You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आम्ही अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीखांच्या संपर्कात - भारतीय परराष्ट्र मंत्रालय
अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हाती सत्ता आली आहे. त्या ठिकाणी सुरू असलेल्या घडामोडींचा लेखाजोखा.
लाईव्ह कव्हरेज
सुरक्षा परिषदेत पाकिस्तान भारतावर का भडकला?
सोमवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय होते. ट्विटरवर त्यांनी लागोपाठ ट्वीट करत अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर पाकिस्तानची भूमिका मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
अशरफ घनी आणि अफगाणिस्तानातील उच्चाधिकाऱ्यांनी तालिबानच्या मुद्दयावर पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका केली होती.
आता अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आहे आणि राजधानी काबूलवर त्यांचं नियंत्रण आहे. त्यामुळे पाकिस्तान आता काय करतं यावर सगळ्यांचं लक्ष आहे.
सोमवारी पाकिस्तानच्या शांतता आणि स्थिरतेची भूमिका घेणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री रात्री भारतावर भडकले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतावर गंभीर आरोप लावले.
खरंतर सोमवारी अचानक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली.
सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी बैठकीत तालिबानला आव्हान केलं की राजकीय तडजोडी करून सध्या सुरू असलेल्या संघर्षाला विराम द्यावा आणि अफगाणिस्तानला पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा अड्डा होऊ देऊ नये.
मात्र सुरक्षा परिषदेत बोलू दिलं जात नाही या मुद्दयावर पाकिस्तान नाराज होता. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानच्या मुद्यावरच बोलवलेल्या बैठकीत पाकिस्तानला बोलायची संधी मिळाली नाही. या महिन्यात ही बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यामुळे या संपूर्ण बोलू न देण्याच्या प्रकाराला भारत दोषी असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे.
शाह मेहमूद कुरेशी यांनी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. ते लिहितात, “अफगाणिस्तानच्या मुद्दयावर पाकिस्तानला पुन्हा एकदा बोलू दिलं गेलं नाही. हे दुर्दैवी आहे. तालिबानचा फटका अफगाणिस्ताननंतर निर्विवादपणे पाकिस्तानला बसला आहे.
ते पुढे लिहितात, “या महत्त्वाच्या टप्प्यावर संयुक्त राष्ट्रासारख्या सर्वपक्षीय मंचावर भारताचं वागणं अडवणूक करणारं आणि पक्षपाती आहे. भारत या मंचाचं राजकीयकरण करत आहे. शांतता प्रस्थापित करणं हे या मंचाचा मूळ उद्देश आहे. मात्र अशावागणुकीमुळे भारताची अफगाणिस्तानबद्दल काय भूमिका आहे ते स्पष्ट दिसतं.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी मुनीर अकरम यांनीही या आरोपाचा पुनरुच्चार केला. तर दुसरीकडे भारतानेही या बैठकीत अफगाणिस्तानच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.
फेसबुकने घातली तालिबानवर बंदी
फेसबुकने तालिबानने बंदी घातली आहे. तसंच तालिबानला समर्थन देणार्या मजकुरावर फेसबुकने बंदी घातली आहे. तालिबान ही दहशतवादी संघटना असल्याचं फेसबुकचं म्हणणं आहे.
अफगाणतज्ज्ञांची एक टीम तालिबानशी संबंधित मजकूर फेसबुकवरून हटवणार आहे. गेली अनेक वर्षं तालिबान द्वेष पसरवण्यासाठी फेसबुकचा वापर करत आहे.
आता तालिबानने ताबा मिळवल्यानंतर या गटाशी निगडीत मजकुराचं काय करायचं असा मोठा प्रश्न या कंपन्यांसमोर उभा राहिला आहे.
“अमेरिकन कायद्यानुसार तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. आम्ही आमच्या धोरणानुसार त्यांच्यावर बंदी घातली आहे. याचाच अर्थ असा की तालिबान किंवा त्यांच्यातर्फे चालवण्यात येणाऱ्या, त्यांची स्तुती किंवा पाठिंबा देणाऱ्या अकाऊंटवर आम्ही बंदी घालू” असं फेसबूकच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं.
“आम्ही अफगाण तज्ज्ञांची एक टीम या कामी लागली आहे. दारी किंवा पश्तो भाषा बोलणाऱ्या या तज्ज्ञांना स्थानिक संदर्भ माहिती असतात. त्यामुळे आक्षेपार्ह मजकूर शोधण्यासाठी त्यांची मदत होईल.” असंही त्यांनी सांगितलं.
अफगाणातील वृत्तवाहिन्यांमध्ये दिसू लागल्या महिला
अफगाणिस्तानातील वृत्तवाहिनी टोलो न्यूजमध्ये पुन्हा एकदा महिला अँकर दिसू लागल्या आहेत.
