बीबीसी 100 विमेन 2024ः कोण आहे यावर्षी यादीत?

2024 बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस सीझनसाठीच्या 100 महिला सहभागींपैकी काहींचे फोटो

बीबीसीनं 2024 साठी जगभरातील 100 प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे.

त्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेत्या नादिया मुराद, बलात्काराच्या पीडिता आणि त्याविरोधात मोहीम चालवणाऱ्या गिसेल पेलिकॉट, अभिनेत्री शेरॉन स्टोन, ऑलिंपिक अ‍ॅथलिट रेबेका अ‍ॅड्रेड आणि अ‍ॅलिसन फेलिक्स, गायिका रेय, व्हिज्युअल आर्टिस्ट ट्रेसी एमिन, हवामान बदलासंदर्भातील कार्यकर्त्या अ‍ॅडेनाइक ओलाडोसू आणि लेखिका क्रिस्तिना रिवेरा गर्झा यांचा समावेश आहे.

गाझा, लेबनॉन, युक्रेन आणि सुदानमधील भयंकर युद्ध आणि मानवीय संकटाचा सामना करण्यापासून ते जगभरातील विक्रमी निवडणुकानंतर समाजात झालेलं ध्रुवीकरण पाहण्यापर्यंत, महिलांना अधिक संकटाला तोंड द्यावं लागलं आणि अधिक कणखरपणानं त्यावर मात करावी लागली.

यावर्षी महिलांच्या वाट्याला आलेल्या अडचणींना आपल्या कणखरपणानं तोंड देत आपल्या सभोवतालचं जग बदल असताना बदलासाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांची दखल बीबीसी 100 विमेन घेतं आहे. ही यादी हवामान बदलाच्या परिणामांची दखल घेण्यासाठी देखील कटीबद्ध आहे. त्यासाठी हवामान बदलाच्या परिणामांना हाताळण्यासाठी त्यांच्या समुदायांना मदत करणाऱ्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही यादी अधोरेखित करते.

यादीतील नावं कोणत्याही विशिष्ट क्रमानं देण्यात आलेली नाहीत.

संस्कृती आणि शिक्षण

ख्रिस्टिना अस्सी

ख्रिस्टिना अस्सी , लेबनॉन

फोटोजर्नलिस्ट

फोटोजर्नलिस्ट ख्रिस्टिना अस्सी 1990 च्या दशकात लेबनॉनमध्ये वाढल्या. नागरी युद्धाचा परिणाम म्हणून तेव्हा सतत अस्थिरता होती. त्यामुळे त्यांनी त्या संघर्षाच्या कथा आणि युद्धातील न सांगितलेल्या गोष्टी सांगण्याची प्रेरणा मिळाली.

मात्र ऑक्टोबर 2023 मध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं.

या स्फोटात त्यांच्याबरोबर असलेले पत्रकार इसाम अब्दुल्लाह आणि इतर पाच सहकारी गंभीर जखमी झाले. नंतर अस्सी यांचा एक पाय कापावा लागला.

या प्रसंगानंतर त्यांनी पत्रकारांची सुरक्षा या विषयावर काम करायला सुरुवात केली. त्यांनी पॅरिस ऑलिंपिक टॉर्च रिलेमध्ये सहभाग नोंदवला आणि कामाच्या ठिकाणी मृत्यू आलेल्या पत्रकारांना तो समर्पित केला.

मेहदेर हेलसेलासी

मेहदेर हेलसेलासी , इथियोपिया

छायाचित्रकार

इथियोपियाच्या छायाचित्रकार मेहदेर हेलसेलासी या कोरड्या नद्या आणि दुष्काळी भागात काम करतात. दुष्काळामुळे त्यांच्या देशातील मुलींचे कसे बालविवाह केले जातात हे त्यांनी आपल्या लेन्समधून टिपलं आहे. या कार्यासाठी त्यांना 2023 सालचा कंटेम्पररी आफ्रिकन फोटोग्राफी प्राईजने गौरवण्यात आलं आहे.

हवामानबदलामुळे बालविवाहाचा धोका 2050 पर्यंत तिपटीने वाढणार असल्याचा धोका जागतिक संघटनांनी व्यक्त केला आहे.

हेलसेलासी यांची छायाचित्रकारितेत त्या ज्या लोकांना रोज भेटतात त्यांचा आणि स्वत:चा पूर्वेइतिहास आणि त्यांचा अनुभव यांचं मिश्रण असतं.

त्यांचं काम अनेक ठिकाणी प्रदर्शित झालं आहे. त्यात यावर्षीच्या आफ्रिकन बिनाले ऑफ फोटोग्राफीचाही समावेश आहे.

स्वेतलाना अनोखिना

स्वेतलाना अनोखिना, रशिया

मानवाधिकार कार्यकर्त्या

स्वेतलाना अनोखिना रशियातील उत्तर कॉकेसस, पूर्व युरोप आणि आशियात पसरलेल्या मुस्लीम-बहुल प्रदेशातील कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडितांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी अनेक वर्षांपासून मदत करत आहेत.

इतर स्वयंसेवकांच्या बरोबर, त्यांनी 2020 मध्ये मरेम प्रकल्पाची सुरूवात केली. या उपक्रमातून दागेस्तान, चेचन्या आणि इतर उत्तर कॉकेशस प्रजासत्ताकांमधील धोक्यात असणाऱ्या महिलांना तिथून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी, तसंच त्या महिलांना कायदेशीर आणि मानसिक आधार देण्यासाठी काम केलं जातं.

चेचेन आणि दागेस्तानी सुरक्षा दलांनी अनोखिना यांच्या महिलांसाठीच्या आश्रयस्थानावर छापा टाकल्यानंतर 2021 मध्ये त्यांनी रशिया सोडण्याचा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी, रशियन सशस्त्र दलांना बदनाम केल्याच्या आरोपावरून अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात फौजदारी तपास सुरू केला.

हमिदा अमान

हमिदा अमान, अफगाणिस्तान

प्रसारमाध्यम आणि शिक्षण व्यावसायिक

तालिबाननं अफगाणिस्तानातील मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश नाकारल्यानंतर हमिदा अमान यांनी बेगम अ‍ॅकेडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या मीडिया उद्योजक आहेत. बेगम अ‍ॅकेडमीमध्ये जे विद्यार्थी शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाइन स्वरुपात मल्टीमीडिया कोर्सेस मोफत शिकवले जातात.

गेल्या वर्षी बेगम अ‍ॅकेडमीने दारी आणि पश्तो भाषेत 8,500 हून व्हीडिओ उपलब्ध करून दिले आहेत. यात 7 ते 12 वी पर्यंतच्या शालेय अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

मार्च महिन्यात अमान यांनी बेगम टीव्हीची सुरूवात केली. ही एक शैक्षणिक वाहिनी आहे. ज्यात बेगम अ‍ॅकेडमीच्या अभ्यासक्रमांचं उपग्रहाद्वारे प्रसारण केलं जातं.

यानंतर त्यांनी रेडिओ बेगम प्रकल्पाची सुरूवात केली. हे महिलांनी, महिलांसाठी चालवलेलं रेडिओ स्टेशन आहे. 2021 मध्ये तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर या रेडिओ स्टेशनची सुरूवात करण्यात आली होती.

प्लेस्टिया अलकाद

प्लेस्टिया अलकाद, पॅलेस्टिनी भूप्रदेश

पत्रकार आणि कवयित्री

गाझामध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा 22 वर्षांच्या प्लेस्टिया अलकाद यांनी विद्यापीठातून पदवीवर झाल्या होत्या. युद्धाच्या सुरूवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा इस्रायली हवाई दलाकडून जोरदार हल्ले केले जात होते तेव्हा त्यांनी त्यांच्या फ्लॅटमधील स्वत:चा एक व्हिडिओ पोस्ट केला होता.

तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर इन्स्टाग्रामवर त्यांनी गाझातील अपडेट्स, कविता आणि डायरीतील नोंदी टाकल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या चाळीस लाखांवर गेली. या वृत्तांवर आधारित त्यांचं 'आईज ऑफ गाझा' हे संस्मरण (आठवणींच्या नोंदी) लवकरच प्रकाशित होणार आहे.

आपल्या कामामुळे अलकाद या वन यंग वर्ल्ड्स जर्नालिस्ट ऑफ द ईयर 2024 ठरल्या आहेत. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटसारख्या अत्यंत वरच्या पातळीवरील व्यासपीठावर त्यांनी पॅलेस्टिनी लोकांची बाजू देखील मांडली आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये अलकाद यांनी गाझापट्टी सोडली. त्यांना बेरूतमध्ये मीडिया स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवीसाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे.

ट्रेसी एमिन

ट्रेसी एमिन, युके

कलाकार

1990 च्या दशकात, माय बेड आणि द टेन्ट या उत्तेजक कलाकृतींमुळे ट्रेसी एमिन प्रसिद्ध झाल्या. या कलाकृती लोकांना त्यांचे लैंगिक अनुभवांवर विचार करायला प्रवृत्त करतात.

तेव्हापासून त्यांचं नाव कलाविश्वात चांगलंच परिचित झालं आहे. त्या स्वत:बद्दलच्या प्रामाणिक आणि आत्मचरित्रात्मक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.

माय बेड लंडनमध्ये पहिल्यांदा मांडण्यात आलं होतं त्याला आता 25 वर्षे झाली आहेत. या कलाकृतीवर प्रसार माध्यमांमधून बरीच चर्चा झाली. कधीकाळी एमिन यांना ब्रिटिश कलेतील वादग्रस्त किंवा चाकोरीबाहेरच्या कलाकार मानलं जायचं. यावर्षी किंग चार्ल्स यांनी व्हिज्युअल आर्ट्समधील योगदानासाठी एमिन यांना सन्मानित केलं आहे.

उदयोन्मुख प्रतिभावान कलाकारांना घडवण्यासाठी त्यांनी युकेमधील मार्गेटमध्ये ट्रेसी एमिन फाऊंडेशनची स्थापना केली आहे.

एक महिला म्हणून मला वाटतं की आपण जितकं कणखर, सक्षम असू तितकं असलं पाहिजे. मला वाटतं आता अशी वेळ आली आहे की महिलांची मोठी एकजूट असली पाहिजे आणि महिलांसाठी मोठा लढा उभारला पाहिजे.

ट्रेसी एमिन

शेरॉन क्लेनबाम

शेरॉन क्लेनबाम, अमेरिका

रबाय

शेरॉन क्लेनबॉम या न्यूयॉर्कमधील ज्यू समुदायातील प्रमुख रबाय (धर्मगुरू) आहेत. त्यांनी एलजीबीटीक्यू+ समुदायाचे अधिकार आणि धर्म यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी तीन दशकं काम केलं आहे.

1992 मध्ये त्यांची नियुक्ती शहरातील काँग्रेजेशन बेत सिमचात तोराह या ज्यू धर्मियांच्या समुदायाची पहिली महिला रबाय म्हणून झाली होती. त्यानंतर अनेक चढउतारांमध्ये त्यांनी या समुदायाचं नेतृत्व केलं आहे. यात 1990 च्या दशकातील एड्सच्या संकटाचाही समावेश आहे.

या समुदायाचा विस्तार होताना त्यात ट्रान्स आणि नॉन-बायनरी (जे लैंगिकदृष्ट्या पुरुष किंवा महिला ठरत नाही) लोकांना धार्मिक सदस्यत्व मिळावं यावर शेरॉन यांनी लक्ष दिलं. त्यामुळे आता काँग्रगेशन बेत सिमचात तोराह हे अमेरिकेतील एलजीबीटीक्यू+ लोकांसाठीचं सर्वात अनुकूल सिनेगॉग (ज्यू प्रार्थनास्थळ) मानलं जातं.

शेरॉन क्लेनबाम यावर्षी निवृत्त झाल्या. सामाजिक न्यायाच्या प्रकल्पांमागील त्या प्रमुख ऊर्जा स्रोत गणल्या जातात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वांतत्र्यासाठीच्या अमेरिकन आयोगावर केली होती.

आनंद ही एक आध्यात्मिक आणि राजकीय प्रतिकाराची कृती आहे.

शेरॉन क्लेनबाम

क्रिस्तिना रिवेरा गार्झा

क्रिस्तिना रिवेरा गार्झा, मेक्सिको/अमेरिका

लेखिका

प्रख्यात लेखिका क्रिस्तिना रिवेरा गार्झा यांना गेल्या काही वर्षांमध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. यात 2024 चा पुलित्झर प्राईसचाही समावेश आहे. हा पुरस्कार त्यांना संस्मरण श्रेणीतील, लिलियानाज इनविन्सिबल समर या त्यांच्या पुस्तकासाठी मिळाला आहे. यात महिला हत्येच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

त्यांची बहीण लिलियाना यांची 1990 च्या दशकात मेक्सिकोमध्ये तिच्याच माजी प्रियकरानं हत्या केली होती. त्यानंतर तो पळून गेला आणि त्याच्यावर कधीही खटला चालला नाही. लेखिकेला आपली प्रिय व्यक्ती गमावण्याचा धक्का बसला होता. या कथेद्वारे लेखिका या आघाताचा सामना करते आणि एका देशात न्यायाच्या शोधात निघते. असा देश जो महिला हत्येचं सर्वाधिक प्रमाण असणाऱ्या जगातील देशांपैकी एक आहे.

रिवेरा गार्झा या ह्युस्टन विद्यापीठात स्पॅनिश भाषेतील सर्जनशील लेखनातील पीएचडीसाठीच्या कार्यक्रमाच्या संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.

भाषेवर सातत्यानं आणि कसून काम करणं ज्यामुळे त्या भाषेद्वारे शेवटी महिलांची बाजू मांडली जाईल आणि त्यातून कोणत्याही प्रकारच्या कणखरपणासाठीचा चांगला पाया घातला जाईल.

क्रिस्तिना रिवेरा गार्झा

लिंडा ड्रॉफन गुनार्सडॉटिर

लिंडा ड्रॉफन गुनार्सडॉटिर, आईसलँड

महिला निवारा व्यवस्थापक

ज्या महिलांना कौटुंबिक हिंसाचारामुळे घर सोडण्यास भाग पाडण्यात आलं आहे अशा महिलांना लिंडा ड्रॉफन गुन्नार्सडोटिर आईसलॅंडमधील महिलांसाठीच्या निवाऱ्यात मदत करतात.

"महिलांसाठीचं सर्वोत्कृष्ट स्थान" म्हणून क्रमवारीमध्ये आईसलँड अनेकदा वरच्या स्थानावर असतो. मात्र तरीदेखील तिथे लिंगावर आधारित हिंसाचाराचं प्रमाण सातत्यानं जास्त आहे.

महिलांसाठीच्या आश्रयस्थानाच्या महाव्यवस्थापक या नात्यानं त्या अशा प्रकल्पाचं नेतृत्व करतात जो आईसलँडमधील महिलांसाठीच्या उद्देशानं तयार करण्यात आलेला पहिला निवारा असेल.

गुन्नर्सडोटिर म्हणतात की 20 वर्षांपूर्वी त्या आश्रयस्थानात राहिलेल्या 64 टक्के महिला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांकडे परतगेल्या. मात्र सुधारित मदत आणि सेवांचा परिणाम म्हणून ही संख्या आता 11 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

जोहाना बाहामॉन

जोहाना बाहामॉन, कोलंबिया

सामाजिक कार्यकर्त्या

कोलंबियातील एका तुरुंगाला दिलेल्या भेटीनंतर जोहाना बाहामॉन या अभिनेत्रीचं जीवन पूर्णपणे बदललं. त्या भेटीतून जोहाना यांना जीवनात ज्या लोकांना 'दुसरी संधी'ची आवश्यकता आहे असा लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली.

2012 मध्ये त्यांनी अभिनयाचं क्षेत्र सोडलं आणि त्या तुरुंग सुधारांकडे वळल्या. त्यांनी फंडासिऑन असिऑन इंटर्ना (Fundación Acción Interna) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. ही संस्था कोलंबियातील तुरुगांत असणाऱ्या कैद्यांना आणि ज्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे अशा लोकांना मदत करते.

या फाऊंडेशनचं काम देशभरातील 1,50,000 हून लोक आणि 132 डिटेंशन सेंटर्सपर्यंत विस्तारलं आहे.

या सामाजिक कार्यकर्त्या 2022 च्या सेकंड ऑपर्च्युनिटी लॉ या कायद्याची प्रवर्तक देखील होत्या. या विधेयकाला जोहाना बाहामॉन बिल म्हणूनही ओळखलं जातं. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लोकांसाठी प्रशिक्षण आणि रोजगार मिळण्याची संधी अधिक मजबूत करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं होतं.

कणखरपणा म्हणजे अडचण आल्यानंतर त्याला तोंड देणं आणि त्यातून पुढे जाण्यापलीकडे आहे; कणखरपणा म्हणजे त्या अडचणीचं रूपांतर वैयक्तिक प्रगतीच्या संधीमध्ये करण्यासाठी निर्णय घेणं.

जोहाना बाहामॉन

शिन डेव

शिन डेव, म्यानमार

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक

शिन यांच्या माहितीपटाला पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या सामानात ड्रोन सापडल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती.

म्यानमारमध्ये लष्करी राजवट आहे. यावर्षी मान्यमारमध्ये त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली खटला चालवण्यात आला. एका बंदिस्त न्यायालयात त्यांना कायदेशीर प्रतिनिधित्व नाकारण्यात आलं, म्हणजे बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

शिन यांनी 1988 पासून लष्करी राजवटीला विरोध केला आहे आणि त्यांच्यासाठी अटक ही काही नवीन गोष्ट नाही.

त्यांनी डझनभर लघु माहितीपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यातील अनेक माहितीपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतलं आहे. यात त्यांच्या 2007 च्या लोकशाही समर्थक निदर्शनांबद्दलच्या चित्रपटादेखील समावेश आहे. लष्करी राजवटीविरोधातील या निदर्शनांमध्ये हजारो बौद्ध भिक्षू सहभागी झाले होते.

झॅनिलसिनझॅट तुर्गनबाइवा

झॅनिलसिनझॅट तुर्गनबाइवा, किरगिझस्तान

संग्रहालय व्यवस्थापक

किरगिझस्तानच्या सांस्कृतिक परंपरेचं जतन आणि पुनरुज्जीवन करणं याला झॅनिलसिनझॅट तुर्गनबाइवा यांचं प्राधान्य आहे.

त्या बिश्केकमध्ये वांशिक संग्रहालय चालवतात. त्यात अत्यंत दुर्मिळ अशा राष्ट्रीय कलावस्तू ठेवल्या आहेत. अनेक लोक या संग्रहालयाला भेट देतात.

किरगिझ संस्कृतीचं संवर्धन हा त्यांच्या सामाजिक कार्याचा एक भाग आहे. त्यात एपिक ऑफ मानसचाही समावेश आहे. त्यात किरगिझ प्रदेशातील 40 समुदायातील लोकांना एकत्र आणणाऱ्या एका योद्ध्याची गोष्ट सांगितली आहे.

ही प्रसिद्ध कविता युनेस्कोच्या यादीत सुद्धा आहे. त्यात 500,000 ओळी असून हे जगातलं सर्वांत प्रदीर्घ महाकाव्य आहे. (हॉमरच्या द ओडिसी पेक्षा 20 पट मोठं) तुर्गनबाइवा यांच्या कार्यामुळे 'मानसचिझ' या कलाकारांसाठी संधी निर्माण करतं. हे कलाकार हे महाकाव्य सादर करतात.

शाहरनूश पारसीपूर

शाहरनूश पारसीपूर, इराण/अमेरिका

लेखक आणि अनुवादक

शाहरनूश पारसीपूर या इराणमधील प्रमुख कांदबरीकारांपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या लेखनातून पुरुषप्रधान समाजव्यवस्थेतील महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि महिलांची बंडखोरी यासारख्या बोलण्या लिहिण्यास व्यर्ज्य मानल्या गेलेल्या समस्या मांडल्या आहेत.

