गंध फुलांचा गेला उडून…

    News imageNews image
    मुघल सम्राट जहांगीरचा काळ, म्हणजेच सुमारे चारशे वर्षांपूर्वीपासून
    उत्तर प्रदेशच्या कन्नौज शहरात फुलांपासून अत्तर तयार केलं जात आहे.

    कृत्रिम अत्तरांच्या वाढत्या वापरामुळे कन्नौजमधील अत्तर उद्याेगावर संक्रांत आली आहे. अत्तरांचा हा जुना नैसर्गिक सुगंध काळाच्या उदरात हरवू्न जाण्याची भीती आहे.
    News image

    कन्नौजमध्ये आलेल्या पर्यटकाला या शहराचा मुख्य व्यवसाय कोणता असेल हे सहज ओळखता येणार नाही, इतकं सगळं बदललं आहे. पण, गजबजलेल्या रस्त्यांवर गाडया, ट्रक आणि फेरीवाल्यांच्या रहदारीतून मधूनच एखादी फुलांचे भारे असलेली हातगाडी वाट काढत निघते आणि जुन्या शहराकडे जाणाऱ्या दगडी गल्लीच्या प्रवेशद्वारात शिरते.

    वीस वर्षांपूर्वी कन्नौजमध्ये अत्तर उद्योग जोमात होता. आता 700 पैकी अवघ्या 100 डिस्टिलरी सुरू आहेत. त्यात, गुलाब, जाई आणि मेंदीच्या फुलांपासू्न अत्तर तयार केलं जातं.

    कन्नौज, उत्तर प्रदेश, भारत 

    कन्नौज, उत्तर प्रदेश, भारत 

    हातांनी खुडलेल्या चार टन गुलाबांपासून एक किलाे अत्तर तयार होतं.
    यावरून अत्तर तयार करण्याची पद्धत, त्याचं वेगळेपण, त्याच्या सुगंधाची अस्सलता याची कल्पना येते.

    सूर्याेदयापूर्वी काटेरी झुडपात फिरून गुलाबाची फुलं खुडली जातात आणि लगेचच त्याच दिवशी त्यापासून अत्तर तयार केलं जातं.

    मातीच्या मोठ्या भांड्यात, म्हणजे ‘ढेग’मध्ये, थंड पाण्यात ही फुलं टाकली जातात. मोठाल्या चुलीवर चढवून लाकडं किंवा गोवऱ्यांचा जाळ केला जातो. चार ते सहा तास पाणी उकळल्यावर तयार होणाऱ्या गरम वाफेद्वारे फुलातील अर्क शोषून घेतला जातो. ही वाफ थंड करून बांबूच्या नळीतून दुसऱ्या भांड्यात अर्क म्हणून गोळा केली जाते.

    ही सगळी प्रक्रिया किचकट आहे. ‘ढेग’ जास्त तापवूनही चालत नाही, जाळ जास्त झाला तर अत्तराच्या सुगंधात फरक पडू शकतो. त्यामुळेच जाळ किती काळ द्यायचा याचा निर्णय घेणं हे कौशल्याचं काम आहे. हे तंत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुभवातून सोपवलं जातं.

    मुन्नालाल अॅण्ड सन्स डिस्टलरीचे तरुण व्यवस्थापक वैभव पाठक यांच्या मते, अत्तराच्या मागणीत दिवसेंदिवस घट होत आहे.

    अत्तर तयार करणं खर्चिक आहे, फार थोड्या लोकांना ही गोष्ट समजते. त्यामुळे अत्तराची कदर करणारेही मोजकेच असतात .”

    चंदनाची टंचाई हे अत्तराच्या किंमती वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. चंदनाच्या तेलाचा थेट अत्तर म्हणून वापर होतोच, शिवाय, गुलाबाच्या अर्कातही ते मिसळलं जातं.

    “भारत सरकारनं चंदनाची झाडं तोडण्यावर बंदी आणली आहे, त्यामुळे चंदनाचे दर परवडेनासे झाले आहेत” असं पाठक सांगतात.

