You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

पुतिन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय - झेलेन्स्की

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा आजवरचा प्रवास फक्त 10 फोटोंमध्ये

  2. व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय? युक्रेनमध्ये व्हॅक्यूम बॉम्बचा वापर होतोय का?

  3. ‘रशियाला त्यांच्या सुरक्षेची वाटणारी चिंता रास्त’

  4. रशियाचा युक्रेनवर हल्ला : आठव्या दिवशी काय घडलं?

    नमस्कार! मी अमृता दुर्वे

    युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा आजचा आठवा दिवस. आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेनमधून बाजूच्या देशांत पलायन केलंय. नाटोने युक्रेनसाठी लढाऊ विमानं पाठवावीत असं आवाहनही झेलेन्स्की यांनी केलंय.

    युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांनी एक गुगल फॉर्म भरत आपला तपशील द्यावा असं युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने म्हटलंय.

    रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याच्या 8व्या दिवसाच्या या महत्त्वाच्या घडामोडी

    आतापर्यंत काय घडलं?

    • पुतिन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच हे युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय.
    • युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची दुसरी फेरी बेलारूसमध्ये सुरू झालीय. युद्ध ताबडतोब थांबवण्यात यावं, युद्धात उद्ध्वस्त झालेल्या शहरांतून आणि गावांतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडोर उपलब्ध करून द्यावा यासारख्या मुदद्यांवर चर्चा होणार आहे.
    • रशियन फौजांनी खर्सन या युक्रेनमधल्या महत्त्वाचं बंदर असणाऱ्या शहराचा ताबा घेतलाय. रशियाने ताब्यात घेतलेलं युक्रेनमधलं हे पहिलं महत्त्वाचं शहर आहे.
    • युक्रेनच्या दक्षिणेतल्याच मारिओपोल शहरावरही रशियाने जोरदार हल्ला चढवलाय. रशियन फौजांनी वीज, अन्न, पाणी आणि हीटिंग (घर गरम ठेवणारी यंत्रणा) बंद केल्याचं मारिओपोल शहराच्या महापौरांनी म्हटलंय.
    • युक्रेनमधून रशिया युक्रेनचं लष्कर हटवेल आणि उद्दिष्टं साध्य करेल असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांच्याशी बोलताना म्हटलंय.
    • युक्रेनमधल्या सर्व भारतीय नागरिकांनी तातडीने एक गुगल फॉर्म भरावा अशी सूचना युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने दिलीय. ट्विटरवर देण्यात आलेल्या या फॉर्ममध्ये इमेल, नाव, पासपोर्ट नंबर, मोबाईल नंबर, लोकेशन यासारखी माहिती भरायची आहे.
    • युक्रेनमधून आतापर्यंत 6,200 भारतीयांना परत आणण्यात आल्याचं भारत सरकारने म्हटलंय. भारतात आज 10 फ्लाईट्सद्वारे दाखल होणाऱ्या 2,185 नागरिकांचाही यात समावेश आहे.
    • युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात - वाराणसीमध्ये भेट घेतली.
    • रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून 5.75 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी युक्रेनमधून पलायन करत शेजारच्या पोलंडमध्ये आसरा घेतलाय. हा हल्ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय.
  5. रशिया आणि युक्रेन : कोणाकडे किती लष्करी सामर्थ्य?

  6. ब्रेकिंग, पुतिन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच हे युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय - झेलेन्स्की

    नाटोने युक्रेनसाठी लढाऊ विमानं पाठवावीत असं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केलंय. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    "जर हवाई क्षेत्र बंद करण्याची ताकद तुमच्यात नसेल (युक्रेनवर नो- फ्लाय झोन लागू करण्याची) तर आम्हाला विमानं द्या," झेलेन्स्की म्हणाले.

    "देव न करो, पण जर आम्ही टिकलो नाही तर पुढचा नंबर लॅटव्हिया, लिथुएनिया आणि एस्टोनियाचा असेल," असंही झेलेन्स्कींनी म्हटलंय.

