका आणि अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव केला आहे. मात्र ते सत्तेच्या सारीपाटावर त्यांना नुकसान पोहोचवण्यात अयशस्वी ठरले आहेत. तरी कर्नाटक, हिमाचल, तेलंगणासारख्या काही राज्यात काँग्रेसला पक्षाला यश मिळालं आहे.

ब्रँड बिल्डिंगच्या क्षेत्रात संतोष देसाई एक प्रसिद्ध नाव आहे. ते म्हणतात:

“पंतप्रधानांना आव्हान देण्यात राहुल गांधी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्वत:हून बरेच प्रयत्न केले आहेत. मात्र जनतेशी सहजपणे मिसळून जातील अशी खासियत राहुल गांधी यांच्याकडे नाहीये. त्यांचे प्रयत्न कमी पडत नाही पण ते नैसर्गिकरित्या जनतेत मिसळू शकत नाहीत.”

संतोष देसाई

संतोष देसाई

काही विश्लेषक म्हणतात की, राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा’ च्या निमित्ताने सामान्य लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि काही अंशी ते यशस्वी झाले. ही यात्रा म्हणजे राहुल गांधी यांना लाँच करण्यासाठीचा रोड शो होता अशा शब्दात भाजप राहुल गांधींवर टीका करतं. मात्र असं मानलं जातं की त्यामुळे त्यांची प्रतिमा चांगली झाली आहे. 14 जानेवारीला राहुल गांधी यांनी ‘भारत न्याय यात्रा’ सुरू केली. त्यांची ही यात्रा आधीपेक्षा जास्त अंतर कापणार आहे आणि त्यानिमित्ताने त्यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी जनतेच्या थेट संपर्कात येण्याची मोठी संधी मिळेल.

पाच वर्षांआधी लोकसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील थिंक टँक ‘स्टडी फॉर डेव्हलपिंग सोसायटीज’ (CSDS) ने एक सर्वेक्षण केलं होतं. त्यात असं लक्षात आलं की मोदी त्यांच्या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नसते तर एक तृतीयांश मतदारांनी भाजपाला मत दिलं नसतं.

भारतासारख्या देशात राजकारणातील यश बहुतांश वेळा घराणेशाहीमुळे मिळतं. अशा परिस्थितीत मोदींची ‘सेल्फ मेड’ असण्याची प्रतिमा मतदारांना भावते. गरीब कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यामुळे लोक त्यांना जोडले जातात. त्यांचं सुरुवातीचं आयुष्य पाहता त्यांना भविष्यात राजकारणात मोठं यश मिळेल असं वाटण्यासारखी परिस्थिती नव्हती. तरुणपणी ते गुजरातमध्ये पक्षाचे साधारण कार्यकर्ते होते. त्यांच्या वैयक्तिक वेबसाईटवरील माहितीनुसार ते गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या क्षेत्रीय मुख्यालयात ‘ऑफिस बॉय ’ होते.

आरएसएसला संघ परिवाराची शिर्षस्थ संघटना मानलं जातं. भाजप हा त्याचा अविभाज्य घटक आहे. वैयक्तिक वेबसाईटनुसार ‘ऑफिस बॉय’ चं काम ऑफिसची स्वच्छता करणं आणि रोजच्या कामासाठी वस्तूंची खरेदी करणं हे त्यांचं मुख्य काम होतं.

ते त्यांच्या भूतकाळाबद्दल अशा अनेक गोष्टी सांगतात ज्याची खातरजमा होऊ शकत नाही. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर रेल्वे स्टेशनवर ते चहा विकायचे ही गोष्ट.

तर मोदींमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळी आहे? भारतातील सामान्य व्यक्तींमधून ते असामान्य कसे झाले?

मोदी मॅजिकमध्ये कशाकशाचा समावेश आहे?

