You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राणी गाइदिन्ल्यू : ब्रिटिशांच्या सक्तीच्या कर वसुलीविरोधात पेटून उठणारी ‘राणी’ #सावित्रीच्यासोबतिणी-2
ईशान्येकडचं राज्य मणिपूरची राजधानी असणाऱ्या इंफाळपासून 174 किलोमीटरचा प्रवास करत दुरवरच्या डोंगर दऱ्या ओलांडून तुम्ही तामेंगलोंग जिल्ह्यात पोहचता. इथेच वसलंय एक गाव लोआंगकाओ.
या गावात आम्ही शोधत होतो राणी गाईदिन्ल्यू यांच्याविषयीच्या कथा.
बीबीसी पुन्हा घेऊन आलंय इतिहासातल्या काही शूरवीर, धैर्यवान महिलांच्या कथा. सावित्रीच्या सोबतिणी ही खास सीरिज त्या दलित आणि मुस्लीम महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते ज्यांना उपेक्षितांचं जीणं मंजूर नव्हतं.
नागा समुदायाच्या राँगमई जमातीतल्या राणी गाईदिन्ल्यूंवर त्यांचे चुलत भाऊ हायपॉन्ग जदोनांग यांचा खूप प्रभाव होता. जदोनांग यांनी नागा जमतींना एकत्र करून ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावापासून आपला प्राचीन धर्म हेराका वाचवण्यासाठी चळवळ उभी केली होती.
नागा भागांमध्ये ब्रिटीशांच्या हस्तक्षेपाला त्यांचा विरोध होता. त्यांनी या चळवळीला 'जेलीऑन्गराँग' आंदोलन असं नाव दिलं होतं. या आंदोलनात हायपाँग यांच्यासोबत राणी गाईदिन्ल्यूही सहभागी झाल्या.
राणी गाईदिन्ल्यूंचे माजी सचिव रामकुई न्यूमे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं, "हाइपॉन्ग जदोनांग त्यांचे मोठे भाऊ होते ते जवळच्याच गावात राहायचे. राणी आणि ते सोबत काम करायचे."
या भागातले लोक त्यावेळी ब्रिटिशांच्या सक्तीने त्रस्त झाले होते.
"ब्रिटीश घरपट्टी वसूल करायचे आणि जबरदस्ती हमाली करायला लावायचे. कोणीही ब्रिटीश अधिकारी आला तर गावकऱ्यांना त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला लागायचा. त्यांना मोफत खांद्यावर उचलून न्यावं लागायचं. एकदा राणीसाहेबांनाही हे काम करावं लागलं.
ते अन्यायकारक हुकूम सोडायचे. राणीसाहेबांना समजलं की, ब्रिटिश आपल्या देशाला बर्बाद करत आहेत. त्यांना देशाबाहेर हाकलावं लागेल. मग सगळे जण ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिले, म्हणाले की आम्ही कर देणार नाही. हमालाचं काम करणार नाही. यामुळे हाइपॉन्ग जदोनांग यांना अटक झाली."
ब्रिटिशांच्या विरोधात कारवाया केल्या म्हणून जदोनांग यांना अटक झाली आणि त्यांना फाशी देण्यात आली. यानंतर या आंदोलनाची धुरा राणी गाईदिन्ल्यू यांनी सांभाळली आणि ब्रिटीश सैन्याच्या विरोधात एक मोठी कारवाई पार पाडली.
इंफाळमधले अभ्यासक या कारवाईविषयी अधिक माहिती देताना म्हणतात, गाइदिन्ल्यूंना ब्रिटिशांच्या आसाम रायफलच्या आऊटपोस्टविषयी माहिती होतं. त्यांनी तिथे हल्ले केले पण याचा परिणाम फारच कमी झाला."
याला प्रत्युत्तर म्हणून ब्रिटीश आसाम रायफल्सच्या तुकडीने हल्ला केला.
"कित्येक गावात जाळपोळ केली. यात कित्येक लोक मारले गेले. पण हे लोक वाचले आणि जीव वाचवून जंगलात पळाले. या हल्ल्यांमध्ये पहिल्यांदा हत्यारं आणि बंदुकांचा वापर झाला होता. जदोनांग यांच्या काळात असं झालं नव्हतं. यानंतर गाइदिन्ल्यू भूमिगत झाल्या. त्यंनी आपल्या समर्थकांसोबत नागा नॅशनल काऊन्सिल स्थापन केलं," ते पुढे सांगतात.
