आमचं सरकार आलं तर अग्निवीर योजना कचऱ्यात टाकू - राहुल गांधी
19 मे च्या ताज्या बातम्या, अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील
थोडक्यात
- इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसींच्या ताफ्याला घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात.
- उड्डाणानंतर एअर इंडियाच्या विमानातील इंजिनानं घेतला पेट, सर्व प्रवाशी सुरक्षित.
- नैऋत्य मोसमी वारे अंदमानजवळ दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून जाहीर.
- इस्रायलच्या संरक्षण मंत्री योवाह गॅलंट यांचा राजीनाम्याचा इशारा
- गाझात आणखीन एका ओलिसाचा मृत्यू झाल्याचा इस्रायली लष्कराचा दावा
- काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या कट्टरतावादी गटांकडून हल्ला, भाजपा संबंधित माजी सरपंचाची हत्या, तर दोन पर्यटक जखमी
- चेन्नई सुपर किंग्सला हरवून रॉयल चॅलेंजर बंगळुरू IPL-17 प्लेऑफ मध्ये पोहोचली आहे.
- नवी दिल्ली येथे आज दुपारी 12 वाजता अरविंद केजरीवाल भाजप कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत
लाईव्ह कव्हरेज
चांद्रमोहीम : भारत, चीन, अमेरिका - कोणत्या देशाचा अंतराळवीर चंद्रावर पुढचं पाऊल टाकेल?
ब्रेकिंग, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर कोसळले

फोटो स्रोत, Reuters
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी यांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यातील एका हेलिकॉप्टरचा रविवारी (19 मे) अपघात झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमाने दिली आहे
यामध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रईसी हे अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते की नाही याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
इराणच्या गृहमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पण खराब हवामानामुळे तिथे पोहोचणं कठीण जात आहे.
बचाव पथकासोबत उपस्थित असलेल्या फार्स न्यूजच्या रिपोर्टरनुसार, दाट धुक्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या डोंगराळ आणि झाडांनी भरलेल्या प्रदेशात केवळ पाच मीटरपर्यंतच दूरचं दिसत आहे.
ज्या भागात हेलिकॉप्टरने हार्ड लँडिंग केले ते वर्जेकन शहराजवळ आहे. हे ठिकाण ताब्रिझ शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे.
ताब्रिझ ही इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताची राजधानी आहे.
कोण आहेत इब्राहिम रईसी?
इब्राहिम रईसी यांचा जन्म 1960 मध्ये इराणचे दुसरे सर्वात मोठे शहर मशहाद येथे झाला. याच शहरात शिया मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र मानली जाणारी मशीददेखील आहे.
रईसी यांचे वडील मौलवी होते. ते पाच वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले.
इब्राहिम रईसी नेहमीच शिया परंपरेनुसार काळी पगडी घालतात. ज्यावरून अशी मान्यता आहे की ते पैगंबर महंमदाचे वंशज आहेत.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या 15 व्या वर्षांपासून त्यांनी कोम शहरातील शिया संस्थेत शिक्षण सुरू केले.
आपल्या विद्यार्थी जीवनात त्यांनी पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेल्या मोहम्मद रेझा शहा यांच्याविरोधात निदर्शनं केली होती. त्यानंतर अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांनी 1979 मध्ये इस्लामी क्रांतीच्या माध्यमातून शहा यांना सत्तेवरून काढून टाकले.
आमचं सरकार आलं तर अग्निवीर योजना कचऱ्यात टाकू - राहुल गांधी