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरूवात कादंबरीकार आणि इराणच्या राष्ट्रीय टीव्ही आणि रेडिओवर निर्मात्या म्हणून केली. मात्र 1979 च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या दोन कवींना फाशी दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिली होता. परिणामी त्यांना पहिल्यांदा तुरुंगात जावं लागलं होतं.

क्रांती झाल्यापासून त्यांच्या साहित्यकृतींवर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर वुमेन विदाऊट मेन या त्यांच्या कादंबरीत त्यांनी कौमार्याशी निगडित समस्यांवर बेतलेल्या समस्या उघडपणे मांडल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकण्यात आलं होतं. नंतर इराणबाहेर त्यांच्या या कादंबरीवर आधारित एक चित्रपट बनवण्यात आला होता.

पारसीपूर यांनी त्यांना तुरुंगवासात आलेले अनुभव त्यांच्या लिखाणातून मांडले आहेत. 1994 पासून त्यांनी अमेरिकेत आश्रय घेतला आहे.

झुआन फुंग

झुआन फुंग, व्हिएतनाम

चित्रपट दिग्दर्शक, लेखिका, आर्ट गॅलरीच्या मालक

झुआन फुंग आता वयाची 95 वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या झुआन त्यांचं आयुष्य भरभरून जगल्या आहेत.

त्यांनी व्हिएतनाममधील दोन युद्धे अनुभवली आहेत. त्या वयाच्या 16 व्या वर्षी देशाला फ्रान्सपासून स्वांतत्र्य मिळवून देण्यासाठी लढल्या आहेत.

डॉक्टर म्हणून पदवी घेतल्यानंतर त्या क्लिनिकच्या प्रमुख होत्या, युद्ध वार्ताहर होत्या आणि व्हिएतनाम टीव्हीसाठी चित्रपट दिग्दर्शक होत्या, व्हिएतनामचं युद्ध संपवणाऱ्या सायगॉनच्या पतनासारख्या ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार आहेत.

वयाच्या 62 वर्षी निवृत्त होण्याऐवजी त्यांनी लोटर गॅलरी सुरू केली. हो चि मिन्ह सिटीमधील सर्वात सुरूवातीच्या खासगी गॅलरीपैकी ती एक होती. या गॅलरीच्या माध्यमातून त्यांना व्हिएतनामची कला जगासमोर आणायची होती. स्थानिक कलाकारांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळावी यासाठी त्यांनी मदत केली, कलाकारांना प्रोत्साहन दिलं.

युजेनिया बोनेत्ती

युजेनिया बोनेत्ती, इटली

नन

सिस्टर युजेनिया बोनेत्ती 100 हून अधिक निवाऱ्यांचं व्यवस्थापन करण्यात आणि मानवी तस्करी आणि शोषणाला बळी पडलेल्या स्थलांतरित महिलांना आधार देण्यासाठी आफ्रिकेत नन एक नेटवर्क स्थापन करण्यात महत्त्वाचं योगदान दिलं आहे.

रोममध्ये लैंगिक शोषणासाठी भाग पाडण्यात आलेल्या महिलांना मदत करण्यासाठी अनेक रात्री काम केलं आहे. त्यानंतर त्या 'स्लेव्हज नो मोअर' या संस्थेच्या अध्यक्षा झाल्या. ही संस्था मानवी तस्करीबाबत जागरुकता वाढवण्याचं काम करते.

बोनेत्ती केनियामध्ये 24 वर्षांहून अधिक काळ मिशनरी होत्या. त्यांनी विविध देशातील अधिकाऱ्यांना मानवी-तस्करीविरोधातील उपक्रम विकसित करण्यासाठी मदत केली आहे.

निवृत्त होण्याआधी त्यांना पोप फ्रान्सिस यांनी 2019 वे ऑफ द क्रॉस ही पुस्तिका लिहिण्यास सांगितलं होतं. कॅथलिक लोकांमध्ये या पुस्तिकेला पवित्र मानलं जातं. यात येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या अखेरच्या तासांबद्दल सांगण्यात आलं आहे. कोलोझियममध्ये गुड फ्रायडेनिमित्त पोप यांच्या उपस्थितीत प्रार्थना केली जाते.

यास्मीन मजाली

यास्मीन मजाली, पॅलेस्टाईन

डिजाइनर

यास्मीन या फॅशन डिजायनर आहेत. पॅलेस्टिनी जीवन आणि परंपरांचा प्रभाव त्यांच्या कामावर आहे.

अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाढल्यानंतर यास्मीन वेस्ट बँकमधील रामल्लाह इथं स्थलांतरित झाल्या. तिथे 2020 मध्ये त्यांनी नोल कलेक्टिव्ह हा त्यांचा ब्रँड लाँच केला.

त्यांचा फॅशन ब्रँड रामल्लाहमधील कुटुंबांद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्थानिक शिवणकाम व्यवसायांबरोबर, नैसर्गिक डाय एजंट पुरवणाऱ्या स्थानिक मसाल्यांच्या दुकानांबरोबर आणि महिलांच्या सहकारी संस्थांबरोबर काम करतो. शिंपी, विणकर, भरतकाम करणारे आणि कोरीवकाम करणारे कारागीर पांरपारिक पद्धतीनंच काम करतात. वस्त्र, पोशाख तयार करण्याच्या पॅलेस्टिनी कौशल्याबद्दलचा आदर, सन्मान ते यातून व्यक्त करतात.

मजाली यांनी त्यांच्या वस्त्रांचा, पोशाखांचा वापर पॅलेस्टिनी लोकांच्या कथा सांगण्यासाठी केला आहे. त्यांनी डेनिम जॅकेट आणि टी-शर्टवर 'नॉट युवर हबिबती' (नॉट युवर बेबी) हा शब्दप्रयोग रंगवून, जगभरात महिलांनी रस्त्यांवर अनुभवलेल्या छेडछाडीचा मुद्दादेखील मांडला आहे.

रॉक्सी मरे

रॉक्सी मरे, युके

अपंग हक्क चळवळीच्या कार्यकर्त्या

रॉक्सी मरे या एक पॅनसेक्सुअल व्यक्ती (सर्वच लिंगाच्या व्यक्तींबद्दल लैंगिक आकर्षण वाटणारे) असून त्यांना मल्टीपल स्केलेरोसिस (MS) हा आजार आहे. आपल्या अनुभवांबद्दल त्या उघडपणे बोलतात. गंभीर, दीर्घकाळ आजारी असलेल्या लोकांना सक्षम करण्यासाठी आणि वैद्यकीय, सेवाभावी आणि कॉर्पोरेट क्षेत्राकडून समाविष्ट न करण्यात आलेल्या गोष्टींशी निगडीत समस्यांना आव्हान देण्यासाठी त्या त्यांच्या व्यासपीठाचा वापर करतात.

रॉक्सी मरे यांना फॅशनची पार्श्वभूमी आहे, त्याचा वापर त्या आपल्या कार्यामध्ये करतात. लोकांना हाचलालींशी निगडित बदलांना सामोरे जाण्यासाठी मदत करताना स्टाईलचा वापर करणं आणि अल्पसंख्याक आणि वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण गटांमधील अपंग लोकांच्या समस्या समोर आणण्यासाठी त्या त्यांच्या पार्श्वभूमीचा वापर करतात.

द सिक आणि सिकनिंग पॉडकास्टच्या त्या संस्थापक आहेत. या पॉडकास्टमध्ये जे लोक अपंगत्व आणि आजारपणासह जगत आहेत त्यांच्या कथा जशाच्या तशा मांडल्या जातात. यात वेदनेचं व्यवस्थापन ते लैंगिक आरोग्य आणि शरीर आणि लैंगिक सकारात्मकतेपर्यंत सर्व मुद्दे मांडले जातात.

एक असामान्य, ब्राऊन (दक्षिण आशियाई) आणि अपंग महिला म्हणून कणखरपणा ही बाब खोलवर वैयक्तिक आणि प्रचंड सामूहिक आहे. कणखरपणा म्हणजे, माझ्यासारख्या लोकांना उपेक्षित ठेवणाऱ्या व्यवस्थेला आव्हान देण्याची ताकद.

रॉक्सी मरे

सु मिन

सु मिन, चीन

रोड ट्रिपर (भटकंती करणाऱ्या) आणि इन्फ्लुएन्सर

सु मिन वयाच्या 56 व्या वर्षी, अपमानास्पद वागणूक मिळणाऱ्या विवाहातून मुक्त होत चीनमध्ये एकट्यानं प्रवासाला निघाल्या. सोबत होती फक्त त्यांची कार, एक तंबू आणि त्यांचं पेन्शन.

2020 मध्ये सु यांनी कारनं भटकंती करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून त्या 20 प्रांतांमधील 100 हून शहरांमध्ये गेल्या आहेत.

त्यांनी आपल्या संपूर्ण प्रवासाचं दस्ताऐवजीकरण केलं आहे, त्याची नोंद ठेवली आहे. त्यांच्या या कहाणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या आयुष्यामुळे इतर मध्यमवयीन महिलांना प्रेरणा मिळाली आहे. या महिलांना अनेकदा समाजात 'आंटी' म्हटलं जातं. सु यांच्या जीवनातून प्रेरणा मिळाल्यानं त्या त्यांच्या सद्यस्थितीच्या विरोधात जाण्याचं धाडस करत आहेत.

त्यांचे सोशल मीडियावर साठ लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित 'लाईक अ रोलिंग स्टोन' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला आहे.

ऑलिव्हिया मॅकवेग

ऑलिव्हिया मॅकवेग, युके

मेक-अप आर्टिस्ट

अलोपेसियाचं निदान झाल्यानंतर ऑलिव्हिया मॅकवेग यांनी विगच्या दुनियेचा शोध घेण्यास सुरूवात केली. नवीन स्टाईल करून पाहणं आणि पर्यायी केसांवर प्रयोग करत त्यांनी ज्या महिला केसगळतीला तोंड देत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी एक ऑनलाइन व्यासपीठ तयार केलं.

त्यांचे जवळपास पाच लाख फॉलोअर्स आहेत. विग वापरणं ही एक सामान्य गोष्ट आहे यासाठी काम करताना त्यांनी अ‍ॅलोपेसिया आणि महिलांच्या आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली.

मॅकवेग या उत्तर आयर्लंडमधील मेक-अप आर्टिस्ट आणि इन्फ्लुएन्सर आहेत. किशोरवयातच त्यांचे केस गळण्यास सुरूवात झाली होती.

आता त्या विग संदर्भात कार्यशाळा घेतात आणि केसगळतीनंतर आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासंदर्भातील स्वत:च्या प्रवासाबद्दल सांगतात. यातून त्या ज्या महिलांना अ‍ॅलोपेसिया झालेल्या महिलांना एकत्र येण्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करतात आणि त्या स्थितीबद्दल बोलणं सहजसोपं करतात.

कणखरपणा हा असा मुकुट आहे जो आम्ही महिला परिधान करतो. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी, त्यानुसार बदलण्यासाठी आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणात प्रगती करण्यासाठी शिकण्यासाठी आम्ही कायमच सक्षम आहोत.

ऑलिव्हिया मॅकवेग

हेलेन मॉलीनेक्स

हेलेन मॉलीनेक्स, युके

सह-संस्थापक, मॉन्युमेंटल वेल्श विमेन

2021 पूर्वी वेल्समध्ये वेल्श महिलांसाठी समर्पित पुतळे नव्हते.

म्हणून मग, वकील असलेल्या हेलेन मोलीनेक्स यांनी मॉन्युमेंटल वेल्श वुमन या संस्थेची सह-स्थापना केली. ही एक स्वयंसेवी संस्था आहे. वेल्श महिलांचं सार्वजनिक प्रतिनिधित्व सुधारणं आणि त्यांचं योगदान आणि यश लोकांसमोर आणणं हा या संस्थेचा उद्देश आहे.

लोकांमधून आलेल्या सूचनांच्या आधारे, मोलीनेक्स आणि त्यांच्या टीमनं एकूण पाच महिलांचे पुतळे उभारण्याची योजना आखली. या महिलांचं आयुष्य विस्मरणात जाऊ नये यासाठी त्यांचे पुतळे उभारले जाणार होते.

या संस्थेनं आतापर्यंत चार पुतळे उभारले आहेत. यातील पहिला पुतळा वेल्सच्या पहिल्या कृष्णवर्णीय मुख्याध्यापिका बेट्टी कॅम्पबेल यांचा होता. उर्वरित तीन जणी म्हणजे माउंटन अ‍ॅशमधील एलेन मॉर्गन, लँग्रानॉगमधील क्रॅनोग्वेन आणि न्यूपोर्टमधील लेडी ऱ्होंडा.

हिंडा अब्दी मोहमूद

हिंडा अब्दी मोहमूद, सोमालिया

पत्रकार

हिंडा अब्दी मोहमूद या लहानपणापासून एक सृजनशील लेखिका आहेत. हिंडा या आपल्याजवळ एक डायरी ठेवत. हिंसाचारामुळे जेव्हा लोक जिगजिगातून हरगेसाला पळून जात होते तेव्हा त्यांनी त्या लोकांच्या गोष्टींची नोंद आपल्या डायरीत करुन ठेवली होती.

आता त्या देशातील पहिल्या आणि एकमेव संपूर्ण महिला टीम असणाऱ्या बिलान मीडियाच्या मुख्य संपादक आहेत.

सोमालियातील महिला कामाच्या ठिकाणी तोंड असलेल्या प्रचंड प्रमाणातील लिंगभेद आणि छळाचा सामना करण्यासाठी ही टीम तयार करण्यात आली होती. या आव्हानांची दखल संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालात घेण्यात आली आहे.

पत्रकारांसाठी जगातील सर्वाधिक धोकादायक देशांपैकी एक असलेल्या देशातील सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकणं हे बिलानचं उद्दिष्टं आहे. बिलान सोमालियातील नागरिक एचआयव्ही, अत्याचार झालेली अनाथ मुलं आणि पांढरी त्वचा, केस असलेले लोक ज्यांना समुदायानं बाजूला सारलं आहे अशांच्या कहाण्या मांडण्याचं काम बिलान करतं.

डिलोरोम युल्डोशेवा

डिलोरोम युल्डोशेवा, उझबेकिस्तान

शिवणकाम करणाऱ्या आणि महिला व्यावसायिक

दोन वर्षांपूर्वी कापणी करताना झालेल्या अपघातात दिलोरोम युल्डोशेवा यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले. मात्र त्यामुळे त्या हताश झाल्या नाहीत आणि त्यांनी मोठी स्वप्नं पाहणं थांबवलं नाही.

त्यांना नवीन कौशल्य शिकायची होती तसंच तरुण उझबेक महिलांना उदरनिर्वाह चालवण्यासाठी मदत करायची होती. म्हणूनच त्यांनी स्वत:चाच शिवणकामाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी त्या उद्योजकता आणि संसाधनांचं व्यवस्थापन यातील मूलभूत गोष्टी शिकल्या. त्यानंतर त्यांनी 40 हून अधिक जणांना प्रशिक्षण दिलं. काही महिन्यातच त्यांच्या कंपनीची चांगली वाढ झाली. त्यांची कंपनी मोफत कार्यशाळा चालवते आणि कामगार, शाळेचे विद्यार्थी यांच्यासाठी गणवेश तयार करण्याची कंत्राटं मिळवून हे काम करते.

त्यांचा व्यवसाय हा त्यांच्यासाठी आणि इतर अनेक महिलांसाठी उत्पन्नाचं साधन बनला आहे.

इडानिया डेल रियो

इडानिया डेल रियो, क्युबा

फॅशन व्यावसायिक

क्लॅन्डेस्टिना हा क्युबामधील पहिला स्वतंत्र फॅशन ब्रँड असून ते जगभरातील बाजारपेठेत ऑनलाइन कपडे विकतात. इडानिया डेल रियो या कंपनीच्या सह-संस्थापक आहेत.

जेव्हा राष्ट्राध्यक्ष राउल कॅस्ट्रो यांनी स्वतंत्र व्यापार आणि उद्योगावरची बंधनं शिथिल केली तेव्हा या कंपनीचा जन्म झाला.

हवानामध्ये ही कंपनी असून डिजायनर्स टीममध्ये बहुतांश महिला आहेत. या उत्पादनातून क्युबन संस्कृतीचं दर्शन घडतं. या बेटावरील सर्जनशीलतेचा गौरव करण्याचा या ब्रँडचा उद्देश आहे. कंपनीच्या उत्पादन साखळीचा विकास करणं आणि शाश्वत मूल्यं अंगीकारण्यात डेल रियो यांचा मोठा वाटा आहे.

त्यांनी हवाना इन्स्टिट्यूट ऑफ डिजाइन (ISDI) मधून पदवी घेतली असून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याआधी विविध गॅलरी, थिएटर्स आणि फेस्टिव्हलसाठी पोस्टर तयार केली आहेत

लेस्ली लोक्को

लेस्ली लोक्को, घाना/युके

वास्तुविशारद

स्थापत्यशास्त्राचे लोकशाहीकरण करण्यासाठी'च्या आपल्या कार्यामुळं लेस्ली लोक्को यांना 'रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स' 2024चं सुवर्णपदक मिळालं आहे. स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रातील हा जगातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे. 1848 मध्ये या संस्थेची स्थापना झाल्यापासून हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला बनल्या आहेत.

गेल्या दोन दशकांमध्ये त्यांनी कमी-प्रतिनिधित्व असलेल्या लोकांना या क्षेत्रात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या घाना-स्कॉटिश वास्तुविशारद पहिल्या आफ्रिकन वंशाच्या महिला बनल्या ज्यांनी व्हेनिस बिन्रकल ऑफ आर्किटेक्चरचं (वास्तुशास्त्राचं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन) सादरीकरण केलं. तिथे त्यांनी डिकार्बनायझेशन आणि डिकॉलॉनायझेशनच्या थीमवर लक्ष केंद्रित केलं होतं.

त्या आफ्रिकन फ्युचर्स इन्सिट्यूट इन अक्रा या संस्थेच्या संस्थापक आहेत. ही संस्था स्थापत्यशास्त्र, ओळख आणि वंश यातील नातं उलगडण्यावर काम करते.

कणखरपणा म्हणजे दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर टिकून राहण्याची क्षमता - अगदी उदासीनता असतानादेखील. कारण उदासीनतेला तोंड देणं हे अनेकदा विरोधाला तोंड देण्यापेक्षा कठीण असतं.

लेस्ली लोक्को

पूजा शर्मा

पूजा शर्मा, भारत

बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या

गेल्या तीन वर्षांपासून पूजा शर्मा दिल्लीत बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार पार पाडत आहेत.

हे काम करण्याची प्रेरणा त्यांना स्वत:च्या अनुभवातून मिळाली आहे. त्यांचा भाऊ मारला गेल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करायला कोणीही पुढं आलं नाही, अशा वेळी त्यांनी स्वत: आपल्या भावावर अंत्यसंस्कार केले होते.

पूजा शर्मा यांना या कामात पुरोहित वर्ग आणि त्यांच्या समुदायाकडून विरोधाला तोंड द्यावं लागलं. कारण पारंपरिकदृष्ट्या हिंदू धर्मात अंत्यसंस्काराचं काम पुरुष करतात.

विरोध होत असूनदेखील, पूजा यांनी विविध धर्माच्या 4,000 हून लोकांवर अंत्यसंस्कार पार पाडले आहेत. त्या सोशल मीडियावर त्यांच्या कामाची माहिती देत असतात. प्रत्येकाला मृत्यूनंतर जो सन्मान मिळायला हवा तो देण्यासाठीचं कार्य त्या करत आहेत.