ब्रिटिश सैन्यावर केलेल्या हल्ल्यानंतर राणी गाईदिन्ल्यू यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सैन्याने मोहीम चालवली. त्याची माहिती देणाऱ्याला करमाफी आणि रोख रकमेचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं गेलं. पण या प्रलोभनांचा काही फायदा झाला नाही. पण अखेरीस 16 वर्षांच्या राणी गाईदिन्ल्यूंना अटक करण्यात ब्रिटिशांना यश आलं.
त्यानंतरच त्यांचं आयुष्य खडतर होतं. गोन्मे लॉम्बिलुंग काबुई इंफाळ कॉलेजमध्ये इतिहासाचे सहायक प्राध्यापक आहेत.
राणी गाईदिन्ल्यूंच्या तुरुंगातल्या दिवसांविषयी ते म्हणतात, "त्या शिलाँग, गुवाहाटी, आयजॉल, तूरा इथल्या तुरूंगात राहिल्या. त्यांच्या आयुष्यातली महत्त्वाची वर्षं तुरूंगातच गेली. प्रशासनाने त्यांना अपमानित करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या कारण इतरांनी त्यांचं पाहून बंड करू नये असा ब्रिटिशांचा हेतू होता. पण एक ब्रिटिश खासदार नॅन्सी एस्टॉन यांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले पण त्या आपल्या संसदेत बहुमत मिळवू शकल्या नाहीत."
राणी गाईदिन्ल्यू तुरूंगात असताना पंडित जवाहरला नेहरूंनी त्यांची भेट घेतली आणि याबदद्ल वर्तमानपत्रात एक लेखही लिहिला. नेहरूंनी राणी गाईदिन्ल्यूंना त्यांचं धाडस आणि योगदानासाठी पर्वतकन्या आणि राणी अशा उपाधी दिल्या.
नेहरूंनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नही केले पण त्यांची सुटका भारताच्या स्वातंत्र्यानंतरच होऊ शकली. 14 वर्षं तुरूंगात काढल्यानंतर राणी गाईदिन्ल्यू यांनी आपल्या समाजताल्या लोकांना प्राचीन धर्म हेराकाशी जोडण्याचे आणि नागा जमातींच्या जेलिऑन्गराँग समुदायाला एकजूट करण्याचे प्रयत्न केले. यासाठी त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटीही घेतल्या.
राणी गाईदिन्ल्यूंच्या आंदोलनाचा हेतू जेलिऑन्गराँग लोकांसाठी काम करणं आणि त्यांना एकजूट करणं हा होता. "हे लोक स्वातंत्र्यपूर्व काळात पूर्व नागालँड, मणिपूर, आणि आसाममध्ये विखुरलेले होते. या संदर्भात त्यांनी जवाहरलाल नेहरूंपासून ते इंदिरा गांधीपर्यंत सगळ्या पंतप्रधानांना निवेदनंही दिली. त्यांच्या ज्या राजकीय मागणीसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला ती मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही," मणिपूर विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक डॉ मॅथ्यू कामई म्हणतात.
राणी गाईदिन्ल्यू म्हणायच्या की आपली संस्कृती लुप्त होऊ देणं म्हणजे आपलं अस्तित्व हरवण्यासारखं आहे.
दुसरीकडे भारताच्या स्वातंत्र्यानंतर नागांचं नेतृत्व करणाऱ्यांपैकी काही घटक, उदाहरणार्थ नागा नॅशनल काऊन्सिल भारतापासून वेगळं होण्याचे प्रयत्न करत होते. त्यांनी पारंपारिक धर्म हेराकाची पुर्नस्थापना करण्याचाही विरोध केला.
परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की राणी गाईदिन्ल्यू यांना आपल्या समर्थकांसह पुन्हा एकदा भूमिगत व्हावं लागलं. पण भारत सरकारच्या प्रयत्नांनंतर राणी गाईदिन्ल्यू मुख्य प्रवाहात परतल्या. 1972 साली त्यांना स्वातंत्र्य सेनानी ताम्रपट आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
हेराकाशी जोडलेली आपल्या समुदायाची नाळ अबाधित ठेवण्यासाठी त्या आधी ब्रिटिशांशी लढल्या आणि मग आपल्याच समाजातल्या विभाजनवाद्यांशी. स्वतःची ओळख हरवू न देण्याची जी मोहीम राणी गाईदिन्ल्यू यांनी सुरू केली होती, ती आजही चालू आहे.
क्रेडिट
रिपोर्टर - सुशीला सिंह
शूट आणि एडिट - दिपक जसरोटीया
इलेस्ट्रेशन - गोपाल शून्य
हे पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)