रविवारी तालिबानने अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर तिथल्या न्यूज चॅनलवर महिला दिसत नव्हत्या.
अफगाणिस्तानातील काही टीव्ही चॅनलमध्ये पुरुष मागे तालिबानचा झेंडा मागे घेऊन असल्याचं फोटोही काल समोर येऊ लागले होते.
मात्र मंगळवारी टोलो न्यूजचे प्रमुख मिराका पोपल यांनी एक ट्वीट शेअर केलं. त्यात एक महिला अँकर स्टुडिओमध्ये तालिबानच्या एका सदस्याची मुलाखत घेत होती.
त्यानंतर त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला. त्यात महिला न्यूजरुममध्ये हिजाब घालून दैनंदिन बैठकीत सहभागी झाल्याचं पहायला मिळालं.
टोलो न्यूजची मुख्य कंपनी असलेल्या मोबीग्रुपचे संचालक साद मोहसीन यांनीही हे फोटो ट्विट केले आहेत. त्याचबरोबर एक महिला रस्त्यावरून वार्तांकन करत असल्याचा फोटोही त्यांनी ट्विट केला आहे.
अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वाढल्यानंतर महिलांच्या स्थितीविषी मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण तालिबान कट्टर इस्लामचा समर्थक आहे आणि त्यानुसार महिलांवर निर्बंध असावे असं त्यांना वाटतं.
20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी महिलांवर निर्बंध घातले होते.आताही काबूलमध्ये दुकानात महिलांचे पोस्टर हटवले जात आहे त्यामुळे तिथे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण आहे.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं. तालिबानने ताबा मिळवल्यानंतर काबुलमधील सैरभैर झाल्याचं पहायला मिळालं. मिळेल त्या वाटेने लोक विमानतळावर जायला निघाले. अगदी उड्डाण घेत असलेल्या विमानावरही काही लोकांनी चढण्याचा प्रयत्न केला. विमानतळावर झालेल्या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही गोंधळाची स्थिती दिवसभर होती. अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांनी परत आणण्याचे प्रयत्न चालू ठेवलेत. भारतानेही तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं.
दुसरीकडे सौदी अरेबियाने आपले राजदूत माघारी बोलावले आहे. 1996 मध्ये अफगाणात तालिबानप्रणित प्रशासनाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये सौदी अरेबियाचा समावेश होता हे उल्लेखनीय. अफगाणिस्तानातील या घडामोडींवर भाष्य करताना तालिबान बरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यास इच्छुक असल्याचं चीनने सांगितलं.
तालिबानने ताबा मिळवल्यानंतर काबुलमधील लोक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुढे काय होईल कोणालाचा माहिती नाही. त्यामुळे अनिश्चितता, असुरक्षितता आणि मायदेशी जाण्याची आस या अवस्थेत अफगाण नागरिक जगत आहेत. अफगाणिस्तानच्या स्थितीचे पडसाद संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेतही उमटले.
अफगाणिस्तानात होणाऱ्या सर्व घडामोडींविषयी आम्ही तुम्हाला माहिती देत राहुच. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला, फेसबुक, ट्विटर, पेजला भेट द्या. आमचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.
तालिबानला संयमाने वागण्याचा संयुक्त राष्ट्र सचिवांचा सल्ला
लोकांचे जीव वाचवण्यासाठी तालिबानला संयमाने वागण्याचा सल्ला संयुक्त राष्ट्रांच्या सचिवांनी दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना अँटोनिओ गट्रेस म्हणाले, “संपूर्ण देशातून मानवी हक्कांची पायमल्ली होणाऱ्या अनेक घटना कानावर आल्या आहेत. विशेषत: अफगाणिस्तानातील स्त्रिया आणि मुलींच्या हक्कांची होत असलेली पायमल्ली अधिक चिंताजनक आहे. आपण अफगाण लोकांना वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही असं ते म्हणाले.
सुरक्षा परिषदेकडं असलेली सर्व आयुधं वापरून अफगाणिस्तानात पुन्हा एकदा मानवी हक्क परत मिळवून देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
काबूल विमानतळावरून सर्व प्रकारची उड्डाणं स्थगित.
काबुल विमानतळावरील सर्व नागरी आणि सैनिकी विमानांची उड्डाणं अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचं पँटागॉनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. ती कधी सुरू होतील हे सांगणंही कठीण असल्याचं सांगण्यात आलं. अमेरिकी सैन्य सध्या विमानतलाची सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहे.