हरबिया अल हिमियारी

हरबिया अल हिमियारी, येमेन

वारसा संवर्धन इंजिनीयर

येमेनमध्ये अनेक वर्षांच्या युद्धांमुळे तिथल्या ऐतिहासिक महत्त्व अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे इंजिनीयर हरबिया अल हिमियारी यांनी या इमारतींचं संवर्धन करून त्यांच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेला सुरूवात केली.

यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्कोसारख्या इतर संस्थाबरोबर भागीदारी केली. त्यांनी जुन्या साना आणि देशभरातील डझनभर निवासी आणि वारसा इमारतींची पुनर्उभारणी केली. युनेस्कोनं 16,000 हून अधिक ठिकाणी झालेल्या नुकसानीचं सर्व्हेक्षण केलं आहे.

वारसा स्थळ किंवा इमारतींच्या संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यामुळे ऐतिहासिक स्थळांचं फक्त जतनच झालेलं नाही, तर अनेकांचं जीवनमान देखील उंचावलं आहे.

अल हिमियारी यांनी स्थानिक रहिवाशांना पारंपरिक बांधकाम कौशल्य, कलाकुसरीचं प्रशिक्षण दिलं आहे. त्याचबरोबर तरुण मुलींना या क्षेत्रात येण्यासाठी प्रेरित केलं आहे.

मारिया टेरेसा हॉर्टा

मारिया टेरेसा हॉर्टा, पोर्तुगाल

कवयित्री

लेखिका आणि पत्रकार असलेल्या मारिया टेरेसा हॉर्टा या पोर्तुगालमधील सर्वांत महत्त्वाच्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. मात्र कदाचित त्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकास पात्र ठरलेल्या नोवास कार्तास पोर्तुगेसास (नवीन पोर्तुगीज पत्रं) या साहित्यकृतीच्या सह-लेखिका म्हणून अधिक परिचित आहेत.

या काल्पनिक, कविता आणि लैंगिकतेशी निगडित संग्रहावर पोर्तुगालच्या हुकूमशाही सरकारनं 1972 मध्ये लगेचच बंदी घातली होती. हॉर्टा आणि त्यांचे सह-लेखक यांच्यावर अश्लीलता आणि "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याबद्दल" खटला चालवण्यात आला होता.

थ्री मारियाजचं प्रकरण या नावानं ते ओळखलं जाऊ लागलं. वृत्तपत्रात त्याचे मथळे झाले आणि त्यातून जगभरात निदर्शनं झाली.

1974 मध्ये कार्नेशन क्रांतीमुळे राजवटीत बदल झाल्यानंतर हा खटला संपला. यावर्षी या त्या ऐतिहासिक क्षणाला 50 वर्षे होत आहेत.

मार्गारिटा बारिएंटोस

मार्गारिटा बारिएंटोस, अर्जेंटिना

अनाट हफ्म्यान

सूप किचनमध्ये मोफत किंवा अल्पदरात गरिबांसाठी अन्न उपलब्ध करून दिलं जातं. फक्त 15 लोकांसाठी म्हणून सूप किचनची सुरूवात करण्यात आली होती. ते आता दररोज 5,000 हून अधिक लोकांना अन्न पुरवतं आहे. मार्गारिटा बारिएंटोस या अर्जेंटिनात भूकेविरुद्धच्या त्यांच्या लढ्यासाठीच्या कटिबद्धतेसाठी परिचित आहेत. अर्जेंटिनात सध्या 4.6 कोटी म्हणजे 56 टक्के लोकसंख्या दारिद्र्यात जगते आहे.

मार्गारिटा यांचा जन्म अर्जेंटिनातील सर्वात गरीब प्रदेशात झाला. लहानपणी त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला. 1996 मध्ये त्यांनी लोस पिलेटोन्स या सूप किचनची स्थापना केली. पुढे त्याचं रूपांतर एका फाऊंडेशनमध्ये झालं आणि आता ते एक डेकेअर सेंटर, आरोग्य केंद्र, शिवणकामाची कार्यशाळा आणि ग्रंथालय चालवतं.

मार्गारिटा यांच्या समाजसेवेसाठी अनेक व्यवसाय आणि ख्यातनाम व्यक्तींनी मदत केली. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने अलीकडेच त्यांना स्वत:ची स्वाक्षरी केलेला एक शर्ट लिलाव करण्यासाठी दिला.

अनट हॉफमन

अनट हॉफमन, इस्रायल

धर्म प्रचारक

अनट हॉफमन यांनी ज्यू धर्मात लैंगिक समानता आणि बहुधार्मिकता असावी यासाठी अनेक दशकं प्रचार केला आहे.

विमेन ऑफ द वॉल या ग्रुपच्या त्या संस्थापक सदस्य आहेत. हा ग्रुप जुन्या जेरुसलेम शहरातील वेस्टर्न वॉल इथं ज्यू महिलांसाठी प्रार्थनेच्या समान अधिकारांची मागणी करतो. गेल्या काही वर्षांपासून अनट यांनी महिलांना प्रार्थना करतानाची शाल परिधान करण्यास आणि तोराहचं सामूहिक वाचन करण्यास प्रतिबंध करणाऱ्या नियमांविरुद्ध लढा दिला आहे.

हॉफमन यांनी इस्रायल रिलिजिअस अ‍ॅक्शन सेंटरच्या कार्यकारी संचालक म्हणून देखील 20 वर्षे काम केलं आहे. सुधारणावादी चळवळीची ही कायदेशीर शाखा आहे. ती समानता आणि सामाजिक न्यायाला चालना देण्यासाठी काम करते.

त्यापूर्वी, अनट या जेरुसलेम सिटी कौन्सिलमध्येही होत्या. तिथे त्यांनी अती पुराणमतवादी धोरणांना आव्हान दिलं होतं.

मनोरंजन आणि खेळ

नोएला वियाला न्वादेई

नोएला वियाला न्वादेई , घाना

अफ्रो-पॉप म्युझिशियन

गायिका आणि गीतकार नोएला वियाला न्वादेई या 'वियाला' याच नावाने सर्वपरिचित आहेत. सिसला भाषेत वियाला म्हणजे 'कर्ता' किंवा काम करणारी व्यक्ती.

फॅशन आणि युनिक स्टाइलसाठी त्या ओळखल्या जातात. या कलाकार स्टेजवरचे त्यांचे कपडे आणि दागिने स्वत: डिझाइन करतात. या माध्यमातून त्यांचं घर असलेल्या उत्तर घानामधील परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करतात.

त्यांच्या अनेक गीतांमधून त्या आफ्रिकेतील स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या छळाचं दर्शन घडवतात. बालविवाह रोखण्यासाठी त्या घाना प्रशासन आणि संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांबरोबर काम केलं आहे.

फुन्सी या त्यांच्या मूळ गावी त्यांनी एक कला केंद्र, रेडिओ स्टेशन आणि रेस्टॉरंट बांधलं आहे. या माध्यमातून त्या रोजगार आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात.

हेंड सब्री

हेंड सब्री , ट्युनिशिया

अभिनेत्री

अभिनेत्री हेंड सब्री या अरब सिनेमामधील एक अतिशय प्रसिद्ध महिला आहेत. 'सायलेन्सेस ऑफ द पॅलेस' (1994) या स्त्रीवादी चित्रपटातील त्यांच्या भूमिकेमुळे ट्युनिशियातील स्त्रियांचा लैंगिक आणि सामाजिक छळ उजेडात आला होता.

2019 मध्ये झालेल्या वेनिस चित्रपट महोत्सवात परीक्षक झालेल्या त्या पहिल्या अरब महिला होत्या.

त्यांची मुख्य भूमिका असलेला ओल्फाज डॉटर्स या चित्रपटाने 2024 च्या ऑस्कर्सच्या शर्यतीत सर्वोत्कृष्ट महितीपट म्हणून स्थान मिळवलं.

नोव्हेंबर महिन्यात सब्री यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदिच्छादूत या पदाचा राजीनामा दिला. गाझामध्ये कुपोषणाचा युद्धातील शस्त्र म्हणून वापर करण्यात आला असा त्यांचा आरोप होता.

फक्त कसंतरी बचाव करणं महत्त्वाचं नाही. युद्धातून पुनर्निर्मिती आणि काहीतरी उद्देश शोधणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे वेदनेचं कृतीत रूपांतर होणंही महत्त्वाचं आहे.

हेंड सब्री

इन्ना मोदजा

इन्ना मोदजा , माली

कलाकार आणि हवामान बदलासंदर्भात काम करणाऱ्या कार्यकर्त्या (क्लायमेट अ‍ॅडव्होकेट)

क्लायमेट जस्टिस अ‍ॅडव्होकेट (ज्यांच्यामुळे हवामान बदलाचं संकट निर्माण झालं त्यांनी हवामान बदलाचा परिणाम ज्यांच्यावर झाला आहे त्यांना मदत करावी अशी भूमिका मांडणारे), संगीतकार आणि फिल्म मेकर इन्ना मोदजा यांनी अनेक आव्हानं पेलली आहेत. त्यात महिलांच्या खतनाविरुद्ध चळवळ ते शाश्वतेचा पुरस्कार यांचा समावेश आहे.

त्यांनी द ग्रेट ग्रीन वॉल या माहितीपटाची निर्मिती केली आहे आणि कामही केलं आहे. त्यात वाळवंटाचा विस्तार रोखण्याचे आफ्रिकेचे महत्त्वाकांक्षी प्रयत्न, साहेल येथील निकृष्ट जमिनीचं पुनरुज्जीवीकरण, हे प्रश्न त्यात मांडले आहेत. साहेल हा भाग सहारा वाळवंटाच्या दक्षिणेला असून त्याचा विस्तार पूर्वेपासून पश्चिमेकडे 12 देशांमध्ये झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरणाच्या विरोधातील उपक्रमाच्या त्या सदिच्छादूत आहेत. हवामान बदलाच्या संकटामुळे ज्या समुदायांवर परिणाम झाला आहे. त्यांचा आवाज जगापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या करतात.

तसंच त्या कोड ग्रीन नॉन-प्रॉफिट संघटनेच्या सहसंस्थापक आहेत. सकारात्मक कृतीसाठी तंत्रज्ञान आणि गेमिंग यांचा मेळ साधण्याचं काम ही संस्था करते.

कणखरपणा म्हणजे बदल घडवण्यासाठी मुली आणि स्त्रिया यांची क्षमता अधिकाधिक वाढवणं आहे.

इन्ना मोदजा

रेबेका अँड्रेड

रेबेका अँड्रेड , ब्राझील

जिम्नॅस्ट

जिम्नॅस्ट रेबेका अँड्रेड यांनी एकूण सहा पदकं जिंकली असून त्या ब्राझीलमधील सर्वांत प्रतिष्ठित ऑलिंपिकपटू आहेत. (त्यांनी नऊ जागतिक विजेतपदंही जिंकली आहेत)

2024 पॅरिस ऑलिंपिकमध्ये फ्लोअर एक्सरसाइज या प्रकारात त्यांनी जगातील सर्वोच्च जिम्नॅस्ट सिमॉन बाईल्स यांचा पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. पदक वितरण समारंभात बाईल्स आणि अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्डन चाईल्स रेबेका यांच्यासमोर नतमस्तक झाल्या. हे दृश्य व्हायरल झालं आणि यावर्षीच्या ऑलिंपिकचं प्रतीक ठरलं.

अँड्रेड यांना सात भावंंडं आहेत. वयाच्या 10 व्या वर्षापर्यंत त्या साओ पाओलोच्या बाहेर असलेल्या झोपडपट्टीतून त्या सरावसत्रासाठी जात असत. त्यांची आई या एकल पालक होत्या. अँड्रेड यांच्या प्रशिक्षणाचे पैसे भरण्यासाठी त्या लोकांच्या घरी साफसफाईचं काम करायची.

अनेक गंभीर दुखापतींना तोंड देत त्यांनी हा टप्पा गाठला आहे. मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याबद्दल त्या नेहमीच खुलेपणाने बोलत असतात.

आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींना आपण कसं हाताळतो आणि परिस्थिती वाईट असतानादेखील चांगली बाजू पाहण्यसाठी माझ्या सहकाऱ्यांना मदत करणं, हाच चिकाटी, कणखरपणाचा खरा अर्थ आहे.

रेबेका अँड्रेड

शेरॉन स्टोन

शेरॉन स्टोन , अमेरिका

अभिनेत्री

हॉलिवूड अभिनेत्री शेरॉन स्टोन यांनी गेल्या तीन दशकांपासून पडद्यावर आणि पडद्याबाहेरच्या जगात आपली छाप सोडली आहे.

1990 च्या दशकात बेसिक इंस्टिंक्ट, टोटल रिकॉल आणि कसिनो या सुपरहिट चित्रपटांमुळे त्या प्रकाशझोतात आल्या. त्यातल्या एकासाठी त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आणि एकासाठी ऑस्कर नामांकन मिळालं.

अभिनयाबरोबर त्यांनी विविध प्रश्न हाताळत सामाजिक क्षेत्रातही काम केलं आहे. एचआयव्ही बाधित लोकांसाठी केलेल्या कार्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित लोकांनी त्यांचा नोबेल पीस समिट अवॉर्ड देऊन गौरव केला होता.

यावर्षीच्या सुरुवातीलाच त्यांना गोल्डन ग्लोब इंटरनॅशनल आयकॉन पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे त्यांच्या गौरवात आणखी भर पडली.

आपण एकतर रडत बसू शकतो किंवा आनंद शोधू शकतो. मला वाटतं की तुम्ही कायम आनंद शोधत रहायला हवा. खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहायला हवं.

शेरॉन स्टोन

किम येजी

किम येजी , दक्षिण कोरिया

ऑलिंपिक शूटर

खेळातील यश आणि मंत्रमुग्धता यामुळे किम येजी यांनी जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं.

पिस्टल शूटर असलेल्या किम यांनी जुलैमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला होता. त्यात महिलांच्या 10 मी एअर पिस्टलमध्ये त्यांनी रौप्यपदक पटकावलं. काही महिन्यांआधी 25 मी स्पर्धेत त्यांनी विश्वविक्रम केला होता.

लवकरच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते. त्यात फक्त त्यांच्या कौशल्याची स्तुती करण्यात आली नव्हती तर त्यांची शांत स्वभाव, अभेद्य एकाग्रता आणि साय-फाय लूक आणि अचूकतेमध्ये मदत करणाऱ्या त्यांच्या विशेष चष्म्याचंही कौतुक झालं होतं.

आई झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांकडे त्या कसं पाहतात याबद्दल किम खुलेपणाने बोलतात. आपल्या सहा वर्षाच्या मुलीबरोबर वेळ घालवता यावा यासाठी त्या खेळातून ब्रेक घेत आहेत.

खेळातून चिकाटी, कणखरपणा, सांघिकवृत्ती, आणि जिद्द दिसते. ही मूल्यं खेळाच्या मैदानाबाहेर जाऊन समाजात मोठा बदल घडवण्यासाठी प्रेरणा देतात.

किम येजी

रेय

रेय , यूके

गायिका

गायिका आणि गीतकार रेय यांनी यावर्षीच्या ब्रिट पुरस्कारांमध्ये इतिहास घडवला असून नामांकन मिळालेल्या सातपैकी सहा पुरस्कार त्यांनी जिंकले आहेत. हे पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला गीतकार ठरल्या आहेत.

2021 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं की त्या पॉलिडोर या त्यांच्या रेकॉर्ड लेबल कंपनीबरोबर अल्बम प्रकाशित करण्यासाठी कायदेशीर संघर्ष करत आहेत.

त्यांनी माय ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी ब्ल्यूज नावाचा पहिलावहिला स्टुडिओ अल्बम स्वतंत्र कलाकार म्हणून 2023 मध्ये सादर केला. समीक्षकांनी त्याची स्तुती केली आणि आर्थिक पातळीवर देखील तो यशस्वी झाला.

संगीतक्षेत्रातील आणि बाहेरच्या जगातील संघर्षाबद्दल त्या खुलेपणाने बोलल्या आहेत. त्यात लैंगिक अत्याचार, ड्रग्स आणि शरीराबद्दलच्या अवास्तव कल्पना या मुद्द्यांचा समावेश आहे. तसंच गीतकारांना योग्य मानधन मिळावं यासाठी त्यांनी आग्रह धरला.

ट्रेसी ओट्टो

ट्रेसी ओट्टो, अमेरिका

तिरंदाज

ट्रेसी ओट्टो यांच्यावर 2019 मध्ये त्यांच्या माजी प्रियकरानं त्यांच्या घरी हल्ला केला होता. या हल्ल्यात ट्रेसी यांना डाव्या बाजूला छातीपासून खाली अर्धांगवायू झाला तसंच डावा डोळा देखील गमवावा लागला. त्याआधी त्या फिटनेस मॉडेल म्हणून करियर करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. इतक्या भयंकर प्रसंगातून जाऊन देखील त्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा निर्धार केला होता.

मार्च 2021 मध्ये ओट्टो यांनी एका अशा खेळाची निवड केली जो खेळ त्या त्यापूर्वी कधीही खेळल्या नव्हत्या. तो खेळ म्हणजे तिरंदाजी. त्यांनी मारलेला पहिला बाण निशाण्यावर जाऊन लागला आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

यावर्षी, ओट्टो यांनी पॅरिस पॅरालिंपिक गेम्समध्ये भाग घेतला. ही त्यांची पहिलीच पॅरालिंपिक स्पर्धा होती. त्यांच्या अपंगत्वामुळे त्या बाण सोडण्यासाठी तोंडाचा वापर करतात.

हल्ल्याच्या जवळपास पाच वर्षांनंतर ट्रेसी ओट्टो त्यांच्या अनुभवांचा उपयोग कौटुंबिक हिंसाचाराच्या पीडितांसाठी करत आहेत.

हदीका कियानी

हदीका कियानी, पाकिस्तान

गायिका आणि गीतकार

हदीका कियानी या पाकिस्तानच्या संगीत विश्वातील एक आयकॉन आहेत. त्या वैविध्यपूर्ण गायन आणि मानवतावादी कार्यासाठी परिचित आहेत.

1990 च्या दशकात त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्या दक्षिण आशियातील महिला पॉप संगीत विश्वातील एक महत्त्वाच्या कलाकार झाल्या. त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाच्या सदिच्छा दूत देखील झाल्या.

2022 मध्ये पाकिस्तान विनाशकारी पूर आला होते. त्यावेळेस कियानी यांनी त्याचा वसीला-ए-राह हा प्रकल्प सुरू केला होता. हा प्रकल्प बलुचिस्तान आणि दक्षिण पंजाबातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी समर्पित होता.

विस्थापित झालेल्या कुटुंबाना मदत करण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं होतं. गेल्या वर्षी या प्रकल्पानं जाहीर केलं की त्यांनी पूरग्रस्त भागात 370 घरं आणि इतर सुविधा बांधल्या आहेत.

फिरदा मर्स्या कुर्निया

फिरदा मर्स्या कुर्निया, इंडोनेशिया

हेवी मेटल संगीतकार

फिरदा मर्स्या कुर्निया या लिंगाविषयीच्या आणि धार्मिक नियमांना आव्हान देण्याचं काम करतात. त्या व्हॉईस ऑफ बेसप्रॉट या सर्व महिला वादक असलेल्या, हिजाब परिधान करणाऱ्या हेवी मेटल बँडमधील प्रमुख गायिका आणि गिटारवादक आहेत.

इंडोनेशियात इंग्रजी आणि सुदानीज भाषा सर्वाधिक बोलली जाते. या भाषांमधील गीतांमधून या तिघीं पितृसत्तेबद्दलचं त्यांचं नैराश्य व्यक्त करतात.

