अमित शाह यांच्या अमरावतीतील सभेवरून वाद, बच्चू कडू शक्तिप्रदर्शनाच्या तयारीत
आजच्या ताज्या बातम्या.
थोडक्यात
- दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, 10 जणांचा मृत्यू
- सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीतील पहिला विजय मिळाला आहे.
- सांगलीत काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटलांनी आपला अर्ज परत घेतला नाही.
- सरकारच्या अधिपत्याखालील प्रसार भारतीनं डीडी न्यूज या वृत्तवाहिनीच्या लोगोचा रंग बदलून 'भगवा' केला आहे.
लाईव्ह कव्हरेज
व्हीडिओ कॅप्शन, अमित शाहांच्या सभेपूर्वी अमरावतीत बच्चू कडूंचा राडा, नेमकं काय घडलं? लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा, 21 लाख रूपये जिंका- मअंनिसचे ज्योतिषांना आव्हान

फोटो स्रोत, Getty Images
सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या विविध स्तरांवरील निवडणूक निकालांचे भाकीत प्रत्येक निवडणुकीवेळी ज्योतिषी वर्तवत असतात. अनेक राजकीय नेते देखील ह्या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबडया लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षीस जिंकण्याचे आव्हान दिले आहे.
ही माहिती डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात,सम्राट हटकर, रामभाऊ डोंगरे, मिलिंद देशमुख, प्रकाश घादगिने, विनोद वायगणकर, प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे दिली आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे.
हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणाऱ्या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषांना आहे.

फोटो स्रोत, Getty Images
काय आहे आव्हान प्रश्नावली?
या प्रश्नावलीमध्ये अंनिसने ज्योतिषांना काही प्रश्न विचारले आहेत.
- लोकसभा निवडणुकीमध्ये टी.शैलजा, नितीन गडकरी, राहुल गांधी, महुआ मलहोत्रा, कंगना राणावत यांना किती मते पडतील?
- कलकत्ता उत्तर, नालंदा, रायपूर, बारामती, आग्रा, बेल्लारी या मतदार संघातून कोण विजयी होईल?
- वाराणसी, बुलढाणा, चांदणी चौक, लडाख, वेल्लोर, भुवनेश्वर या मतदारसंघात सगळ्यात कमी मते कोणाला पडतील?
- संपूर्ण भारतात सर्वांत कमी मते कोणत्या उमेदवाराला पडतील?
- कोणत्या मतदारसंघात नोटाला जास्त मतदान होईल?
- पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्य किती उमेदवारांना मिळेल?
या प्रश्नांची अचूक उत्तरे ज्योतिषांनी देणे अपेक्षित आहे.
भविष्य कसे वर्तवले ते सांगा :
राजकीय भविष्य सांगण्यासाठी कोणती ज्योतिष पद्धत वापरली यांची माहिती ज्योतिषांनी देणे अत्यावश्यक आहे. उदा. उमेदवाराची जन्म कुंडली, हस्तरेषा शास्त्र, अंकशास्त्र, टॅरो कार्ड, राशीभविष्य, नाडी भविष्य, होरा शास्त्र, कृष्णमूर्ती पद्धत, प्राणी पक्षी यांचा वापर करून वर्तवलेले भविष्य किंवा अर्ज भरताना काढलेला मुहूर्त, प्रचाराचा काढलेला शुभ मुहूर्त, उमेदवाराच्या नावातील अद्याक्षरे.
प्रश्नावली आणि गुण पध्दत :
या प्रश्नावलीत एकूण चार प्रमुख प्रश्न असून प्रत्येक प्रश्नांच्या अंतर्गत काही उपप्रश्न आहेत. प्रत्येक योग्य उत्तरला पाच गुण देण्यात येतील. एकूण शंभर गुण अशी या प्रश्नावलीची रचना आहे.
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना ते उत्तर ज्योतिषाची कोणती पद्धत आणि कशी वापरून काढले याची सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. या माहितीसाठी अर्धे गुण असतील आणि अर्धे गुण उत्तरासाठी असतील.
ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करा!
या पार्श्वभूमीवर फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक संरक्षण कायदा लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे वर्तविलेले भविष्य खरे ठरले नाही, तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला उपलब्ध राहील. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसने दिलेले आव्हान ज्योतिषांनी वर्तविलेल्या भविष्याचा खरेपणा सिद्ध करण्याची संधी मानून स्वीकारावे, असे जाहीर आवाहन या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
सुरक्षेच्या कारणावरून बच्चू कडूंच्या अमरावतीतल्या सभेला परवानगी नाकारली

