You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोरक्षकांनी म्हशी नेल्या, आता परत करेनात; साताऱ्यातील शेतकऱ्यासोबत काय घडलं?
साताऱ्यातल्या कोरेगावजवळच्या गावातील शेतकरी गुलाबराव पवार आपल्या म्हशी विक्रीसाठी पुण्याकडे घेऊन निघाले होते. पण घाटाच्या पुढे त्यांची गाडी गोरक्षकांनी अडवली. गाडीत 11 म्हशी आणि 10 रेडकू होते. या म्हशी कत्तलीसाठी जात असल्याचा संशय घेत गोरक्षकांनी गाडीतील सर्व जनावरं जप्त करून फुरसुंगीतील एका गोशाळेत नेली. चार महिने उलटून गेले तरीही या म्हशी शेतकऱ्यांना परत मिळालेल्या नाहीत.
गोरक्षकांच्या कारवाईनंतर व्यापारी शराफत बेपारी यांनी न्यायालयात
तक्रार दाखल केली होती, त्याचा आधार घेत पवार यांनी पुणे जिल्हा न्यायालयात दाद मागितली.
न्यायालयाने दोन लाख रुपयांचा दंड आणि गोशाळेचा सांभाळ खर्च भरल्यानंतर म्हशी परत देण्याचा आदेश दिला. मात्र पवार यांचा आरोप आहे की, कोर्टाच्या आदेशानंतर दंडाची रक्कम भरली, तर चाऱ्याचा खर्च घेऊनही गोशाळेने म्हशी परत देण्यास नकार दिला. त्यांनी सांगितलं की, “कोर्टाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही गोशाळा रिकामी दिसली, म्हशींचा काहीच मागमूस नव्हता.”
या प्रकरणात द्वारकाधीश गोशाळेचे सल्लागार ऋषिकेश कामटे यांनी म्हटलं की, “या म्हशी त्यांच्या ताब्यात द्यायच्या नाहीत. न्यायालयाने आदेश दिला तरी आम्ही वरच्या कोर्टात जाऊ.”
गोशाळेकडून जनावरं आजारी असल्याने किंवा चरण्यासाठी बाहेर असल्याचं सांगण्यात आलं. याचवेळी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी गोशाळेला भेट देऊन म्हशींचा ठावठिकाणा न सापडल्याचं सांगितलं.
गोरक्षकांनी मात्र या म्हशी कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असल्याचा दावा कायम ठेवला आहे. पोलिसांनी जनावरांच्या क्रूरतेच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला असून गोवंश हत्या बंदी कायद्याचा उल्लेख केला आहे. मात्र या कायद्याचा चुकीचा वापर होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. गोरक्षक आणि गोशाळा यांच्या दाव्यांमुळे शेतकऱ्यांच्या म्हशी परत मिळण्याचा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)