अधिक पुराणमतवादी असलेल्या मुस्लिमांकडून याला विरोध आहे. त्यांनी हेवी मेटल बँडला चांगला प्रतिसाद दिला नाही.

मात्र 10 वर्षांपूर्वी पश्चिम जावात असणाऱ्या गरूत या त्यांच्या गावातील शाळेत सुरू झालेल्या या बँडनं बराच मोठा पल्ला गाठला आहे. यावर्षी त्यांनी ग्लास्टनबरी इथे त्यांचं संगीत सादर केलं. या संगीत महोत्सवाच्या 54 वर्षांच्या इतिहासात सादरीकरण करणारा हा पहिलाच इंडोनेशियन बँड होता.

झाकिया खुदादादी

झाकिया खुदादादी, अफगाणिस्तान

तायक्वांडो पॅरालिंपियन

झाकिया खुदादादी या पदक जिंकणाऱ्या पॅरालिंपिक रेफ्युजी टीमच्या पहिल्या सदस्य आहेत. त्यांनी 2024 पॅरिस गेम्समध्ये पदक जिंकून इतिहास घडवला होता.

त्यांना जन्मत:च कोपरापासून एक हात नाही. मात्र तरीदेखील वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात या त्यांच्या मूळ गावी असणाऱ्या एका छुप्या जिममध्ये गुप्तपणे तायक्वांडोचा सराव करण्यात सुरूवात केली होती.

2021 मध्ये तालिबान सत्तेत परतल्यावर त्यांना टोकियोतील त्यांच्या पहिल्याच पॅरालिंपिक्समध्ये भाग घेण्याची संधी सुरूवातीला नाकारण्यात आली होती.

मात्र आंतरराष्ट्रीय पॅरालिंपिक समितीच्या हस्तक्षेपामुळे आणि फ्रान्सच्या पाठिंब्यामुळे त्यांना अफगाणिस्तानातून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तालिबानची सत्ता आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाऱ्या त्या पहिल्या अफगाण खेळाडू ठरल्या.

ऑलिंपिक पदकासाठीचा माझा प्रवास अफगाण महिला, निर्वासित महिला, प्रत्येक महिलेच्या कणखरपणाच्या सामर्थ्याबद्दल बोलतो. हार न मानता आम्ही वाटचाल करत हे दाखवून देत आहात की महिला करू शकत नाहीत असं काहीही नाही.

झाकिया खुदादादी

क्लो झाओ

क्लो झाओ, युके

चित्रपट दिग्दर्शक

ऑस्कर-विजेत्या चित्रपट दिग्दर्शक आणि लेखिका क्लो झाओ या पहिल्या बिगर श्वेतवर्णीय महिला आहेत आणि इतिहासातील तीन पैकी एक महिला आहेत ज्यांना अकादमीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.

बीजिंगमध्ये जन्मलेल्या झाओ नंतर युके आणि अमेरिकेत गेल्या. त्या स्वत:चं वर्णन भटक्या म्हणून करतात. हीच संकल्पना, नोमॅडलँड (2020) या त्यांच्या पुरस्कार-विजेत्या चित्रपटात देखील मांडण्यात आली आहे.

आपल्या सुरूवातीच्या चित्रपटांमध्ये स्थानिक समुदायाचं प्रतिनिधित्व करण्यापासून ते मार्व्हल युनिव्हर्समध्ये सर्वाधिक वैविध्यपूर्ण कलाकारांचं दिग्दर्शन करण्यापर्यंत झाओ यांना माणूस म्हणून आपल्याला जोडणाऱ्या गोष्टींबद्दल खूपच उत्कट किंवा तीव्र भावना आहेत.

यावर्षी त्या मॅगी ओफेरेल यांच्या शेक्सपियरच्या काळातील हॅम्नेट या गाजलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सध्या आम्ही ज्या उद्योगात काम करत आहोत त्या उद्योगाची रचना जर आपण बदलली नाही, आपण फक्त इतकंच म्हणतो आहोत की आमचं महत्त्व असण्यासाठी आम्हाला पुरुषांसारखं असण्याची आवश्यकता आहे. मात्र तीच आपली ताकद आहे असं मला वाटत नाही.

क्लो झाओ

झियिंग (तानिया) झेंग

झियिंग (तानिया) झेंग, चिली

टेबल टेनिस खेळाडू

झियिंग झेंग किंवा तानिया या चिनी-चिलियन टेबल टेनिस खेळाडू आहेत. त्यांनी 2024 पॅरिस गेम्समध्ये वयाच्या 58 व्या वर्षी ऑलिंपिकमध्ये पदार्पण केलं.

याला बराच काळ लोटला होता: आईबरोबर प्रशिक्षक म्हणून, त्या वयाच्या 12 व्या वर्षी व्यावसायिक बनल्या. त्या चीनच्या राष्ट्रीय संघासाठी पात्र ठरल्या. मात्र नंतर त्या चिलीला गेल्या. तिथे त्या त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी 30 वर्षे या खेळापासून दूर राहिल्या.

कोरोनाच्या संकटात तानिया झेंग पुन्हा टेबल टेनिसच्या खेळाकडे वळल्या.

2023 पर्यंत त्या चिलीमधील या खेळातील सर्वोच्च मानांकनाच्या महिला होत्या. ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याचं आयुष्यभर जपलेलं स्वप्न पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप आणि पॅन अमेरिकन गेम्स या स्पर्धांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं.

मॅडिसन टेव्हलिन

मॅडिसन टेव्हलिन, कॅनडा

टॉक-शो च्या सादरकर्त्या आणि मॉडेल

यावर्षी अ‍ॅझ्युम दॅन आय कॅन या मोहिमेत अभिनय केल्यावर मॅडिसन टेव्हलिन यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि त्यानं जगभरात वेड लावलं. या व्हीडिओनं लोकांचे डाऊन्स सिंड्रोम (एक जास्तीचं गुणसूत्र असण्याचा आजार) बद्दलचे पूर्वग्रह मोडून काढले.

जागरुकता निर्माण करण्यासाठीच्या या मोहिमेला 15 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. तसंच त्याच्या सकारात्मक प्रभावाबद्दल त्याला कान लायन्स फेस्टिवलमध्ये प्रतिष्ठित गोल्ड लायन पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले.

अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या टेव्हलिन यांनी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये देखील भाग घेतला आहे. त्या क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हमध्ये समावेशावर बोलल्या आहेत. तसंच त्यांना क्विन्सी जोन्स एक्ससेप्शनल अ‍ॅडव्होकसी पुरस्कार देखील मिळाला आहे.

हू डू यू थिंक आय अ‍ॅम'? या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या टॉक-शो चं त्यांनी सादरीकरण केलं आहे. तसंच 21क्वेशन्स या पॉडकास्टदेखील सादरीकरण केलं आहे.

कणखरपणा म्हणजे कधीही हार न मानणं, अगदी मला कमी लेखलं गेलं किंवा दुर्लक्षित केलं गेलं किंवा टीका केली गेली तरीही...मला जे वाटतं आहे त्यासाठीचं उभं राहणं आणि स्वत:साठी किंवा माझ्या समुदायासाठी लढताना कधीही हार न मारणं.

मॅडिसन टेव्हलिन

अ‍ॅलिसन फेलिक्स

अ‍ॅलिसन फेलिक्स, अमेरिका

ट्रॅक आणि फिल्ड अ‍ॅथलीट

अ‍ॅलिसन फेलिक्स यांच्या नावावर विक्रमी 20 जागतिक चॅम्पियनशिप पदकं आणि 11 ऑलिंपिक पदकं असून त्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ट्रॅक आणि फील्ड अ‍ॅथलीट आहेत.

प्री-एक्लॅम्पसिया झाल्यानंतर आणि आपल्या मुलीला अकाली जन्म दिल्यानंतर, मातेच्या आरोग्यासंदर्भातील हक्कांसाठीच्या एक आक्रमक पाठीराख्या बनल्या आहेत. त्यांना आता अमेरिकेतील कृष्णवर्णीय मातांच्या आरोग्यसेवेसंदर्भात काम करण्यासाठी मेलिंडा फ्रेंच गेट्स यांच्याकडून 2 कोटी डॉलर्सचं अनुदान मिळालं आहे.

त्या खेळातून निवृत्त झाल्या आहेत. पॅरिस 2024 खेळांमध्ये पहिल्या ऑलिंपिक व्हिलेज नर्सरीच्या उद्घाटनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

त्याचबरोबर यावर्षी, त्यांची निवड आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती अ‍ॅथलीटच्या आयोगामध्ये झाली, तसंच त्यांनी फक्त महिलांच्या खेळांवर लक्ष केंद्रित करणारी स्वत:ची क्रीडा व्यवस्थापन कंपनी देखील लाँच केली.

कणखरपणा म्हणजे कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी लागणारं सामर्थ्य आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या अपयशाचा वापर संधी म्हणून करणे.

अ‍ॅलिसन फेलिक्स

विनेश फोगाट

विनेश फोगाट, भारत

कुस्तीपटू

तीन वेळा ऑलिंपिक भाग घेतलेल्या विनेश फोगाट या भारतातील सर्वाधिक यशस्वी कुस्तीपटूंपैकी एक आहे. तसंच त्या महिला क्रीडापटूंबद्दलच्या लैंगिक दृष्टीकोनासंदर्भात प्रखरपणे भूमिका मांडतात. त्यांनी जागतिक चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये पदकं जिंकली आहेत.

यावर्षी विनेश फोगाट ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला कुस्तीपटू ठरल्या. मात्र सामना खेळण्यासाठी आवश्यक असणारं वजन राखण्यात अपयश आल्यानं त्या खेळण्यास अपात्र ठरल्या. नंतर त्यांनी खेळातून निवृत्ती घेतली आणि राजकारणात प्रवेश केला.

लिंगभेदाबद्दल स्पष्टपणे बोलणाऱ्या विनेश फोगाट, भारताच्या कुस्ती फेडरेशनचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कित्येक महिने चाललेल्या निदर्शनांचा चेहरा बनल्या होत्या. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला खेळाडूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. मात्र त्यांनी हा आरोप फेटाळला होता.

निदर्शनाच्या वेळेस पोलिसांनी विनेश फोगाट आणि इतरांना ताब्यात घेतल्यावर त्याची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली होती.

कामाच्या एखाद्या खराब दिवसानंतर पुन्हा स्वत:ला झोकून देण्याची आणि स्वत:ला सावरून पुढे जाण्याची क्षमता म्हणजे कणखरपणा.

विनेश फोगाट

जोन चेलिमो मेली

जोन चेलिमो मेली, केनिया/रोमानिया

लांब पल्ल्याची धावपटू

लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमधील यशासाठी केनियात जन्मलेल्या रोमानियन ऑलिंपियन जोन चेलिमो ओळखल्या जातात. जोन यांनी या वर्षी युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये अर्ध्या मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक जिंकलं.

खेळापलीकडील त्यांची ओळख म्हणजे त्या लिंगभेदावर आधारित हिंसाचाराच्या पीडिता आहेत. आपल्या वैयक्तिक अनुभवाचा वापर करून त्या अ‍ॅथलिट्सना वारंवार तोंड द्यावं लागत असलेल्या धोक्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करतात.

टायरोप्स एंजेल्स या केनियातील अ‍ॅथलिट्सच्या संघटनेच्या त्या सह-संस्थापक आहेत. त्यांची सहकारी आणि विश्वविक्रमी धावपटू अ‍ॅग्नेस टायरोप यांची 2021 मध्ये हत्या झाल्यानंतर त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती. ही संस्था लिंगभेदावर आधारित हिंसाचाराविरोधात विविध कार्यक्रम, कृतींद्वारे काम करते.

यावर्षी ऑलिंपिक धावपटू रेबेका चेप्टेगी यांची त्यांच्या पूर्व प्रियकराने केलेल्या हत्येमुळे केनियात होणाऱ्या महिलांच्या हत्येविरोधात कारवाई करण्यासाठीच्या मागणीनं जोर पकडला.

मला वाटतं की आपली वेदना हा काही आपल्या आयुष्याचा शेवट नाही, तर एखाद्या मोठ्या गोष्टीची ती सुरूवात असते, हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हाच खऱ्या बदलाची सुरूवात होते.

जोन चेलिमो मेली

गॅबी मोरेनो

गॅबी मोरेनो, ग्वाटेमाला

संगीतकार

गॅबी मोरेनो या लॅटिन संगीताच्या क्षेत्रातील नामांकित गायिका-गीतकार आहेत. 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट लॅटिन पॉप अल्बमसाठीचा ग्रॅमी पुरस्कार जिंकून त्या या क्षेत्रातील मुख्य प्रवाहात आल्या.

त्यांचं संगीत दोन भाषांमध्ये आहे आणि अमेरिकाना, सोल आणि लॅटिन लोककलेचा प्रभाव त्यावर आहे. त्यांच्या संगीतातून आणि भावस्पर्शी आवाजातून त्यांचा समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतिबिंब दिसतं.

युनिसेफच्या सदिच्छा दूत बनणाऱ्या, मोरेनो या ग्वाटेमालेतील पहिल्या व्यक्ती आहेत. त्या बाल हक्क चळवळीच्या समर्थक आहेत.

दर्जेदार शैक्षणिक किट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांनी अलीकडेच एक मोहीम सुरू केली. ग्वाटेमालामध्ये 27 लाख मुलं आणि मुली शालेय शिक्षणापासून वंचित असल्याचा अंदाज आहे.

नाओमी वतनबे

नाओमी वतनबे, जपान

विनोदी कलाकार

जपानमधील सर्वांत प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्सपैकी एक असलेल्या नाओमी वतनबे यांनी त्यांच्या देशातील विनोदी महिला कलाकारांच्या पुढील पिढीसाठी मार्ग मोकळा केला आहे.

मुख्य पात्र करणारी एक महिला म्हणून आणि यशस्वी विनोदी कार्यक्रमांद्वारे त्यांनी जपानमधील पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विनोदी कलाकारांच्या विश्वातील अडथळे दूर केले आहेत.

जपानमधील शरीरासंदर्भातील विशिष्ट मानसिकतेला बदलण्यासंदर्भात वतनबे काम करत आहेत. पोचाकावाई नावानं ओळखल्या जाणाऱ्या शरीरासंदर्भातील सकारात्मक चळवळीचं त्या नेतृत्व करत आहेत. याचा अर्थ "गुबगुबीत आणि गोंडस" असा होतो. प्लस साईज कपड्यांचा जपानमधील पहिला ब्रॅंड त्यांनी लॉंच केला आहे.

जपानमधील टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर जागतिक पातळीवरील विनोदी कार्यक्रमांमध्ये ठसा उमटवण्यासाठी त्या आता अमेरिकेत स्थलांतरीत झाल्या आहेत.

तुम्ही कणखर कसे राहाल? मला नेहमीच वाटतं, 'मी तुम्हाला आवडत नसेल, तर काही हरकत नाही. कृपया मला एक वर्षभराचा कालावधी द्या आणि कदाचित मी तुमचा दृष्टीकोन बदलू शकेन'. माझी नेहमी हीच मानसिकता असते.

नाओमी वतनबे

इलाहा सोरूर

इलाहा सोरूर, अफगाणिस्तान

गायिका आणि संगीतकार

इलाहा सोरूर या अफगाणिस्तानातील गायिका आहेत. अफगाणिस्तानात सार्वजनिक जीवनातून महिलांचं अस्तित्व पुसलं जात असताना, इलाहा सोरूर यांनी या दडपशाहीला विरोध करण्यासाठी नान, कर, आझादी! (भाकरी, काम, स्वातंत्र्य!) हे गीत लिहिलं. त्यातून त्यांनी महिलांना प्रोत्साहन देणारा संदेश दिला.

ऑक्टोबर महिन्यात अल्बेनियातील अभूतपूर्व ऑल-अफगाण विमेन समिटमध्ये या गीताचं पहिल्यांदा सादरीकरण झालं.

त्यांची कारकीर्द चित्रपट, नाटक आणि संगीत या क्षेत्रात विस्तारलेली आहे. त्यांना पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांनी या व्यासपीठांचा वापर अनेकदा महिलांच्या अधिकारांना पुरस्कार करण्यासाठी केला आहे.

सोरूर या हजारा या वांशिक अल्पसंख्याक समुदायातील आहेत. 2009 मध्ये अफगाण स्टार या एका लोकप्रिय टॅलेंट शोमधून त्या पुढे आल्या. मात्र संगीताच्या क्षेत्रात करियर करताना त्यांना हिंसक विरोधाला तोंड द्यावं लागलं. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी देश सोडला.

राजकारण आणि सामाजिक कार्य

निजला इसिक

निजला इसिक , तुर्की

गावाच्या प्रमुख आणि निसर्ग संवर्धक

निजला इसिक यांची पश्चिम तुर्कियेमधील इकिझ्कॉय भागाच्या प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या भागात होणाऱ्या जंगलतोडीविरोधात त्या या भागात गेल्या पाच वर्षांपासून आंदोलन करत आहेत.

या भागापासून जवळच असलेल्या अकबेलेन जंगलात कोळशाच्या खाणीचा प्रस्ताव आला होता.त्यामुळे या जंगलाला धोका निर्माण झाला होता. इसिक आणि इतर स्थानिक महिलांनी वृक्षतोड करण्याविरोधात आणि पर्यायाने खाणकाम प्रकल्पासाठी जमीन देण्याविरोधात आंदोलनं केली.

त्यांच्या आंदोलनामुळे या जमिनीचं रक्षण करणारे पोलीस आणि आंदोलक यांच्यात चकमकी झाल्या. मात्र कितीही आव्हानं आणि धमक्या आल्या तरी इसिक आणि गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. जंगलात विनापरवनागी शिरल्याबद्दल दंडही करण्यात आला होता. (नंतर हा दंड रद्द करण्यात आला होता.)

घरातल्या, शेतातल्या, रस्त्यावरच्या आणि संघर्ष करणाऱ्या महिला हे जग आणखी सुंदर करत आहेत, त्या नक्कीच हे जग वाचवतील .

निजला इसिक

हाला अल्कारिब

हाला अल्कारिब , सुदान

युद्धादरम्यान होणाऱ्या लैंंगिक हिंसाचाराविरुद्ध लढा

स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह फॉर वुमन इन द हॉर्न ऑफ अफ्रिका (SIHA) या संस्थेच्या प्रादेशिक संचालिका, सुप्रसिद्ध कार्यकर्त्या, आणि लेखिका हाला अल्कारिब यांनी प्रदेशातील लिंगाआधारित अत्याचारावर प्रकाश टाकला.

एप्रिल 2023 मध्ये युद्ध सुरू झाल्यावर SIHA संघर्ष सुरू असलेल्या भागातल्या लैंगिक हिंसाचाराचा माग घेऊन स्त्रिया आणि महिलांना आधार देत आहे.

ऑक्टोबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी या समस्येच्या व्याप्तीबद्दल इशारा दिला होता. तसंच पॅरामिलिटरी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) या संस्थेवर अत्याचार केल्याचा आरोप केला. मात्र हे आरोप फेटाळले गेले.

या अहवालानुसार युद्धजन्य भागातील 400 लोकांना जुलै 2024 पर्यंत आधार दिला गेला. मात्र हे फक्त हिमनगाचं टोक असल्याचं सांगितलं गेलं.

अरुणा रॉय

अरुणा रॉय , भारत

सामाजिक कार्यकर्त्या

अरुणा रॉय गरिबांच्या हक्कासाठी लढतात. ग्रामीण समाजातील लोकांसाठी कार्य करण्यासाठी नागरी सेवेतील नोकरी त्यांनी सोडले आणि समाजकार्य हाती घेतलं.

