इलेक्टोरल बाँड्सबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकांचं वारं महाराष्ट्रासह देशभर वाहतंय. निवडणुकांच्या घडामोडींसह इतरही अपडेट तुम्हाला इथे वाचता येतील.

थोडक्यात

  • 'तुमच्या पुत्रप्रेमामुळेच अंतिम सामना गमवावा लागला', उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका
  • सांगलीत आज चंद्रहार पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीचा मेळावा
  • धैर्यशील मोहिते पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
  • माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील लढणार
  • भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलून भारतीय खलाशांच्या सुटकेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
  • इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायल प्रत्युरादाखल हल्ला करणार असेल तर त्यात सहभागी होणार नाही, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे.
  • IPL च्या 14 एप्रिलच्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 20 धावांनी पराभव केला आहे.
  • काँग्रेसने ईशान्य दिल्ली येथून कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत भाजपच्या मनोज तिवारी यांच्याशी होणार आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या

  2. इलेक्टोरल बाँड्सबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

    नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, ANI

    एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींना विचारण्यात आलं की विरोधी पक्षांकडून इलेक्टोरल बाँड्समध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले जातायत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

    या प्रश्नाला उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, निवडणुकीत काळा पैसा वापरला जातो. हे होऊ नये यासाठी आम्ही मार्ग शोधत होतो. निवडणुकीच्या काळात 1000 आणि 2000 रुपयांच्या मोठ्या नोटा चलनात येत होत्या.

    आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. 'भाजपमध्ये आम्ही चेकद्वारे पैसे घेणार असं ठरवलं होतं. त्यामुळे व्यावसायिकांना याची भीती वाटत होती. जर सरकारला आम्ही किती देणगी दिली हे कळलं तर आमच्या अडचणी वाढतील असं व्यापाऱ्यांना वाटत होतं. पण आम्ही नियम आणले आणि चेकद्वारे पैसे घेतले.

    इलेक्टोरल बाँड्स होते, म्हणूनच पैश्यांचा मागोवा घेता आला. कोणत्या कंपनीने पैसे दिले? ते पैसे कसे दिले आणि कुठे दिले याची माहिती मिळाली. आज जे बोलत आहेत त्या सर्वांना प्रामाणिकपणे विचार केल्यावर पश्चाताप होईल."

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, "37 टक्के पैसा भाजपकडे गेला आहे आणि 63 टक्के विरोधकांकडे गेला आहे. विरोधकांना यातून जास्त पैसे मिळाले आहेत तरीही ते आमच्यावर आरोप करत आहेत."

    तामिळनाडूतील द्रमुकबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, "काँग्रेसला हा प्रश्न विचारला पाहिजे की, सनातनच्या विरोधात इतके विष ओकणाऱ्यांसोबत तुम्ही का बसला आहात?" या द्वेषातून द्रमुकचा जन्म झाला असावा.

    द्रमुकविरोधात रोष आहे आणि हा राग भाजपकडे वळवला जात आहे.

    केंद्राच्या राज्यांशी असलेल्या संबंधांच्या प्रश्नावर पीएम मोदी म्हणाले, “मी बराच काळ गुजरातचा मुख्यमंत्री आहे. केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध महत्त्वाचे का आहेत, हे मला माहीत आहे.

    मी कोणत्याही राज्याला अडचणीत येऊ देणार नाही. कोरोनाकाळाचंच उदाहरण घ्या. मी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्राइतकेच राज्यांचे योगदान आहे. मात्र, विकासासाठी राज्यांमध्ये स्पर्धा आवश्यक आहे."

    शेजारी देशांसोबतच्या संबंधांच्या प्रश्नावर पीएम मोदी म्हणाले की, शेजारी देश आमच्यासाठी प्राधान्य आहेत. शेजारी देश सुखी आहेत. असा एकही शेजारी देश नाही ज्याला आपण कोरोनामध्ये मदत केली नाही.

    नेपाळच्या भूकंपात सर्वप्रथम मदत पाठवली. श्रीलंकेतील संकटात आम्ही मदत केली आहे. आम्हाला आमच्या शेजारी देशांची प्रगती पहायची आहे.

  3. राम मंदिर, कलम 370 आणि युएपीएवर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

    नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, ANI

    एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मला दोन टप्प्यांमध्ये काम करायचं आहे. एक भाजपच्या जाहीरनाम्यात आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणं आणि दुसरं जे माझं स्वप्न आहे त्यानुसार मी काम करेन."

    मोदी म्हणाले की, "2019 च्या निवडणुकीत मी 100 दिवसांचं आश्वासन दिलं होतं. मी त्याच 100 दिवसात काश्मीरचं काम केलं. युएपीएसुद्धा 100 दिवसातच लागू केला. मी जनावरांच्या लसीकरणाची संपूर्ण मोहीम राबवत आहे. मी नियोजन करूनच पुढे जातो."

    भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेल्या गॅरंटीबद्दल बोलताना मोदी म्हणाले की, "आपल्या देशात नेते शब्द पाळत नाहीत, जबाबदारी घेत नाहीत. नेते जे बोलतात ते करत नाहीत. जीव गेला तरी शब्द पाळला पाहिजे.

    मी जनतेला दिलेल्या वचनाची जबाबदारी घेतो. जेव्हा आपण असं करतो तेंव्हा देशाला तुमच्याबाबत एक आत्मविश्वास येतो. "मी जे सांगितलं ते करून दाखवलं.

