'मुली काहीही करू शकतात, हे मला दाखवायचं होतं...' भारताच्या आईस हॉकी टीमची कहाणी
भारतासारख्या उष्ण देशात आईस हॉकी हा खेळ कुणाला फारसा माहितीही नाही. पण काही महिला खेळाडू हे चित्र हळूहळू बदलत आहेत. सोयी सुविधांचा अभाव, समाजाचा विरोधातला दृष्टीकोन या सगळ्यांचा सामना करत त्या यश मिळवतायत. एके दिवशी विंटर ऑलिंपिक गाठण्याचं स्वप्न पाहतायत.
बीबीसीच्या टीमनं देहरादूनमध्ये टीमची भेट घेतली आणि त्यांच्या या वाटचालीविषयी जाणून घेतलं.
"आम्ही मुली काहीही करू शकतो, हे मला दाखवायचं होतं... आमच्यासाठी आईस हॉकी हा फक्त खेळ नाही, ते आमचं जगणंच आहे."
भारताच्या महिला आईस हॉकी टीमची कर्णधार त्सेवांग चुस्किट तिच्या टीमच्या प्रवासाविषयी सांगत होती.
देहारादूनच्या हिमाद्री आईस हॉकी रिंकमध्ये आम्ही त्सेवांग आणि तिच्या इतर टीममेट्सना भेटलो. जून 2025 मध्ये आशिया कपचं कांस्य पदक मिळवल्यापासून हा संघ चर्चेत आहे.
आम्ही त्यांचा सराव पाहिला, हा खेळ अनुभवला, आणि त्यांच्या प्रवासाविषयी, स्वप्नांविषयी जाणून घेतलं.
खरंतर यूएसए, कॅनडासारख्या देशांत आईस हॉकी लोकप्रिय आहे. तिथे हिवाळ्यात गोठलेल्या तलावांवर तसंच कृत्रिम आईस रिंकवर लोक स्केटिंग करतात, आईस हॉकीसारखे विंटर स्पोर्टस खेळतात.
पण भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात आईस हॉकी खेळली जाते, हेही अनेकांना माहिती नसतं.
मात्र त्याच खेळात या मुली नाव कमावतायत. यामागे अनेक दशकांची मेहनत आहे तसंच गैरसमजुती मोडण्याचं धाडसही आहे.
असा असतो आईस हॉकीचा खेळ
आईस हॉकी म्हणजे आईस रिंकवर अर्थात बर्फाच्या बंदिस्त सपाट थरावर खेळली जाणारी हॉकी. गोठलेल्या तलावांवर किंवा कृत्रिम आईस रिंकवर हा खेळ खेळला जातो.
यात आईस स्केटिंग करताना खेळाडू स्ट्रायकर सारखं दिसणारं 'पक' प्रतिस्पर्ध्याच्या जाळ्यात ढकलून गोल करण्याचा प्रयत्न करतात. ज्याचे गोल जास्त तो विजेता.
एका संघात वीस खेळाडू असतात, पण प्रत्येक वेळी सहाच जण रिंकवर थांबू शकतात – तीन फॉरवर्ड, दोन डिफेंडर आणि एक गोलकीपर.
बर्फाचं तापमान -2 ते -8 अंश सेल्सियस एवढं कमी असतं, त्यामुळे एखादा खेळाडू जास्तीत जास्त तीस सेकंद बर्फावर राहू शकतो आणि लगेचच बदली खेळाडूला उतरावं लागतं.
जड उपकरणं घेऊन फिरणं, स्लाइड करणं, पोझिशन घेणं—सगळं वाटतं तितकं सोपं नसतं.
हिमालयात रुजलेलं स्वप्न
भारतात आईस हॉकीची सुरुवात हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीसारख्या जागा आणि लडाखमधून झाली. तिथल्या रहिवाशांना 1960 च्या दशकात भारतीय सैन्याच्या जवानांनी या खेळाची ओळख करून दिली.
त्याविषयी भारताच्या महिला हॉकी टीमची प्रवक्ता आणि खेळाडू डिस्किट आंगमो सांगते. "हिवाळ्यात लडाखमध्ये काही ठिकाणी तापमान उणे 20 ते 30 अंशांपर्यंत खाली जातं. तेव्हा तीन महिने सगळं बंदच असतं.