    हे सगळे देश नाटोच्या डिफेन्स अलायन्सचा हिस्सा आहेत. म्हणजेच जर रशियाने यापैकी एकावर हल्ला केला तर ते नाटोच्या सगळ्या सदस्यांसोबतचं युद्ध असेल.

    पुतिन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच हे युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय.

    "आम्ही रशियावर हल्ला करत नाही आहोत. आणि असा हल्ला करायचा आमचा बेतही नाही. तुम्हाला आमच्याकडून काय हवंय? आमची भूमी सोडून जा," झेलेन्स्की म्हणाले.

    "माझ्यासोबत चर्चेला बसा. फक्त (फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांच्यासोबतच्या बैठकीप्रमाणे) 30 मीटर दूर नको," झेलेन्स्की म्हणाले.

  7. पुतिन तुम्ही गंभीर चूक करत आहात – इमॅन्युएल मॅक्रॉन

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात थोड्यावेळापूर्वी फोनवरून चर्चा झाली. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानं आता त्यातील तपशील जारी केला आहे.

    युक्रेनवर हल्ला करून तुम्ही गंभीर चूक करत आहात, असं यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी यावेळी पुतीन यांना सांगितलं.

    तसंच यावेळी रशियाकडून कीव्हा आणि इतर शहरांतल्या नागरी वस्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत फ्रान्सने चिंता व्यक्त केलीय. पण पुतिन यांनी असे हल्ले नाकारले आहेत.

    निर्बंधांमुळे रशिया एकटा पडेल तसंच त्यांची स्थिती फार नाजुक होईल असंसुद्धा मॅक्रॉन यांनी पुतिन यांना म्हटलंय.

    मॅक्रॉन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशीसुद्धा फोनवरून चर्चा केली आहे. त्यावेळी आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण आम्ही शरण येणार नाही असं झेलेन्स्की यांनी मॅक्रॉन यांना सांगितलं आहे.

  8. ब्रेकिंग, युक्रेन आणि रशियात बेलारूसमध्ये चर्चा सुरू

    युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची दुसरी फेरी बेलारूसमध्ये सुरू झालीय.

    युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिलीय.

    युद्ध ताबडतोब थांबवण्यात यावं, युद्धात उद्ध्वस्त झालेल्या शहरांतून आणि गावांतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडोर उपलब्ध करून द्यावा यासारख्या मुदद्यांवर चर्चा होणार आहे.

  9. युद्धात अडकलेलं बालपण...

  10. रशिया युक्रेनमधलं उद्दिष्टं साध्य करेल - व्लादिमीर पुतिन

    रशिया युक्रेनमधली आपली उद्दिष्टं साध्य करेल असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांना सांगितलंय.

    रशिया युक्रेनला 'डी- मिलिटराईज' (लष्कराचं अस्तित्त्वं नसलेला) करून तटस्थ बनवेल असं पुतिन यांनी म्हटलंय.

    रशिया आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांदरम्यान फोनवरून चर्चा झाली. युक्रेनने चर्चेमध्ये दिरंगाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्याने रशियाच्या मागण्या आणखी वाढत जातील, असं पुतिन यांनी म्हटल्याचं या चर्चेच्या तपशीलांत म्हटलंय.

    हे युद्ध सुरू होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष जबाबदार असल्याचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांनी म्हटलं होतं. आपण याच्याशी सहमत नसल्याचं पुतिन यांनी आज म्हटलंय.

  11. LIVE 3 गोष्टी पॉडकास्ट: युक्रेनमध्ये आणखी एका भारतीयाचा मृत्यू कसा झाला?

  12. खारकीव्हमधल्या भारतीय नागरिकांनी 'हा' गुगल फॉर्म भरावा, दूतावासाच्या सूचना

    युक्रेनमधल्या सर्व भारतीय नागरिकांनी तातडीने एक गुगल फॉर्म भरावा अशी सूचना युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने दिलीय.

