मुंबईत अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा, मुद्दाम उशीर केल्याचा ठाकरेंचा आरोप

लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानात आज मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील एकूण 13 मतदारसंघांसाठी मतदान झालं. या 13 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 48.66 टक्के मतदान झालं.
यात मुंबईत अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेबाबत नाराजीच्या तक्रारी पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी गोंधळ झाल्याचंही पाहायला मिळालं.
मुंबईत अनेक मतदान केंद्रांबाहेर लांबच्या लांब रांगा असल्याचं पाहायला मिळालं. प्रचंड उन्हामुळं अनेक मतदार मतदान न करताच परतले, अशा तक्रारीही करण्यात आल्या.
तसंच, कल्याण, पवई, आर.ए.कॉलनी अशा, माहीम अशा काही भागांमध्ये गदारोळ झाल्याचंही समोर आलं.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. तसंच मतदान कमी व्हावं म्हणून मुद्दाम मतदान केंद्रांमध्ये उशीर केला जात असल्याची तक्रार करण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिवसेनेचे आरोप फेटाळून लावले.
नागरिकांची तक्रार
दोन तासापासून रांगेत उभे आहोत पण पाण्याची किंवा इतर काहीही सोय नाही. तसंच, मतदान केंद्रात सोडायलाही उशीर केला जात असल्याची तक्रार अँटॉप हिल येथील मतदान केंद्रातील नागरिकांनी केली.
मतदार मतदान न करताच गेले - उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला.
निवडणूक आयोगाकडून जाणूनबुजून पक्षपातीपणा केला जात असल्याची तक्रार उद्धव ठाकरे यांनी केली. "मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी आले. पण त्यांना वेळ लावून ताटकळत ठेवल्यानं मतदार परतत आहेत," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मतदारांनी मतदान केंद्रावर जावं आणि कितीही उशीर झाला तरी मतदान होईपर्यंत तिथून जाऊ नये, असं आवाहन ठाकरेंनी केलं.
मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करू नये म्हणून मोदी सरकारचा हा डाव असल्याची तक्रारही त्यांनी केलं. शिवसेनेला ज्या भागात मतदान जास्त होतं, त्या भागातून तक्रारी मिळाल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मोदी सरकार पराभवाच्या भीतीनं पछाडलं आहे. त्यामुळं ते मुद्दाम लोकांना ताटकळत ठेवत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अत्यंत घाणेरडा खेळ खेळला जात असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंची तक्रार
आदित्य ठाकरे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून निवडणूक आयोगाच्या सावळ्या गोंधळाची तक्रार केली. निवडणूक आयोगानं मतदारांसाठी पुरेशी व्यवस्था केली नसल्याचं ते म्हणाले. मतदार तासनतास उन्हात उभे आहेत. सावली, पाणी, पंखे अशी काहीही व्यवस्था नाही. आम्ही सोयी करू शकत नाही, पण निवडणूक आयोगानं व्यवस्था का केली नाही, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
आदेश बांदेकरांनी शेअर केला व्हिडिओ
शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनीही मुंबईच्या पवई भागातील परिस्थितीबाबतचा व्हिडिओ पोस्ट करत तक्रार केली. याठिकाणी यंत्र बंद पडल्यामुळं सुमारे तासभर मतदान प्रक्रिया बंद होती, अशी तक्रार काही नागरिकांनी केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
रांगेत असलेल्या प्रत्येकाला मतदान करता येणार - निवडणूक आयोग
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी मात्र 6 पर्यंत रांगेत असलेल्या प्रत्येक मतदाराचं मतदान झाल्याशिवाय मतदान प्रक्रिया थांबणार नसल्याचं सांगितलं. नियमानुसार सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या परिसरात रांगेत असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरेंचे रडगाणे - फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांनंतर उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली, असं फडणवीसांनी सांगितलं.
"नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केलीय," असं फडणवीस म्हणाले.
4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी उद्धव ठाकरे आताच तयार करीत आहेत. तसंच निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचंही ते म्हणाले.









