राष्ट्र महाराष्ट्र : लाडक्या बहिणींना जे पैसे दिले, ते पुन्हा परत घेणं असा कद्रूपणा करणार नाही - शिंदे

महाराष्ट्रातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने BBC न्यूज मराठी 'राष्ट्र महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्रातील विद्यामान सरकारच्या कामगिरीवर चर्चेसाठी बीबीसी मराठीचा 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रम
  • बीबीसीच्या मंचावर महायुती सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा आणि त्यावर चर्चा
  • सत्ताधारी मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेतेही यात सहभागी होत आहेत.
  • आतापर्यंत आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांनी आपलं म्हणणं मांडलं
  • यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि जंयत पाटील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत

लाईव्ह कव्हरेज

बीबीसी मराठी टीम

  1. 'शक्तीपीठ महामार्गा'बद्दल एकनाथ शिंदे म्हणाले...

    • लोकांच्या सहमतीशिवाय शक्तीपीठ महामार्ग होणार नाही.
    • महामार्ग झाला तर लोकांचाच फायदा होईल. हे सगळं लोकांसाठीच सुरु आहे. त्यांच्या सहमतीशिवाय करणार नाही.
    • समृद्धी महामार्गाला असाच विरोध होता. मात्र, नंतर लोकांना जेव्हा कळलं की हा आपल्या फायद्याचा आहे, तेव्हा लोकांनी सहमती दिली.
    एकनाथ शिंदे

    राज्यातील धार्मिक ध्रुवीकरण उद्योगांना मारक नाहीये का, या प्रश्नावर ते म्हणाले...

    • लोकसभेआधी कुणी ध्रुवीकरण केलं? कुणी विरोधात बोलला तर त्या पत्रकारालाही अटकेत टाकलं.
    • केतकी चितळे, कंगणा रणौत, नारायण राणे या सगळ्या प्रकरणात काय झालं?
    • अंबानींच्या घराखाली जिलेटीन कुणी ठेवलं?
    • वातावरण दुषित ठेवण्याचं काम विरोधक जाणीवपूर्वक करत आहेत.
    • आम्हाला महाराष्ट्र शांतच हवा आहे. हे पुरोगामी राज्य आहे. आम्हाला वातावरण दुषित करायचं नाही.
    • त्यामुळे, नागपूरमध्ये जी दंगल झाली, त्यात मुख्यमंत्री आणि मी स्वत: जातीनं लक्ष घालत होतो.
    • आम्ही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत आहोत.
    • हे उद्योग-स्नेही राज्य आहे. त्यासाठी जे जे काही करावं लागेल, ते आम्ही करु.
  2. लाडकी बहिण योजनेबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...

    • पात्र बहिणी योजनेपासून वंचित राहणार नाहीत.
    • मात्र, जे पैसे गेलेले आहेत, ते पुन्हा परत घेणं असा कद्रूपणा आम्ही करणार नाही.
    • अपात्र महिलांकडे जे पैसे गेले आहेत, त्यांच्याकडून पुन्हा कसे वसूल करायचे, त्याचे मार्ग शोधले जातील.
    • विरोधकांना असं वाटत होतं की, आम्ही हे पैसे निवडणुकीनंतर देणार नाही. मात्र, आम्ही देणारे लोक आहोत, घेणारे नाही.
    • विरोधक तोंडघशी पडले. ते म्हणत होते की, पंधराशे रुपये कुठून देणार? आणि शेवटी स्वत:चं तीन हजार रुपयांचं आश्वासन दिलं.
    एकनाथ शिंदे

    फोटो स्रोत, bbc

    मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न तुमच्या शिवसेनेकडून केला जातोय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी याच मंचावर केला, यावर काय सांगाल...

    • याच लोकांनी देवेंद्रजींना फडतूस वगैरे म्हटलं. पण मग आता त्यांना हे लोक का भेटतात? देवेंद्रजींचं काडतूस निघेल म्हणून भेटतात का ते?
    • आम्ही जे करतो, ते खुलेआम करतो. पोटात एक ओठात एक असं करत नाही.
    • देवेंद्रजींबद्दल तुमच्या काय भावना होत्या, ते आम्हाला माहिती आहे.
    • आमच्या दोघांमध्ये कुणी कितीही प्रयत्न केले तरी आमची दोस्ती तुटणार नाही. कारण आमची लढाई खुर्चीसाठी वा स्वार्थासाठी नाहीये.
    • महायुती अत्यंत मजबूत आहे.
  3. महाराष्ट्रातील धार्मिक ध्रुवीकरणावर एकनाथ शिंदे म्हणाले...

    • आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, याचा अर्थ दुसऱ्या धर्माचा द्वेष करा, असं कधीच नाहीये. हिंदुत्व हे व्यापक आहे. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं हिंदुत्व नाहीये.
    • बाळासाहेब सच्च्या आणि राष्ट्रभक्त मुस्लिमांच्या विरोधात नव्हते.
    • जे पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके फोडतात, ते मुसलमान देशाचा दुष्मन आहेत.
    • आम्ही विकासाला महत्त्व देतो. आमच्या योजनेत मुसलमान फायदा घेत नाहीत का? लाडक्या बहिणी फायदा घेत नाहीयेत का? आम्ही कुठे फरक केला आहे?
    • देशाच्या विरोधात काम करणारा कोणीही असो, तो देशाचा दुष्मन आहे.मग कोणत्याही धर्माचा असो.
    एकनाथ शिंदे
    • लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पात्र बहिणी योजनाबाह्य होणार नाहीत. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली होईल, तेव्हा योजनेतील रक्कमही वाढवली जाईल.
    • पायाभूत विकासासंदर्भातील प्रकल्प महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत.
  4. औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे म्हणाले...

    • आमचं एवढंच म्हणणं आहे की, जो औरंगजेब महाराष्ट्राचा घास घ्यायला आला, ज्याने अत्याचार-अन्याय केला. ज्याने छत्रपती संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार केला, त्याचं उदात्तीकरण करू नये.
    • उदात्तीकरण होता कामा नये, ही भूमिका सगळ्या शिवभक्ताची आणि महाराष्ट्रातील प्रत्येकाची आहे.
    • सच्चे देशभक्त असलेले मुसलमान पण त्याचं उदात्तीकरण करणार नाहीत.
    एकनाथ शिंदे
    • विरोधकांना जर सभागृहात चर्चाच करायची नसेल, तर काय बोलणार? चर्चा करायला आणि उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत.
    • आमचं विरोधकांना आवाहन आहे की, तुमची संख्या कमी असली तरीही आम्ही तुम्हाला अंडरइस्टीमेट करत नाहीये. तुम्ही या, विकासावर बोलू.
  5. पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले...

    • बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी तडजोड केली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली. मी मंत्री होतो, माझ्यासोबत आठ मंत्री सोबत आले. त्यानंतर मी झालो मुख्यमंत्री. अडीच वर्षे काम केलं भरपूर.
    • आमचं भांडण खुर्चीसाठी नाहीये. आमचा संघर्ष हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न, त्याच्या समस्या सोडवणं यासाठी आहे.
    एकनाथ शिंदे
    • मी ज्या रोलमध्ये त्या रोलमध्ये काम करतो आहे.
    • पुन्हा मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की, राजकारणात 'जर-तर'ला काही स्थान नसतं.
    • काम करणाऱ्याला पदाचा काहीही फरक पडत नाही.
  6. सरकारच्या पहिल्या 100 दिवसांबाबत काय सांगाल?

    • आधीचं आमचं सरकार आणि आताच सरकार एकच आहे. मुख्यमंत्री बदलला असला तरीही आम्ही टीम म्हणूनच काम करतो.
    • समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो, कारशेडची कामं, अशी सगळी थांबलेली कामं आम्ही मार्गी लावली.
    • शेवटी, आपल्या उद्योजक केव्हा येतात? तुमच्याकडे पायाभूत सुविधा असल्या आणि सोयीसुविधा असल्या तरच उद्योजक येतात.
    • आम्ही दावोसला गेलो आणि अनेक गुंतवणुकीचे करार केले.
    एकनाथ शिंदे
    • आम्ही आरोग्यावर फोकस केलं. शाळांवर फोकस केलं.
    • 'माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित' ही योजना राबवत आहोत.
    • ग्रामीण भागातील आमच्या लाडक्या बहिणी आरोग्याकडं दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी योजना आणल्या.
    • पर्यटनासाठीही आम्ही चालना दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटी करतो आहोत.
    • मी गावी जातो तेव्हा सगळ्यांच्या पोटात दुखतं. मी गावी गेलो तरी नाराज, दिल्लीला गेलो तरी नाराज, शांत बसलो तरी नाराज, काहीही केलं तरी नाराज... मी संवेदनशील माणूस आहे. मी गावी जातो, याचा अभिमान आहे. तिकडे गेलो की मी शेतीत जातो.
    • गावी गेल्यावर मला जरा मानसिक शांतता मिळते, म्हणून मी जातो.
    • काही लोकांना घरं सुटत नाहीत, तेच माझ्यावर असे आरोप करतात.
    • तिथल्या तरुणांना इतर शहरात नोकरीसाठी जायला लागू नये, हा माझा प्रयत्न आहे.
  7. कुणाल कामरा प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

