You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात एकूण चार टप्प्यांमध्ये 60.68 टक्के मतदान

मुंबईच्या 6 जागा, याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, मावळ, शिर्डी, शिरूर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी आणि नाशिक या जागांवर मतदान पार पडलं.

लाईव्ह कव्हरेज

  1. चला, निरोप घेतो...!

    हुश्श! चला तर मग, याबरोबरच आमचं हे लाईव्ह कव्हरेज इथे थांबवतोय.

    तुम्हाला या सर्व अपडेट्स वाचून, हा नवा फॉर्मॅट पाहून कसं वाटलं, आम्हाला आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर नक्की कळवा.

    आणि हो, लोकसभा निवडणुकीच्याच नव्हे तर इतरही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी आमच्या या पेजेसला नक्की भेट द्या -

    • फेसबुक
    • ट्विटर
    • युट्यूब
    • इन्स्टाग्राम

    सर्व महत्त्वाच्या तसंच रंजक बातम्यांचा ओघ सतत सुरूच राहणार आहे. धन्यवाद.

  2. कसं पार पडलं चौथ्या टप्प्यातलं मतदान

    कसं पार पडलं चौथ्या टप्प्यातलं मतदान? सांगत आहेत बीबीसी विश्वमध्ये मुंबईहून आमचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर.

    याबरोबरच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करत आहेत बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित.

  3. उत्तर मुंबई मतदारसंघात चुरस वाढली

    2014च्या तुलनेत मुंबईतली सगळ्यांत मोठी मतदानातली वाढ उत्तर मुंबईत नोंदवली गेली. इथे सुमारे 6-7 टक्के मतदान वाढलं.

    त्यामुळे काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्यातली चुरस वाढली आहे.

  4. सिनेतारकांनी चमचमणारं मुंबईचं मतदान

    मुंबईची निवडणूक म्हटलं की बॉलिवुडचे अनेक तारेतारका एकतर रिंगणात असतात किंवा मतदानकेंद्रांबाहेरच्या रांगेत.

    यंदाही उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याने बॉलिवुडची बरीच चर्चा झाली. तर देशभरात सनी देओल, हेमा मालिनी यांच्यासारखे चेहरे निवडणूक लढवत आहेत.

    त्यावरच बीबीसीचे कार्टुनिस्ट किर्तीश यांच्या कुंचल्यातून तयार झालेलं हे कार्टून.

  5. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी 57 टक्के मतदान, चार टप्प्यांमध्ये मतदानाची एकूण टक्केवारी 2014 इतकीच

    महाराष्ट्रात आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील 17 जागांसाठी 57 टक्के मतदान झालं. यासह महाराष्ट्रात लोकसभेच्या चारही टप्प्यांमध्ये आतापर्यंत 60.68 टक्के मतदान झालं आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी ही माहिती दिली.

    राज्यातील एकूण मतदारांची संख्या 8 कोटी 85 लाख आहे. त्यापैकी 5 कोटी 37 लाख मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.

    मतदानाची आकडेवारी 2014 मध्ये झालेल्या मतदानाइतकीच आहे.

  6. देशभरात 71 जागांसाठी 62.50 टक्के मतदान

    चौथ्या टप्प्यातील 71 जागांसाठी रात्री आठपर्यंत 62.50 टक्के मतदान झालं आहे. मतदानाच्या टक्केवारीचा हा आकडा अंतरिम आहे.

    निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 55.85 टक्के मतदान झालं आहे.

    पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 76.66 टक्के मतदान झालंय. राजस्थानमध्ये 67.42 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 66.68 टक्के, ओडिशामध्ये 64.05, झारखंडमध्ये 63.77 टक्के मतदान झालं.

  7. महाराष्ट्रात पाचपर्यंत 52.07 टक्के मतदान

    महाराष्ट्रात लोकसभेच्या 17 जागांसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52.07 टक्के मतदान झालं. 17 पैकी 12 ठिकाणी 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. नंदुरबारमध्ये 62.44 टक्के, दिंडोरीमध्ये 58.20 टक्के, शिर्डीमध्ये 56.19 टक्के मतदान झालं.

    मुंबईच्या सहा जागांपैकी उत्तर मुंबई मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 54.72 टक्के मतदान झालं. ईशान्य मुंबईमध्ये 52.30 तर दक्षिण मध्य मुंबईमध्ये 51.53 टक्के मतदान झालं.

  8. मुकेश अंबांनींचं सहकुटुंब मतदान

    रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कुटुंबासह पेडर रोडवरील सेंट थेरेसा हायस्कूलमध्ये मतदान केलं.

    काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी हे काँग्रेसचे उमेदवार यांना पाठिंबा देणाऱ्या एका व्हीडिओमध्ये झळकले होते. "Milind is the man for South Mumbai," असं ते त्यात बोलताना दिसतात.

    तर दुसरीकडे त्यांचे पुत्र आकाश अंबानी पंतप्रधान मोदींच्या सभांमध्ये दिसले होते, म्हणून अंबानी कुटुंब या निवडणुकीत बराच चर्चेचा विषय ठरलं आहे.

