You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नांदेडमध्ये जातीय द्वेषातून दलित तरुणाची हत्या; प्रेयसीने सांगितला संपूर्ण घटनाक्रम - ग्राऊंड रिपोर्ट
(या घटनेतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)
नांदेड शहरातील जुना घाट (जूना गंज) परिसरात घडलेल्या एका अमानुष हत्येनं परिसर हादरून गेला आहे. प्रेमसंबंधाचा विरोध करणाऱ्या कुटुंबानं तरुणाची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर घडलेल्या घटनाक्रमानंतर उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली आहे.
नांदेड शहरातील इतवारा परिसरात राहणाऱ्या सक्षम ताटे ( वय वर्ष-20) आणि आचल मामीडवार (वय वर्षे -21) यांचे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. मात्र आचलच्या कुटुंबाला या नात्याचा तीव्र विरोध होता.
सक्षम ताटेची आणि आचलची जात वेगळी होती. सक्षम हा दलित समाजातील होता.
सक्षमची हत्या झाल्यानंतर त्याची प्रेयसी आचलने त्याच्या मृतदेहाला हळदी कुंकू लावले आणि नंतर स्वतःच्याही कपाळावर हळदी कुंकू लावून घेतले. त्यानंतर आता आपण सक्षमच्याच घरी राहणार असल्याचे तिने म्हटले.
'माझा प्रियकर मरुनही जिंकला आणि माझे आई-वडील त्याला मारुनही हरले,' असे तिने नंतर म्हटले.
'आमच्या दोघांची जात वेगळी होती त्यामुळे घरच्यांचा विरोध होता,' असे आचलने म्हटले.
आचलने माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. त्यावेळी आचलने सांगितले की "सक्षम काही काळापूर्वी तुरुंगवास भोगून बाहेर आला होता आणि त्यानंतर माझ्या कुटुंबाकडून त्याला सतत धमक्या दिल्या जात होत्या. गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आचलच्या कुटुंबाने सक्षमला जाळ्यात ओढून त्याच्यावर हल्ला केला."
आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल यांनी सक्षमवर गोळी झाडली आणि नंतर तीव्र प्रहार करून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
नांदेड पोलिसांनी सक्षमच्या हत्येप्रकरणी मामीडवार कुटुंबातील फरार असणाऱ्या आरोपींना अटक केली आहे.
- ग्राउंड रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
- शूट - किरण साकळे
- एडिट - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)