    ट्विटरवर देण्यात आलेल्या या फॉर्ममध्ये इमेल, नाव, पासपोर्ट नंबर, मोबाईल नंबर, लोकेशन यासारखी माहिती भरायची आहे.

    यापूर्वी काल भारतीय दूतावासाने नागरिकांना तातडीने खारकीव्ह सोडायला सांगितलं होतं.

    युक्रेनमधून नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारने 'ऑपरेशन गंगा' मोहीम सुरू केली आहे.

    युक्रेनमधून आतापर्यंत 6,200 भारतीयांना परत आणण्यात आल्याचं भारत सरकारने म्हटलंय. तर पुढच्या काही दिवसांत 7400 पेक्षा जास्त भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष उड्डाणं आयोजित केली जाणार आहेत.

  13. युक्रेनमधून हे लोक कुत्रे-मांजरं का घेऊन येतायत?

  14. युक्रेनमधून आजवर 6,200 नागरिकांना परत आणलं, भारत सरकारची माहिती

    युक्रेनमधून अद्याप 6,200 भारतीयांना परत आणण्यात आल्याचं भारत सरकारने म्हटलंय. भारतात आज 10 फ्लाईट्सद्वारे दाखल होणाऱ्या 2,185 नागरिकांचाही यात समावेश आहे.

    पुढच्या काही दिवसांत विशेष विमानांनी 7400 भारतीय नागरिकांना भारतात आणण्यात येण्याची अपेक्षा आहे.

    ऑपरेशन गंगा मोहिमेमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये 18 विमानं नियोजित असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं.

    पुढच्या दोन-तीन दिवसांत भारतीयांना परत आणण्यासाठी जास्तीत जास्त उड्डाण आयोजित करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं बागची यांनी सांगितलं.

    युक्रेन आणि युक्रेन शेजारच्या ज्या देशांनी भारतीय नागरिकांना आसरा दिला आणि मदत दिली, त्यांचे अरिंदम बागची यांनी आभार मानले आहेत.

  15. कीव्ह आणि खारकीव्हमध्ये कुठे पोहोचलय रशियन सैन्य, नकाशांमधून समजून घ्या

  16. पंतप्रधान मोदींनी घेतली युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांची भेट

    युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात - वाराणसीमध्ये भेट घेतली.

    या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव पंतप्रधानांना सांगितलं. ही मुलं वाराणसी आणि उत्तर प्रदेशातल्या इतर भागांत राहणारी होती.

    युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा सुरू केलंय.

    वायुदलाचाही या मोहिमेत सहभाग आहे. मोदी सरकारमधले अनेक मंत्री सध्या युक्रेन लगतच्या देशांमध्ये आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या प्रक्रियेवर ते नजर ठेवून आहेत. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या खारकीव्हमध्ये नवीन नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

    शेलिंगमध्ये नवीनचा मृत्यू झाल्याचं भारताच्या परराष्ट्र खात्याने सांगितलं होतं. कर्फ्यू उठल्यानंतर नवीन जवळच्याच दुकानात अन्नपदार्थ आणायला गेला, पण परतला नाही.

    युक्रेन भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस धरत त्यांची मानवी ढाल करत असल्याचा आरोप रशियाने केला होता. पण अशी कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचं परराष्ट्र खात्याने स्पष्ट केलं होतं.

  17. युक्रेन रशिया संघर्ष: आकाशातून हवाई हल्ले, तळघरात बाळांचा जन्म

  18. ब्रेकिंग, खर्सनमधली प्रशासकीय इमारत रशियाच्या ताब्यात

    युक्रेनच्या खर्सन शहरातल्या राज्याच्या प्रशासकीय इमारतीवर रशियाने ताबा मिळवलाय.

    रशियन सैन्याने खर्सनमधल्या विभागीय प्रशासकीय इमारतीवर पूर्ण कब्जा केल्याचं प्रशासनाचे प्रमुख हेन्नडी लहुता यांनी फेसबुकवरून सांगितलं.