    पण खरंच मुकेश अंबानी मिलिंद देवरा यांच्यासाठी प्रचार का करत आहेत? वाचा हे सविस्तर विश्लेषण.

  9. सिनेतारकांचं मतदान

  10. देशभरात मतदानाची अंतरिम टक्केवारी

    देशभरात झालेल्या मतदानाची अंतरिम टक्केवारी निवडणूक आयोगाने जारी केली आहे.

    आतापर्यंत बंगालमध्ये सर्वाधिक 76.14 टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी म्हणजे 9.98 टक्के मतदान नोंदवण्यात आलं आहे.

    महाराष्ट्रात मतदानाचा आकडा 50 टक्के गाठता गाठता राहिला, असं सध्या तरी दिसतंय.

    अंतिम आकडेवारी यायला जरा वेळ लागू शकतो, तेव्हा हे आकडे बदलू शकतात.

  11. शाहरूख आणि गौरी खानचं मतदान

    अभिनेता शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी बांद्रा येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.

  12. मेहबुब चाचांची मतदानासाठी परवड

    मेहबूब चाचा 62 वर्षांचे आहेत. ते वडाळ्यात फर्निचर बनवायचे.

    28 वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचं काम करणं बंद झालं. आता कल्याण पूर्व भागातील कचोरे या गावात ते राहतात.

    आज ते रिक्षाने 20 रुपये देऊन भरदुपारी 12 वाजता मतदान करायला प्रबोधनकार ठाकरे विद्यालयात आले. त्यांचे मतदान दुसऱ्या मजल्यावर असल्याचं समजलं. ते कसेबसे दुसऱ्या मजल्यावर पोहोचले. मात्र तिथल्या यादीत त्यांचं नाव नव्हतं!

    निराश होऊन ते खाली उतरले. मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांचं नाव दुसऱ्याच मतदान केंद्रावर होतं. आता त्यांना 20 रुपये खर्च करून पुन्हा रिक्षाने त्या दुसऱ्या मतदान केंद्रावर जावं लागतंय.

  13. महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.03 टक्के मतदान

    दुपारून मतदानाचं प्रमाण काहीसं वाढलं. तीन वाजेपर्यंत एकूण 42.03 टक्के मतदान झालं.

    मुंबईमधील सहा जागांपैकी उत्तर मुंबईमधील मतदानाची टक्केवारी 44.65 तर ईशान्य मुंबईमधील मतदानाची टक्केवारी 43.12 इतकी आहे.

    नंदुरबारमध्ये 51.96 टक्के मतदान झालं.

    पालघरमध्ये 46.77 टक्के तर दिंडोरीमध्ये 46.13 टक्के मतदान झालं.

  14. दुबई ते मावळ - फक्त मतदानासाठी

    दुबईत नोकरी करणारे विनायक पेंडसे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खास सुट्टी घेऊन भारतात आले.

    आज मावळच्या थेरगाव येथे संचेती विद्यालयात त्यांनी मतदान केलं.

    “संविधानाने दिलेला हक्क आणि कर्तव्य सर्वांनी पार पाडायला हवं,” अस ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

  15. बच्चन कुटुंबीयांचं मतदान

    अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनी जुहूमधल्या मतदान केंद्रावर मतदान केलं.

  16. स्मृती इराणींनी केलं मतदान

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पती झुबीन इराणी यांच्यासह वर्सोव्यातील मतदान केंद्रावर मतदान केलं.

    स्मृती इराणी दुसऱ्यांदा अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी त्यांना अपयश आलं होतं, मात्र त्यांच्याकडे मोदी सरकारची अनेक केंद्रीय खाती देण्यात आली होती.

  17. सचिनसाठी यंदाचं मतदान का आहे स्पेशल?

    भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आपली पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुनसह मतदानाचा हक्क बजावला. सचिननं मतदान केल्यानंतरचा आपला फोटो ट्वीट केला.

  18. दुपारी 1 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 31.74 टक्के मतदान, नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान

    नंदुरबारमध्ये सर्वाधिक 40.5 टक्के मतदान झालं.

    त्याखालोखाल पालघरमध्ये 36.16 टक्के मतदान झालं.

    मुंबईच्या सहा जागांपैकी उत्तर मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 32.93 टक्के मतदान झालं, जिथे काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर विरुद्ध भाजपचे गोपाळ शेट्टी असा सामना रंगतोय.

  19. 'नवनवे बदल होतात ते स्वीकारावेच लागतात'

    फुलाबाई वाघमारे मुळच्या उस्मानाबादच्या.१९७२ला दुष्काळ पडला आणि त्या मुंबईला आल्या. त्या सांगतात, “लोकांची भांडी घासून दिवस काढले, पूर्वी आम्ही शिक्के मारून मतदान करायचो. आता मशिनी आल्यात. नवंनवे बदल होतात ते स्वीकारावेच लागतात.”