भारताचं आदित्य L-1 सौरयान सध्या काय करतंय?

फोटो स्रोत, ISRO
भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जे आदित्य एल-1 अंतराळयान अवकाशात सोडलं आहे. त्या यानाने एक सेल्फी काढून पाठवला आहे.
त्यात सेल्फी छायाचित्रामध्ये पृथ्वी आणि चंद्र दिसत आहेत.
आदित्यच्या सेल्फीमध्ये अंतराळयानाची काही मुख्य उपकरणं सोन्याच्या आवरणाखाली झाकलेली दिसतात.
पृथ्वीच्या दिशेने काढलेल्या छायाचित्रात पृथ्वीचा एक भाग उजेडात तर एक भाग गडद अंधारात दिसतोय. तर चंद्र पृथ्वीच्या शेजारील एक लहान गोळा असल्याचं भासतोय.

फोटो स्रोत, ISRO
आदित्य- एल 1 अंतराळयानाच्या प्रक्षेपणाविषयी बोलताना इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ म्हणाले, "आदित्य-एल1 मोहीम पार पाडण्यासाठी पीएसएलव्ही बाबत एक अतिशय वेगळा दृष्टीकोन ठेवल्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. यापुढे मोहिमेचा प्रवास एल 1 बिंदू पासून सुरू होईल. हा 125 दिवसांचा प्रवास असणार आहे."
आदित्य-एल 1 अंतराळ मोहिमेच्या संचालक निगार साजी म्हणाल्या, "हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. पीएसएलव्ही द्वारे आदित्य- एल 1 चे प्रक्षेपण ही आनंदाची गोष्ट आहे. आदित्य-एल 1 ला 125 दिवसांचा सर्वात मोठा प्रवास पूर्ण करायचा आहे.
एकदा आदित्य-एल 1 कार्यान्वित झाला की तो देशासाठी आणि जगासाठी महत्वाची देणगी ठरणार आहे. ही मोहीम शक्य करण्यासाठी वैज्ञानिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी संपूर्ण टीमच्या वतीने आभारी आहे."
सूर्याचं एक नाव आदित्य आहे तर एल 1 म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याचं संतुलन ज्या ठिकाणी होतं तो बिंदू.

फोटो स्रोत, ISRO
23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.
त्याच आठवड्यात भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक अंतराळयान यशस्वीपणे प्रक्षेपित केले.
आदित्य-एल 1 च्या प्रवासाचा रस्ता
सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा एकमेव तारा आहे. या दोघांमधील अंतर जवळपास 1.5 कोटी किलोमीटर इतकं आहे. सूर्य हा वायूचा गोळा असून सौरमालेच्या केंद्रस्थानी आहे. या सौरमालेतील सर्व ग्रहांसाठी तो ऊर्जेचा स्रोत आहे.
सूर्याच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवरील जीवनासाठी अनुकूल वातावरण तयार होते.
इस्रोच्या मोहीमेविषयीच्या माहिती पुस्तिकेत असं म्हटलंय कि, अशा महत्त्वाच्या सौर उपकरणामुळे आपल्याला आकाशगंगा आणि ग्रहांविषयी बरंच काही समजेल.
आदित्य-एल1 आता चार महिने प्रवास करेल आणि एल1 बिंदूवर स्थिर होईल. पृथ्वी आणि बुध ग्रहादरम्यान 15 लाख किमी अंतर आहे.