फोटो स्रोत, Getty Images
अमित शहा यांच्या सायन्स स्कोर येथील बुधवारच्या (24 एप्रिल) नियोजित सभेवरून वाद उफाळण्याचा चिन्हं आहेत.
याच मैदानातून आमदार बच्चू कडू यांचं शक्तिप्रदर्शन करणार होते, त्यासाठी आवश्यक परवानगी आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला होता.
पण सुरक्षेचं कारण देत बच्चू कडू यांच्या सभेची, शक्तिप्रदर्शनाची परवानगी नाकारली.
मैदान सोडण्यासाठी प्रशासन आमच्यावर दबाव आणत असल्याचा आरोपही आमदार कडू यांनी केला होता.
अमित शहा यांच्या सभेची परवानगी असल्याचा दावा आमदार राणा यांनी केला. कडू याना सतत चर्चेत राहायच असतं त्यामुळं ते अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
मैदानासाठी कडू आणि राणा ठाम आहेत. मात्र मैदान मिळालं नाही तर उपोषणाला बसू, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही कडू यांनी दिला होता.
जाहिरातींइतकाच माफीनामा ठळक छापलात का? रामदेव बाबांना सुप्रीम कोर्टाचा सवाल
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित प्रकरणात योग गुरू रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बालकृष्ण यांनी मंगळवारी (23 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की, त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये माफीनामा छापला आहे.
मात्र, वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेले माफीनामे हे तितकेच ठसठशीत होते का जितक्या त्यांच्या जाहिराती, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने या दोघांनाही केला.
रामदेव आणि बालकृष्ण यांना आज (23 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयासमोर हजर व्हायचं होतं.
मागील सुनावणीदरम्यान रामदेव आणि बालकृष्ण या दोघांनीही सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली होती आणि सार्वजनिकरित्या माफीनामा छापण्याचाही प्रस्ताव दिला होता.

फोटो स्रोत, ANI
जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस एहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर पतंजलि आयुर्वेद, त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आचार्य बालकृष्ण आणि सह-संस्थापक रामदेव यांच्या विरोधात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी सुनावणी सुरू आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार रामदेव आणि बालकृष्ण यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी सांगितलं की, सोमवारी (22 एप्रिल) 67 वर्तमानपत्रांत माफीनामा छापला आहे.
या प्रकरणाची पुढची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या राज्यात हनुमान चालीसा ऐकणंही गुन्हा होतो

फोटो स्रोत, ANI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना म्हटलंय की, काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणं देखील गुन्हा ठरतोय.
कर्नाटकातील एका प्रकरणाचा उल्लेख करत मोदींनी हे वक्तव्य केलं. सध्या कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. ते म्हणाले, "आज हनुमान जयंतीच्या दिवशी मला काही दिवसांपूर्वीचा एक प्रसंग आठवला. कदाचित ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली नसावी. ही बातमी पसरवणं हे माध्यमांचे काम होतं, पण तसं झालं नाही. ही बातमी काँग्रेस शासित कर्नाटकातील आहे."
पंतप्रधान मोदी म्हणाले, "काही दिवसांपूर्वी एक दुकानदार त्याच्या दुकानात बसून हनुमान चालीसा ऐकत होता. हनुमान चालीसा ऐकत असल्यामुळे त्याला खूप मारहाण झाली."
"काँग्रेसच्या कर्नाटक सरकारचं काम बघा. एक छोटासा गरीब माणूस, जो भक्तिभावाने हनुमान चालीसा ऐकतोय हनुमानजींचं स्मरण करतोय, त्याला मारहाण करण्यात आली." "तुम्ही कल्पना करू शकता की काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणं देखील गुन्हा ठरतोय, आपली श्रद्धा जोपासणं किती कठीण झालंय."
अरविंद केजरीवाल यांना तिहार तुरुंगात दिलं इन्सुलिन