    • खरं म्हणजे आरोपांवर मी प्रतिक्रिया देतच नाही. अडीच वर्षे सातत्याने पहिल्या दिवसापासून सरकार स्थापन झाल्यापासून आरोपांच्या फैरी लोक झाडत होते. आरोपाला मी कामाने उत्तर देणार, असं मी नेहमी म्हणत असतो. आरोपाला आरोपाने उत्तर दिलं तर आपलाच फोकस हलतो.
    • महाविकास आघाडीने ज्या कामावर जे स्टे ऑर्डर दिले होते, ते सगळे उखडून फेकले.
    • बंद पडलेल्या सगळ्या योजना आम्ही सुरू केल्या आणि विकासाला महत्त्व दिलं. विकास आणि कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं.
    • एकीकडे एवढे निर्णय आम्ही घेतले आणि त्याची अंमलबजावणी आम्ही केली. त्यामुळे, आरोपांकडे मी पाहिलंच नाही. कोण काय बोलतंय, त्याकडे बघितलंच नाही.
    एकनाथ शिंदे
    • विधानसभा निवडणुकीत आरोप करणाऱ्यांना घरी बसवलं आणि महायुतीला ऐतिहासिक असा जनमताचा कौल दिला.
    • आम्ही 80 जागा लढवल्या आणि 60 जिंकल्या. समोरच्यांनी 100 जागा लढवलल्या आणि 20 जिंकल्या. आरोपांना आम्ही कामाने उत्तर दिलं म्हणून आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं.
    • आम्ही पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला वगैरे आरोप करुनही जनतेनं जर आम्हाला मँडेट दिला असेल, तर तुम्ही गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे समजून जा.
    एकनाथ शिंदे
    • अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे पण त्याचा गैरफायदा घेऊन बोलणार असाल तर हा एकप्रकारचा व्यभिचार, स्वैराचार आणि एकप्रकारे सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे.
    • याच माणसाने सरन्यायाधीशांबद्दल, पंतप्रधानांबद्दल, निर्मला सीतारमण यांच्याबद्दल, उद्योगपतींबद्दल काय बोलला आहे ते पाहा.
    • हे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये. कुणाची तरी सुपारी घेऊन बोलण्यासारखं आहे.
    • मी यावर दिवसभर बोललो नाहीये आणि बोलणारच नाहीये.
    • तोडफोडीचं समर्थन मी कधीच करत नाही. मात्र, समोरच्यानं आरोप करताना कुठल्या लेव्हलला आरोप करायचं ते तरी पाहिलं पाहिजे.
    • माझी सहन करण्याची ताकद खूप आहे. पण यांची आहे का? मी कधीही कुणावरही रिऍक्ट होत नाही. कामावर फोकस करणं आणि लोकांना न्याय देणं, या माझ्या भूमिकेमुळे देदिप्यमान असं यश आम्हाला मिळालं आहे.
  8. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात 'बीबीसी मराठी'च्या मंचावर...

    एकनाथ शिंदे
  9. जयंत पाटील स्वत:ला पुढील काही वर्षांमध्ये कुठं बघतात?

    • माणूस विरोधी पक्षात बसला की त्याचं व्हीजन शॉर्ट होतं आणि सत्तेत बसला की तो पुढील पंधरा-वीस वर्षांचंही सांगू शकतो. हा प्रश्न आधी विचारला असता तर कदाचित सांगू शकलो असतो.
    • आता विरोधात आहोत, ते काम प्रामाणिकपणे करु.
    जयंत पाटील
  10. महाराष्ट्रातील बिघडलेल्या सामाजिक सलोख्याबाबत जयंत पाटील म्हणाले की....