त्यांच्या समर्थकांच्या मते ते एक जबरदस्त वक्ता आहेत. मात्र विरोधी पक्षाचे नेते दावा करतात की मोठमोठ्या कार्यक्रमांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करतात. ते एक प्रकारचे शोमॅन आहेत असं दोन्ही पक्ष मानतात आणि त्यांचे विरोधक दावा करतात की ते अदृश्य टेलिप्रॉम्प्टर शिवाय बोलत नाहीत. सामान्य लोकांशी संपर्क साधण्यात ते तरबेज आहेत. प्रचार अधिक प्रभावी करण्यासाठी त्यांनी अनेक उपाय योजले आहेत. उदा, ‘चाय पे चर्चा’ आणि ‘परीक्षा पे चर्चा’. इतकंच काय त्यांचे राजकीय विरोधक त्यांची भाषण कला उच्च दर्जाची असल्याचं मानतात.

काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी मोदींची स्तुती केली तेव्हा त्यांना त्यांच्या पक्षाच्या नाराजीचा सामना करावा लागला. थरुर म्हणाले होते:

"पंतप्रधान अतिशय प्रभावी भाषण करतात. ते नवनवीन घोषणा देतात. नवनवीन जुमले सांगणं आणि फोटोद्वारे वातावरण निर्मिती करण्याच्या बाबतीत त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. मोदींच्या रुपात एका चांगल्या वक्त्याला त्याचं कसब दाखवताना आपण पाहत आहोत.”

शशी थरुर

शशी थरुर

काही लोक म्हणतात की एखाद्या साधारण कार्यक्रमालासुद्धा ते भव्य सोहळ्यात रुपांतरित करतात. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पंतप्रधानांनी दिल्लीत ‘नमो ट्रेन सेवा’ सुरू केली तेव्हा ते ट्रेनमध्ये प्रवास करत असलेल्या लोकांशी बोलताना दिसले. त्यात शालेय विद्यार्थिनीही होत्या. त्यामुळे संदेश गेला की किती सहजपणे ते सामान्य लोकांमध्ये मिसळतात आणि त्यांच्या अडचणी समजून घेतात.

संतोष देसाईंच्या मते ते कोणत्याही कार्यक्रमाचा राजकीय फायदा करून घेण्यात तरबेज आहेत. ते म्हणतात:

“जी-20 परिषदेचं उदाहरण घ्या. जी-20 च्या सदस्य देशांना आळीपाळीने अध्यक्षपद भूषणवण्याचा आणि परिषदेचं आयोजन करण्याची संधी मिळते. त्यामुळे ते कोणत्याच प्रकारचं यश नसतं. भारताआधी इंडोनेशियामध्ये परिषद झाली होती. भारतानंतर ही संधी आता ब्राझीलला मिळणार आहे. मात्र मोदींनी या परिषदेचं एका मेगा इव्हेंटमध्ये रुपांतर केलं."

विरोधकांच्या मते, जी-20 चं यश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं वैयक्तिक यश म्हणून जगासमोर मांडलं. वास्तविक पाहता भारत जी-20 चा अध्यक्ष होणारच होता. मग देशाचा पंतप्रधान कोणीही असतं तरी त्याने काहीही फरक पडला नसता.

विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जी-20 सारख्या परिषदेचा सत्तेसाठी फायदा करून घेण्याच्या प्रयत्नासाठी मोदींवर टीका केली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला की मोदींनी जी-20 चं अध्यक्ष होणं आणि परिषदेचं यजमानपद भूषवण्याच्या घटनेला एका हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये रुपांतरित केलं.

मिशिगन विद्यापीठाचे प्राध्यापक जोयोजित पाल सांगतात:

"दिल्ली मेट्रो ई श्रीधरन नावाच्या माणसाने तयार केली आहे असं तुम्ही ऐकता. जर दिल्ली मेट्रो आज तयार झाली असती तर आम्हाला कळलंही नसतं की ती कोणी तयार केली आहे. आम्हाला हेच सांगितलं असतं की मेट्रो मोदींनी तयार केली आहे.”

