युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा आज सातवा दिवस, आतापर्यंत काय काय घडलं?
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा आज सातवा दिवस आहे. युक्रेनवरील हल्ले वाढल्यानंतर लाखो लोक युक्रेन सोडून पलायन करत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी घडत आहेत. त्याची इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या लाइव्ह पेजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. तत्पूर्वी काय घडले हे आपण पाहू.
- कीव्हमध्ये टीव्ही टॉवरजवळ स्फोट. कीव्ह मधल्या टीव्ही टॉवरच्या परिसरातून धुराचे मोठाले लोट उठताना दिसत होते.
- रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं कीव्हच्या नागरिकांना इशारा दिला आहे. युक्रेनच्या राजधानीतल्या निवडक ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत.
- युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दोन विमानं मंगळवारी दिल्लीमध्ये पोहोचली. त्यांपैकी एक विमान हंगेरीहून आलं आहे.
- युक्रेनच्या खारकीव्हमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेला भारतीय विद्यार्थी कर्नाटकचा होता.
- युक्रेनमध्ये झालेल्या गोळीबारात मृत्यमूखी पडलेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी निश्चित धोरण हवं, असंही राहुल गांधींनी म्हटलं.
- युक्रेनमधलं दुसरं मोठं शहर असलेल्या खारकीव्हमध्ये झालेल्या एका मोठ्या स्फोटामध्ये किमान दहा लोक ठार झाले आणि 20 जण जखमी झाले आहे
- युरोपियन युनियनच्या विशेष सत्राला युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमीर जेलेन्स्की यांनी संबोधित केलं. त्यांच्या या भावूक भाषणानंतर सर्वांनी उठून उभं राहात त्यांचं अभिनंदन केलं. दुसरीकडे, रशियाच्या प्रतिनिधींच्या भाषणाकडे सर्वांना पाठ फिरवली.
कालचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीच्या या पेजला भेट द्या.