"आम्ही मजा किंवा टाईमपास म्हणून आइस हॉकी खेळायला सुरुवात केली होती. हा ऑलिम्पिक खेळ आहे, जगभर लोकप्रिय आहे—हे आम्हाला तेव्हा माहितीही नव्हतं."
आंतरराष्ट्रीय पातळीवर आईस हॉकीचा खेळ कृत्रिम रिंकवर खेळला जातो. पण या मुलींनी खेळायला सुरुवात केली, तेव्हा अशी सुविधा उपलब्ध नव्हती. त्यांना सरावासाठी स्वतःच स्वतःची रिंक तयार करावी लागायची.
भारताची माजी कर्णधार आणि सध्याच्या टीमची सदस्य रिंचेन डोल्मा आणि गोलकीपर डोर्जे डोल्मा त्याविषयी माहिती देतात.
रिंचेन सांगते, "त्या वेळी आईस रिंक सहज उपलब्ध नसायच्या. मुलं गोठलेल्या तलावांवर खेळायची, पण मुलींना तिथे प्रवेश मिळणं अशक्य होतं. त्यामुळे आम्ही स्वतःच जमिनीवर पाणी टाकून, आमच्यासाठी आईस रिंक तयार करायचो."
अशी रिंक तयार करणं सोपं नसतं. ती तयार करण्यासाठी दिवस-रात्र ठराविक वेळी जमिनीवर पाणी ओतून बर्फाचे पातळ थर एकावर एक तयार होऊ द्यावे लागतात, असं डोर्जे नमूद करते.
"सगळ्याजणी बादल्या घेऊन रांगेत उभं राहून एकामागोमाग एक पाणी टाकत रिंक तयार करायचो."
खडतर वातावरणासोबतच या टीमनं गैरसमजूती आणि महिलांविषयी भेदभावावरही मात केली.
भेदभावांवर मात आणि रिंकवरचं कुटुंब
डिस्किट सांगते, "आइस हॉकी हा कॉन्टॅक्ट स्पोर्ट आहे. इजा होऊ शकते. खेळ खूप वेगवान आहे. मुलींनी असं करू नये—असं नेहमी सांगितलं जातं. पण आम्ही हे समज मोडून काढले."
कर्णधार त्सेवांग चुस्किट आधी तिरंदाजी खेळायची. पण टीम स्पोर्टस जास्त आवडत असल्यानं तिनं आईस हॉकी निवडली.
"त्या वेळी आमच्याकडे पूर्ण उपकरणंही नव्हती, आम्ही मुलांपासून काही गोष्टी उधार घ्यायचो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जायचो, तेव्हा आइस हॉकी असोसिएशन ऑफ इंडिया कुठून कुठून कसोशीने निधी जमवायची."
आता परिस्थिती बदलते आहे, मात्र संघातल्या अनेक खेळाडूंना आजही आजही नोकऱ्या आणि घर सांभाळून खेळावं लागतं.
2016 मध्ये भारताच्या महिला महिला टीमनं आईस हॉकी खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या टीमचं रिंचेननं नेतृत्व केलं होतं. दशकभरानंतर आजही ती खेळते आहे.
2025 च्या आशिया कपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या टीममध्येही रिंचेनचा समावेश होता. त्याच वर्षाच्या सुरुवातीला मुलीच्या जन्मानंतर पाचच महिन्यांत ती खेळात परतली होती.
रिंचेन सांगते, "पहिल्यांदा मी माझ्या बाळाला आइस रिंकवर आणलं ते नॅशनल कॅम्पदरम्यान. तेव्हा मी खूप उत्साहात होते, तीही खूप खूश होती. मी तिला उचलून स्केटिंग करत होते.
"माझ्या टीममेट्स तर म्हणतात की ही आमच्या टीमची नवीन सदस्य आहे आणि ती ऑलिम्पिकमध्ये खेळेल.. तिनं तिला हवं ते करावं, पण तिला आइस हॉकी खेळायचं असेल तर मी तिला गोलकीपर बनवेन."
कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाल्याचं रिंचेन नमूद करते. तिचे वडीलही आईस हॉकी खेळायचे आणि त्यांनीच तिला स्केट्स आणून दिले होते. लग्नानंतर नवराही पाठीशी उभा राहिला.
