महायुतीला राज्यभरात मिळालेला कौल पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली.
"मोदी सरकार आमच्या पाठीमागे उभे राहिले, मोठ्या प्रमाणावर केंद्राने राज्याला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं. सामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला, विकास आणि योजनांची सांगड घातली", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
"मी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो. फेसबूकवरून सरकार चालवता येत नाही. आम्ही तिघं 24 तास काम करायचो. पत्रकार परिषदेत बोलताना तुमचा पक्ष कोणता? असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून तिरकसपणे विचारलं. त्यावर राष्ट्रवादी असं उत्तर दिलं. तो नेमका कोणाचा पक्ष आहे हे जनतेने दाखवून दिलं असं शिंदे म्हणाले. त्यावर तुमचा पक्ष कोणता हेही जनतेने दाखवून दिलं असं अजित पवार म्हणाले. लाडक्या बहिणींना सावत्र भावांना चांगलाच जोडा दाखवला आहे" असंही ते म्हणाले.
'एक है तो सेफ है', हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. जनतेने त्याला मान दिला आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"मुख्यमंत्री कोण या कळीच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेण्याचा पुनरुच्चार केला. तर तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि अगदी आठवले साहेबांचाही सल्ला घेऊ", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज लागलेल्या निर्णयात गडबड आहे असं शिवसेना (उबाठा) चे नेते संजय राऊत म्हणाले होते. त्यावर “EVM चा निर्णय मान्य आहे, मान्य आहे मान्य आहे.” असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.