त्या मजदूर किसान शक्ती संघटन (MKSS) या तळागाळातील संघटनेच्या सह संस्थापक आहेत. पारदर्शकता आणि समान वेतन या मुद्द्यावर ही संघटना काम करते. सरकारचं उत्तरदायित्व वाढवणारा कायदा 2005 मध्ये अस्तित्वात आला. त्यात या संघटनेनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

चार दशकांपेक्षा अधिक काळ रॉय लोकसहभागातील उपक्रमात आघाडीवर आहेत. त्यांना रॅमन मॅगसेसे पारितोषिकासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मॅगसेसे पुरस्कार हा 'आशियातील नोबेल पारितोषिक' म्हणून ओळखला जातो.

त्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. 'द पर्सनल इज पॉलिटिकल' हे त्यांचं आत्मचरित्र यावर्षी प्रसिद्ध झालं आहे.

खूप मोठं काहीतरी शोधताना अनेकदा आपल्या अगदी जवळ असलेलं स्वप्न ओळखता येत नाही.

अरुणा रॉय

अ‍ॅन चुमापोर्न (वाड्डाओ)

अ‍ॅन चुमापोर्न (वाड्डाओ), थायलंड

एलजीबीटीक्यू+ च्या अधिकारांच्या कार्यकर्त्या

यावर्षी थायलंडमध्ये विवाह समानता विधेयकाला मंजुरी देत त्याचं कायद्यात रुपांतर केल्यामुळे आणि समलिंगी संबंधांना मान्यता देणारा थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला देश बनल्यामुळे अ‍ॅन 'वाड्डाओ' चुमापोर्न यांच्याकडे आनंदी होण्यासाठी अनेक कारणं होती.

हे विधेयक संसदेत मंजूर होण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले होते. त्यांनी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेट या संसदेच्या दोन्ही सभागृहात कायदा पुनरावलोकन आयुक्त म्हणून काम केलं होतं.

चुमापोर्न दक्षिण थायलंडच्या ग्रामीण भागातील असामान्य समलिंगी कार्यकर्त्या आहेत. तसंच बँकॉक प्राईड या संस्थेच्या त्या सह-संस्थापक आहेत. चुमापोर्न गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून मानवाधिकार आणि एलजीबीटीक्यू+ च्या कौटुंबिक हक्कांसाठी संघर्ष करत आहेत.

2020 मध्ये थायलंडमध्ये तरुणांनी केलेल्या निदर्शनांच्या वेळेस त्या लोकशाही समर्थक फेमिनिस्ट लिबरेशन फ्रंटच्या नेत्या म्हणून उदयाला आल्या. त्यांच्या या सक्रियतेसाठी त्यांना आठ राजकीय आरोपांचा सामना करावा लागला.

फौझिया अल-ओतैबी

फौझिया अल-ओतैबी, सौदी अरेबिया/युके

महिला अधिकार कार्यकर्त्या

फौझिया अल-ओतैबी या दीर्घकाळापासून सौदी अरेबियातील महिलांसाठी पुरुषांकरवी होत असलेली देखरेखीची व्यवस्था संपावी यासाठी मोहीम चालवत आहेत. आपला आवाज इतरांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी सोशल मीडियाचाही वापर केला आहे.

मात्र अधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्यांनी देश सोडून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

मनाहेल अल-ओतैबी या त्यांच्या बहीण आहेत. त्यादेखील महिलांच्या अधिकारासाठी काम करतात. या वर्षाच्या सुरूवातीला त्यांना अटक झाली आणि 11 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांची पोशाखाची निवड आणि ऑनलाइन स्वरूपात त्यांनी व्यक्त केलेली मत यासंदर्भात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. त्यात दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली, अशी माहिती मानवाधिकार गटांनी दिली आहे.

अल-ओतैबी त्यांच्या बहिणीच्या सुटकेसाठी अथक मोहीम चालवत आहेत. महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टच्या विरोधात अलीकडेच सौदी अरेबियात करण्यात आलेल्या कारवाईत अनेकांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

डॅनियल कँटर

डॅनियल कँटर, इस्रायल/पॅलेस्टिनी भूप्रदेश

सांस्कृतिक कार्यकर्त्या

कल्चर ऑफ सॉलिडॅरिटी या उपक्रमाच्या डॅनियल सह-संस्थापक आहेत. कोरोनाच्या संकटकाळात सुरू झालेल्या या तळागाळातील उपक्रमाच्या माध्यमातून डॅनियल यांनी तेल अविवमधील स्थानिक कुटुंबाना अन्न आणि इतर मदत पुरवली होती.

या उपक्रमाच्या सह-संस्थापक अलमा बेक यांच्याबरोबर डॅनियल हाऊस ऑफ सॉलिडॅरिटी हे केंद्र चालवतात. लोकांना भेटण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यशाळांना उपस्थित राहण्यासाठी ही जागा एक पर्यायी केंद्र बनली आहे.

त्यांनी अलीकडेच स्प्रेड्सचं लेखन आणि छायाचित्रण केलं. हे एक कला पुस्तक आहे, जे इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्रदेशातील समुदायांच्या अस्मितेच्या राजकारणाचे बारकावे तपासण्यासाठी खाद्य संस्कृतीचा वापर करतं.

मध्यपूर्वेत तत्काळ शस्त्रसंधी व्हावी आणि कायमस्वरूपी शांतता करार व्हावा याची मागणी करणाऱ्या निदर्शनांमध्ये विमेन पीस सिट-इन या उपक्रमाच्या इतर सदस्यांसह डॅनियल सहभागी होत आहेत.

महिला जेव्हा त्यांच्या उपजत करुणेचा वापर करतात, तेव्हा आपण अन्याय करणाऱ्या व्यवस्थेची ओळख खऱ्या अर्थानं पटवू शकतो आणि त्यातून आपल्या पुढील मार्गाबद्दल पुनर्विचार करू शकतो.

डॅनियल कँटर

सुसान कॉलिन्स

सुसान कॉलिन्स, अमेरिका

सिनेटर

सुसान कॉलिन्स सध्या पाचव्यांदा मेन राज्याचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्या अमेरिकेच्या सिनेटमधील रिपब्लिकन पार्टीच्या सर्वात जास्त काळ कार्यरत असणाऱ्या महिला आहेत.

ऐतिहासिक कायद्यांच्या संदर्भात त्यांनी अनेकदा पक्षाच्या भूमिकेपलीकडे जाऊन काम केलं आहे. अ‍ॅडव्हान्सिंग मेनोपॉज अँड मिड-लाईफ वुमेन्स हेल्थ अ‍ॅक्ट हा कायदा आणण्यासाठी जबाबदार असणाऱ्या सहा सिनेटर्सपैकी त्या एक आहेत. या कायद्यामुळे रजोनिवृत्तीवरील संशोधन, उपचार आणि जनजागृती यासाठी पुढील पाच वर्षात 27.5 कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.

कॉलिन्स यांनी नॅशनल अल्झायमर प्रोजेक्ट अ‍ॅक्ट या कायद्याचा मसुदा देखील लिहिला आहे. हा कायदा अल्झायमर या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठीच्या राष्ट्रीय योजनेचं समन्वय करतो. या प्रकल्पासाठी 2035 पर्यंत निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी काम केलं आहे. त्याचबरोबर डाऊन सिंड्रोम असलेल्या लोकांसह मोठ्या प्रमाणात आरोग्यसेवा उपलब्ध नसलेल्या लोकांना आवश्यक ती आरोग्यसेवा मिळावी यासाठी त्यांनी काम केलं आहे.

झिना मोदरेस गोर्जी

झिना मोदरेस गोर्जी, इराण

महिला अधिकार कार्यकर्त्या

झिना मोदरेस गोर्जी या कुर्दिश पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी 2019 मध्ये झिव्हानो वुमेन्स असोशिएनची सह-स्थापना केली आहे. ही संस्था शिक्षण, निदर्शनं आणि पाठिंबा याचा वापर करून महिलांवरील हिंसाचाराचा सामना करते.

इराणमधील महिला, जीवन, स्वातंत्र्य चळवळीची सुरूवात झाल्यापासून झिना मोदरेस गोर्जी यांना दोनदा अटक करण्यात आली. सुरूवातीला त्यांना 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यावेळेस त्यांच्यावर 'राजवटीविरोधात अपप्रचार केल्याच्या' आरोपासह इतर आरोप ठेवण्यात आले होते. सध्या त्या कमी करण्यात आलेली दोन वर्षे आणि चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत.

इराणमध्ये कायदेविषयक सुधारणा करण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या दहा लाख स्वाक्षरी अभियानाच्या (वन मिलियन सिग्नेचर्स) मोदरेस गोर्जी या एक सदस्य होत्या.

कुर्दिश महिलांचा एक फोटोग्राफी गट, एक महिलांचं पॉडकास्ट आणि कुर्दिश महिलांना प्रेरणा देणारं एक मुलांचं पुस्तक या कामामागे मोदरेस गोर्जी आहेत.

लीला चॅनिशेव्हा

लीला चॅनिशेव्हा, रशिया

राजकीय कार्यकर्त्या आणि माजी कैदी

यावर्षी ऑगस्टमध्ये आंततराष्ट्रीय कैदी अदलाबदल हा उपक्रम राबवला गेला. त्यात 26 कैद्यांची मुक्तता केली. राजकीय कार्यकर्त्या लीला चॅनिशेव्हा त्यापैकी एक होत्या. त्यानंतर त्यांनी रशिया सोडलं.

रशियातील दिवंगत विरोधी पक्षनेते अ‍ॅलेक्स नॅवलेनी यांच्या रशिताील बाशकोरोस्तान येथील कार्यालयाच्या त्या प्रमुख होत्या. भ्रष्टाचाराचा तपास करणं आणि निष्पक्ष निवडणुकांचा पुरस्कार करणं हे त्यांचं काम होतं.

हे काम करण्याआधी त्या आघाडीच्या अर्थतज्ज्ञ होत्या. त्यांनी मॉस्कोमधील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी कर सल्लागार म्हणून काम केलं होतं.

2021 मध्ये कट्टरतावादाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना साडेनऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांची सुटका होण्याआधी त्यांनी दोन वर्षं नऊ महिने शिक्षा भोगली.

हुआंग जी

हुआंग जी, तैवान

राजकारणी

महिला-पुरुष समानतेसाठीच्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हुआंग जी यांनी जानेवारी महिन्यात इतिहास घडवला. त्या तैवानच्या संसदेतील पहिल्या एलजीबीटीक्यू+ खासदार बनल्या.

आपल्या राजकीय कारर्किदीत त्यांनी मोठ्या सुधारणा घडवून आणल्या आहेत. यामध्ये एकल महिला आणि लेस्बियन जोडप्यांना प्रजननासाठी उपचार घेण्यासाठीच्या अधिकारांना पाठिंबा देणं, तसंच अल्पउत्पन्न गटातील आणि अपंग महिलांसाठी मासिक पाळीशी संबंधित उत्पादनांवर सरकारी अनुदान मिळवून देणं या गोष्टींचा समावेश आहे.

2023 मध्ये सार्वजनिकरीत्या समोर आल्यानंतर त्यांना तोंड द्यावं लागलेल्या अत्याचाराबद्दल त्या उघडपणे बोलल्या आहेत. त्या डीपफेक पॉर्नोग्राफीच्या पीडिता आहेत. त्यामुळे डिजिटल लैंगिक हिंसाचाराचा सामना करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांना अधिक मजबूत करण्यात यावं याच्या त्या समर्थक आहेत.

खरा कणखरपणा हा विविधता स्वीकारण्यात आहे. आपण जितक्या अधिक लोकांचे विचार स्वीकारू तितकेच आपण अधिक मजबूत बनू - विशेषकरून ज्यांना कधीकाळी कमकुवत मानलं जातं होतं, महिला आणि एलजीबीटीक्यू+ यांचे विचार स्वीकारण्याची आवश्यकता आहे.

हुआंग जी

गुर्लिन एम. जोझेफ

गुर्लिन एम. जोझेफ, हैती

स्थलांतरितांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या

गुर्लिन अमेरिकेत राजकारण आणि वंश या दोन्ही गोष्टी जिथे एकत्र येतात अशा क्षेत्रात काम करतात. त्या स्थलांतरितांच्या अधिकारांसाठी मोहीम चालवतात.

महिलांच्या नेतृत्वाखालील हैतन ब्रिज अलायन्सच्या संस्थापक आहेत. ही संस्था आफ्रिकन वंशाच्या लोकांवर लक्ष केंद्रित करते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली या अलायन्सनं गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात फौजदारी आरोप दाखल केले. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करताना ओहिओतील स्प्रिंगफिल्ड येथील भाषणात हैतीतून आलेल्या स्थलांतरितांच्या बाबतीत 'पाळीव प्राणी खाणारे' असं वक्तव्य केलं होतं.

अमेरिकेतून हैतीच्या लोकांच्या सुरू असलेल्या हद्दपारीवर जोझेफ स्पष्ट टीका करतात. हैतीतील टोळी हिंसाचारामुळे तिथून पळून अमेरिकेत आश्रय घेण्यासाठी आलेल्या लोकांना पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवणं थांबवावं, असं आवाहन त्यांच्या संस्थेनं अलीकडेच बायडन प्रशासनाला केलं होतं.

इनाव झांगौकर

इनाव झांगौकर, इस्रायल

ओलिसांच्या सुटकेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या

इनाव झांगौकर या एकल माता आहेत. मतन या त्यांच्या 24 वर्षांच्या मुलाचं, 7 ऑक्टोबरला हमासनं केलेल्या हल्ल्यात अपहरण करून त्याला ओलीस ठेवण्यात आलं होतं. मतन याची जोडीदार इलाना हिच देखील स्वतंत्रपणे अपहरण झालं होतं. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या कैद्यांच्या अदलाबदलीत ती परत आली.

तेव्हापासून इनाव सातत्यानं ओलिसांच्या संकटाकडे लक्ष वेधत आहेत. त्या नेत्यांना त्यासंदर्भात पावलं उचलण्यासाठी आवाहन करत आहेत. आठवड्यामागून आठवडे त्या लोकांना एकत्र आणून यासाठी निदर्शनं करत आहेत.

झांगौकर यांनी आधी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सत्ताधारी पक्षाला मतदान केलं होतं. मात्र आता ओलिसांना घरी परत आणण्यामध्ये अपयशी ठरल्याबद्दल त्या इस्रायली सरकारवर उघड टीका करत आहेत.

उर्वरित ओलिसांची सुटका व्हावी यासाठी त्या शस्त्रसंधी करार करण्याची मागणी करत आहेत.

अमांडा झुरावस्की

अमांडा झुरावस्की, अमेरिका

प्रजनन अधिकार कार्यकर्त्या

ऑगस्ट 2022 मध्ये अमांडा झुरावस्की यांच्या लक्षात आलं की त्यांच्या गर्भाशयातून (गर्भाचं रक्षण करण्यासाठी त्याच्याभोवती असणाऱ्या पिशवीतून) पाण्याची अकाली गळती सुरू झाली आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की त्यांचा गर्भ जगणार नाही.

झुरावस्की अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहतात. त्यांनी गर्भपात करण्यास नकार दिला होता. दोनच महिन्यांपूर्वी तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं रो विरुद्ध वेड खटल्यात घटनात्मक ठरवलेला गर्भपाताचा अधिकार रद्द केला होता. रुग्णांच्या जीवाला धोका असल्याशिवाय गर्भपाताच्या प्रक्रियेवर सरकारनं बंदी घातली होती. तीन दिवसांनी झुरावस्की सेप्टिक शॉकमध्ये (यात संसर्गामुळे रक्तदाब अतिशय कमी होतो आणि अवयव निकामी होतात) गेल्या. त्या परिस्थितीत थेट त्यांच्या जीवालाच धोका असल्यामुळे अखेर त्यांना गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली.

मार्च 2023 मध्ये झुरावस्की आणि अशाच अनुभवातून गेलेल्या 19 इतर महिलांनी सरकारविरोधात खटला दाखल केला. रो विरुद्ध वेड या खटल्याचा निकाल न्यायालयानं उलटवल्यानंतर महिलांना गर्भपातास बंदी केल्यानंतर दाखल करण्यात आलेला हा पहिलाच खटला होता. टेक्सासच्या सर्वोच्च न्यायालयानं गर्भपातावरील बंदीला दिलेलं हे आव्हान फेटाळलं होतं.

यानंतर देशात "प्रजननविषयक अधिकार पुन्हा लागू करण्याचे आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी" लढा सुरू ठेवणार असल्याचं झुरावस्की यांनी सांगितलं आहे.

काशा जॅकलिन नबागेसेरा

काशा जॅकलिन नबागेसेरा, युगांडा

विविधता आणि सर्वसमावेशकतेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या

युगांडामध्ये समलैंगिकता बेकायदेशीर आहे. समलैंगिकतेला तिथे तुरुंगवासाची शिक्षा आहे. काशा नबागेसेरा एलजीबीटीक्यू+ च्या समर्थक आहेत. या देशातील प्रतिगामी कायदे बदलण्यासाठी त्या लढत आहेत.

समलिंगी महिला म्हणून आपली ओळख त्या उघडपणे दाखवतात. एलजीबीटीक्यू+ संदर्भात असलेल्या मानसिकतेविरोधात त्यांनी संपूर्ण आफ्रिका खंडात आपल्या मोहिमेचा मोठा प्रभाव पाडला आहे.

नबागेसेरी यांनी एलजीबीटीक्यू+ विरोधातील भूमिका घेणाऱ्या युगांडा सरकार आणि वृत्तपत्रांविरोधात खटला जिंकला आहे. युगांडामधील न्यायालयांमध्ये समलैंगितेविरोधातील कायद्यांना त्यांनी दोनदा आव्हान दिलं होतं. सध्या त्यांनी 2023 च्या कायद्याला आव्हान दिलं आहे.

त्यांनी युगांडामधील नकुंबा विद्यापीठातून व्यवसायविषयक पदवी घेतली आहे. तसंच स्टॅनफोर्ड विद्यापीठाची फेलोशिप देखील त्यांना मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपियन संसद आणि आफ्रिकन कमिशनसारख्या उच्च स्तरीय व्यासपीठांवर त्यांनी विविधतेसंदर्भातील उपक्रमांमध्ये योगदान दिलं आहे.

गिसेल पेलिकॉट

गिसेल पेलिकॉट, फ्रान्स

बलात्काराच्या पीडिता आणि प्रचारक

जिसेल पेलिकोट यांनी आपलं नाव उघड केलं आणि त्यांची गोष्ट जगापर्यंत पोहोचवली. जिसेल पेलिकोट या धैर्य, कणखरपणा आणि चिकाटीचं प्रतीक झाल्या.

त्यांच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्यानं लग्न झालेलं असताना ड्रग्स देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचं कबूल केलं. तसंच बायकोवर बलात्कार करण्यासाठी अनेक पुरुषांना पैसे दिले. या कथित बलात्कारांंचं शूटिंग झालं होतं.

कायद्यानं खरंतर त्यांना आपली ओळख लपवण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी ही सुनावणी खुली करायला सांगितली आणि व्हीडिओ दाखवायला सांगितला. आरोपींना आपल्या कृत्याची 'लाज वाटावी' यासाठी त्यांनी हे केलं. 50 आरोपींपैकी काहींनी बलात्कार केल्याचं कबूल केलं. मात्र बहुतांश लोकांनी फक्त लैंगिक कृत्यात सहभाग घेतल्याचं सांगितलं.

हा खटला आता शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र या फ्रेंच आजीमुळे जगभरातील महिलांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या खटल्यामुळे फ्रान्सचा कायदा बदलेल तसंच बलात्कार आणि संमतीबद्दल लोकांचा दृष्टिकोन बदलेल, अशी आशा त्यांना वाटते.