    त्यामुळेच, मुन्नालाल अॅण्ड सन्सनेही इतरांप्रमाणे पॅराफीनचा अत्तरासाठी वापर करण्यास सुरूवात केली अाहे. अर्थात, पारंपरिक अत्तराचा गंध जाणणाऱ्या ग्राहकांना ही नवीन अत्तरं रुचत नाहीत.

    ' रूह - अल - गुलाब ' अर्थात गुलाबाचा अात्मा,
    या खास अत्तरांसाठी असलेली मागणी आणखी कमी आहे.
    News image

    गुलाबाच्या अर्काचा अर्क काढून, त्यात इतर काहीही न मिसळता हे खास अत्तर तयार केलं जातं.

    “इतर कोणत्याही अत्तराशी याची तुलना नाही. हे अत्तर उत्साह वाढणारं आणि आत्मशांती देणारं आहे.” अशी या अत्तराची स्तुती मुघल सम्राट जहांगीरनं (1569-1627) त्याच्या ‘तुझुकी जहांगिरी’ या आत्मचरित्रात केली आहे.

    जहांगीर

    जहांगीर

    एक किलो रूह-अल-गुलाब अत्तर तयार करण्यासाठी, नेहमीपेक्षा दुप्पट म्हणजे आठ टन गुलाब लागतात. मुन्नालाल अॅण्ड सन्सकडे या अत्तराचा घाऊक दर एका किलोसाठी 12 लाख 60 हजार रुपये आहे.

    भारतातील काही श्रीमंत ग्राहक आजही रूह-अल-गुलाब किंवा तशी महागडी अत्तरं खरेदी करतात. पण, कन्नौजमध्ये अत्तराला सगळ्यात जास्त मागणी आहे ती तंबाखू उद्याेगाकडून. गुलाबाचा अर्क खाण्यास सुरक्षित असतो, तसंच, या अर्काचा एक थेंब मोठ्या प्रमाणातील तंबाखूला सुगंधीत करण्यासाठी पुरेसा असतो.

    भारताबाहेर या अत्तरांना अाखाती देशांमध्ये मोठी मागणी असते. ‘ढेग’मध्ये तयार झालेल्या अत्तराचं मूल्य जाणणारे आणि किंमत परवडणारे दर्दी तिथं भरपूर आहेत. 2014 मध्ये सौदी अरेबियात 1.4 अब्ज ङॉलरच्या अत्तराची उलाढाल झाली. सौदीतील प्रत्येक ग्राहक दर महिन्याला सरासरी 49,000 रूपये अत्तरावर खर्च करतो.

    “रूह - अल - गुलाब कोणीही लावलेलं असलं म्हणजे, अापण गुलाबाच्या बागेत चालत असल्यासारखं वाटतं, त्याचा सुगंध नैसर्गिक वाटतो”, असं हुसाह - अल - तामीमी या कुवैती तरुणीला वाटतं.

    भारत आणि आखातातील मुसलमानांंना ही अत्तरं भावण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, ही अत्तरं पूर्णपणे नैसर्गिक असतात, त्यात, अल्कोहोल नसल्यानं ती थेट शरीरावर लावता येतात.

    आखाती भागात, अत्तर जेवढं जुनं तेवढी त्याची किंमत जास्त होते. त्यामुळेच, लग्नात वधूला सोनं आणि धूपासोबत लाकडी कुपीत अत्तर भेट दिलं जातं.

    “माझ्या आईला लग्नाची मागणी घालण्यासाठी माझ्या वडिलांनी भारतात जाऊन सगळ्यात महागडी अत्तरं विकत आणली आणि आईला भेट दिली. त्यातील काही अत्तरं आजही माझ्या आईकडे अाहेत, मुलांच्या लग्नात त्यांना ती भेट देण्याची तिची इच्छा आहे”. असं कुवैतच्या दलाल - अल - सान यांनी सांगितलं.

    विशेष म्हणजे, पुरुषही अत्तरं वापरतात, खरंतर, अाखातात, गुलाबाचं अत्तर हे पुरुषीच मानलं जात होतं, अलिकडेच स्त्रियांनीही ते वापरण्यास सुरूवात केली.