जोयोजित पाल

जोयोजित पाल

मोदी फक्त भाषणाद्वारे आणि बॉडी लँग्वेजद्वारेच लोकांशी संवाद साधतात असं नाही. ते सार्वजनिकरित्या त्यांच्या भावना व्यक्त करतात आणि विविध प्रकारची वेशभूषा आणि विविध भागातल्या टोप्या किंवा पगड्या घालून त्याद्वारे सुद्धा राजकीय संदेश देतात. मोदी अगदी सहज जाहीर सभांमध्ये भावूक होतात. रडल्यामुळे ते लोकांच्या दृष्टीने ते एक सामान्य व्यक्ती होऊन जातात आणि त्याचवेळी ते शक्तिशाली असण्याच्या त्यांच्या प्रतिमेला तडा जात नाही. त्यांचा हा भावनिक स्वभाव मतदारांना प्रभावित करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरला आहे. कधी ते एखाद्या हिंदू साधूसारखे भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात तर कधी सैनिकांच्या वेशभूषेत दिसतात.

त्यांचे टीकाकार हेही मानतात की साधारण कार्यकर्त्यांपासून ते जागतिक पातळीवरील नेता होण्याचा त्यांचा राजकीय प्रवास असामान्य आहे. मात्र हा प्रवास इतका सोपा नव्हता.

दर्शन देसाई गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार आहेत. जेव्हा मोदी भाजपाचे साधारण नेते होते तेव्हापासून देसाई त्यांना ओळखतात. दर्शन देसाई म्हणतात की मोदी त्यांच्या कारकि‍र्दीचे एकमेव निर्माते आहेत. त्यांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने त्यांचा प्रवास आखला आणि स्वत:ला एक राजकीय ब्रँड म्हणून प्रस्थापित केलं. दर्शन देसाई म्हणतात:

“नरेंद्र मोदी खूप दूरचा विचार करतात. ते खूप समोरचा विचार करतात. मला माहिती आहे की पंतप्रधान होण्याबद्दल त्यांनी खूप आधी विचार करून ठेवला असेल.”

दर्शन देसाई

दर्शन देसाई


2001 ते 2014 या काळात ते तीनदा गुजरातचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यावर एका वर्षाच्या आतच 2002 मध्ये गुजरातमध्ये दंगली झाल्या. त्यात एक हजारपेक्षा जास्त लोक मारले गेले. त्यापैकी बहुतांश लोक मुस्लीम होते. त्यांच्यावर आरोप होता की दंगल थांबवण्यासाठी त्यांनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. पुढे सुप्रीम कोर्टाने त्यांना या आरोपांतून दोषमुक्त केलं.

दर्शन देसाई म्हणतात की नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा सामना करण्यासाठी गुजरातच्या जनतेत जाऊन अस्मितेची भावना जागृत केली. देसाई सांगतात की:

“ते सरळ जनतेत गेले आणि म्हणाले की हा जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यांच्यावर झालेले आरोप किंवा हल्ला हा गुजरातच्या लोकांवर हल्ला आहे.”

प्रतिमा बदलण्याची धडपड

2003 च्या आसपास त्यांनी आपली प्रतिमा बदलण्यावर भर दिला. प्रतिमा बदलण्यात खालील गोष्टींचा समावेश होता.

व्हायब्रंट गुजरात

जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून गुजरातला जगाच्या नकाशावर आणण्याचा हा प्रयत्न होता.

मिशिगन विद्यापीठाचे प्राध्यापक जोयोजित पाल म्हणतात की गुजरात दंगलीच्या आधी त्यांनी आपली प्रतिमा ‘हिंदूहृदयसम्राट’ अशी केली होती. हिंदुत्वासाठी लढणारा नेता अशी त्यांनी स्वत:ची प्रतिमा केली होती असं पाल म्हणतात:

“ही अतिशय यशस्वी राजकीय घोषणा होती. त्यामुळे त्यांना असामान्य म्हणता येईल असं राजकीय यश मिळालं.”

दर्शन देसाई म्हणतात की त्यानंतर अशी एक वेळ आली की त्यानंतर ते स्वत:चं ब्रँडिंग ‘विकास पुरुष’ म्हणून करू लागले. म्हणूनच त्यांनी 2003 मध्ये व्हायब्रंट गुजरात परिषदेची सुरुवात केली जी आजपर्यंत सुरू आहे. देसाई म्हणतात, “जर गुजरातमध्ये गुंतवणूक आली तर तर गुजरात बरोबर त्यांच्या प्रतिमेतही सुधारणा होईल.”