फोटो स्रोत, INC
केंद्रात आमचं सरकार स्थापन झालं तर सैन्य भरतीसाठी मोदी सरकारने सुरू केलेली अग्निवीर योजना बंद करू, असं राहूल गांधी यांनी म्हटलं आहे.
ते रविवारी (19 मे) उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे एका निवडणूक रॅलीला बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
"INDIA आघाडीचं सरकार आलं तर अग्निवीर योजना कचऱ्यात टाकू. तसचं जुन्या पद्धतीने सर्व सैनिकांना सुविधा देऊ आणि कुणासोबत दुजाभाव केला जाणार नाही," असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
ते पुढं म्हणाले, "हा लढा संविधानाचा आहे. भाजप, आरएसएसकडून त्यावर हल्ला होतोय. मी त्यांना सांगू इच्छितो की आंबेडकरांचे संविधान, जवाहरलाल नेहरूंचे संविधान आणि हे लोकांचे संविधान आहे. त्यात आम्ही बदल होऊ देणार नाही."
या रॅलीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांना आपले भाषण लवकर संपवावे लागले. तरुणांची गर्दी राहुल आणि अखिलेश यांच्या अगदी जवळ पोहोचली होती.
नरेंद्र मोदींनी 22 लोकांना अब्जाधीश बनवलंय. त्यांनी 22 लोकांना सर्व फायदे दिले आहेत. असाही आरोप गांधी यांनी केला.
"आमचं सरकार आलं तर आपण कोट्यवधी लोकांना करोडपती बनवणार आहोत. भारतातील सर्व गरीब लोकांची यादी बनवली जाईल. प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेचे नाव निवडले जाईल आणि त्यानंतर आम्ही करोडो महिलांच्या खात्यात वर्षाला 1 लाख रुपये आणि दरमहा 8500 रुपये जमा करू," असंही गांधी पुढं म्हणाले.
त्वचेच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मेंदूच्या कर्करोगातून 'असं' केलं स्वतःला बरं
एअर इंडियाच्या विमानातील इंजिनानं उड्डाणानंतर घेतला पेट, प्रवाशांनी काय सांगितले?

फोटो स्रोत, ANI/Getty Images
बंगळुरूमध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील इंजिनानं उड्डाणानंतर पेट घेतला.
ही घटना 18 मेच्या रात्री घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसचं IX 1132 हे विमान बंगळुरूहून कोचीला जात होतं. बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनन विमानानं उड्डाण केलं, पण काही मिनिटांतच इंजिनातून जाळ बाहेर पडत असल्याचं लक्षात आल्यानं विमान माघारी फिरलं.
विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनात आग लागल्याचं प्रवाशांनी टिपलेल्या व्हिडियोंतून दिसतं. रात्री 11:12 वाजता बंगळुरूत या विमानानं इमर्जन्सी लँडिंग केलं. त्यानंतर प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. ही आग लगेच विझवण्यात आली.
विमानातले सर्व 177 प्रवाशी आणि सहा कर्मचारी सुखरूप आहेत. एयर इंडियानं प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल असं सांगितलं, पण लगेच दुसरं विमान उपलब्ध झालं नाही.
त्यामुळे अनेक प्रवाशांना एयरपोर्टवरच रात्र काढावी लागली. रविवारी (19 मे ) सकाळी 122 प्रवाशांना एयर इंडियाच्या दुसऱ्या विमानानं कोचीला नेलं. इतरांची व्यवस्था केली जात असल्याचं एयर इंडिया एक्सप्रेसनं म्हटलं आहे. ही आग का लागली, याचा तपास केला जाईल, असंही एयर इंडिया एक्सप्रेसनं म्हटलं आहे.
विमानातून प्रवास करणारे डॉ जेफ्री चेरी यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं आहे, “केवळ काहीजणांना हॉटेलमध्ये नेलं गेलं. बहुतांश प्रवासी, ज्येष्ठ नागरीकही एयरपोर्टवर बसून होते. त्यांनी आम्हाला खायला दिलं आणि पाणीही दिलं.”
चेरी सांगतात की आग लागल्याचं लक्षात आलं, तेव्हा पायलटनं घाबरून जाऊ नका म्हणून विनंती केली. आम्हाला सामान न घेता विमानातून उतरा असं सांगण्यात आलं होतं. काही जणांनी आपल्या बॅगा मिळाव्यात म्हणून मागणी केली.
आधी ते आमचं सामान थेट दुसऱ्या विमानात पाठवणार होते. पण काहींना औषधं घ्यायची होती, म्हणून त्यांनी शेवटी सामान आणून दिलं.
शनिवारीच तिरुवनंतपुरमहून बंगळुरूला जाणारं एयर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाचं तांत्रिक बिघाडामुळे तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केलं होतं.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
अचानक दारू सोडल्यावर काय होतं? दररोज किती दारू पिणं सुरक्षित असतं?
मान्सून कुठे पोहोचला, राज्यात उष्णतेची लाट कुठे आहे?
नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागात आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
मान्सूनची उत्तरेकडची सीमा मालदीवच्या काही भागात, निकोबार बेटांमध्ये तसंच दक्षिण अंदमान समुद्रातून जातत असल्याचंही हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. 31 मे पर्यंत मान्सून भारताच्या मुख्य भूमीवर, केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती.
यात ± 4 दिवस, म्हणजे चार दिवस पुढे मागे होऊ शकतं असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये, 5 जूनच्या आसपास गोव्यात, 10 जूनच्या आसपास मुंबईत आणि 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अवतरतो.
आम आदमी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्याच कार्यालयाबाहेर थांबवलं - दिल्ली पोलीस