    • जगात काय सुरुये? सुनीता विल्यम्सला परत आणण्याच्या गोष्टीकडं जग पाहतंय. एआय, ग्रॉक यावर चर्चा सुरु आहे. उडणाऱ्या गाड्यांवर प्रयोग सुरु आहेत.
    • एकीकडे हे सुरु आहे आणि आपण कबर खोदायच्या मागे लागलो आहोत.
    • मी इतिहासाला विसरा, असं म्हणत नाहीये.
    • औरंगजेबाला मराठी भूमीमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांनी, राजाराम महाराजांनी, ताराराणींनी इथंच मूठमाती दिली. एवढा संघर्ष केला की बादशाहाला इथं मातीत घातला, याचं ही कबर प्रतीक आहे, असं आम्ही मानतो.
    • हे सगळं मतांसाठी सुरु आहे, हे सगळ्यांना कळतं.
    जयंत पाटील

    महाराष्ट्र हिंदुत्वाची प्रयोगशाळा का बनत चालला आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की,

    • फार तरुणपणी असं विष भिनवलं की, शिक्षणापेक्षा, रोजगारापेक्षा समोर सांगणारा जे सांगतोय तेच खरं, याची सवय तरुणांना लागली आहे.
    • आता तरुणांचं वाचन कमी आहे, वाचन केलं, वाचन वाढवलं, तर या सगळ्याला लोक बळी पडणार नाहीत.
    • फार वाईट पद्धतीने मराठी मन बिघडवलं जात आहे, तरुणांची मने कलुषित केलं जात आहे.
  11. कुणाल कामरा प्रकरणावर जयंत पाटील म्हणाले की...

    • कुणाल कामराबाबत तुम्ही तक्रारी करा, चौकशी करा. पण आता छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वा महात्मा फुलेंबाबत जे अपमानास्पद बोलले, त्यांच्याबद्दल सरकारनं कधीच काही केलेलं नाही.
    • मात्र, आता सध्याचे महाराष्ट्रातले महात्मे आहेत, त्यांच्याबद्दल काही बोललं की लगेच गुन्हा दाखल करता. स्टुडीओ तोडफोड करता. शेवटी, आपल्यावर टीका झाली तर सहनही करायला पाहिजे.
    जयंत पाटील
    • कुणीही आमच्याविरोदात बोलायचं नाही, असं कसं चालेल?
    • कुणी तुमच्याविरोधात बोलायचंच नाही, असं चालणार नाही. प्रतिवाद करायचा नसेल तर दुर्लक्ष करणं हाही एक उपाय आहे.
    • लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे. एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याचा प्रतिवाद करा. एखाद्याला जाऊन मारणं, तोडफोड करणं योग्य नाही.
    • समाजात वेगवेगळे प्रतिभावंत लोक असतात. त्या प्रतिभेप्रमाणे लोक टीका करतात. काही सहज तुमच्याबद्दल वर्णन केलं जातं. काही फॅक्ट्स त्यानं कवितेत घातलं आणि गाणं गायलं. पण फॅक्ट इज फॅक्ट. त्यामुळे, असं चिडणं बरोबर नाही.
  12. विरोधकांच्या कामकाजाबद्दल काय सांगाल, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले...

    • लोकसभेत यश मिळाल्यानंतर विधानसभेवेळी आमचा मोठा अपेक्षाभंग झाला. त्यानंतर दोन-तीन महिने आम्ही थोडं शांततेत घेतलं. नव्या सरकारच्या चुका व्हायला वेळ द्यावा लागतो.
    • बीड, परभणी, नागपूर या घटना घडल्या. नागपूरसारख्या घटनांना कोण प्रोत्साहन देतंय, हे जगजाहीर आहे. त्यांचेच मंत्री बाहेर जाऊन टोकाची मतं व्यक्त करतात. असं महाराष्ट्रात आधी कधीच झालेलं नव्हतं. महाराष्ट्रातलं सर्वधर्मसमभावाचं तत्त्व बिघडवण्याचं काम सुरु आहे.
    • विधानसभेमध्ये विरोधकांना बोलण्याची संधी मिळणंही महत्त्वाचं असतं. भाषणाला सुरुवात करतानाच धारेवर धरलं तर ते अडथळे आणून भाषण थांबवलं जातं. त्यामुळे, भाषण पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे सभागृहात बोलण्यापेक्षा बाहेर बोलणंच पसंत केलं जातं. सभागृहात टोकाची टीका केली तर ती सहन होत नाही. त्यामुळे, बाहेर बसलेल्यांना असं वाटतं की, फारच साध्या भाषेत टीका केली जात आहे. मात्र, एक विरुद्ध 237 अशी स्थिती तिथे असते.
    जयंत पाटील