लॉर्डेस बरेटो

लॉर्डेस बरेटो, ब्राझिल

सेक्स वर्कर्सच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या

लॉर्डेस बरेटो यांनी त्यांचं आयुष्य ब्राझिलमधील सेक्स वर्कर्सच्या अधिकारांसाठी काम करण्यात वेचलं आहे. यासाठीच्या अनेक मोहिमांमागील त्या प्रमुख ऊर्जास्रोत आहेत.

अ‍ॅमेझॉनच्या प्रदेशात बेलेम डो पारा इथं आपल्या कामाची सुरूवात केल्यानंतर 1980 च्या दशकात त्यांनी ब्राझिलियन नेटवर्क ऑफ प्रॉस्टिट्यूट्सची सह-स्थापना केली. ही संस्था लॅटिन अमेरिकेतील सेक्स वर्कर्सच्या सर्वात पहिल्या संघटित चळवळींपैकी एक आहे.

बरेटो यांच वय आता ऐंशीच्या घरात आहे. कित्येक दशकांपासून त्या पूर्वग्रहांना आव्हान देत आहेत.

ब्राझिलमध्ये एचआयव्ही प्रतिबंधक धोरण लागू करण्यात आणि सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या समुदायांमध्ये एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी मोहीम राबवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2023 मध्ये त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं.

आमच्या कहाण्यांना महत्त्व दिलं जावं आणि त्या उपेक्षित राहता कामा नये. स्वप्न पाहण्याची, ते साध्य करण्याची, विचार करण्याची आणि समाजात परिवर्तन घडवून आणण्याची अफाट क्षमता आम्हा जगभरातील महिलांमध्ये आहे.

लॉर्डेस बरेटो

महरंग बलोच

महरंग बलोच, पाकिस्तान

डॉक्टर आणि राजकीय कार्यकर्त्या

बलुचिस्तान प्रांतातून कथितरीत्या लोक बेपत्ता होण्याच्या विरोधात पाकिस्तानात निदर्शनं करणाऱ्या शेकडो महिलांपैकी महरंग बलोच या एक आहेत.

महरंग बलोच यांच्या वडिलांना 2009 मध्ये सुरक्षा सेवेतील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. दोन वर्षांनी त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या शरीरावर त्यांचा छळ केल्याच्या खुणा होत्या. त्यानंतर त्या न्याय मिळवण्यासाठी पुढे सरसावल्या.

2023 च्या अखेरीस, महरंग बलोच यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांचा 1,000 मैल (1,600 किमी) अंतरावरून इस्लामाबादपर्यंत मोर्चा निघाला होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या ठावठिकाण्याची माहिती मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यांच्या या प्रवासा दरम्यान त्यांना दोनदा अटक करण्यात आली होती.

बलुचिस्तान प्रांतात प्रदीर्घ काळापासून राष्ट्रवादी बंड सुरू आहे. तिथले आंदोलक म्हणतात की बलुचिस्तानातील बंडाविरोधातील कारवाईदरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांनी त्यांच्या कुटुंबीयांना पकडून नेलं आणि त्यांची हत्या केली. मात्र इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

महरंग बलोच तेव्हापासून एक प्रमुख आंदोलक बनल्या आहेत. त्यांच्या स्वत:च्या बलोच याकजेहती कमिटी (युनिटी) (BYC) या मानवाधिकार गटाद्वारे त्या आंदोलन करत असतात. मानवाधिकारांसंदर्भातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा समावेश टाइम 100 नेक्स्ट 2024 च्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत करण्यात आला होता.

केमी बॅडेनॉक

केमी बॅडेनॉक, युके

कंजर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या

केमी बॅडेनॉक यांची नोव्हेंबर महिन्यात कंजर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. त्या युकेतील प्रमुख राजकीय पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला आहेत.

सध्या त्या वायव्य एसेक्समधून खासदार आहेत. त्यापूर्वी केमी व्यवसाय सचिव आणि महिला आणि समानता मंत्री होत्या.

केमी बॅडेनॉक यांचे पालक नायजेरियन असून त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला होता. मात्र त्यांचं संगोपन आधी नायजेरियातील नागोसमध्ये आणि नंतर अमेरिकेत झालं. नायजेरियातील बिघडत्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्या वयाच्या 16 वर्षी युकेमध्ये परतल्या. त्यानंतर त्यांनी तिथे कॉम्प्युटर इंजिनीयरिंग आणि कायद्याची पदवी घेतली.

राजकारणात येण्यापूर्वी त्या कौट्स या खासगी बँकेच्या सहयोगी संचालक आणि द स्पेक्टेटर या मासिकाच्या डिजिटल संचालक होत्या.

अ‍ॅनी सिनांडूकू मवांगे

अ‍ॅनी सिनांडूकू मवांगे, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो

खाण कामगार

काँगोमधील खाण उद्योगातील एक महिला म्हणून मवांगे त्या उद्योगातील असमानता आणि लैंगिक छळांविरोधातील तळागाळातील चळवळीचं नेतृत्व करतात. या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांमध्ये महिलांची संख्या निम्मी आहे.

नॅशनल विमेन्स मायनिंग नेटवर्क रेनाफेमच्या त्या नेत्या आहेत. त्या स्वत:ला 'बॉस' किंवा 'मदर बॉस' म्हणवतात. त्या खाणींमध्ये महिलांच्या अधिकारपदावरील नियुक्तीकडे म्हणजे पुरुष सहकाऱ्यांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाला प्रतिबंध म्हणून पाहतात.

त्यांना अशी देखील आशा आहे की महिलांच्या उपजीविकेच्या साधनांमध्ये गुंतवणूक केल्यानं खाणीतील बालमजुरी कमी होईल. कारण जगभरात इलेक्ट्रिक कारसारख्या पर्यावरपूरक ऊर्जेशी निगडित उत्पादनांसाठी कोबाल्ट आणि इतर खनिजांची मागणी वाढते आहे.

कॅथरिन मार्टिनेझ

कॅथरिन मार्टिनेझ, व्हेनेझुएला

मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या वकील

व्हेनेझुएलातील कराकसमधील जोस मॅन्युएल डी लॉस रिऑस चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील बहुतांश रुग्ण अल्पउत्पन्न गटातील आणि एकल पालक कुटुंबातील आहेत.

कॅथरीन मार्टिनेझ यांनी प्रेपारा फॅमिलिया, या नावानं स्वयंसेवी संस्था सुरू केली आहे. ही संस्था अशा रुग्णांना, आवश्यक असलेले कपडे, वैद्यकीय मदत आणि अन्न पुरवते. तसंच मानसिक आधार देखील देते.

मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या वकील म्हणून मार्टिनेझ आणि त्यांची टीम मानवाधिकारांशी संबंधित गोष्टींची नोंद ठेवतात. मुलांच्या आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत मानवाधिकारांचं जे उल्लंघन होतं त्यासंदर्भात पीडितांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी त्या अशा गोष्टींची नोंद ठेवतात.

व्हेनेझुएलामध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे प्रेपारा फॅमिलिया संस्थेनं मुलं आणि गर्भवती महिलांना पोषक पूरक आहार आणि जीवनसत्वं मोफत पुरवण्यासाठी केंद्र देखील उघडलं आहे.

नादिया मुराद

नादिया मुराद, इराक

शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेत्या

लैंगिक हिंसाचाराच्या पीडितांसाठीच्या एक अग्रगण्य वकील, मानवाधिकार कार्यकर्त्या आणि शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कार विजेत्या नादिया मुराद यांनी इराकमधील यझिदी नरसंहार पाहिला. स्वत:ला इस्लामिक स्टेट (IS)म्हणवणाऱ्या एका गटानं 2014 मध्ये तो केला होता.

इस्लामिक स्टेटच्या कट्टरतावाद्यांनी त्यांना पकडलं होतं, त्यांना गुलाब बनवण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर बलात्कार आणि अत्याचार करण्यात आले. तीन महिन्यांनी नादिया त्यांच्या तावडीतून निसटल्या आणि लढाईच्या काळात होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी जगासमोर त्यांच्या तोंड द्यावं लागलेल्या अग्निपरीक्षेबद्दल हिमतीनं सांगितलं.

इस्लामिक स्टेटला जबाबदार ठरवण्यासाठी त्यांनी मानवाधिकार वकील अमल क्लुनी यांच्याबरोबर काम केलं आणि समुदायांची पुनर्उभारणी करण्यासाठी आणि पीडितांच्या नुकसान भरपाईसाठी नादियाज इनिशिएटिव्ह या स्वयंसेवी संस्थेची सुरूवात केली.

याझिदी हत्याकांडानंतर दहा वर्षांनंतर देखील नादिया मुराद या कणखरपणाचं जागतिक प्रतीक म्हणून ओळखल्या जातात.

समानता आणि न्याय: सत्य, आशा आणि करुणेसाठी आपण मी म्हणते ती 'चेतनेची शस्त्रं' वापरायला हवीत

नादिया मुराद

लाटिशा मॅकक्रुडेन

लाटिशा मॅकक्रुडेन, आयर्लंड

आयरिश प्रवासी चळवळीच्या कार्यकर्त्या

त्या फक्त 20 वर्षांच्या आहेत. मात्र लाटिशा मॅकक्रुडेन यांनी आयरिश प्रवासी समुदायाच्या एक खंद्या समर्थक म्हणून स्वत:ला स्थापित केलं आहे.

स्वत: आयर्लंडमधील वांशिक अल्पसंख्याक समुदाया भाग म्हणून, त्यांना आयर्लंडमधील वांशिक अल्पसंख्यांकाबाबत असलेल्या चुकीच्या धारणांविरोधात लढा द्यायचा आहे. तसंच कौटुंबिक अत्याचाराची पीडिता म्हणून त्यांना महिला आणि मुलींवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात लढा द्यायचा आहे.

मॅकक्रुडेन गॅलवे विद्यापीठात कायद्याच्या विद्यार्थिनी आहेत. त्या आयरिश ट्रॅव्हलर मूव्हमेंट नॅशनल यूथ फोरम, नॅशनल विमेन्स कौन्सिल ऑफ आयर्लंड आणि मिन्सेयर्स व्हिडेन या ट्र्रॅव्हलर सपोर्ट ग्रुपच्या सदस्य म्हणून काम करतात.

2029 मध्ये होणाऱ्या पुढील स्थानिक निवडणुकांमध्ये भाग घेण्याची आणि त्याद्वारे आयर्लंडसाठी भविष्यात काम करून बदल घडवण्याची त्यांची इच्छा आहे.

हाना-रावहिती मैपी-क्लार्क

हाना-रावहिती मैपी-क्लार्क, न्यूझीलंड

राजकारणी

वयाच्या 22 वर्षी हाना रावहिती मैपी-क्लार्क न्यूझीलंडच्या संसदेत निवडून येणाऱ्या सर्वात तरुण माओरी महिला खासदार बनल्या.

आपल्या पहिल्याच भाषणाच्या वेळेस, त्यांनी हाका हे प्रसिद्ध माओरी नृत्य सादर केलं आणि स्वदेशी नागरिकांच्या प्रतिनिधित्वात वाढ होण्याबाबत आवाहन केलं. अलीकडेच त्यांनी आणखी एक हाकाचं नेतृत्व केलं. एका वादग्रस्त विधेयकाला विरोध करण्यासाठी हे हाका करण्यात आलं होतं आणि त्यामुळे संसदेचं कामकाज ठप्प झालं होतं.

मैपी-क्लार्क माओरी हक्क, सांस्कृतिक वारशाचं रक्षण आणि पर्यावरणाच्या समस्यांची हिरिरीनं मांडणी करतात. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित केलं होतं. हे पुस्तक माओरी लुनार कॅलेंडरसंदर्भात होतं.

यावर्षी त्यांना राजकारणात स्थानिक तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रतिष्ठित असा वन यंग वर्ल्ड पॉलिटिशियन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

महिलांना सहज प्रवेश नसलेल्या ठिकाणांचे दरवाजे त्यांनी जोरदार धडका देऊन खुले केले पाहिजेत, मग ते स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण का असेना.

हाना-रावहिती मैपी-क्लार्क

फेंग युआन

फेंग युआन, चीन

महिला अधिकार कार्यकर्त्या

फेंग युआन यांनी चीनमध्ये महिलांच्या अधिकारांसाठी प्रदीर्घ काळ काम केलं आहे. त्या इक्वॅलिटी बीजिंग या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. या संस्थेची स्थापना 2014 मध्ये झाली होती. ही संस्था हेल्पलाइनद्वारे कायदेशीर सुधारणा, क्षमता निर्माण करणं आणि लिंगावर आधारित हिंसाचाराचा सामना करण्यासाठी समर्पित आहे.

अलीकडच्या वर्षांमध्ये, त्या चीनमधील मी टू पीडितांना म्हणजे लैंगिक शोषणाच्या पीडितांना पाठिंबा देत आहेत. तसंच कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ टाळण्यासाठी वरिष्ठांना किंवा मालकांना प्रशिक्षण देत आहेत.

फेंग यांनी 1986 ते 2006 दरम्यान महिलांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी पत्रकार म्हणून काम केलं आहे.

1990 च्या दशकाच्या मध्यापासून, त्यांनी महिला आणि प्रसारमाध्यमं, एचआयव्ही/एड्स, नेतृत्वगुण आणि तरुणांचं सक्षमीकरण यासंदर्भात विविध बिगर सरकारी उपक्रम सुरू करण्यास मदत केली आहे. त्यांनी चीन आणि चीनबाहेरील प्रकाशनांमध्ये लेखन केलं आहे, संपादन केलं आहे.

एंजेला रेनर

एंंजेला रेनर, युके

उप पंतप्रधान

युकेच्या राजकारणातील सर्वोच्च पदांपैकी एका पदावर असलेल्या एंजेला रेनर जुलैमधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर उपपंतप्रधान झाल्या

स्टॉकपोर्टमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या, रेनर लहानपणापासून त्यांच्या आईची काळजी घ्यायच्या. वयाच्या 16 वर्षी गर्भवती राहिल्यानं त्यांनी शाळा सोडली. त्यांनी स्थानिक कौन्सिलमध्ये सोशल केअरसाठी काम केलं आणि तिथून पुढील वाटचाल करत त्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधी झाल्या

2015 मध्ये रेनर पहिल्यांदा अ‍ॅश्टन-अंडर-लाइन या शहरातून लेबर पार्टीच्या खासदार झाल्या. त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिला महिला खासदार होत्या. नंतरच्या काळात त्यांनी महिला आणि समानता विभागासाठी शॅडो मंत्री (विरोधी पक्षांकडून विशिष्ट खात्यासाठी नियुक्त करण्यात आलेला प्रतिनिधी) म्हणून काम केलं तसंच इतरही जबाबदाऱ्या सांभाळल्या.

सध्या त्या गृहनिर्माण, समुदाय आणि स्थानिक सरकार खात्याच्या सचिव आहेत.

रुथ लोपेझ

रुथ लोपेझ, एल साल्वाडोर

वकील

त्या कायदा आणि न्याय याबद्दल तीव्रतेनं विचार करतात. रुथ लोपेझ क्रिस्टोसल या संस्थेत मुख्य कायदा अधिकारी आहेत. ही संस्था मध्य अमेरिकेत लोकशाहीचा विस्तार करण्यासाठी काम करते.

त्या एल साल्वाडोरमध्ये भ्रष्टाचारविरोधी, निवडणूक कायदा आणि मानवाधिकारांचं संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

देशातील सरकार आणि संस्थांच्या व्यवहारावर सातत्याने त्या खुलेपणाने भाष्य करतात, त्यांनी राजकारणात पारदर्शकता यावी तसेच जनतेनीच सरकारच्या कामाचे मूल्यमापन करावे यासाठी सोशल मीडियावरुन नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

या वर्षाच्या सुरूवातीला नायिब बुकेले यांची एल साल्वोडोरच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर लोपेझ यांचं कार्य अधिक ठळकपणे समोर आलं आहे. बुकेले यांनी गुन्हेगारांवर कारवाई केल्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढली होती. त्यांनी स्वत:चं वर्णन 'जगातील सर्वात मस्त हुकूमशहा" असं केलं होतं.

रोडमारी विडलर-वॉल्टी

रोडमारी विडलर-वॉल्टी, स्वित्झर्लंड

शिक्षक आणि हवामान बदल कार्यकर्त्या

रोसमारी विडलर-वॉल्टी या क्लिमासिनऑरीनेन (हवामान संरक्षणासाठी वरिष्ठ महिला) या संस्थेच्या सह-अध्यक्ष आहेत. त्यांनी स्विस सरकारविरुद्धच्या नऊ वर्षांच्या लढ्याचं नेतृत्व केलं. मानवाधिकारासाठीच्या युरोपियन न्यायालयात त्यांनी हवामान बदलासंदर्भातील पहिला खटला जिंकला.

बालवाडी शिक्षिका आणि समुपदेशक असलेल्या विडलर वॉल्टी यांनी इतर 2,000 महिलांसह युक्तिवाद केला की जागतिक तापमान वाढीशी निगडित उष्णतेच्या लाटांना स्विस सरकारनं दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांच्या आरोग्याच्या अधिकाराचं हनन झालं आणि त्यांचं वय आणि लिंग यामुळे त्या असुरक्षित झाल्या.

एप्रिलमध्ये न्यायालयानं निकाल दिला की कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठीचे देशाचे प्रयत्न अपुरे आहेत.

स्वित्झर्लंडच्या संसदेनं नंतर न्यायालयाचा हा निकाल नाकारला असला तरी या खटल्यामुळे हवामान बदलाशी निगडित कायदेशीर लढाईसाठी एक नवीन उदाहरण प्रस्थापित केलं.

युमी सुझुकी

युमी सुझुकी, जपान

सक्तीच्या नसबंदीसंदर्भातील खटल्याच्या फिर्यादी

युमी सुझुकी यांना जन्मत: सेलेब्रल पाल्सीचा आजार होता. त्यांना लहानपणापासून भेदभावाला तोंड द्यावं लागलं. त्या जेव्हा फक्त 12 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांना गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं.

1950 ते 1990 च्या दशकांदरम्यान जपानमध्ये सुझुकी यांच्याप्रमाणेच अपंगत्व असणाऱ्या किंवा अक्षम असणाऱ्या लोकांची सक्तीनं नसबंदी करण्यात आली होती. वांशिक सुधारणा करण्यासाठीच्या कायद्याअंतर्गत असं करण्यात आलं होता. तो कायदा 1996 मध्ये रद्द करण्यात आला होता.

सुझुकी आणि इतर 38 फिर्यादींनी सरकारविरोधात खटला भरला होता. अनेक वर्षे सुनावणी झाल्यावर सुझुकी तो खटला जिंकल्या. जुलैमध्ये जपानच्या सर्वोच्च न्यायालयानं ही पद्धत घटनाबाह्य ठरवली आणि सरकारला पीडितांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते.

अधिकाऱ्यांनी हे कबूल केलं की 16,500 जणांवर त्यांच्या संमतीशिवाय नसबंदी करण्यात आली.

विज्ञान, आरोग्य आणि तंत्रज्ञान

सारा बेरकाय

सारा बेरकाय , यूके/एरटिया

DIY विज्ञान किटच्या डिजाइनर

सारा एरटियात जन्माला आल्या तरी लंडनमध्ये मोठ्या झाल्या. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या त्यांच्या घरातील त्या पहिल्या होत्या. त्या तिथे चाइल्ड डेव्हलपमेंट हा विषय शिकल्या.

त्या अ‍ॅम्बेसा प्ले या सामाजिक संस्थेच्या संस्थापक आहेत ही संस्था लहान मुलांसाठी DIY पद्धतीच्या शैक्षणिक किट्स तयार करते आणि खेळणी तयार करण्यात त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देते.