फोटो स्रोत, ANI
दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना पक्ष कार्यालयाबाहेर रोखल्याचा दावा केला आहे.
मध्य दिल्लीचे डीसीपी हर्षवर्धन मंडावा यांनी एएनआयला सांगितले की, मी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था केली होती. आम्ही त्यांना (केजरीवाल) आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर थांबवलं.
आम्ही त्यांना सांगितलं की येथे कलम 144 लागू आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल दुपारी 12 वाजता आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पोहोचले.
भाजप मुख्यालयाकडे कूच करण्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर 'ऑपरेशन झाडू' चालवल्याचा आरोप केला. त्यांच्या सर्व नेत्यांना अटक करण्याची योजना आखली जात आहे, त्यामुळे आज भाजप मुख्यालयात स्वतःला अटक करवून घेणार असल्याचं ते म्हणाले.
'तर केंद्रीय मंत्रिपद सोडू', नेत्यनाहू सरकारमधील युद्ध मंत्र्यांनी दिला इशारा

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, केंद्रीय युद्ध मंत्री बेन्नी गॅंट्झ येत्या 8 जूनपर्यंत जर पंतप्रधान बेंजमिन नेत्यनाहू यांनी युद्धानंतर गाझा पट्ट्याचे भवितव्य काय असेल याबाबतची योजना जाहीर केली नाही तर केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊ असे केंद्रीय युद्ध मंत्री बेन्नी गॅंट्झ यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना सुनावले आहे.
रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या 'सहा उद्दिष्टां'ची पूर्तता व्हावी असे गॅंट्झ यांनी सुचवले आहे. त्यात गाझामध्ये असलेल्या हमासची सत्ता संपूर्णपणे नष्ट करण्यात यावी, हे देखील एक उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांबाबत स्पष्टता देण्यासंदर्भात गॅंट्झ यांनी 8 जूनची मुदत दिली आहे.
'जर स्वतःचे हित बाजूला ठेवून राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवाल तर तुम्हाला या संघर्षाच्या काळात एक साथीदार मिळेल अन्यथा तुम्ही आंधळेपणाने राष्ट्राला विनाशाच्या गर्तेत लोटणार असाल तर आम्ही मंत्रिमंडळातील पदांचा राजीनामा देऊ,' असे गॅंट्झ यांनी म्हटले आहे. गॅंट्झ यांचे वक्तव्य 'अर्थहीन' असल्याचे पंतप्रधान नेत्यनाहूंनी म्हटले आहे.
'असे उद्गार काढणे म्हणजे इस्रायलचा पराभव मान्य करण्यासारखे आहे,' असे नेत्यनाहू म्हणाले. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांमध्ये राजकीय तणाव पाहायला मिळत आहे.
नुकताच इस्रायलच्या संरक्षण मंत्री योवाह गॅलंट यांनी म्हटले होते की नेत्यनाहूंनी हे स्पष्ट करावे की गाझावर प्रशासकीय अथवा लष्करी ताबा मिळवण्याचा आमचा काही मानस नाही. सातत्याने आपण हा मुद्दा उचलत आलो आहोत पण त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याचे गॅलंट यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप कार्यालयाकडे निघण्याआधी अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप मुख्यालयावर मोर्चा काढण्यापूर्वी आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले.
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर 'ऑपरेशन झाडू' चालवल्याचा आरोप केला. त्यांच्या सर्व नेत्यांना अटक करण्याची योजना आखली जात आहे, त्यामुळे आज भाजप मुख्यालयात जाऊन स्वतःला अटक करवून घेणार असल्याचं केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले की आज आम्ही मोर्चा काढणार असून पोलीस आम्हाला जिथे अडवतील तिथे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. आणि अर्ध्या तासात त्यांना अटक केली नाही तर हा भाजपचा पराभव असेल, असं केजरीवाल म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
ते म्हणाले की, “पंतप्रधानांनी आम आदमी पक्षाला पूर्णपणे नष्ट करण्याचा आणि चिरडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ऑपरेशन झाडू सुरू केले आहे. आम्हाला ओळखणारे बरेच लोक भेटायला जातात. त्यांना भेटल्यानंतर ते आम्हाला सांगतात की पंतप्रधान आम आदमी पार्टीबद्दल बोलतात.”
