ऊदा देवी: 36 इंग्रजांना मारून पतीच्या हत्येचा बदला घेणारी महिला #सावित्रीच्यासोबतिणी-2

ऊदा देवींची कहाणी इतिहासाच्या पानांमध्ये लिहिली गेली नसेल कदाचित. पण उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊच्या आसपास मात्र त्यांच्या शौर्याचे किस्से आजही ऐकवले जातात.

बीबीसी पुन्हा घेऊन आलंय इतिहासातल्या काही शूरवीर, धैर्यवान महिलांच्या कथा. 'सावित्रीच्या सोबतिणी' ही खास सीरिज त्या दलित आणि मुस्लीम महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकते ज्यांना उपेक्षितांचं जीणं मंजूर नव्हतं.

दलित समाजातल्या ऊदा देवी लखनऊचे नवाब वाजिद अली शाह यांची बेगम हजरत महल यांच्याकडे सुरक्षारक्षकाचं काम करायच्या. त्यांचे पती मक्का पासी नवाबाच्या सैन्यात होते.

समाजशास्त्राचे प्राध्यापक असणारे प्रोफेसर बद्रीनारायण तिवारी म्हणतात, "ऊदा देवी सुरुवातीपासूनच हजरत महल बेगमच्या सैन्याचा भाग होत्या. त्यांचे पती हयात असतानाच त्यांचं महिला सैनिक म्हणून प्रशिक्षण झालं होतं. ऊदा देवी महालात सेविका होत्या आणि सुरक्षा तुकडीच्या सदस्यही. सैन्य तुकडीत असणाऱ्या दासी दलित जातींमधल्या होत्या. अनेक वेगवेगळ्या जातींच्या महिला इथे सेविका म्हणून काम करायच्या. त्यातल्या काहींना राणी किंवा राजा आपल्या सैन्यासाठी प्रशिक्षण द्यायचे."

1857 साली भारतात इंग्रजांविरुद्ध पहिलं बंड झालं. लखनऊचे नवाब वाजिद अली शाह यांना इंग्रजांनी कलकत्त्यात निर्वासित करून टाकलं होतं. बंडाचा झेंडा त्यांची पत्नी बेगम हजरत महल यांनी फडकवला. लखनऊजवळ चिन्नहट नावच्या जागी नवाबाचं सैन्य आणि इंग्रजांच्या सैन्याची लढाई झाली. यात ऊदा देवींचे पती मक्का पासी यांचा मृत्यू झाला.

दलित लेखक आणि पत्रकार मोहनदास नैमिशराय म्हणतात, "ऊदा देवींच्या पतीच्या मृत्यूने त्यांच्या जीवनाची दिशा बदलली, त्यांचे विचार बदलले असं मला वाटतं. त्यांच्या पतीचा मृत्यू झाला, इतरही अनेक लोक मेले असतील. तेव्हा त्यांना वाटलं की मला काहीतरी करायला हवं."

पतीच्या मृत्यूने दुःखी झालेल्या ऊदा देवींनी इंग्रजांविरोधात कसा सूड घेतला? ऊदा देवी पासी समुदायाच्या होत्या. इतिहासकारांचा एक वर्ग मानतो की ऊदा देवींनी शौर्यांचे मापदंड प्रस्थापित केले. तारीख होती 16 नोव्हेंबर 1857. लखनऊच्या सिंकदराबाद भागात एक भलंमोठं पिंपळाचं झाड होतं.

आपल्या पतीच्या मृत्युचा सूड घ्यायला ऊदा देवींनी 36 इंग्रजांना या झाडावर चढून ठार केलं.

इतिहासकार आणि लेखक राजकुमार म्हणतात, "जेव्हा कॅप्टन वायल्स आणि डाऊसन तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की इंग्रजांचे मृतदेह पडलेत. ते थक्क झाले. तेवढ्यात डाऊसनने वर खूण करत म्हटलं की तिथे कोणीतरी आहे."

कुठून गोळ्या झाडल्या जातायत कोणालाच कळत नव्हतं. डाऊसनने लक्षपूर्वक वर पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की गोळ्या वरतून येत आहेत. एक सैनिक वर बसून गोळ्या झाडत होता. त्या सैनिकाने लाल जॅकेट घातलं होतं. मग या लोकांनी खालून गोळ्या झाडल्या. रक्तबंबाळ अवस्थेत त्या खाली पडल्या. इंग्रजांनी पाहिलं की हा पुरुष नाही तर महिला सैनिक आहे. त्या होत्या ऊदा देवी.

ऊदादेवींनी अखेरचा श्वास घ्यायच्या आधी 36 इंग्रज शिपायांना ठार केलं होतं. शौर्याची ही गोष्ट फक्त लोककथा बनून जिवंत राहिली. हे शौर्य गाजवणाऱ्या ऊदा देवींचं नाव मात्र इतिहासाच्या पानात हरवलं.

प्रा बद्रीनाराण तिवारी म्हणतात, "ऊदा देवी फक्त कथा नाही तर प्रत्यक्षात होत्या. हे मान्य केलं पाहिजे कारण त्यांचं वर्णन काही ऐतिहातिक दस्ताऐवज आणि चरित्रात्मक लेखनात सापडतं. या घटनेच्या काही वर्षांनी त्यांच्याविषयी लिहिलं गेलं आहे. त्या कोण आहेत हे फार उशिरा कळलं. इतिहासांच्या पानांमध्ये खोलवर डोकावून पाहिलं तेव्हा कळलं की या घटनेची नायिका ऊदा देवी आहेत."

ऊदादेवींसारख्या अनेक महिलांची नावं इतिहासात हरवून गेली आहेत. त्यांच्या वंशजांची इच्छा आहे की त्यांच्या कर्तृत्वाची दखल आता सरकारने घ्यायला हवी.

त्यांचे वंशज कमल म्हणतात, "वीरांगना ऊदा देवींच्या नावाचा राजकारणासाठी वापर झाला नाही असं म्हणता येईल. पण समाजात चेतना फुलवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सरकारची इच्छा असेल तर त्यांच्या कर्तृत्वाची कहाणी शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांचा यथोचित सन्मान करू शकतं."

ऊदा देवींच्या कहाणीने स्वातंत्र्य लढ्यातलं दलित महिलांचं योगदान प्रकाशात आणलं आहे. भारतातल्या खऱ्याखुऱ्या लोकांची कहाणी आहे ही.

रिपोर्टर - सुशीला सिंह

एडिट - दिपक जसरोटीया

शूट - देवेश सिंह, दिपक जसरोटीया, सुभाष भट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)