अमेरिका-इराण अणू करार : भारतावर काय परिणाम?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिका-इराण अणू करार : भारतावर काय परिणाम?

इराण अणू करारातून अमेरिका बाहेर पडलं आणि जगभरात ब्रेकिंग न्यूज झाली! पण ही घडामोड इतकी का महत्त्वाची आहे? आणि तिचा आपल्यावर इथे भारतात काय परिणाम होणार?

प्रमुख भूमिका

या सगळ्या प्रकरणात अनेक लोक गुंतलेत, त्यातले महत्त्वाचे लोक कोण ते आधी समजून घेऊ, मग त्यांनी काय काय केलं ते पाहू.

1. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा.

2. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप.

3. हा करार झाला तेव्हा आणि आताही इराणचे प्रमुख असलेले हसन रौहानी.

4. त्यांच्या आधीचे इराणचे प्रमुख महमूद अहमदिनेजाद.

मुद्दा काय आहे?

इराण अण्वस्त्र बनवण्यासाठी अणुऊर्जा कार्यक्रम चालवतंय असा बराच काळ आरोप होत होता. 2005 ते 2013 दरम्यान इराणचे राष्ट्रप्रमुख महमूद अहमदिनेजाद यांनी या कार्यक्रमाला आणखी वेग दिला. हा शांततामय अणू कार्यक्रम इराणचा हक्क आहे, असं ते म्हणत होते.

इराण अण्वस्त्र निर्मिती करेल असा आरोप अनेक देशांनी केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराण अण्वस्त्र निर्मिती करेल असा आरोप अनेक देशांनी केला.

पण आंतरराष्ट्रीय तपासणीला त्यांनी साफ नकार दिला. त्यामुळे अमेरिका आणि इतर राष्ट्रांचा संशय बळावत गेला आणि त्यांनी इराणवर कडक आर्थिक निर्बंध घातले.

इराण अणू करार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराण अणू करारातून अमेरिका बाहेर पडली.

2013 साली हसन रौहानी इराणचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांच्याशी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन आणि जर्मनी या महासत्तांनी वाटाघाटी केल्या आणि अखेर Joint Comprehensive Plan of Action किंवा साध्या भाषेत ‘इराण अणू करार' 2016मध्ये लागू झाला. या अंतर्गत इराणनं आश्वासन दिलं की ते अणुबाँब बनवणार नाहीत. इराणने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाहणी करण्याची परवानगी दिली. त्याबदल्यात इराणवरचे आर्थिक निर्बंध हटवण्यात आले.

इथवर सारं आलबेल होतं. पण अमेरिकेत निवडणुकांचे वारे वाहू लागले आणि डोनाल्ड ट्रंप यांनी प्रचारादरम्यान ओबामा आणि इराण करारावर जोरदार हल्ला चढवला.

“सडका, बेकार, आत्मघातकी” अशा शब्दांत त्यांनी या कराराची हेटाळणी केली. ते राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी या करारातून खरंच माघार घेतली. इराण कराराचं पालन करत नाहीये आणि यातून अमेरिकेचं नुकसान होतंय, असा ट्रंप यांचा आरोप आहे.

पुढे काय होऊ शकतं?

अमेरिका बाहेर पडली असली तरी हा करार वाचवण्यासाठी ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स प्रयत्न करत आहेत. रशिया आणि चीननेसुद्धा आपला पाठिंबा कायम राहील असं सांगितलंय.

पण इराणमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. हा करारच आता मोडीत काढा आणि अणुबाँब बनवा, अशी मागणी कट्टरवाद्यांनी राष्ट्राध्यक्ष रौहानी यांच्याकडे केली आहे.

याचा भारतावर कसा परिणाम होणार आहे?

भारत आपल्याला आवश्यक असलेल्या खनिज तेलापैकी 80% खनिजतेल म्हणजे पेट्रोल आणि डिझेल आयात करतं. इराणवरचे निर्बंध उठल्यानंतर भारताने त्यांच्याशी असलेला तेल व्यापार वाढवला. यावर्षी दोन्ही देशांनी तो आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला.

भारत-इराण तेल व्यापार

फोटो स्रोत, MONEY SHARMA/GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, भारत-इराण तेल व्यापार वाढला आहे.

पण अमेरिकेनं नवे निर्बंध लादण्याची तयारी सुरू केलीय. इतर देश यावर काय भूमिका घेतात याचा भारत-इराण संबंधांवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)