“ते (मोदी) म्हणाले की हा आम आदमी पक्ष खूप वेगाने वाढत आहे आणि त्याच्या कामांवर चर्चा केली जात आहे आणि आगामी काळात आम आदमी पक्ष राष्ट्रीय स्तरावर भाजपसाठी कठीण आव्हान असू शकते. त्यामुळे भविष्यात भाजपसाठी आव्हान बनू नये म्हणून हा पक्ष आताच संपवला पाहिजे, असे पंतप्रधानांचे मत आहे.
ऑपरेशन झाडू अंतर्गत आम आदमी पार्टीच्या मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली असून त्यांना पुन्हा अटक करण्यात येईल. येत्या काळात आम आदमी पक्षाची बँक खाती जप्त केली जातील. आम आदमी पार्टीचे कार्यालय रिकामे करून रस्त्यावर आणले जाईल."
"मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की जर त्यांनी एका केजरीवालला अटक केली तर या देशात हजारो केजरीवाल जन्माला येतील."
केजरीवाल म्हणाले की, 2015 मध्ये सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकारच्या घोटाळ्यांचे आरोप झाले पण पैसा कुठे आहे. ते म्हणाले की, दारू घोटाळ्यात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतो, मात्र तपास यंत्रणांना त्यात एक पैसाही सापडला नाही.
कुठे वादळी पाऊस तर कुठे उष्णतेची लाट, पुढचे काही दिवस महाराष्ट्रावर तीव्र हवामानाचं सावट

फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि वादळी पाऊस एकाच वेळी पाहायला मिळतायत.
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यावरही या तीव्र हवामानाचं सावट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये 13 मतदारसंघांत सोमवारी 20 तारखेला मतदान होत असून, त्यापैकी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये या दिवशी उष्ण हवामानासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इथे काही ठिकाणी तापमान उष्ण आणि दमट राहील असं हवामान खात्यानं 18 एप्रिलला जारी केलेल्या पाच दिवसांच्या हवामान अंदाजात म्हटलं होतं. तर धुळे आणि नाशिकमध्येही हवामान कोरडे राहील असं भाकित हवामान खात्यानं केलं आहे.

मुंबईतल्या उष्ण हवामानाचा परिणाम मतदानवर होणार नाही, अशी आशा राजकीय कार्यकर्ते आणि निवडणूक अधिकाऱ्यांना वाटते आहे.
गेल्या आठवड्यात सोमवारीच उत्तर कोकणात वादळी पावसामुळे दुपारनंतर मावळ मतदारसंघातल्या काही भागात मतदानावर परिणाम झाल्याचं दिसलं होतं.
आता या सोमवारीही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40-50 किमी वेगानं वाहणारा सोसाट्याचा वारा तसंच हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज आहे.
परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये काही ठिकाणी अशा पावसाची शक्यता आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब, हरयाणा, चंदीडगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या भागांतही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून गोव्यासह दक्षिणेकडेच्या सर्व राज्यांत अनेक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून इथे रेड अलर्ट देण्यात आला आहे. 19 तारखेच्या आसपास अंदमान समुद्रात दक्षिण भागात मॉन्सून तयार होईल आणि 31 मे पर्यंत केरळमध्ये भारताच्या मुख्य भूमीत दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच बंगालच्या उपसागरात 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.
आपचे नेते सौरभ भारद्वाज यांचा आरोप - आमच्या नेत्यांविरोधात षडयंत्र रचलं जातंय
आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी 'आमच्या नेत्यांविरोधात षडयंत्र रचले जात आहे' असं म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दुपारी 12 वाजता आम आदमी पार्टी भाजपच्या मुख्यालयावर निदर्शने करणार असल्याची घोषणा केली आहे.
सौरभ भारद्वाज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले की, "आमच्या सर्व मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे."
केजरीवाल 20 दिवसांपासून जामिनावर बाहेर आहेत, पण ते (भाजप) रोज नवीन कट रचत आहेत आणि आमच्यावर गुन्हे दाखल करत आहेत.