तालिबान आल्यानंतर काबूलमध्ये गोंधळाची स्थिती
काबूलहून परतलेल्या एअर इंडियाच्या विमानाची गोष्ट
अफगाणातील भारतीयांना सरकार परत आणणार- परराष्ट्र मंत्रालय
अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की काबुलची परिस्थिती गेल्या काही दिवसापासून बिघडली आणि तिथे वेगवान घडामोडी होत आहेत.
ते म्हणाले, “अफगाणिस्तानमधील घडामोडींवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. तिथे असलेल्या नागरिकांसाठी आम्ही वारंवार मार्गदर्शक सूचना जारी करत आहोत. आम्ही त्यांना लवकरात लवकर परतण्याचं आवाहन केलं आहे. आणखी काही भारतीय मायदेशी परतू इच्छितात आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.”
“आम्ही अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीखांच्या संपर्कात आहोत. त्यापैकी जे भारतात येऊ इच्छितात त्यांना आणण्यासाठी आम्ही मदत करू. तिथे अनेक अफगाण लोक असेही आहे ज्यांच्या शिक्षणात आणि एकूणच विकासात आम्ही सहभाग घेतला आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.”
“काबुलमधील उड्डाण सेवा स्थगित केल्या आहेत. त्यामुळे लोकांना परत आणण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. विमानं पूर्ववत सुरू होण्याची आम्ही वाट पाहत आहोत.”
सौदी अरेबियाचे राजदूत माघारी
सौदी अरेबियाचे सर्व राजदूत माघारी परतले.
सौदी अरेबियाची शासकीय वृत्तसंस्था सौदी प्रेस एजंसी नुसार परराष्ट्र मंत्रालयाने रविवारीच काबूलहून त्यांच्या दुतावासातील सर्व राजदुतांना बाहेर काढण्याची घोषणा केली होती.
अफगाणिस्तानातील अस्थिर परिस्थिती पाहता सौदी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचं वृत्तसंस्थेने स्पष्ट केलं.
1996 मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सरकारला मान्यता देणाऱ्या देशात सौदीचाही समावेश होता. याशिवाय पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीनेही तालिबानला मान्यता दिली होती.
राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी अफगाणिस्तानातून असे पळाले
अफगाणिस्तानचं विमान उझबेकिस्तानमध्ये दुर्घटनाग्रस्त
अफगाणिस्तानच्या सैन्याचं एक विमान उझबेकिस्तानच्या सीमेवर दुर्घटनाग्रस्त झाल्याचं उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं.
उझबेकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनिसार अफगाणिस्तानच्या सीमेवर लागून असलेल्या उझबेकिस्तानच्या सुर्खोडारयो प्रांतात रविवारी ही घटना घडली.
AFP वृत्तसंस्थेच्या हवाल्याने उझबेकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते बाखरोम जुल्फिकारोव म्हणाले, “हे विमान उझबेकिस्तानची सीमा ओलांडून आलं आहे. या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.”
काबुल : बेसूर रस्ते, दहशत, आणि मायदेशाची आस
बीबीसीचे पत्रकार मलिक मुदासिर अफगाणिस्तानात आहे. सध्या तिथे काय परिस्थिती आहे ते त्यांच्या नजरेतून पाहूया
सगळीकडे फक्त तालिबानीच दिसत आहेत. विशेषत: तपासणी नाक्यांवर. तिथे आधी पोलीस असायचे. आज शहरात अजिबात गोंधळाची स्थिती नाही. तालिबान वाहनांची झडती घेत होते, वाहतूक नियंत्रण करत होते. पोलीस आणि सैन्यांच्या गाड्यांची ते विशेष तपासणी करत होते. त्यांनी या सगळ्या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत आणि त्यांचा वापरही सुरू केला आहे.
शहरात आयुष्य पूर्ववत आहे. वाहतूक विरळ आहे. बहुतांश दुकानं बंद आहेत. सगळीकडे संताप उफाळून येत असताना स्थानिक नागरिक कालपेक्षा शांत दिसत आहेत.
मी रस्त्यावर काही बायकांना पाहिलं. त्यांनी मास्क आणि बुरखा घातला होता. त्या रस्त्यावर चालत होत्या. तालिबान्यांना याविषयी काही अडचण दिसली नाही.
मी ज्या हॉटेलमध्ये राहतो तिथे सतत संगीत सुरू असतं. आता ते पूर्णपणे बंद झालं आहे, रस्तेही बेसूर झाले आहेत. लोक घाबरले आहेत मात्र शहराचा गाडा सुरू आहे.
त्याचवेळी विमानतळावर भीषण परिस्थिती आहे. लहान मुलं, बायका, वृद्ध मंडळी विमानतळाकडे चालताना दिसत आहेत, ते या शहरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
विमानतळावर आलात की दारात सशस्त्र तालिबानी दिसतात. हवेत गोळीबार करून ते लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना विमानतळावर जायचं आहे ते भिंतींवरून उड्या मारून जात आहेत. अगदी विद्युतप्रवाह असलेलं तारांचं कुंपणही ओलांडून जात आहे. प्रत्येक व्यक्तीला विमानतळावर जायचं आहे.
अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चीनने मांडली भूमिका
अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवल्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावर टिप्पणी केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनियांग यांच्या मते अफगाणिस्तानच्या लोकांना त्यांच्या भविष्याचा आणि नशीबाचा निर्णय घेण्याच्या अधिकारांंचं चीन स्वागत करतंय. ते म्हणाले की चीनची अफगाणिस्तानबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे.
ते पुढे म्हणाले, “चीन अफगाणिस्तानात शांतता आणि पुर्ननिर्माणासाठी रचनात्मक भूमिका घेऊ इच्छितो. तालिबानही त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तिथे सर्वसमावेशक इस्लाम सरकारची स्थापना करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
अफगाणिस्तानातील स्थितीचा महिलांवर काय परिणाम होईल?
अफगाणिस्तानातील महिलांच्या आयुष्यावर तालिबान राजवटीचा काय परिणाम होईल याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काळजी व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यापासून ते संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटरेस अशा अनेकांनी अफगाण महिलांची चिंता वाटत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ही संपूर्ण बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अफगाण नागरिकांची केविलवाणी धडपड..
काबूल विमानतळावर अमेरिकेला जाणाऱ्या एका विमानाला अफगाणिस्तानच्या काही नागरिकांनी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. विमानाच्या धावपट्टीवरच अनेक लोक दिसत आहेत. तालिबानने काबुलवर ताबा मिळवल्यानंतर अनेक देशांच्या नागरिकांना मायदेशी परतण्याची आस लागली आहे.
अफगाण सेनेच्या विशेष कृती दलाचं आत्मसमर्पण
अफगाण सेनेच्या एका विशेष कृती दलाच्या हजारो सैनिकांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती तालिबानने एका निवेदनाद्वारे दिली.
तालिबान साठी लढणाऱ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून या दलाला घेराव घातला होता.
आम्ही काय करू? कुठे जाऊ?
फरझाना कोचाई अफगाणिस्तानात खासदार होत्या.त्यांनी काबूलच्या सद्यस्थितीचं वर्णन बीबीसीकडे केलं. लोक सध्या प्रचंड घाबरली आहेत असं त्या म्हणाल्या. “लोकांच्या मनातल्या भीतीचं मोजमाप कसं करावं हेच कळत नाही. प्रत्येकजण घाबरला आहे. सध्या जे सुरू आहे त्यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. आम्ही काय करू? कुठे जाऊ?
“सर्वजण सारख्याच परिस्थितीचा सामना करत आहे. त्यांना जीव गमवावा लागण्याची भीती आहे कारण जे काही सुरू आहे त्यावर कुणाचंच नियंत्रण नाही.”
काबुल सोडण्याचा निर्णय कठीण होता. मात्र..- अशरफ घनी
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी देश सोडून गेल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली. "राजधानी काबुल सोडण्याचा निर्णय कठीण होता. मात्र, रक्तपात रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला," असं अशरफ घनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
त्यांनी पुढे लिहिलंय की, "मी काबुलमध्ये थांबलो असतो तर झटापट झाली असती आणि त्यामुळे लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता." "आज मला एक कठीण निर्णय घ्यायचा होता की, एकतर राष्ट्रपती भवनात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सशस्त्र तालिबान्यांच्या समोर उभं राहावं किंवा ज्या देशाच्या सुरक्षेसाठी गेली 20 वर्षे आयुष्य घालवलं त्यांना सोडावं. जर यावेळी असंख्य लोक मारले गेले असते आणि काबुल शहराला उद्ध्वस्त होताना पाहावं लागलं असतं, तर 60 लाख लोकसंख्येच्या काबुल शहरात मोठं मानवी संकट उभं राहिलं असतं."
"तालिबाननं तलवार आणि बंदुकीच्या जोरावर विजय मिळवला आहे. आता देशातील लोकांचा जीवाची जबाबदारी तालिबानवर आहे," असं पुढे घनी म्हणतात. "मात्र, ते लोकांची मनं जिंकू शकत नाहीत. इतिहासात कुणालाही ताकदीच्या जोरावर हा हक्का मिळाला नाही आणि मिळणारही नाही. आता त्यांना एका ऐतिहासिक परीक्षेचा तोंड द्यावं लागेल. एकतर ते अफगाणिस्तानचं नाव आणि स्वाभिमान वाचवतील किंवा इतर क्षेत्र आणि नेटवर्क," असंही घनी म्हणाले.