"एरवी अनेक महिला लग्नानंतर किंवा बाळंतपणानंतर खेळणं सोडून देतात. पण माझ्यासाठी माझी मुलगी नशीबवान आहे."
"मी लेहमध्ये असले, की खेळासोबतच एका शाळेत शिकवते. त्यामुळे मी घराबाहेर असते, तेव्हा हिची आजी तिला सांभाळते."
एकत्र प्रवास करता करता, अडथळ्यांवर मॉमत करत या टीममधल्या खेळाडूंचं कुटुंबच तयार झालं आहे. विजयाचा क्षण असो वा निराशेचा – सगळ्या त्याला एकत्र सामोऱ्या जातात.
डिस्किट सांगते, "आम्ही एकतर कुटुंबासोबत असतो, नाहीतर हॉकी टीमसोबत. टीमच आमचा परिवार आहे. आम्ही एकत्र खूप मजा करतो. एकत्र असलो की आव्हानं अवघड वाटत नाहीत."
या एकजुटीनेच त्यांना पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवून दिलं आहे.
असा झाला टीमचा प्रवास
भारताची महिला आईस हॉकी टीम 2016 मध्ये स्थापन झाली. दहा वर्षांपेक्षाही कमी वेळात या संघाने खूप मोठी मजल मारली आहे.
2025 च्या जूनमध्ये भारतीय महिलांनी यूएईमध्ये झालेल्या एशिया कपमध्ये कांस्य पदक जिंकले.
रिंचेन सांगते, "ती राऊंड-रोबिन स्पर्धा होता. फक्त आम्ही ड्रेसिंग रूममध्ये परत आलो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही कांस्य जिंकलं आहे. सगळे ओरडायला लागले."
डिस्किट माहिती देते, " हा फक्त स्कोअरबोर्डवरील विजय नव्हता. हा सगळ्यांसाठी एक मोठा विजय होता. यामुळे आमच्यासाठी अनेक दारं उघडली. आता खूप लोकांना या खेळाबद्दल माहिती मिळाली आहे."
पुढची पावलं
2025 सालीच उत्तराखंडमधील देहरादून येथे हिमाद्री आईस रिंक ही भारतातली पहिली कृत्रिम आइस रिंक उघडली— टीमसाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
गोष्टी बदलायला सुरुवात झाली आहे, पण अजून खूप करणं बाकी आहे, असं डिस्किट नमूद करते.
"पायाभूत सुविधा वाढत आहेत. अनेक रिंक तयार होत आहेत. यामुळे आमच्या सरावाला मदत होते. नैसर्गिक तलावांवर सराव केला तर फक्त तीन महिनेच सराव करता येते.
"आधी आम्ही तीनच महिने सराव करून वर्षभर खेळणाऱ्या मुलींचा सामना करायचो. पण आता देहरादूनमध्ये रिंक झाली आहे, तर आम्ही बारा महिने सराव करू शकतो."
राजस्थानसारख्या उष्ण वाळवंटाच्या ठिकाणीही आईस रिंक उभी राहात असल्याचंही ती सांगते. पण केवळ सोयी सुविधा नाही तर लोकांचा पाठिंबाही मिळायला हवा असं तिला वाटतं.
"सर्वात आधी आम्ही कामगिरी करायला हवी. लोकांचा पाठिंबा आपोआप येतो.
"बाहेर स्पर्धेला जायचं तर आजही निधी उभा करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, प्रसंगी खिशातले पैसे द्यावे लागतात. सरकारी मदत मिळत आहे, आणि ती वाढेल अशी आम्हाला आशा आहे."
आइस हॉकीने या मुलींचे आयुष्य बदलून टाकलं आहे, त्यांना कधीच कल्पना न केलेले व्यासपीठ दिले आणि अधिक मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस दिले.
एक ना एक दिवस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचं स्वप्न या सगळ्याजणी उराशी बाळगून आहेत. त्सेवांग सांगते, "एक दिवस भारत विंटर ऑलिंपिकमध्ये आईस हॉकी खेळेल असं माझं स्वप्न आहे. माझ्या हयातीत ते शक्य होईल की नाही, माहिती नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