प्राध्यापक जोयोजित पाल हा मुद्दा स्पष्ट करताना पुढे म्हणतात:

“जेव्हा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना गुजरातमध्ये प्रचारासाठी आणलं तेव्हा खरंतर मुख्यमंत्री मोदी यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यानंतर उद्योगपती रतन टाटा गुजरातला गेले आणि त्यानंतर नारायण मूर्तीसुद्धा गेले.”

अशी प्रकारे त्यांची स्वीकारार्हता वाढत गेली.


मीडिया मॅनेजमेंट

मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी पत्रकार परिषदा घेत नाही अशी टीका त्यांच्यावर होत असे. पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या दहा वर्षांत त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत.
दर्शन देसाई जुन्या दिवसांची आठवण काढताना सांगतात:

“गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा काही पत्रकार परिषदा होत असत. अगदी एक दोनदा त्या झाल्यात. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी प्रसारमाध्यमांचा हरप्रकारे वापर करून घेत होते. त्यांनी आजपर्यंत प्रसारमाध्यमं प्रभावी पद्धतीने हाताळली आहेत. मी हे कोणत्याच नकारात्मक अर्थाने म्हणत नाहीये. प्रसारमाध्यमेच हुकमाचे ताबेदार आहेत. ते तेच करतात जे मोदींना हवं आहे.”

त्यांचे टीकाकार म्हणतात की त्यांच्या कार्यकाळात प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. पत्रकारांना ट्रोल केलं जात आहे. त्यांना त्रास दिला जात आहे. इतकंच काय तर पत्रकारांनी त्यांचं काम केलं तरी त्यांना अटक केली जात आहे. गेल्या दहा वर्षांत ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स’ मध्ये भारताचं स्थान सातत्याने घसरत आहे. पॅरिसमध्ये असलेल्या ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सने’ त्यांच्या 2023 च्या अहवालात म्हटलं आहे की एक वर्षाआधीच्या तुलनेत प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबतीत 180 देशांच्या यादीत भारताचा 161 वा क्रमांक आहे. आधी तो 150 होता.

फॅक्ट चेकिंगसाठी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याचा उद्देश सोशल मीडियावर देखरेख करणं असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यामुळे सेन्सॉरशिप वाढण्याचा धोका अनेक पत्रकारांना जाणवत आहे. मात्र सरकारचं म्हणणं आहे की या फॅक्टचेक युनिटचा उद्देश फेक न्यूजला आळा घालण्याचा आहे. काही पत्रकारांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं आहे.

अर्थात प्रसारमाध्यमांना बिगर भाजपशासित राज्यांमध्येही छळ सहन करावा लागलाच आहे. आधीच्या काळातही प्रसारमाध्यमांना या परिस्थितीला तोंड द्यावं लागले आहे. विशेषत: इंदिरा गांधींच्या कार्यकाळात.

पंतप्रधानपदाच्या उमेदवारात रुपांतर

2011 च्या आसपास ते स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून स्वत:ला समोर आणण्याच्या तयारीत होते. हे खूप मोठं आव्हान होतं कारण त्यावेळी पक्षाचे सर्वोच्च नेते आणि मोदींचे राजकीय गुरू लालकृष्ण आडवाणी यांना हिंदुत्वाचा सगळ्यात मोठा चेहरा म्हणून पाहिलं जायचं. त्यांनाही पक्षांतर्गत आडवाणींच्या श्रेष्ठत्वाची जाणीव होती. म्हणूनच मोदींना पर्याय म्हणून स्वत:चा राजकीय ब्रँड तयार करण्यात ते व्यग्र होते.

त्यांच्या या राजकीय ब्रँडिंगच्या अभियानात काही असे व्हीडिओ आणि फोटो होते ज्यात त्यांना एक उत्तुंग नेता म्हणून समोर आणलं गेलं.

एका जुन्या फोटो सेशनचे हे फोटो पाहा. हे फोटोशूट 2011-12 मध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. या फोटोत एक धुक्याने वेढलेली सकाळ दिसत आहे. शांत वातावरण आहे आणि आसपास बदकं पोहताना दिसत आहेत. ते शांततेचे प्रतीक आहेत. या फोटोत अ‍ॅपलचा लॅपटॉप आणि डीएसएलआर कॅमेराही पहायला मिळतोय. त्यांच्या या फोटोत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचं पुस्तकही दिसत आहे. या फोटोत मोदी झाडाच्या खाली बसून आरामात इकॉनॉमिक टाइम्स हे वर्तमान पत्र वाचताना दिसत आहेत.