फोटो स्रोत, ANI
"जर मोदीजी आम आदमी पक्षाचा द्वेष करतात आणि त्यांना वाटत असेल की ते नेत्यांना तुरुंगात टाकून आमचा पक्ष नष्ट करू शकतात, तर त्यांची चूक आहे."
सौरभ भारद्वाज म्हणाले, "आज आम्ही दुपारी 12 वाजता भाजप मुख्यालयात जाणार आहोत, त्यांनी आमच्या नेत्यांना एकामागून एक तुरुंगात टाकण्याचे नाटक थांबवावे आणि आम्हा सर्वांना एकत्र अटक करावी."
दिल्ली पोलिसांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? ते केंद्र सरकारचे काम करत आहेत आणि त्यांनी सरकारचे आदेश न पाळल्यास त्यांची एकतर बदली केली जाईल किंवा निलंबित केले जाईल किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातील.
स्वाती मालीवाल आणि बिभव कुमार यांच्या प्रकरणावरून लक्ष हटवायचे असल्याने अरविंद केजरीवाल हे आंदोलन करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
गाझात आणखीन एका ओलिसाचा मृत्यू झाल्याचा इस्रायली लष्कराचा दावा

फोटो स्रोत, FAMILY HANDOUT
इस्रायली सैन्याने दावा केला आहे की गाझामध्ये आणखी एका ओलीसाचा मृतदेह त्यांनी ताब्यात घेतला आहे.
इस्रायली लष्कराचे म्हणणं आहे की, 53 वर्षीय रॉन बेंजामिनचा मृतदेह शुक्रवारी इतर तीन ओलिसांच्या मृतदेहांसह सापडला आहे. इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरला 53 वर्षीय बेंजामिन रोजी गाझा सीमेजवळ एका सायकल ट्रिपमध्ये सहभागी झाले होते.
हमासच्या सैनिकांनी ऑक्टोबर 2015 मध्ये इस्रायलवर हल्ला केला होता. इस्रायलचा दावा आहे की हमासच्या हल्ल्यात 1200 लोक मारले गेले, तर गाझामध्ये 252 लोकांना ओलिस ठेवण्यात आलं आहे.
इस्रायली लष्कराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलं आहे की बेंजामिन यांचा 7 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता.
इस्रायली लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह रॉन बेंजामिनचा असल्याचे समजले असून त्याच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
शुक्रवारी इस्रायली लष्कराने उत्तर गाझामधील जबलिया येथे तीन ओलीसांचे मृतदेह सापडल्याचा दावा केला.
हमास संचालित आरोग्य मंत्रालयाचा दावा आहे की 7 ऑक्टोबरपासून इस्रायली सैन्याच्या हल्ल्यांमुळे 35 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुसंख्य मुले आणि महिलांचा समावेश आहे.
अरविंद केजरीवाल आज भाजप कार्यालयावर मोर्चा नेणार, भाजप म्हणालं 'नौटंकी' थांबवा