    अरब व्यापाऱ्यांनी शतकानुशतकं धुपाच्या बदल्यात मसाले आणि अत्तरांचा व्यापार केला. 1900 च्या पुर्वाधात कुवेतमधूनच या व्यापाराची सुरुवात झाली.

    कुवैत सिटीच्या साखमध्ये 1925 साली अत्तराचं पहिलं दुकान ‘अत्याब -अल - मरशौद’ सुरू झालं. सुलेमान - अल - मरशौद यांनी ते सुरू केलं, ते वडिलांसोबत भारतात नियमित येत असत. आता त्यांचा मुलगा वलिद हे दुकान चालवतो. त्यानं आजोबांपासून भारताशी असलेले त्यांचे संंबंध आजही कायम ठेवले आहेत.

    साखमध्ये आता अत्तरांची भरपूर दुकानं आहेत. बल्गेरिया आणि तुर्कस्तानमधून येणाऱ्या गुलाबाच्या अत्तराला इथं मानाचं स्थान असलं तरी कन्नौजमधल्या रूह-अल-गुलाबचं स्थान वेगळंच आहे. अत्याब - अल - मरशौदमध्ये एक तोळा रूह - अल - गुलाबसाठी दोनशे कुवैती दिनार (सुमारे 45 हजार रुपये) इतका दर मोजावा लागतो.

    दुबईतील अत्तराचे दुकान

    दुबईतील अत्तराचे दुकान


    “पण, शुद्धतेची खात्री असल्यामुळे एवढे पैसै देण्यास ग्राहक तयार असतात. कारण अत्तर जेवढं दुर्मिळ तेवढं ते अनमोल” असं वलिद - अल - मरशौद सांगतात.

    अर्थात, कन्नौजमधून पारंपरिक अत्तरांचा, रूह - अल - गुलाबचा पुरवठा किती काळ सुरू राहील हे सांगणं कठीण आहे.

    News image

    “ढेगमध्ये तयार झालेल्या अत्तराला जवळजवळ मागणी नाहीच, सध्याच्या पिढीला आधुनिक अत्तरांमध्येच रस आहे. त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मला नवनवीन शकला लढवाव्या लागतात.” असं प्रागमती अरोमा डिस्टिलरीचे मालक पुष्पराज जैन यांचं म्हणणं आहे.

    नवीन अत्तरांसोबतच जैन यांनी ढेग मधून तयार होणाऱ्या अत्तराचं उत्पादन सुरू ठेवलं आहे. पण, कन्नौजमधल्या अत्तराच्या भवितव्याविषयी ते साशंक आहेत.

    मुन्नालाल अॅण्ड सन्स डिस्टिलरी मधील उस्मान यांना त्यांनी तयार केलेल्या अत्तराच्या गुणवत्तेविषयी पूर्ण खात्री आहे. कृत्रिम अत्तर आणि नैसर्गिक अत्तर यांच्यातला फरक सांगतांना ते मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेलं अन्न आणि चुलीवर शिजवलेलं अन्न याची तुलना करतात.

    तरीही त्यांना या उद्योगाच्या भवितव्याविषयी चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी मुलाला अधिक भरभराटीच्या व्यापार-उद्योगात लक्ष घालायला सांगितलं आहे.

    कन्नौजमधील जुना अत्तर उद्योग अस्तित्वासाठी संघर्ष करतो आहे.
    गुंतवणूक फारशी नसल्यामुळे काही डिस्टिलरींमध्ये
    व्हिक्टोरियन काळातल्या बाॅयलरचा वापर पाहायला मिळतो.
    News image
    काही ठिकाणी जुन्या मातीच्या भांड्याची दुरवस्था झालेली दिसते.
    News image
    गुलाबांचा आत्मा या परिसरात अजूनही दरवळतो आहे.
    पण हा सुगंध आणखी किती काळ तग धरेल ?

    सर्व छायाचित्रांचे अधिकार सुरक्षित

    News image