प्राध्यापक जोयोजित पाल यांनी 2016 मध्ये एका कॅम्पस लेक्चरमध्ये हे फोटो दाखवून त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की त्यांनी कशा प्रकारे ‘खास तयार केलेला’ संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. या फोटोच्या माध्यमातून ते सांगत होते की ते आजच्या काळातील नेते आहेत. ते शांततेला प्रोत्साहन देतात आणि तंत्रज्ञानाचा योग्य प्रकारे वापर करतात.

त्यावेळी त्यांचं प्रतिमासंवर्धन करणाऱ्या ब्रँड गुरुंच्या समोर मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदास योग्य नेता म्हणून कसं समोर आणायचं आव्हान होतं क्रिएटिव्ह डायरेक्शन क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्त्व प्रल्हाद कक्कर सांगतात:

"एखाद्या नेत्याला उत्तुंग राजकीय नेता म्हणून रुपांतरित करायचं हेच आमच्या व्यवसायाचं रहस्य आहे. जर तुम्ही एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री असाल तर तुम्ही नेते आहात उत्तुंग राजकीय नेते नाही. जर तुम्ही एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री आहात तर साहजिकच तुम्हाला पूर्ण देश ओळखत नाही.”

प्रल्हाद कक्कर

प्रल्हाद कक्कर

पंतप्रधान होण्याआधी प्रचार मोहिमेसाठी ज्या टीमने काम केलं, त्या टीमचा प्रल्हाद कक्कर भाग होते. त्यावेळी त्या लोकांनी ‘गुजरात मॉडेल’ चा प्रचार केला होता. कक्कर म्हणतात, “त्यांनी या मॉडेलचा आधार घेऊन गुजरातला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि त्याच पद्धतीने ते भारतालाही अशाच पद्धतीने महान बनवतील हे लोकांना कळावं यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले.”

त्यानंतरच गुजरात मॉडेलचा खूप प्रचार केला गेला. प्राध्यापक जोयोजित पाल म्हणतात की जेव्हा 2014 च्या निवडणुकांचा प्रचार सुरू झाला तेव्हापर्यंत मोदी एक राष्ट्रीय ब्रँड झाले होते.

सोशल मीडियाचा रचनात्मक वापर

सोशल मीडियावर नरेंद्र मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांच्यापेक्षा जास्त युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर फॉलोअर्स असणाऱ्या राजकीय नेत्यांची संख्या कमी आहे.

मिशिगन विद्यापीठाचे प्राध्यापक जोयोजित पाल यांनी मोदी ब्रँडला पुढे नेण्यासाठी आणि त्याच्या विस्तारासाठी सोशल मीडियाची भूमिका या विषयावर बराच अभ्यास केला आहे. पाल यांनी त्यांच्या सहा हजार ट्विट्सचा अभ्यास केला आहे. हे ट्विट 2009 ते 2015 या काळातले होते. प्राध्यापक पाल सांगतात की त्यावेळी त्यांना सोशल मीडियावर असं सादर केलं जात होतं की जणू ‘देशात त्यांच्यासारखा कोणताही नेता नाही.’

ते म्हणतात:

“ब्रँड तयार करण्याच्या या मोहिमेत त्यांना असा व्यक्ती म्हणून सादर केलं जो सगळं काही करू शकतो. ते ‘मन की बात’ करू शकतात. ते योगा करू शकतात. ते राजकीय भाषण देऊ शकतात. ते परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे गुरू होऊ शकतात. ती अशी व्यक्ती आहे ज्यांचे प्रत्येक कामामागे कष्ट आहेत. त्यामुळे आज देश जो काही पुढे जात आहे तो फक्त त्यांच्याचमुळे जात आहे.”