कथित दारू घोटाळा प्रकरणात जामिनावर सुटलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे.
यावेळी ते म्हणाले की , "मी उद्या (19 मे) दुपारी 12 वाजता दिल्लीतल्या भाजपच्या कार्यालयात पोहोचणार आहे." केजरीवाल म्हणाले की, "मी माझ्या पक्षातील सगळे नेते आणि आमदारांना घेऊन उद्या दुपारी 12 पर्यंत भाजपच्या मुख्य कार्यालयात जाणार आहे, तुम्हाला ज्या ज्या माणसाला तुरुंगात टाकायचं असेल त्याला तुम्ही तुरुंगात टाकावं."
भारतीय जनता पक्ष आम आदमी पक्षाचं खच्चीकरण करत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. ते म्हणाले की आम आदमी पक्ष हा एक विचार आहे, तुम्ही आमच्या पक्ष्याच्या जेवढ्या नेत्यांना तुरुंगात पाठवाल तेवढेच नवीन नेते तयार होतील.
दुसरीकडे भाजपने अरविंद केजरीवाल 'नौटंकी' करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेव म्हणाले की स्वाती मालिवाल यांच्याबाबत केजरीवाल शांत आहेत आणि दुसरीकडे अशी 'नाटकं' करतायत.
धोनी विरुद्ध विराट युद्धात, बंगळुरूची सरशी, चेन्नई स्पर्धेबाहेर

फोटो स्रोत, Getty Images
काल (18मे) झालेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सचा विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दारुण पराभव करत चेन्नईला आयपीएलच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' अशी परिस्थिती होती आणि ऐन मोक्याच्या क्षणी यश दयाल या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने धोनीला तंबूत पाठवलं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा करण्यात चेन्नईचा संघ कमी पडला.
चेन्नई आणि बंगळुरू या दोन्ही संघांचे गुण समान होते पण चांगल्या नेट रनरेटच्या बळावर बंगळुरूने आयपीएलच्या प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्याच ओव्हरपासून आक्रमक फलंदाजी करत बंगळुरूच्या फलंदाजांनी 218 धावांचा डोंगर उभा केला.
हा डोंगर सर करण्यासाठी पिवळे कपडे घालून मैदानात उतरलेला चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड फारसं काही करू शकला नाही. तो ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि चेन्नईच्या डावाला घरघर लागली.
धोनी फलंदाजीला आला तेंव्हा 218 धावांचा लक्ष्य अशक्यप्राय वाटत असलं तरी प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी चेन्नईला 201 धावा काढणं गरजेचं होतं पण चेन्नईचा संघ तेही करू शकला नाही.
पहिल्या 7 सामन्यांमध्ये केवळ एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरलेल्या विराटच्या संघाने आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन करत सलग सहा सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गोळीबार, भाजपशी संबंधित असणाऱ्या माजी सरपंचाचा मृत्यू

फोटो स्रोत, ANI
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तोंडावर कट्टरतावाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. या दोन्ही घटना दक्षिण काश्मीरमध्ये घडल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये एक घटना घडली ज्यामध्ये एजाज अहमद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एजाज अहमद हे माजी सरपंच होते आणि भारतीय जनता पक्षाचं काम करायचे.
दुसरी घटना अनंतनागमध्ये घडली ज्यात कट्टरपंथीयांनी केलेल्या गोळीबारात दोन पर्यटक जखमी झाले आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागच्या यन्नारमध्ये ही घटना घडली, राजस्थानच्या जयपूरहून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या फरहा आणि त्यांचे पती तबरेज हे गोळीबारात जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील पाच जागांवर पाच टप्प्यात मतदान होणार आहे. येथील श्रीनगर लोकसभा जागेवर 13 मे रोजी मतदान पूर्ण झालं आणि बारामुल्लामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे.
नमस्कार
देशात निवडणुका सुरू आहेत. पाच टप्प्यातील मतदान आता संपले आहे. आज दुपारी 12.00 वाजता आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप कार्यालयावर मोर्चा नेणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक गोष्टी सुरू आहेत. इस्रायल विरुद्ध हमास युद्ध सुरू आहे, तसेच रशिया विरुद्ध युक्रेन युद्धदेखील सुरू आहे. या सर्व घडामोडी आम्ही तुम्हाला लाइव्ह पेजच्या माध्यमातून सतत देत राहू.
18 मे च्या घडामोडी वाचण्यासाठी बीबीसी मराठीच्या पेज ला भेट द्या.

