'भारत भाग्यवान आहे'; व्लादीमीर पुतिन भारतात आल्यावर मोदींविषयी नेमकं काय म्हणाले?

गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रशियन भाषेत लिहिलेली गीता भेट दिली.

फोटो स्रोत, X/ @NarendraModi

फोटो कॅप्शन, गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रशियन भाषेत लिहिलेली गीता भेट दिली.
वाचन वेळ: 4 मिनिटे

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आहेत.

एका भारतीय खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इंधन खरेदीबाबत अमेरिकेच्या 'दुहेरी धोरणावर' प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

'इंडिया टुडे'शी बोलताना ते म्हणाले, "अमेरिका रशियाकडून युरेनियम खरेदी करत आहे, जे अणुभट्टी इंधन निर्मितीसाठी आवश्यक आहे. तर दुसऱ्या बाजूला, ते भारतावर रशियाकडून ऊर्जा आयात थांबवण्यासाठी दबाव आणत आहे."

पुढे ते म्हणाले, "जर अमेरिकेला रशियाकडून इंधन खरेदी करण्याचा अधिकार आहे, तर भारतालाही तोच अधिकार असला पाहिजे."

पुतिन गुरुवारी (4 डिसेंबर) संध्याकाळी त्यांच्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत पोहोचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं आहे. चार वर्षांत पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

अमेरिकेने रशियन तेल आयातीवर 25 टक्के 'रेसीप्रोकल टॅरिफ'व्यतिरिक्त अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादलेलं आहे. परिणामी, रशियाकडून तेल आयात करणं ही गोष्ट भारतासाठी सोपी राहणार नाही, असं म्हटलं जात आहे.

ट्रम्प यांच्याबाबत काय म्हणाले पुतिन?

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इंधन खरेदीबाबत अमेरिकेच्या 'दुहेरी धोरणावर' प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणाले, "अमेरिका रशियाकडून युरेनियम खरेदी करत आहे, जे अणुभट्टी इंधन निर्मितीसाठी आवश्यक आहे, तर ते भारतावर रशियाकडून ऊर्जा आयात थांबवण्यासाठी दबाव आणत आहे."

ते म्हणाले, "जर अमेरिकेला रशियाकडून इंधन खरेदी करण्याचा अधिकार आहे, तर भारतालाही तोच अधिकार असला पाहिजे."

"या प्रश्नांवर सविस्तर चर्चा आवश्यक आहे आणि आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहोत."

मात्र, या मुलाखतीत पुतिन यांनी असा दावा केला की, 'भारतासोबत रशियाची ऊर्जा भागीदारी स्थिर आहे आणि युक्रेनमधील सध्याचे चढउतार किंवा दुःखद घटनांमुळे त्यावर परिणाम होणार नाही.'

ट्रम्प प्रशासनाचा असा दावा आहे की, रशियाच्या तेलाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून भारत युक्रेन युद्धात पुतिन यांना मदत करत आहे. भारताने हा आरोप सातत्याने फेटाळून लावला आहे.

रशियाच्या युद्धातून भारत नफा कमवत आहे, हा ट्रम्प प्रशासनाचा आरोप भारतीय अधिकाऱ्यांनी फेटाळला असून त्याचं 'दुहेरी मापदंड' म्हणून वर्णन केलं आहे.

ट्रम्प प्रशासनानं 'टॅरिफ'चा शस्त्र म्हणून वापर करण्याबाबत पुतिन म्हणाले की, "ते स्वतःचंच धोरण पुढे रेटतात. त्यांचे असे सल्लागार आहेत ज्यांना असं वाटतं की, व्यापारी भागीदारांवर कर लादल्याने शेवटी अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा होईल. मला वाटतं की ते (ट्रम्प) हे चांगल्या हेतूनं करतात. आमच्या सल्लागारांना वाटतं की यामुळे आमच्यासाठी धोका निर्माण होतो."

ते म्हणाले की, "प्रत्येक देश आणि त्याच्या नेत्यांना कोणतं धोरण निवडायचं हे ठरवण्याचा अधिकार आहे. आम्ही अशा प्रकारच्या धोरणांमध्ये कधीही सहभागी नव्हतो, आताही नाही आणि भविष्यातही नसू. आपली अर्थव्यवस्था खुली आहे. मला आशा आहे की येणाऱ्या काळात जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे होणारे सर्व उल्लंघन सुधारले जातील."

रशियन भाषेतील गीतेची प्रत दिली भेट

गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिली.

पुतिन

फोटो स्रोत, ANI

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलं की, "राष्ट्रपती पुतिन यांना रशियन भाषेत लिहिलेल्या गीतेची प्रत भेट दिली. गीतेची शिकवण जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते."

पुतिन यांनी पंतप्रधान मोदींबाबत काय म्हटलं?

व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशिया भारताकडून अधिक वस्तू खरेदी करण्यासाठी नवीन पर्याय शोधत आहे. जेणेकरून भारतीय आयात वाढेल आणि दोन्ही देशांमधील व्यापाराचा असमतोल कमी होईल.

व्लादिमीर पुतिन म्हणाले की, भारत आणि चीन हे दोन्हीही देश त्यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांचं 'समजूतदार नेते' असं म्हणून वर्णन केलं आहे. हे दोन्हीही नेते कठीण समस्यांना सोडवण्यासाठी अत्यंत दृढनिश्चयी आहेत, असंही ते म्हणाले.

पुतिन

फोटो स्रोत, AFP via Getty Images

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल ते म्हणाले, "आमचे खूप विश्वासू आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते खूप विश्वासू व्यक्ती आहेत.

या अर्थाने, मी खूप प्रामाणिकपणे सांगतो आहे की, भारत भाग्यवान आहे की त्याला मोदींसारखा नेता मिळाला आहे. ते भारतासाठीच जगतात आणि प्रत्येक श्वास घेतात."

पुढे ते म्हणाले, "भारत-रशियाचे संबंध अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः आर्थिक सहकार्य, संरक्षण, मानवी भागीदारी आणि उच्च तंत्रज्ञानाचा विकास यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मजबूत करण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यांना भेटणं मनोरंजक असतं."

पंतप्रधान मोदींच्या मॉस्को भेटीची आठवण करून देताना राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले, "तिथे खूप मोकळेपणानं चर्चा झाली. ते आले आणि आम्ही माझ्या निवासस्थानी एकत्र बसलो. पूर्ण संध्याकाळ आम्ही चहापानावर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ती आमची एक मनोरंजक चर्चा होती."

यापूर्वी, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायजेशनच्या बैठकीत दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)