किरगिझस्तानमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने नोंदवला निषेध

फोटो स्रोत, MUHAMMAD BILAL
बिश्केकमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरुद्ध झालेल्या हिंसेसंदर्भात किरगिझस्तानच्या सरकारकडं निषेध नोंदवला असल्याचं पाकिस्ताननं सांगितलं आहे.
परदेशी विद्यार्थी आणि स्थलांतरित कामगारांबरोबर स्थानिक लोकांची चकमक झाली होती. त्यानंतर बिश्केकमध्ये दंगलविरोधी पथक तैनात करावं लागलं होतं.
या हिंसेमध्ये किमान 28 जण जखमी झाले आहेत आणि काही जणांना अटक करण्यात आली आहे.
किरगिझस्तान आणि इजिप्तच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर आक्रमक झालेल्या गर्दीनं परदेशी विद्यार्थ्यांच्या होस्टेलला घेराव घातला होता.
किरगिझस्तानात परदेशातून आलेल्या मजुरांची संख्या वाढत असल्यामुळं अनेक स्थानिक तरुणांमध्ये असंतोष आहे.
एकिकडं किरगिझस्तानमधील अनेकांना रोजगारासाठी रशियात जावं लागतं. तर दुसऱ्या बाजूला देशात मोठ्या संख्येनं परदेशातील लोक काम करत आहेत.
किरगिझस्तान सरकारनं देखील मागील काही वर्षात परदेशी मजुरांबाबत कडक धोरणं अवलंबण्यास सुरुवात केली आहे.
सरकारनं बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना मोठ्या संख्येने देशातून बाहेर काढलं आहे.
अनेक आशियाई देशांचे विद्यार्थी देखील किरगिझस्तानात शिक्षण घेतात.


