फोटो स्रोत, ISRO
या प्रवासाच्या पहिला टप्प्यात पीएसएलव्ही एक्सएल अंतराळयान आदित्य-एल1 ला पृथ्वीच्या कक्षेत घेऊन जाईल. तिथून आदित्य चंद्रयानाप्रमाणे पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल आणि शेवटच्या लंबवर्तुळाकार मार्गावर पोहोचल्यानंतर त्याला अवकाशात झेप घेऊन एल 1 बिंदूकडे ढकलले जाईल.
त्यानंतर, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होईल आणि एल 1 बिंदूच्या दिशेने प्रवास करेल.
चार महिन्यांच्या प्रवासात आदित्य-एल 1 सूर्याला प्रदक्षिणा घालत त्याचे वरपासून खालपर्यंत निरीक्षण करेल.
अंतराळयान एल 1 नावाच्या बिंदूजवळून सूर्याचे निरीक्षण करेल. ग्रहणाच्या वेळी चंद्राच्या सावलीमुळे सूर्य झाकोळला असला तरी आदित्य-एल1 च्या नजरेतून सूर्य बाजूला जाणार नाही.
त्यामुळे सूर्याच्या क्रियांचा पूर्ण अभ्यास करता येईल.
आदित्य एल 1 अंतराळयानाची किंमत किती आहे?
इस्रोने अद्याप या मोहिमेची किंमत जाहीर केलेली नाही. पण माध्यमातील बातम्यांनुसार या मोहिमेची किंमत 3.78 अब्ज रुपये असू शकते.
सूर्याचा अभ्यास कसा करणार ?
ऑर्बिटरमध्ये सात उपकरणं बसविण्यात आली आहेत. ही उपकरणं सूर्याच्या वरच्या थरांचे परीक्षण करतील. या थराला कोरोना असं म्हणतात. त्याचप्रमाणे सूर्यापासून निघणाऱ्या सौर वादळांचा अभ्यास करतील.
कोरोना थर हा सर्वात बाहेरचा थर आहे. आपण लहान असताना सूर्य काढायचो तेव्हा त्याच्याभोवती लहान लहान रेषा काढायचो. त्या रेषा प्रत्यक्षात आहेत. त्यांना कोरोना लेयर म्हणतात.
आपण पृथ्वीवरून पाहू शकतो अशा सूर्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास ही उपकरणं करतील. शिवाय कोरोना यांच्यातील प्लाझ्माच्या पातळ थराचा अभ्यास करतील.

या अभ्यासांमुळे शास्त्रज्ञांना सूर्याच्या क्रियांविषयी माहिती मिळेल. जसं की सौर वादळामुळे पृथ्वीवरील आणि जवळपासच्या अवकाशातील हवामानावर कसा परिणाम होतो हे समजण्यास मदत होईल.
उपग्रहांना मदत करणार आदित्य-एल 1
इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ मयलास्वामी अन्नादुराई सांगतात की, "सूर्याची किरणे, उष्णता, त्यातून उत्सर्जित होणारे कण आणि चुंबकीय क्षेत्राचा प्रवाह पृथ्वीच्या हवामानावर सतत प्रभाव टाकत असतो. त्याच वेळी, त्यांचा अंतराळावरही प्रभाव पडतो."
ते पुढे सांगतात की, "अवकाशातील हवामान उपग्रहांच्या प्रभावी कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. सौर वादळ उपग्रहांवरील इलेक्ट्रॉनिक्सवर परिणाम करतात. यामुळे उपग्रहावरील पॉवर ग्रीड्स उडवल्या जाऊ शकतात."

फोटो स्रोत, ISRO
भारताचे अंतराळात 50 हून अधिक उपग्रह आहेत. ते देशाला अनेक महत्त्वाच्या सेवा पुरवतात. उपग्रहांमुळे दळणवळण, हवामानाची माहिती, दुष्काळ आणि आगामी आपत्तींचा अंदाज लावता येतो.
अंतराळात सुमारे 10,290 उपग्रह पृथ्वीभोवती फिरत आहेत. त्यापैकी जवळपास 7,800 कार्यरत आहेत.
त्यामुळे आदित्य-एल 1 च्या माध्यमातून आपल्याला सूर्याच्या गतीशीलतेची अधिक चांगली माहिती मिळू शकते. शिवाय आदित्य-एल 1 मुळे आपल्याला सौर वादळांची माहिती एक किंवा दोन दिवस अगोदर मिळू शकते, जेणेकरून त्यावर आपल्याला मार्ग काढता येऊ शकतो असं मयलास्वामी अन्नादुराई यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








