भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू, तिच्या मृत्यूला जबाबदार कोण? आई-वडिलांचा सवाल

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू, तिच्या मृत्यूला जबाबदार कोण? आई-वडिलांचा सवाल

सार्वजनिक ठिकाणांवरुन भटक्या कुत्र्यांना हटवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं नुकतेच राज्य सरकारांना दिलेत. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जालन्यात एका 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झालाय. भटक्या कुत्र्यांच्या भीतीमुळे अनेक जण रात्री घराबाहेरही निघू शकत नाहीयेत.

दीपक यांची पत्नी छठ पूजेसाठी बिहारला जाण्यासाठी निघाली, तेव्हा छोट्या मुलीनं वडिलांसोबतच राहण्याचा हट्ट केला. दीपक त्यांच्या पत्नीला रेल्वे स्टेशनला सोडून आले आणि परी त्यांच्यासोबत घरी परत आली.

दीपक सांगतात, "मी तिला साडेअकरा वाजता झोपवलं होतं. झोपेतून ती कधी उठली मला काही समजलंच नाही. सकाळी साडेसहा वाजता माझी झोप झाली, तेव्हा मी पाहिलं तर परी माझ्याजवळ नव्हती. तेव्हा मला धक्काच बसला."

पहाटे 4 च्या सुमारास परी घराचे दरवाजे उघडून बाहेर गेली. काही अंतर चालत गेल्यावर तिच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला, तिचे लचके तोडले. यात परीचा मृत्यू झाला.

भटक्या कुत्रे चावल्याच्या घटना इथे आधीही घडल्याचं, पण कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना पहिलीच असल्याचं दीपक राहतात त्या यशवंत नगरमधील रहिवासी सांगतात.

दीपक यांनी काही दिवसांपूर्वीच परीचं शेजारच्यात शाळेत ॲडमिशन घेतलं होतं. परीच्या आठवणीत दीपक आणि त्यांच्या पत्नीचे डोळे पाणावतात.

देशभरातील श्वान दंशाच्या एकूण प्रकरणांपैकी सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात घडली आहेत. पण, या परिस्थितीला जबाबादार कोण? बीबीसी मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.

रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)