बेरकाय यांच्या कार्यामुळे विविध देशातील लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी मिळते. 2019 मध्ये इथियोपिया आणि एरटिया भागातील निर्वासित लहान मुलांना STEM कार्यशाळेत शिकवत असताना त्यांना ही संकल्पना सुचली.

फोर्ब्सच्या '30 अंडर 30' या यादीत सामाजिक प्रभाव या प्रवर्गाखाली समावेश करून त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला होता. त्यांना इतरही सन्मान मिळाले आहेत.

चिकाटी म्हणजे आशावादाचे मूर्त रूप आहे. प्रेमाने भारलेली, उज्ज्वल भविष्यासाठीची ती वचनबद्धता आहे.

सारा बेरकाय

एनास अल-घौल

एनास अल-घौल, पॅलेस्टाईन

कृषी इंजिनीयर

इस्रायल-गाझा युद्धामुळे गाझापट्टीत पाण्याचा तुटवडा भासू लागल्यानंतर एनास अल-घौल यांना जाणवलं की त्यांनी या समस्येवर उपाय शोधायला हवा.

त्या कृषी इंजिनीयर आहेत. त्यांनी या समस्येवर मात करण्यासाठी लाकूड, काच आणि ताडपत्रीसारख्या पुनर्प्रक्रिया केलेल्या साहित्याचा वापर करून समुद्राच्या पाण्याचं रूपांतर पिण्यायोग्य पाण्यात करू शकणारं सौर ऊर्जेवर चालणारं डिसॅलिनेशन उपकरण तयार केलं.

तेव्हापासून हे उपकरण गाझापट्टीच्या दक्षिणेला असणाऱ्या खान युनिस परिसरातील तंबूत राहणाऱ्या अनेकजणांसाठी जीवनदायी बनलं आहे. कारण ऑक्टोबर 2023 पासून गाझात सुरू झालेल्या युद्धामुळे तिथल्या पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था नष्ट झाल्या आहेत.

अल-घौल यांनी गाझामधील विस्थापित पॅलेस्टिनी लोकांना मदत करण्यासाठी आपली कौशल्यं वापरण्याचा निर्धार केला होता. त्यातूनच त्यांनी सौरऊर्जेवर चालणारा एक कूकर देखील तयार केला आहे. त्याचबरोबर त्या गाद्या आणि पिशव्या यासारख्या वस्तू तयार करण्यासाठी उपलब्ध साहित्यावर पुनर्प्रक्रियाही करत आहेत.

सफा अली

सफा अली, सुदान

महिला आरोग्य आणि प्रसूतीतज्ज्ञ

गेल्या वर्षी जेव्हा सुदानमध्ये त्यांच्या हॉस्पिटलजवळ जोरदार लढाई सुरू झाली तेव्हा तिथे सतत बॉम्बहल्ले आणि गोळीबार होत असून देखील डॉ. सफा अली यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत तिथून जाण्यास नकार दिला.

प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या सफा अली यांनी सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेसमध्ये सुरू असलेल्या जोरदार लढाईदरम्यान स्वयंसेवी कर्मचारी आणि गर्भवती महिलांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं कामात योगदान दिलं.

सध्या त्या अल-सौदी मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीतज्ज्ञ म्हणून काम करतात. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर त्या गर्भवती महिलांची शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करतात आणि महिलांच्या आरोग्याच्या समस्यांवर उपचार करतात.

तिथे असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तुटवडा कमी करण्यासाठी म्हणून त्या जवळपास 20 नवीन पदवीधर महिला डॉक्टरांना प्रशिक्षण देखील देत आहेत.

मला वाटतं की महिलांच्या प्रतिकारातून तिथे उपचार, न्याय आणि भविष्याची खात्री आहे. तिथे आपल्याला यापुढे भीतीखाली जगण्याची आवश्यकता नाही. महिलांचं हे सामर्थ्यच मला या गोष्टीची आठवण करून देतं की अजूनही आशा शिल्लक आहे, अगदी निराशेच्या काळोखात देखील.

सफा अली

शिलशिला आचार्य

शिलशिला आचार्य, नेपाळ

सस्टेनॅबिलिटी (पर्यावरणपूरक) व्यावसायिक

शिलशिला आचार्य नेपाळमदील सर्वात मोठं प्लास्टिक रिसायकलिंग नेटवर्क चालवतात. अवनी वेंचर्स नावाची त्यांची कंपनी कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काम करते. उपेक्षित समुदायातील लोक त्यांच्या कंपनीत कर्मचारी आहेत आणि पर्यावरणपूरक क्षेत्रात काम करण्यासाठी अधिकाधिक महिलांना सहभागी करून घेण्यावर कंपनी लक्ष केंद्रित करते.

शिलशिला आचार्य यांनी 2014 सालच्या 'नो थँक्स, आय कॅरी माय ओन बॅग' या मोहिमेत प्रमुख भूमिका बजावली होती. या मोहिमेमुळे प्लॅस्टिकच्या शॉपिंग बॅगवर बंदी आली.

हवामान बदल आणि कचरा या विषयासंदर्भात त्या लोकांना शिक्षण देतात. हिमालयात गिर्यारोहकांनी टाकलेला कचरा काढण्यासाठी दरवर्षी केल्या जाणाऱ्या साफसफाईच्या मोठ्या मोहिमेदेखील त्या आहेत. त्याद्वारे 2019 पासून 119 टन कचरा गोळा करण्यात आला आहे.

त्यांच्या कार्यामुळे, या कचऱ्यातील काही भाग वापरून स्थानिक कारागीर टोपल्या, चटई आणि दागिने तयार करून त्यातून उदरनिर्वाह चालवतात.

शिरीन आबेद

शिरीन आबेद, पॅलेस्टाईन

बालरोगतज्ज्ञ

बॉम्बहल्ले आणि संसाधनांचा प्रचंड तुटवडा या गोष्टी शिरीन आबेद यांना गाझामधील नवजात बालकांची काळजी घेण्यापासून रोखू शकल्या नाहीत.

2023 मध्ये इस्लायल-गाझा युद्ध सुरू झाल्यानंतर त्या विस्थापित झाल्या होत्या. कारण त्यांचा फ्लॅट इस्रायली सैन्याच्या हल्ल्यात नष्ट झाला होता. मात्र या नवजात बालतज्ज्ञानं विस्थापितांच्या शिबिरांमध्ये असणाऱ्या बाळांची काळजी घेणं सुरू ठेवलं.

शिरीन यांना गाझामधील मुख्य हॉस्पिटलमधील नवजात बालकांच्या युनिटमध्ये काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. अगदी अलीकडे त्या अल-शिफा वैद्यकीय संकुलातील प्रसूती केंद्राच्या संचालक म्हणून काम करत आहेत. या अनुभवांच्या आधारे त्यांनी अत्यंत मर्यादित संसाधनांच्या आधारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीवनरक्षक उपचार पुरवण्यास सक्षम करण्यासाठी आणीबाणीच्या स्थितीत अंमलात आणायचे प्रोटोकॉल (कार्यपद्धती) तयार केले आणि त्याचं प्रशिक्षण इतर डॉक्टरांना दिलं.

गाझामधील प्रतिकूल परिस्थितीनं त्यांना या वर्षाच्या सुरूवातीला आपल्या दोन मुलींसह गाझा सोडण्यास भाग पाडलं. मात्र तरीदेखील शिरीन आबेद, प्रत्यक्ष गाझामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची दूर राहून देखील मदत करत आहेत.

नूर इमाम

नूर इमाम, इजिप्त

फेम-टेक उद्योजक

नूर इमाम लैंगिक आरोग्य शिक्षिका आहेत. त्या मासिक पाळीदरम्यानची स्वच्छता, प्रजननाशी निगडीत आरोग्य आणि लैंगिक जागरुकता यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करतात. मध्यपूर्वेत आणि उत्तर आफ्रिकेत हे विषय अनेकदा महिलांसाठी निषिद्ध किंवा बोलण्यास, मांडण्यास अयोग्य मानले जातात.

इमाम या मदरबीईंग या फेम-टेक कंपनीच्या सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. फेम-टेक म्हणजे महिलांच्या आरोग्याशी निगडित उत्पादने किंवा सेवा पुरवणारी कंपनी. ही कंपनी कैरोमधील क्लिनिक आणि डिजिटल व्यासपीठाद्वारे हायब्रीड सेवा पुरवते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांपर्यंत अधिक आरोग्यसेवा पोहोचवण्याची या कंपनीची महत्त्वाकांक्षा आहे.

महिलांना गर्भनिरोधक उपायांविषयी विश्वसनीय माहिती पुरवताना आणि संकोच न बाळगता संवेदनशील मुद्द्यांबाबत मार्ग काढण्यासाठी महिलांना मदत करताना त्यांच्या शरीराविषयी पुराव्याच्या आधारे ज्ञान देऊन सक्षम करण्याचं नूर इमाम यांचं उद्दिष्ट आहे.

रोसा वासक्युएझ एस्पिनोझा

रोसा वासक्युएझ एस्पिनोझा, पेरू

रासायनिक जीवशास्त्रज्ञ

उपचारांबाबत आजीच्या ज्ञानानं प्रेरित होऊन, पेरूतील अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यातील जैवविविधतेचं संरक्षण करण्यासाठी, रोसा वासक्युएझ एस्पिनोझा या वैज्ञानिकेनं तिचं आयुष्य अत्याधुनिक विज्ञान आणि पारंपारिक ज्ञान यांचं एकत्रीकरण करण्यासाठी आपल्या सर्व कारकीर्दीत काम केलं आहे.

अ‍ॅमेझॉन रिसर्च इंटरनॅशनल या संस्थेच्या संस्थापक म्हणून त्या जंगलातील अज्ञात जैवविविधतेचा शोध घेण्यासाठी स्थानिक समुदायांबरोबर काम करतात.

एस्पिनोझा पृथ्वीवरील दुर्गम भागातील निसर्गात अनेकदा प्रवास करतात. त्यांच्या कामामध्ये अ‍ॅमेझॉनच्या प्रसिद्ध बॉयलिंग रिव्हरमध्ये नवीन जीवाणू शोधणं आणि पेरूमधील मधमाशा आणि औषधी मधाचं पहिलं रासायनिक विश्लेषण करणं यासारख्या कामांचा समावेश आहे.

त्या दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठ्या स्थानिक समुदायांपैकी एक असलेल्या अशानिंका लोकांच्या आंतरराष्ट्रीय राजदूत देखील आहेत.

ओल्गा ओलेफिरेंको

ओल्गा ओलेफिरेंको, युक्रेन

शेतकरी

2015 मध्ये ओल्गा यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळेस ओल्गा यांना आपल्या वडिलांचं शेतीची स्वप्न पूर्ण करायचं होतं. पशुधन विकत घेतल्यावर त्यांनी त्यावर काम करण्यास सुरूवात केली. मात्र लवकरच त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी आल्या आणि त्यांना त्यांची सर्व जनावरं विकावी लागली.

मात्र तिला तिच्या वडिलांचं स्वप्न तसंच सोडून द्यायचं नव्हतं. त्यांचे वडील नौदलात होते. नौदलाच्या विशेष दलामध्ये कमांडर म्हणून कर्तव्य बजावत असताना डोनबासमध्ये युद्धाच्या आघाडीवर ते मारले गेले होते.

गेल्या वर्षी त्यांनी युक्रेनियन वेटरन्स फंडातून निधी मिळवण्यासाठी बोली लावण्यासाठी एक व्यवसाय योजना तयार केली आणि त्यात त्या यशस्वी झाल्या.

ओल्गा ओलेफिरेंको यांनी पुन्हा त्यांची शेती करण्यास सुरूवात केली. त्यांनी आधुनिकीकरणावर, शेतीतील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर आणि स्थानिक समुदायासाठी रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांच्या कामासाठी आणि नेतृत्वासाठी त्यांच्याकडे प्रेरणा म्हणून पाहिलं जातं.

गॅब्रिएला सालास काब्रेरा

गॅब्रिएला सालास काब्रेरा, मेक्सिको

प्रोग्रॅमर आणि डेटा सायंटिस्ट

नाहुटल ही गॅब्रिएला यांची मातृभाषा आहे. गुगलच्या भाषांतरासाठी सर्वत्र वापरण्यात येणाऱ्या व्यासपीठावर ही भाषा गॅब्रिएला यांनी त्यात लक्ष घालेपर्यंत उपलब्ध नव्हती.

गॅब्रिएला यांनी ही भाषा आणि मेक्सिकोतील इतर स्थानिक भाषांचा समावेश गुगल ट्रान्सलेटमध्ये करण्यासाठी गुगलबरोबर भाषाशास्त्राच्या प्रकल्पावर काम केलं आहे. नाहुटल भाषेचं भाषांतर करणारं टूल यावर्षाच्या सुरूवातीलाच लोकांसाठी उपलब्ध झालं आहे.

गॅब्रिएला यांच्या कार्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ताकदीचा वापर दुर्लक्षित भाषांचा वापर वाढवण्यासाठी तसंच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्थानिक महिलांच्या सहभागाला चालना देण्यासाठी होतो आहे.

ऑब्जेक्ट-ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात त्या निपुण आहेत. त्या स्पेनमधील माद्रिद येथील युनिव्हर्सिदाद पॉलिटेक्निया मध्ये डेटा सायन्सचा अभ्यास करत आहेत.

महिलांचा कणखरपणा ही एक अशी ज्योत आहे जी कधीही मालवत नाही. ती वेदनेचं रूपांतर ध्येयामध्ये करते आणि जे तिचं अनुसरण करतात त्यांचा मार्ग उजळवते.

गॅब्रिएला सालास काब्रेरा

कतालिन कारिको

कतालिन कारिको, हंगेरी

बायोकेमिस्ट आणि नोबेल पुरस्कार विजेत्या

कतालिन कारिको या हंगेरीतील बायोकेमिस्ट आहेत. त्यांच्या मॉडिफाईड मेसेंजर आरएनए (mRNA)वरील संशोधनाचे कौतुक झाले. कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी बायोएनटेक/फायझर आणि मॉडर्ना यांनी या संशोधनाचा वापर केला होता.

त्यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे (ड्रू वेसमन यांच्याबरोबर संयुक्तपणे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता). " 'आधुनिक काळात तयार झालेल्या सर्वांत मोठ्या आरोग्य संकटात लसनिर्मितीसाठी लागलेला अत्यल्प वेळ वाखाणण्याजोगे आहे,' असं नोबेल समितीने त्यांना पुरस्कार देताना म्हटलं होतं.

आपल्या डीएनएचं (DNA) प्रथिनांमध्ये रूपांतर करण्याचं काम एमआरएनए (mRNA) करतात. एमआरएनए अतिशय नाजूक असतात आणि त्यांच्यावर काम करणं अत्यंत कठीण असतं. मात्र कारिको यांना खात्री होती की एमआरएनए औषधांच्या बाबतीत मोठी भूमिका बजावू शकतात.

हे तंत्रज्ञान कोरोनाच्या संकटाआधी प्रायोगिक स्वरूपाचं होतं. मात्र आता जगभरातील लाखो लोकांना कोरोनासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण करण्यासाठी ते लसीच्या स्वरूपात देण्यात आलं आहे.

नेहमी तुम्ही काय करू शकता यावर लक्ष केंद्रित करून तुमच्या ध्येयांसाठी कार्यरत रहा आणि इतरांनी काय करावं यावर लक्ष केंद्रित करू नका. जर तुम्ही अपयशी ठरला तर त्यातून शिका. पुन्हा जोमानं उभे राहा आणि त्याच उत्साहानं पुढील मार्गक्रमण करा.

कतालिन कारिको

नाओमी चंदा

नाओमी चंदा, झांबिया

शेतकरी आणि प्रशिक्षक

नाओमी चंदा एका प्रशिक्षण देण्याच्या शेतावर कृषी मार्गदर्शक म्हणून काम करतात. आपल्या समुदायानं जमिनीचा आदर आणि जतन करणाऱ्या कृषी पद्धतींचा वापर करावा या मोहिमेवर त्या आहेत.

त्यांचा लक्ष पर्यावरणास अनुकूल असणाऱ्या कौशल्यांवर आहे. उदाहरणार्थ ठिबक सिंचन, ज्यामुळे कमी पाण्याचा वापर केला जातो किंवा कमी कालावधीची पीकं. त्या महिलांना हवामान बदलाच्या आव्हानांवरील उपायांच्या केंद्रस्थानी ठेवतात.

कॅमफेड ही मुलींच्या शिक्षणासाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. नाओमी चंदा या संस्थेच्या मदतीनं साधारण 150 तरुण महिलांना शेतीचं तंत्र कसं आत्मसात करायचं हे शिकवतात आणि झांबियाच्या ईशान्येकडील दुर्गम भागात हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यास सक्षम बनण्यावर काम करतात. त्या भागात दीर्घकाळ पडणाऱ्या दुष्काळांमुळे आणि नाट्यमयरित्या हंगामात होणाऱ्या बदलांमुळे तिथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर विनाशकारी परिणाम झाले आहेत.

अ‍ॅडेनाईके टिटिलोप ओलाडोसू

अ‍ॅडेनाईके टिटिलोप ओलाडोसू, नायजेरिया

क्लायमेट जस्टिस अ‍ॅडव्होकेट

अ‍ॅडेनाईके टिटिलोप ओलाडोसू या स्त्रीवादी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत. त्या आय लीड क्लायमेट अ‍ॅक्शन या उपक्रमाच्या संस्थापक आहेत. महिला आणि तरुणांचा हवामान बदलाशी लढा देणारा हा तळागाळातील उपक्रम आहे.

नायजेरिया, नायगर, चाड आणि कॅमेरून या आफ्रिकेतील देशांच्या सीमा जिथे एकत्र येतात तिथे लेक चाड आहे. या सरोवराच्या पर्यावरण संकटाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी काम केलं आहे. या भागात जलस्त्रोतांमध्ये घट होत असल्यामुळे संघर्ष वाढला आहे.

ओलाडोसू पर्यावरणाशी निगडित आणि सामाजिक क्षेत्रातील समस्या या दोन्हीवर काम करतात. कारण या दोन्ही बाबींचा विशेषत: आफ्रिकन महिलांवर परिणाम होतो आहे. आफ्रिकेत वाळवंटीकरणाचा थेट परिणाम अन्नधान्याच्या सुरक्षेवर होत असल्यामुळे त्या आफ्रिकन महिलांना पर्यावरणपूरक शेतीची कौशल्ये शिकवतात.

2019 पासून त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक हवामान बदलविषयक परिषदांमध्ये सहभागी होत आहेत. यातून त्यांनी विविध सरकारांना आफ्रिकेतील हवामान बदलाच्या समस्येला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे.

हवामान बदलाचं संकट हे गंभीर संकट असून त्यावर मात केल्याशिवाय पर्याय नाही. या संकटात टिकून राहण्यासाठी, आपल्याला तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण गोष्टींमध्ये गुंतवणुकीची आवश्यकता आहे.

अ‍ॅडेनाईके टिटिलोप ओलाडोसू

सुबिन पार्क

सुबिन पार्क, दक्षिण कोरिया

संस्थापक, स्टेअर क्रशर क्लब

सुबिन पार्क व्हीलचेअरचा वापर करायच्या. त्यांना असं आढळून आलं की सेऊलमध्ये अनेक ठिकाणी त्यांना जिथं जायचं आहे, त्या जागी व्हीलचेअरमुळे त्यांना जाणं शक्य होत नव्हतं. या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी एक माजी आयटी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी त्यांची कौशल्यं वापरण्यास सुरूवात केली.