    विरोधकांमधील तीन पक्षांमध्ये समन्वय कमी पडला आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले की,

    • त्यावेळी जागावाटप वगैरे सुरु होतं, त्यामुळे एकत्र आहोत, हे जास्त जाणवायचं. मात्र, आमच्यातलं अंडरस्टँडींग बऱ्यापैकी चांगलं आहे. तिघांच्यात फार मतभेद आहेत, असं काही नाहीये. गोंधळाची परिस्थिती नाहीये.

    विरोधक म्हणून तुमचं व्हीजन काय आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की...

    • विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवणं, ही भूमिका आमची आहे.
    • एक सशक्त विरोधक म्हणून विधानसभेत आम्ही चांगली भूमिका बजावू.
  13. लाडकी बहिण योजनेबाबत जयंत पाटील म्हणाले की...

    • लाडकी बहिण योजनेमधील अडीच कोटी लाभार्थी महिलांवरुन साठ-सत्तर हजारांवर आणायचा त्यांचा प्रयत्न दिसतोय.
    • ही निव्वळ गंभीर गोष्ट नसून ही फसवणूक आहे.
    • एकंदर अनेक आश्वासनांची पूर्तता हे सरकार करत नाहीये.निवडणूक आल्यानंतर अशा घोषणा करणं आणि लोकांची मतं मिळवण्यासाठीच या घोषणा आहेत, हे लोकांनाही कळत होतं.
    • लोकसभेच्या निकालाने यांची फारच पडझड झालेली आहे, हे लक्षात घेऊनच त्यानंतर त्यांनी वेगवेगळे निर्णय घेतले, हे लोकांना कळत होतं.
    • सत्तेचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती आहे, ही खरं म्हणजे धोक्याची आहे.तमिळनाडूमध्ये टिव्ही, कॉम्प्यूटर दिले, अशा गोष्टी चालायच्या. मात्र, महाराष्ट्र हे काही भ्रष्ट राज्य नाहीये. मात्र, त्यांना असं मिंधं करण्याचं काम योग्य नाहीये. पण तरीही ते झालं.
    जयंत पाटील
    • ज्या घरात काहीच पैसे नाहीयेत, त्यांना साडेसात हजार गेले त्यांना निश्चितच आनंद झाला असेल. मात्र, आता त्यांचे पैसे निकष लावून बंद करणं योग्य नाहीये.
    • फडणवीस 2014 ते 2019 मुख्यमंत्री होते, त्यांना अनुभव आहे. प्रश्नांची जाण आहे, समंजस आहे. स्वत:च्या कृतीची वा झालेल्या घटनांचा परिणाम काय होतो, याची जाण असलेले ते नेते आहेत. ते पुन्हा सत्तेत आलेले आहेत. त्यामुळे, अधिक व्यापक पद्धतीनं ते चांगलं काम करतील, अशी अपेक्षा आहे.
    • निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील, अशी जाहिरात केली जायची. आकडे बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. त्यामुळे, बघू आता काय...
    • दोन उपमुख्यमंत्र्यांचा कारभाराबद्दल काय सांगाल, यावर ते म्हणाले की, कारभार मुख्यमंत्र्यांचाच आहे.
  14. भाजपसोबत जाणार का, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले...

    अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या गाठी-भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही भाजपसोबत जाणार आहात का, या प्रश्नावर ते म्हणाले की,

    • एक म्हणजे मी नाराज नाहीये. दुसरं म्हणजे भेटी-गाठी या काही कामानिमित्तच होत असतात. परवाची भेट कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अनुषंगाने आमची भेट झाली. मी शरद पवार साहेबांच्या सोबतच आहे. त्यांच्यासोबत असताना मी कुठं जाणार, हा प्रश्नच उद्भवत नाही.
    • संजय राऊत यांनी केलेल्या टोलेबाजीवर ते म्हणाले की, त्यांना त्या भेटीचा तपशील माहिती नसावा. विरोधक असला तरीही आम्ही संवादाची दारे बंद करत नाही. संजय राऊत यांची नाराजीची भावना आम्ही समजू शकतो. आमची कामासाठीच भेट झाली होती. त्यामुळे, त्यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही.
    जयंत पाटील

    सरकारच्या शंभर दिवसाबाबत तुम्ही काय सांगाल?