प्राध्यापक क्रिस्टॉफ जॅफरलो सांगतात:

“आपण ठोसपणे असं सांगू शकत नाही की सोशल मीडियामुळे मोदी भारताचे पंतप्रधान झाले. मात्र हे म्हणू शकतो की ते पंतप्रधान होण्यात सोशल मीडियाचा महत्त्वाचा वाटा आहे. जसा डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयात होता, हंगेरीमध्ये विक्टर ओरबान आणि ब्राझीलमध्ये बोलसोनारो यांच्या विजयात होता. लोकप्रिय होण्यासाठी सामान्य जनतेशी थेट जोडले जाणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सोशल मीडिया अतिशय महत्त्वाचं शस्त्र आहे.”

प्राध्यापक जोयोजित पाल यांच्या मते:

“सोशल मीडियावर त्यांच्या प्रवासाची सुरुवात ऑर्कुटवरून झाली होती. आता हा प्लॅटफॉर्म बंद झाला आहे. ट्विटरवर आल्यावर त्यांनी लोकांशी थेट संवाद सुरू केला. मोदींचं ट्विट वाचणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला असं वाटेल की मोदी त्यांच्या आवाजात थेट आपल्याशी थेट संवाद साधत आहेत.”

मोदींचा ब्रँड तीन टप्प्यात तयार केला गेला आहे असा निष्कर्ष प्रा. पाल यांनी त्यांच्या संशोधनातून काढला आहे. ते म्हणतात की पहिल्या टप्प्यात त्यांचा नाव पुढे करण्यासाठी आणि स्वीकारार्हतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उद्योगपती आणि सेलिब्रिटींचा वापर केला. दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवात झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या सरकारसाठी प्रचार करणं सुरू केलं होतं. तेव्हा ‘स्वच्छ भारत’ ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘बेटी बचाओ’ सारख्या योजनांचा सोशल मीडियावर प्रचार केला. त्यावेळी असं दाखवलं गेलं की सोशल मीडियाचा वापर ते आपल्या पक्षाच्या फायद्यासाठी नाही तर देशाच्या प्रगतीसाठी करत आहेत. ते जे काही करताहेत ते देशासाठी करताहेत असं दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते.

प्राध्यापक पाल म्हणतात, “ब्रँड प्रमोट करण्याचा तिसरा टप्पा 2019 च्या निवडणुका जवळ आल्यावर सुरू झाला होता. त्यावेळी पुन्हा एकदा त्यांनी त्यांची ताकद दाखवणं सुरू केलं. आता ते आधीचे मोदी उरले नव्हते. ते आता असे नेते झाले होते जे म्हणत होते की देश माझ्याशिवाय चालू शकत नाही. माझ्याशिवाय देश सुरक्षित राहू शकत नाही.”

प्राध्यापक पाल मानतात की ब्रँड मोदी हे अभियान सातत्याने सुरू राहतं. ही अंतहीन प्रक्रिया आहे. ते म्हणतात:

“गेल्या चार पाच वर्षांपासून विश्व गुरू ब्रँडचा प्रचार करण्याची सुरुवात झाली आहे. ते जगभरातील नेत्यांशी संवाद साधतात. ते आता असा संदेश देताहेत की मी जसा तुमचा गुरू आहे तसा मी संपूर्ण जगाचा गुरू होऊ शकतो. 2024 च्या निवडणुकांमध्ये या ब्रँडच्या प्रमोशनचं एक नवीन पर्व पहायला मिळेल.”

ब्रँड मोदींच्या मर्यादा

आज देशात अनेक लोकांना असं वाटतं की मोदी इतका मोठा ब्रँड झाला आहेत ते आपल्या पक्षापेक्षाही मोठे झाले आहेत:

“जर त्यांना राजकीय पटलावरून दूर केलं तर भाजपचं काहीच अस्तित्व नाही. भाजपचं धोरणं हे त्यांचं धोरण आहे. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालय धोरण तयार करायचे आणि सरकारही चालवायचे. आज ते पंतप्रधान आहेत तर पंतप्रधान कार्यालय धोरणं ठरवतं. संपूर्ण सरकार चालवतं. आता त्यांना पक्षाची गरज नाही, जितकी पक्षाला त्यांची गरज आहे.”