    लहुता यांनी लिहीलंय, "पण आम्ही आमची जबाबदारी अजून सोडलेली नाही. मी ज्या विभागीय प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं नेतृत्त्वं करतो, ते अजूनही काम करत असून विभागातल्या स्थानिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत."

    हेन्नडी लहुता पुढे लिहीतात, "मानवता म्हणून पाठवण्यात येणाऱ्या मदतीची आम्ही वाट पाहतोय. कृपया चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि घाबरू नका."

    रशियन फौजांनी खर्सन शहराचा ताबा घेतलाय. या शहरात युक्रेनचं महत्त्वाचं बंदर आहे. खर्सन हे रशियाने ताब्यात घेतलेलं युक्रेनमधलं पहिलं मोठं शहर आहे.

  19. 5.75 लाख नागरिकांचं युक्रेनमधून पोलंडला पलायन

    रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून 5.75 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी युक्रेनमधून पलायन करत शेजारच्या पोलंडमध्ये आसरा घेतलाय.

    हा हल्ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय.

    या देशातून एकूण 40 लाखांपेक्षा जास्त लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील असा युरोपियन युनियनचा अंदाज आहे.

    पोलंडने आतापर्यंत 5.75 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना आपल्या हद्दीत घेतल्याचं पोलिश बॉर्डर गार्ड एजन्सीनने म्हटलंय.

    पोलंडमध्ये आधीपासूनच युक्रेनियन समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे युक्रेनमधून आता पलायन करणाऱ्या अनेकांनी आपल्या नातलग वा मित्र मंडळींकडे येण्याचा पर्याय निवडलेला आहे.

    ज्यांची कुठेच जायची सोय नाही, त्यांच्यासाठी पोलंडमध्ये तात्पुरते निवारे उभारण्यात आले आहेत.

  20. नमस्कार! मी अमृता दुर्वे

    बीबीसी मराठीच्या रशिया - युक्रेन संघर्षाच्या बातम्यांविषयीच्या लाईव्ह पेजवर तुमचं स्वागत. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचे अपडेट्स, बातम्या, फोटो, नकाशे आणि व्हीडिओज या पानावरून मी आणि माझे सहकारी तुमच्यापर्यंत पोहोचवू.

    जर तुम्ही आताच हे लाइव्ह पेज पाहात असाल तर या आहेत हल्ल्याच्या आजच्या आठव्या दिवसातल्या महत्त्वाच्या घडामोडी

    • युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्याचा आठवा दिवस असून देशाच्या ईशान्य व दक्षिणेस लढाई सुरू आहे. रशिया आपल्या रहिवासी भागांवर हल्ले करत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.राजधानी कीव्हबरोबर खारकीव्हवरही मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत.
    • मध्यरात्रीपासून रशियाने विविध शहरांवर न थांबता हल्ले केले असून युक्रेनचं सैन्य जोरदार प्रतिकार करत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी एका व्हिडिओत म्हटलंय.
    • शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेन सीमा ओलांडून पोलंडला पोहोचले आहेत. खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठाचे हे सर्व विद्यार्थी आहेत. सहा दिवस बंकरमध्ये राहिल्यानंतर मंगळवारी (1 मार्च) त्यांनी खारकीव्ह सोडलं.
    • खारकीव्ह आणि सुमेमधील हल्ले थांबले तर परदेशी विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट केले आहे.भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर देशांनी रशियाकडे याची मागणी करावी असं युक्रेन सरकारने म्हटले आहे.
    • युक्रेनमध्ये मानवी ढाल म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना बंधक बनवलं गेलं हा रशियाचा दावा म्हणजे खोटा प्रचार असल्याचं भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी म्हटलंय.
    • टाईम मासिकाने त्यांच्या कव्हरवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा उल्लेख केलाय. या फोटोसाठी युक्रेनच्या झेंड्याची पार्श्वभूमीसुद्धा वापरण्यात आली आहे.