    • शंभर दिवसात आम्ही काय करु, याचं डॉक्यूमेंट देऊ, असं महायुतीनं म्हटलं होतं. मात्र, ते अद्याप आलेलं नाही. हे पहिलं अपयश आहे.
    • हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. इतर दोन पक्षांमुळे भाजप सत्तेत आहे, असं नाहीये. मात्र, तरीही तीन पक्ष एकत्र आहेत. तिघांची मतमतांतरे सतत दिसून येतात. बऱ्याचशा कामांसाठी यांचं एकमत होत असेल, असं महाराष्ट्रातील जनतेला वाटत नाही.
    • सत्ता आल्यावर लाडकी बहिणचा हप्ता एकवीसशे करु असं म्हटलं होतं. मात्र, आता निकष लावून महिलांना वगळण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वी तुम्ही सरसकट सगळ्यांना देणार, अशी आश्वासने तुम्ही दिलीत. याचा अर्थ, तुम्ही मतांसाठीच हे पैसे दिले. आता निकष लावून या महिलांची संख्या कमी करणार, हे उघड आहे.
  15. जयंत पाटील थोड्याच वेळात 'बीबीसी मराठी'च्या मंचावर

    शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील थोड्याच वेळात 'बीबीसी मराठी'च्या मंचावर येऊन विरोधकांची भूमिका मांडणार आहेत.

    जयंत पाटील
  16. कुणाल कामराबाबत उदय सामंत म्हणतात...

    कुणाल कामरा प्रकरणावर ते म्हणाले की,

    • ज्यांनी तोडफोड केली ते भलेही शिवसैनिक असतील, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई पोलिसांनी केली आहे.
    • कालची ऍक्शनला रिऍक्शन होती. एखाद्या पृथ्वीवर वावरणाऱ्या पुरुषानं काय बोलावं, याचं भान ठेवलं पाहिजे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते बोलावं, असं कुठंही संविधानात लिहिलं नाही.
    • मोदी-शिंदे साहेबांवर त्याने टीका केली. पण आनंद महिंद्रा आणि अंबानींनी काय वाकडं केलंय? मग ज्या घाणेरड्या भाषेत त्याने टीका केलीय, त्याचं काय?
    उदय सामंत
    • कुणी काय बोलावं, यालादेखील बंधनं आहेत. कंगणा रणौतचं आणि नारायण राणेंचं घर तोडायला गेलं त्याचं काय?
    • देवेंद्रजींसारख्या माणसाला अटक करायला हे जातात, त्याचं काय?
    • आपण धुतल्या तांदळाचं असल्यासारखं भासवून टीका करणाऱ्यांनी कंगणा रणौतचं घर तोडलं होतं. त्याचं काय?
    • स्टँड-अप कॉमेडी करणाऱ्यांनी विनोद जरुर करावं, मात्र आपली पात्रता काय आहे, हेदेखील पहावं.
    • नंतर उगाच संविधान हातात घ्यायचं. ते 'भारत जोडो यात्रे'त होते.
    • ऍक्शनला रिऍक्शन झालेली असली तरीही आम्ही त्याचं समर्थन करत नाही.
  17. वाढत्या धार्मिक तणावाचा उद्योगांवर परिणाम होईल का?

    • नागपूरमध्ये असं कधीही घडलं नव्हतं. नागपूरमधील समाजकंटकांनी हे ठरवून केलेलं आहे.
    • उद्योजकांना महाराष्ट्राबाबत माहिती आहे. सरकार उद्योजकांना पाठिंबा देणारं आहे, हे त्यांना माहिती आहे.
    • अंबानींच्या घराखाली जिलेटीन ठेवणारं हे सरकार नाही.
    • धार्मिक तणाव, दंगली या गोष्टी चिंताजनक आहेत. मात्र, उद्योजकांकडून पैसे उकळण्यासाठी त्यांच्याच घराखाली जिलेटीन ठेवणं, हा जास्त गंभीर गुन्हा आहे.
    उदय सामंत
    • उद्योजकांना एमआयडीसींमध्ये खंडणी मागितली जाते. त्यामुळे, त्यांना त्रास होतो यावर ते म्हणाले की, हे सरकार उद्योजकांना सपोर्ट करणारं आहे. या घटनांमध्ये उद्योजकांनी स्वतः पुढे येऊन तक्रारी करायला हवी तर आम्ही कारवाई नक्कीच करू.
    • नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलंय, त्याची त्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे. त्यांनी संयमाचं पालन करावं, हीच विनंती आहे.
  18. बारसू-नाणारमध्ये प्रकल्प येणार आहे का?