फोटो स्रोत, ANI
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पहिल्यांदाच तिहार तुरुंगात इन्सुलिन देण्यात आलं आहे.
केजरीवाल यांच्या शरीरातील वाढती साखर आणि इन्सुलिन या मुद्दांवरून आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ट्विट करून म्हटलं की,
"अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची वाढती साखर आटोक्यात आणण्यासाठी तुरुंग प्रशासनाने त्यांना इन्सुलिन दिल्याच्या बातम्या येत आहेत. एका मुख्यमंत्र्यांना इन्सुलिनसाठीही कोर्टात जावे लागलं आहे.
"भाजप आणि केंद्र सरकारचे अधिकारी म्हणतात की, सर्व कैदी समान आहेत. पण इन्सुलिनसाठी तुम्हा सगळ्यांना कोर्टात जावं लागतं का? त्यासाठी तब्बल एक आठवडा टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात वाद घालावा लागतो का?"
सौरभ भारद्वाज यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं की, "मुख्यमंत्र्यांना इन्सुलिनची गरज होती. पण केंद्र सरकारच्या अखत्यारीतील अधिकारी त्यांच्यावर जाणूनबुजून उपचार करत नव्हते. भाजपच्या मते केजरीवालांना इन्सुलिनची गरज नव्हती. मग आता तुरुंग अधिकाऱ्यांकडून हे का दिलं जात आहे?"
तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांचा हवाला देत PTI या वृत्तसंस्थेने म्हटलं की, AIIMSच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केजरीवाल यांना सोमवारी (22 एप्रिल) संध्याकाळी कमी डोसचे इन्सुलिनचे दोन युनिट देण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी सोमवारी संध्याकाळी 7 वाजता 217 होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना इन्सुलिन देण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी केजरीवाल यांनी तिहार तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून सांगितले होते की, साखरेचे प्रमाण जास्त असूनही त्यांना इन्सुलिन मिळत नाही.
अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने 21 मार्च रोजी मद्यविक्री परवाना धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती.
ते 1 एप्रिलपासून तिहार तुरुंगात आहेत.
मलेशियात दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, 10 जणांचा मृत्यू
मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची एका सरावादरम्यान आकाशातच टक्कर झाल्याने मोठा अपघात घडला आहे. हे हेलिकॉप्टर्स रॉयल मलेशियन नौदलाच्या दीक्षांत कार्यक्रमाआधी हे हेलिकॉप्टर्स सराव करत होते. तेव्हा अचानक हा प्रकार घडला.
"दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये किमान 10 क्रू मेंबर्स होते. त्या सगळ्यांचा आकाशातच दुर्दैवी मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. "दोन्ही हेलिकॉप्टर्समधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे पार्थिव लष्करी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे," असं रॉयल मलेशियान नौदलाने म्हटलं आहे. या अपघाताचं कारण शोधण्यासाठी सरकारने एका समितीची स्थापना केली आहे, असं नौदलाकडून सांगण्यात आले आहे.
स्थानिक मीडियामध्ये दिसलेल्या फुटेजनुसार, स्टेडियममध्ये उतरण्याआधीच हे दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकले. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी (23 एप्रिल) 9.30 वाजता ही घटना घडली आहे.