संतोष देसाईंच्या मते मोदी स्वत:ला मंत्रीमंडळात किंवा पक्षात दोन्ही ठिकाणी सर्व मंत्र्यापेक्षा किंवा नेत्यांपेक्षा उच्चस्थानी मानतात. संतोष देसाई म्हणतात:

"जेव्हा ते कॅबिनेटच्या बैठकीला बसतात, तेव्हा ते वेगळे बसतात. तेव्हा असं स्पष्ट दिसतं की ते नेते आहेत आणि इतर सगळे अनुयायी आहेत. मी नेता आहे, मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे. मला तुमच्यापेक्षा जास्त समजतं असा संदेश ते देऊ इच्छितात.”

मात्र प्राध्यापक जॅफरलो मानतात की मोदींचं विराट व्यक्तिमत्व पुढच्या काळात पक्षाच्या बाजूने राहणार नाही. ते म्हणतात:

“मला हे स्पष्ट दिसतंय की मोदी जरी अतिशय लोकप्रिय झालेले असले तरी पक्षाची लोकप्रियता तशी नाही. आज मोदी म्हणजे भाजप आहे. आपण आधीही असंच काहीसं होताना पाहिलं आहे. साठ आणि सत्तरच्या दशकात इंदिरा गांधींनी काँग्रेसला असंच बदलून टाकलं आणि त्यामुळे काँग्रेसचे प्रचंड नुकसान झालं होतं. आता भाजपही त्याच मार्गावर आहे. मोदींनंतर कोण, हा प्रश्न एक दिवस उपस्थित होऊ शकतो आणि तेव्हा तो बदल अतिशय कठीण ठरू शकतो.”

कोणालाही या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आणि मोदींच्या उत्तराधिकारी कोण या प्रश्नावर पक्षानेसुद्धा मौन बाळगलं आहे. सध्या तरी असं वाटतंय की मोदींनंतरच्या काळाबद्दल भाजपने अजून विचारही केलेला नाही.

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर म्हणतात की ब्रँड मोदीच्या मर्यादांबद्दल बोलणं म्हणजे कल्पनेचे इमले बांधण्यासारखं आहे. ते मानतात की मोदी आणि त्यांच्या पक्षाकडे अशी ताकद आहे जी त्यांच्या विरोधकांकडेही नाही.

प्रशांत किशोर प्रश्न उपस्थित करतात:

"भाजप वारंवार जिंकण्यामागे कोणती ताकद आहे? ही हिंदुत्वावर आधारित विचारसरणी आहे आणि मोठी हिंदू वोट बँक आहे. ती मोदींना हिंदुत्वाच्या नावावर मतं देते. त्यांची दुसरी ताकद आहे नव राष्ट्रवाद किंवा आक्रमक राष्ट्रवाद. तिसरी ताकद आहे ती म्हणजे सरकारी योजनांचे फायदे थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं. मग ते शौचालय असो, शेतकऱ्यांना मदत असो किंवा घरकुल योजना असो. त्यांची चौथी ताकद निवडणूक लढण्याची ताकद आणि पैसा ही आहे. जर मोदींना हरवायचं असेल तर तुम्हाला चार पैकी दोन किंवा तीन गोष्टींमध्ये त्यांन मागे टाकावं लागेल.”

अनेक योजनांद्वारे ते कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचले आहेत. या लोकांकडे आधीच्या सरकारांनी दुर्लक्ष केलं होतं. ज्यांनी पहिल्यांदा बँकेत खातं उघडलं अशा लोकांची संख्या कोटीच्या घरात आहे. ज्यांना पहिल्यांदा घर मिळालं किंवा शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पैसा पोहोचला आहे अशा लोकांची संख्या प्रचंड आहे. सरकारी आकडेवारीनुसार 80 कोटी गरजू लोकांना मोफत धान्याचा लाभ मिळत आहे. या कल्याणकारी योजनांनी आधीच मजबूत असलेल्या ब्रँडला आणखी ताकद दिली आहे.

आपल्या वारशावर काम करत आहेत

एकदा हरियाणाच्या एका मंत्र्याने दावा केला की मोदी महात्मा गांधीपेक्षाही मोठा ब्रँड आहे. मोदींना असं वाटतंय की आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार म्हणून लोकांनी त्यांची आठवण ठेवावी. जर नेहरू स्वतंत्र भारताचे शिल्पकार होते तर मोदींना नक्कीच वाटेल की त्यांना आधुनिक, आत्मनिर्भर, आत्मविश्वास आणि समृद्धीने संपन्न असलेल्या भारताचा निर्माता म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं.