    • बारसू-नाणार बाबत अभ्यास केला पाहिजे की राजकारणात काय घडू शकतं?
    • नाणारमध्ये प्रकल्प येणार होता, मात्र, तो रद्द झाला. त्या परिसरामध्ये रिफायनरीच होणार नाही, अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानं घेतली.
    • ज्यावेळी नाणार रद्द झालं तेव्हा लोकांना वाटलं की हा प्रकल्प होणारच नाही.
    • नाणारमधील स्थानिकांना विश्वासात घ्यावं लागेल मगच पुढे जावं लागेल.
    उदय सामंत
    • या प्रकल्पाबाबत आम्ही स्थानिकांशी संवाद करत आहोत. पण जोपर्यंत सॉईल टेस्टींगनंतर कंपनी निर्णय घेत नाही, त्याबाबतचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत हे पुढे जाणार नाही.
    • जोपर्यंत कंपनीकडून उत्तर येत नाही, तोपर्यंत मीदेखील काही वेगळं बोलू शकत नाही.
    • राजकारणासाठी नाणार नको आणि नंतर सरकारमध्ये आल्यावर व्यवहारासाठी बारसू पाहिजे ही भूमिका बेरोजगारीला खतपाणी घालणारी भूमिका आहे.
  19. बेरोजगारीच्या वाढत्या आकडेवारीवर उदय सामंत म्हणतात...

    • महाराष्ट्राची लोकसंख्या चौदा ते पंधरा कोटीवर पोचलो आहोत.
    • जे प्रोडक्ट डिग्री घेऊन बाहेर पडतंय, ते स्कील सेंटर्ड असले पाहिजेत.
    • कौशल्य विकासासाठी स्कील सेंटर तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
    • या महाराष्ट्रात आशिया खंडातलं सर्वांत मोठं इनोव्हेशन सेंटर तयार करतो आहोत.
    • या मुलांच्या अपेक्षा नुसतं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं म्हणून त्यातून पूर्ण होणाऱ्या नाहीत. लागणारं कौशल्य देण्यासाठी स्कील सेंटर उभारण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत.
    • कंपनीला लागणारं स्कील मुले शिकतील, त्यातून नोकरी मागतील, तेव्हाच ही आकडेवारी कमी होतना दिसेल.
    • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती नावाची योजना आहे. याआधी फक्त सात हजार उद्योजक निर्माण केले होते. गेल्या तीन वर्षांत आम्ही 32 हजार तयार करण्यात यश मिळवलं आहे.
    उदय सामंत
    • देशात असं कुठलंच राज्य नाहीये, जिथे बेरोजगारी नाहीये.
    • ज्यांनी अर्ध्यावर शिक्षण सोडलं आहे, त्यांचीही आकडेवारी यात आहे. याला एकच उपाय आहे की, कौशल्य विकास करणं.
    • इंडस्ट्रीला लागणारं कौशल्य असणारी मुलं तयार करणं आणि त्यातून त्यांना रोजगार मिळवून देणं, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.
  20. 'औद्योगिक समतोलासाठी सरकार प्रयत्नशील'

    उद्योग फक्त पुणे-मुंबईतच का, असा प्रश्न 'बीबीसी मराठी'च्या वाचकाने विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की,

    • औद्योगिक समतोल राज्यात सगळीकडेच राहिला पाहिजे, ही भूमिका घेऊनच आम्ही काम करत आहोत.
    • गडचिरोली हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी इतकं काम तिथं चालू केलं आहे की, तिथले नक्षलवादी बंदूका ठेवत आहेत.
    • तिथेही उद्योग गेले आहेत. मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यातही आपण प्रकल्प दिले आहेत.
    • शेवटी उद्योग आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करु शकतो. मात्र, उद्योजकच ठरवतात की उद्योग कुठे उभा केला जावा.
    उदय सामंत
    • उद्योजक आणि उद्योग स्वीकारण्यासाठी स्थानिक नागरिकांची मानसिकता व्हावी लागते.
    • सलग तीन वर्षे महाराष्ट्र क्रमांक एकला आहे.