पार्क या स्टेअर क्रशर क्लबच्या सह-संस्थापक आहेत. हा एक ना-नफा प्रकल्प असून त्यात दक्षिण कोरियातील व्हीलचेअरसाठी अनुकूल नसलेले मार्ग आणि प्रवेशासाठी पायऱ्या असलेल्या ठिकाणांची माहिती गोळा केली जाते.

या प्रकल्पाचा उद्देश व्हीलचेअर वापरणाऱ्यांसाठी योग्य ठरेल असा नकाशा तयार करणं हा आहे.

आतापर्यंत स्टेअर क्रशर क्लबच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून 2,000 नागरिकांनी त्यांच्या डेटाबेसमध्ये योगदान दिलं आहे आणि देशभरातील 14,000 ठिकाणं तिथे प्रवेश करण्यासंदर्भात तपासली गेली आहेत.

रिक्ता अख्तर बानू

रिक्ता अख्तर बानू, बांगलादेश

नर्स आणि शाळेच्या संस्थापक

उत्तर बांगलादेशमधील ज्या दुर्गम भागात रिक्ता अख्तर बानू या परिचारिका राहतात, तिथे ऑटिस्टिक किंवा अपंग मूल असणं हा एक शाप मानला जातो.

जेव्हा ऑटिस्टिक आणि सेलेब्रल पाल्सी असलेल्या त्यांच्या मुलीला स्थानिक प्राथमिक शाळेत प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा त्यांनी त्यांची जमीन विकली आणि स्वत:चीच शाळा बांधली.

रिक्ता अख्तर बानू लर्निंग डिसेबिलिटी स्कूलमध्ये आता 300 विद्यार्थी आहेत आणि या शाळेमुळे स्थानिक समुदायाच्या अपंगत्वाबद्दलच्या दृष्टीकोनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.

सुरूवातीला ही शाळा जरी ऑटिस्टिक किंवा शिकण्यास अक्षम असणाऱ्या मुलांसाठी बांधण्यात आली होती तरी आता त्या शाळेत विविध बौद्धिक आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं.

ब्रिगिट बॅपटिस्ट

ब्रिगिट बॅपटिस्ट, कोलंबिया

पर्यावरणशास्त्रज्ञ

ब्रिगिट बॅपटिस्ट या एक ट्रान्सवुमन (जन्माच्या वेळेस पुरुष असल्याचं वाटणाऱ्या मात्र आता महिला म्हणून जगणाऱ्या) जीवशास्त्रज्ञ आहेत. जैवविविधता आणि लिंग ओळख यामधील साम्यस्थळांचा त्या शोध घेतात.

भूप्रदेश आणि प्रजातींचं निरीक्षण करण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा लिंगभेदरहीत आहे. पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी 'निसर्ग' या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी त्या काम करतात. 2018 मध्ये TEDx टॉक मध्ये त्यांनी किंडिओ वॅक्स पाम या कोलंबियाच्या राष्ट्रीय वृक्षाचा वापर केला. या झाडाचं त्यांनी उदाहरण दिलं कारण त्याचं वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जीवनकालात हे झाड आधी नर असतं मग ते मादी होतं.

त्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञदेखील आहे. बॅपटिस्ट या अ‍ॅलेक्झांडर वॉन हमबोल्ट इन्सिट्यूटच्या 10 वर्षे संचालक होत्या. तसंच सध्या त्या बोगोटा इथं युनिव्हर्सिदाद ईएएनच्या अध्यक्ष आहेत. ही एक उच्च शिक्षण संस्था आहे जिथे पर्यावरणपूरक उद्योजकतेवर लक्ष केंद्रित केलं जातं.

अधिकाधिक एलजीबीटीक्यू+ लोकांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी चांगला निधी मिळवून देण्यासाठी मोहीम देखील चालवली आहे.

कॉना मालग्वी

कॉना मालग्वी, नायजेरिया

काँटेन्ट मॉडरेटर्ससाठीच्या युनियन लीडर

कॉना मालग्वी या तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उद्योगातील कामगारांच्या अधिकारांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. त्या नायजेरियातील काँटेन्ट मॉडरेटर्सच्या संघटनेच्या प्रमुख आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध प्रणाली तयार करण्यासाठी जे अनेक लोकांचे श्रम मोबदल्याशिवाय वापरले जातात याविषयी त्या जागरुकता वाढवतात.

त्या फेसबुक या प्रसिद्ध सोशल मीडिया व्यासपीठाच्या माजी आऊटसोर्स्ड काँटेन्ट मॉडरेटर आहेत. त्या कामाबद्दल त्या म्हणतात, त्यांना बलात्कार, आत्महत्या आणि बालकांच्या शोषणाचे व्हीडिओ पाहावे लागत होते. परिणामी त्यांना निद्रानाश आणि पॅरानोईया (इतरांकडून अपाय होण्याची भीती) सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागलं.

फेसबुकची पॅरंट कंपनी असेलल्या मेटा कंपनीवर आणि केनियातील कंपनीच्या उपकंत्राटदारांवर खटला दाखल करणाऱ्या 184 माजी मॉडरेटर्सपैकी त्या एक आहेत. जागरूक कर्मचाऱ्यानं कामाच्या ठिकाणची वाईट स्थिती लक्षात आणून दिल्यावर बेकायदेशीररीत्या कामावरून काढून टाकल्याच्या विरोधात हे खटले दाखल करण्यात आले आहेत.

काँटेन्ट मॉडरेटर्सचे अधिकार मांडण्यासाठी त्यांनी युरोपियन संसदेत साक्ष दिली आहे.

तंत्रज्ञानातील प्रगती आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टींना महत्त्व देणारा सर्वांगीण दृष्टीकोन आणून महिला या आपल्या खंडित जगातील वास्तवाला आव्हान देऊ शकतात आणि त्यात बदल घडवून आणू शकतात.

कॉना मालग्वी

ओल्गा रुडनिवा

ओल्गा रुडनिवा, युक्रेन

संस्थापक, सुपरह्युमन्स सेंटर

युक्रेनवर रशियानं केलेल्या आक्रमणानंतर, या युद्धात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं ओल्गा रुडनिवा वाटलं.

ज्या लोकांनी युद्धात आपले हातपाय गमावले होते त्यांच्याकडे अनेकजण युद्धाचे बळी म्हणून पाहत होते. मात्र रुडनिवासाठी ते 'सुपर ह्युमन' म्हणजे खास माणसं होती. जे त्यांच्याकडून मिळू शकणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी पात्र होते.

त्यांनी लविवमध्ये एका सुपरह्युमन्स ट्रॉमा सेंटरची स्थापना केली. या सेंटरच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्याबरोबर तिथे तज्ज्ञांची टीम काम करते. या केंद्रामध्ये रुग्णांना कृत्रिम अवयव दिले जातात आणि अलीकडेच त्यांनी एक पुनर्वसन केंद्र सुरू केलं आहे.

केंद्र सुरू झाल्यापासूनच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये त्यांच्या सेवांचा लाभ 1,000 हून लोकांना झाला आहे.

कणखरपणा म्हणजे दररोज सायरनच्या आवाजानं उठणं आणि तुमच्या देशासाठी लढत राहणं. 'मीच का?' या प्रश्नात अडकून राहण्याऐवजी 'कशासाठी जगायचं?' या प्रश्नाचा शोध घेणं. दररोज अधिक करण्यासाठीचे मार्ग शोधत राहणं.

ओल्गा रुडनिवा

स्नेहा रेवणूर

स्नेहा रेवणूर, अमेरिका

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तज्ज्ञ

वयाच्या फक्त 20 व्या वर्षी स्नेहा रेवणूर यांनी बरीच मजल मारली आहे. त्या एनकोड जस्टिसच्या संस्थापक आहे. एनकोड जस्टिस ही सुरक्षित, समान कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीची एक जागतिक युवा चळवळ आहे. याचे 30 देशांमधून 1,300 हून अधिक सदस्य आहेत.

रेवणूर यांच्या कामातून उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारे धोके कमी करण्याचा आणि तरुणांना महत्त्वाच्या चर्चांमध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न होतो आहे.

त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत, तसंच सेंटर फॉर एआय अँड डिजिटल पॉलिसीमध्ये समर फेलो आहेत.

अलीकडेच त्या टाइम मासिकाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली 100 लोकांच्या यादीत समावेश झालेल्या सर्वात तरुण व्यक्ती बनल्या आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्रांतिकारी क्षमतेला ग्रहण लागण्यापूर्वी त्याच्याशी निगडित धोक्यांच्या पुढे जाण्याची संधी आपल्याकडे आहे. माझ्यासाठी, कणखरपणा म्हणजे: भूतकाळावर मात करून भविष्याची नव्यानं मांडणी करणं.

स्नेहा रेवणूर

जॉर्जिना लाँग

जॉर्जिना लाँग, ऑस्ट्रेलिया

मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट

जॉर्जिना लॉंग कर्करोगावर काम करतात. लक्ष्याधारित थेरेपी आणि इम्युनो-ऑन्कोलॉजीच्या माध्यमातून त्यांना जगभरात कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंवर मात करायची आहे.

लाँग या मेलानोमा इन्स्टिट्यूट ऑस्ट्रेलियाच्या सह-संचालक आहेत. 2024 मध्ये त्यांनी त्यांचे सहकारी आणि मित्र रिचर्ड स्कोलायर यांना कर्करोगापासून मुक्त होण्यासाठी जगातील पहिली उपचारपद्धती सह-विकसित केल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या. रिचर्ड यांना मेंदूचा एक आक्रमक प्रकारचा कर्करोग झाला होता.

लाँग आणि त्यांच्या टीमनं - त्यामध्ये रुग्णदेखील आहेत - शोधून काढलं की ट्युमर काढण्यासाठीच्या शस्त्रक्रियेपूर्वी औषधांचं मिश्रण वापरल्यास इम्युनोथेरेपी अधिक चांगल्या प्रकारे काम करते.

त्यांची ही अत्याधुनिक पद्धती मेलानोमावरील अनेक वर्षांच्या संशोधनातून आली आहे. त्वचेच्या कर्करोगाचे निदान झालेल्या हजारो रुग्णांचे जीव त्यामुळे वाचले आहेत.

भविष्यातील नेत्यांमध्ये करुणा आणि माणुसकी असली पाहिजे, कालबाह्य प्रणालींना आव्हान देण्यासाठी आणि समस्यांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी त्यांनी लोकांना सक्षम केलं पाहिजे.

जॉर्जिना लाँग

साशा लुसिओनी

साशा लुसिओनी, कॅनडा

संगणक वैज्ञानिक

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगवान विकासासाठी जुळवून घेत असलेल्या जगात, उद्योगांमुळे कार्बन उत्सर्जनाकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जाऊ शकतं.

साशा लुसिओनी या आघाडीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता वैज्ञानिक आहेत. त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना असं टूल तयार करण्यास मदत केली आहे जे कार्बन उत्सर्जनाचं मोपमाप करू शकतं. हे टूल 13 लाख हून अधिक वेळा डाऊनलोड झालं आहे.

साशा लुसिओनी या हगिंग फेस या कंपनीच्या हवामान बदलासंदर्भातील प्रमुख आहेत. हगिंग स्पेस हे एक जागतिक स्तरावरील स्टार्टअप असून ते ओपन सोर्स एआय मॉडेल्ससह काम करतं आणि चांगल्या मशीन लर्निंगचं ते लोकशाहीकरण करू इच्छितं.

साशा यांचं लक्ष कृत्रिम बुद्धिमत्तेची पर्यावरणपूरकता वाढवण्यावर आहे. 'एनर्जी स्टार रेटिंग सिस्टम' विकसित करण्याचं त्यांचं उद्दिष्टं आहे. AI स्टार्टअप या सिस्टमचा वापर त्यांचा हवामान बदलावर होणाऱ्या परिणामांची तुलना करण्यासाठी करू शकतात.

सुनीता विलियम्स

सुनीता विलियम्स, अमेरिका

अंतराळवीर

5 जूनला जेव्हा नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स बोईंग स्टारलाईनर या अंतराळयानात चढल्या, तेव्हा आंतरराष्ट्र्यी अंतराळ स्थानकात (ISS)आठ दिवसांच्या मोहिमेसाठी जात असल्याची अपेक्षा त्या करत होत्या.

मात्र यानात निर्माण झालेल्या अनेक तांत्रिक दोषांमुळे विलियम्स आणि त्यांचे सहाकारी बॅरी बिलमोअर यांना कळवण्यात आलं की त्यांना पृथ्वीवर फेब्रुवारी 2025 पर्यंत परतता येणार नाही.

सुनीता विलियम्स या एक निवृत्त हेलिकॉप्टर पायलट आणि एका महिलेद्वारे सर्वाधिक स्पेसवॉक करणाचा माजी विक्रम त्यांच्या नावावर आहे. 2007 मध्ये अंतराळात मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती बनल्या होत्या.

आता अंतराळात पृथ्वीपासून 400 किमी अंतरावर, आपल्या कुटुंब आणि मित्रमंडळीपासून दूर असताना अंतराळातील हा अनपेक्षित वाढीव मुक्काम त्यांनी कणखरपणे आणि उत्साहानं स्वीकारला आहे. अंतराळयानाचं वर्णन त्यांनी त्यांच्या मुक्कामाचं 'आनंदी ठिकाण' असं केलं आहे.

सिल्वाना सँटोस

सिल्वाना सँटोस, ब्राझिल

जीवशास्त्रज्ञ

सिल्वाना सँटोस जीवशास्त्रज्ञ आहेत. जनुकशास्त्रातील आपल्या अद्भूत शोधाचं त्या एका संधीला देतात. ती संधी त्यांना त्यांचं घर ज्या रस्त्यावर होतं त्या रस्त्यावरील एका अज्ञात आजारानं पीडित असलेल्या कुटुंबाच्या भेटीतून मिळाली होती.

त्यांनी एसपीओएएन (SPOAN) सिंड्रोमचा (स्पॅस्टिक पाराप्लेजिया, ऑप्टिक अट्रॉफी आणि न्यूरोपॅथी) शोध लावला. हा एक दुर्मिळ अनुवांशिक न्युरोडीजनरेटिव्ह आजार आहे. यामुळे ईशान्य ब्राझिलमध्ये वाढत जाणारा अर्धांगवायू होतो.

सेरिन्हा डॉस पिंटोस या शहरात त्यांनी 20 वर्षांपूर्वी सिल्वाना सँटोस यांनी संशोधनाची सुरूवात केली होती. तेव्हापासून त्यांनी हा आजार झालेल्या नागरिकांना यांचं महत्त्वाचं निदान करण्यास मदत केली आहे.

हा दुर्मिळ अनुवांशिक आजार होण्याचा आणि ब्राझिलच्या ग्रामीण भागातील गरीब वस्त्यांमधील लोकांच्या जवळच्या नातेवाईकांशी झालेला विवाह, याचा या आजाराशी असलेला संबंध यावर त्या अभ्यास करतात.

कणखरपणाची शक्ती आपण कशी दर्शवू शकतो? जीवन हे एक चक्र आहे याची जाणीव म्हणजे कणखरपणा. भीषण दुष्काळात आपण फक्त जीव वाचवतो. आणि जेव्हा भरपूर पाऊसपाणी असतं तेव्हा आपण शेती करतो, फळं-भाज्या लावतो. हे अगदी त्यासारखंच आहे.

सिल्वाना सँटोस

सामिया

सामिया, सीरिया

मानसोपचार समुपदेशक

सामिया मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत. त्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी बीबीसी त्यांची ओळख निनावी ठेवत आहे. सीरियामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे तिथे अनेकांना मानसिक आघातांना तोंड द्यावं लागतं आहे. सामिया अशा सीरियन लोकांची मदत करत आहेत.

सीरियात कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे हजारो लोक बळी पडले आहेत. त्यात जे जिवंत वाचलं आहेत, त्यातील बरेचजण अत्यंत गंभीर स्थितीत जगत आहेत. ते नैराश्य आणि चिंता यांचा सामना करत आहेत.

आंतरराष्ट्रीय बचाव समितीद्वारे चालवण्यात येणाऱ्या मानसिक आरोग्य केंद्रात सामिया काम करतात. त्या ईशान्य सीरियातील निर्वासितांच्या शिबिरात विस्थापित झालेले लोक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी समुपदेशनाचं काम करतात.

संसाधनांचा तुटवडा असूनदेखील, रुग्णांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्या समर्पित काम करतात. तसंच संकट काळात जागरुकता वाढवण्यावर त्यांचा भर आहे.

2024 बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस सीझनसाठीच्या 100 महिला सहभागींपैकी काहींचे फोटो

100 विमेन काय आहे?

बीबीसी 100 विमेन, या उपक्रमात दरवर्षी जगभारतील 100 प्रभावशाली आणि प्रेरणादायी महिलांची निवड केली जाते. आम्ही महिलांना केंद्रस्थानी ठेवणारे माहितीपट, प्रदीर्घ लेख, बातम्या आणि मुलाखती-कथांची निर्मिती करतो. ते बीबीसीच्या सर्व व्यासपीठांवर प्रकाशित आणि प्रसारित केलं जातं.

इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बीबीसी 100 विमेन ला फॉलो करा. #BBC100Women वापरून संभाषणांमध्ये सहभागी व्हा.

या 100 महिलांची निवड कशी करण्यात आली?

बीबीसी 100 विमेन टीमनं संशोधनाद्वारे गोळा केलेल्या आणि बीबीसीच्या 41 वर्ल्ड सर्व्हिस लँग्वेजेस टीम्सच्या नेटवर्कनं तसंच बीबीसी मीडिया अ‍ॅक्शननं सुचवलेल्या नावांमधून ही अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.

आम्ही अशा उमेदवारांना शोधत होतो ज्यांच्या कामाची गेल्या 12 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे किंवा ज्यांनी महत्त्वाच्या बातम्यांवर प्रभाव टाकला आहे. तसंच ज्या उमेदवारांच्या कहाण्या प्रेरणादायी आहेत किंवा त्यांनी काहीतरी महत्त्वपूर्ण साध्य केलं आहे आणि त्यांनी त्यांच्या कामातून समाजाला प्रभावित केलं आहे. कदाचित त्यांच्या कामाबद्दल बातम्यांमध्ये आलेच असेल असे नाही पण ज्यांच्या कामाचा जनमानसांवर प्रभाव पडला अशा उमेदवारांची आम्ही निवड केली आहे.

या वर्षाची थीम चिकाटी-कणखरपणा ही आहे. या थीमच्या अनुषंगानं देखील यादीतील नावांचं मूल्यांकन करण्यात आलं. यावर्षी जगभरातील महिलांना सहन कराव्या लागलेल्या समस्या, संकटांची दखल देखील आम्हाला अशा नावांच्या निवडीतून घ्यायची आहे जे - त्यांच्या कणखरपणानं - जागतिक स्तरावर किंवा समुदायाच्या स्तरावर बदल घडवत आहेत आणि लोकांचं जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही हवामान बदलाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या नावांचं देखील मूल्यांकन केलं. त्यातूनच हवामान बदलाच्या समस्येवर काम करणाऱ्या आणि इतर पर्यावरणासाठी काम करणाऱ्या लोकांचा गट निवडण्यात आला.

आमच्या यादीमध्ये राजकारणातील वेगवेगळ्या पातळीवरील आणि समाजाच्या सर्व क्षेत्रातील लोकांचं प्रतिनिधित्व आहे. मतमतांतरं असणाऱ्या विषयांशी निगडित नावांची आम्ही शोध घेतला आहे.

अंतिम यादी ठरवण्यापूर्वी प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि निष्पक्षपातीपणाचा मुद्दा देखील लक्षात घेण्यात आला आहे. या यादीत नावाचा समावेश करण्यासाठी सर्व महिलांनी संमती दिली आहे.