प्रा. क्रिस्टॉफ जॅफरलो म्हणतात, “ज्या प्रमाणे मुंबईचा विकास होत आहे, ज्या प्रमाणे दिल्लीत नवनवीन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य सुरू आहे, त्यातून दिसतंय की येणाऱ्या पिढीसाठी ते एक संदेश ठेवून जातील. आधी जे लोकांनी केलं त्याचीच ही आवृत्ती आहे आणि त्यावर मोदींना आपली छाप सोडायची आहे.”

‘द क्रुकेड टिम्बर ऑफ न्यू इंडिया’ चे लेखक पराकला प्रभाकर जोर देऊन सांगतात की मोदींच्या नेतृत्वात भारताचं राजकारण पहिल्यांदाच हिंदुत्वाकडे कललं आहे. आता पूर्ण चर्चाच धर्मनिरपेक्षतेऐवजी हिंदुत्वाची झाली आहे.”


प्रभाकर यांनी करण थापर यांना नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात ते म्हणतात, “दहा पंधरा वर्षांपूर्वी देशात राजकीय संवाद धर्मनिरपेक्षतेच्या आसपास असायचा. भाजप तेव्हा म्हणायची की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, अगदी खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहोत. काँग्रेसचा धर्मनिरपेक्षपणा खोटा आहे. बाकी सगळ्या पक्षांचा धर्मनिरपेक्षपणाही छद्मी आहे. मी हे म्हणू इच्छितो की भाजपने त्यांची धर्मनिरपेक्षता सोडलेली नाही. मोदींच्या राज्यात धर्मनिरपेक्षता पूर्णपणे बाजूला झालेली आहे.”

आपल्या पुस्तकात ते लिहितात, “हिंदू बहुसंख्याकवाद ही विचारसरणी आज जितकी स्वीकारार्ह आहे तितकी स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षानंतरही नव्हती. सध्याचं सरकार त्यांची राजकीय अधिमान्यता कारभाराने मिळवत नाहीये. त्यांच्या कामगिरीच्या आधारावर ते सत्तेत येत नाही. खरंतर त्यांना ही ताकद हिंदू असण्याच्या ओळखीवर भर देऊन आणि बिगर हिंदूना लक्ष्य करून मिळते.”

प्रल्हाद कक्कर लोकशाहीचे समर्थक आहेत आणि त्यांना तशी व्यवस्था हवी आहे, जी आजच्या भारतापेक्षा अधिक संतुलित असेल. मात्र लोकांचा मोदींवर खूप जास्त विश्वास आहे असंही ते म्हणतात. कक्कर सांगतात, “मध्यमवर्ग खरंतर मोदी भक्त नाही पण त्यांचा मोदींवर प्रगाढ विश्वास आहे. कारण त्यांना असं वाटतं की मोदींनी देशाला मजबूतपणे एकजूट केलं आहे.”

येणाऱ्या काळात मोदींचा वारसा जेव्हा सांगितला जाईल तेव्हा शक्तिशाली नेता म्हणून त्यांची प्रतिमा येणाऱ्या काळातही तितकीच टिकून राहील यात काही शंका नाही.

सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की त्यांचा वारसा भारताला कोणत्या वळणावर आणून ठेवेल? 140 कोटी लोकसंख्या असलेला भारतासारखा विविध जातींचा, धार्मिक, भाषा आणि सामाजिक विविधतेने भारलेला देश त्यावेळी कुठे उभा असेल? अनेकांना अशी भीती आहे की तेव्हापर्यंत भारताची एकता आणि विविधता कायमची नष्ट झालेली असेल. तर काही अन्य लोकांना असं वाटतं की हीच तर भारताच्या मूळ ओळखीचा पाया होता आणि त्याचीच वाट आम्ही पाहत होतो.

अहवाल: झुबेर अहमद चित्रण: पुनित बर्नाला निर्मिती: शादाब नझमी फोटो: गेटी