    कलम 370 हटवून काश्मीरचं नशीब बदललं. तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला. आम्हाला सत्तेतून जावं जरी लागलं तरी आम्ही हे सांगू शकू की आम्ही जे बोललो ते करून दाखवलं. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा देशाला 'मोदीकी गॅरंटी' देत असतो."

    राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेबाबत बोलताना मोदी म्हणाले की, "राम मंदिराचं राजकारण कधी झालं आणि ते कुणी केलं हे पाहिलं पाहिजे. आमचं सरकार नव्हतं तेंव्हाही हा निर्णय होऊ शकला असता. राजकीय फायद्यासाठी हा मुद्दा जिवंत ठेवला गेला. न्यायालयातही निर्णय येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले.

    राम मंदिर हे त्यांच्यासाठी (विरोधक) राजकीय शस्त्र होतं. व्होट बँक तयार करण्याचा हा एक मार्ग होता. आता काय झालं. राम मंदिर बांधलं गेलं आणि विरोधकांकडे हा मुद्दाच राहिला नाही."

    राम मंदिर हा माझ्यासाठी एखादा कार्यक्रम नव्हता. हा माझ्यासाठी गंभीर प्रश्न होता. हा 500 वर्षांचा संघर्ष होता. लाखो लोकांनी यासाठी बलिदान दिलं होतं. यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रिया करावी लागली."

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "सरकारी पैशातून राम मंदिर बांधलेलं नाहीये. सामान्य लोकांनी एक एक पैसा देऊन हे मंदिर उभं केलं आहे. लोकांच्या योगदानातून राम मंदिर बांधण्यात आलंय."

    19 एप्रिलपासून देशात मतदान सुरु होईल आणि त्याआधी पंतप्रधान मोदींची ही मुलाखत एएनआय या वृत्तसंस्थेवर प्रसारित करण्यात आली आहे.

  4. देशासमोर दोन पर्याय काँग्रेसची पन्नास-साठ वर्षं आणि आमची दहा वर्षं - मोदी

    पंतप्रधान मोदी म्हणाले मी कुणाला घाबरवायला निर्णय घेत नाही.

    एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देशातील जनतेसमोर दोन पर्याय आहेत.

    काँग्रेसने पाच-सहा दशकांमध्ये केलेलं काम आणि भाजपने मागच्या 10 वर्षांमध्ये केलेलं काम या दोन्ही पर्यायांमधून एकाची निवड त्यांना करायची आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "2024 आणि 2047 या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टींची सरमिसळ करू नये. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याला 100 वर्षेही पूर्ण होतील त्यामुळे आपल्याला पुढच्या 25 वर्षांचा विचार करावा लागेल.

    2024ची निवडणूक ही पुढच्या 5 वर्षांची वाटचाल ठरवेल. ही निवडणूक वेगळी आहे. या निवडणुकांना आपण सहज न घेता लोकशाहीचा उत्सव म्हणून ही निवडणूक साजरी केली पाहिजे.

    फक्त संविधानाच्या कक्षेत लोकशाहीचं अस्तित्व असून नये तर लोकांच्या मनात लोकशाही असायला हवी. देश चालवण्याची जबाबदारी दिल्यावर संपूर्ण लक्ष देशावरच द्यायला हवे.

    ते (विरोधक) कुटुंब मजबूत करण्यावर भर देतात. माझे संपूर्ण लक्ष देश मजबूत करण्यावर आहे. देश मजबूत झाला तर प्रत्येकाला काही ना काही मिळते. देशात काहीतरी घडतंय, असं त्यांना वाटतं.

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझे निर्णय कोणालाही घाबरवण्यासाठी नाहीत.

    पंतप्रधानांच्या सभेत मोदी वारंवार म्हणतात की "हा तर फक्त ट्रेलर आहे." या वाक्याचा अर्थ सांगताना ते म्हणाले की, "माझे निर्णय देशाच्या विकासासाठी आहेत.

    ते तरुणांसाठी आहेत. मी अजून सगळ्या गोष्टी केल्या नाहीत, अजून खूप काही करायचं आहे. प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न कसं पूर्ण होईल यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. त्याचमुळे मी म्हणतो की हा फक्त ट्रेलर आहे अजून खूप काही करायचं बाकी आहे."

    नरेंद्र मोदी

    फोटो स्रोत, ANI

  5. 'तुमच्या पुत्रप्रेमामुळेच अंतिम सामना गमवावा लागला', उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका

    मुंबईतील शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, "अमित शाहांना मला सांगायचंय की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे.

    त्यामुळे तसं पुत्रप्रेम तरी मी दाखवलेलं नाही पण आता अमित शहांकडे पक्षातलं नेमकं स्थान कोणतं आहे? कारण त्यांच्याकडे अध्यक्ष वेगळे आहेत. त्यांच्या अध्यक्षांना किती अधिकार आहेत हे अध्यक्षच सांगू शकतील.

    "मला अमित शाहांना एवढंच सांगायचं आहे की तुमच्याकडे जे चेलेचपाटे आहेत त्यांच्यात एकवाक्यता ठेवा. कारण देवेंद्र फडणवीस काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, पुन्हा येईन बोललो होतो पण मी आलो ते दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेलेचपाटेच काढतायत. त्याबद्दल बोललात तर बरं होईल."

    सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले की, "ज्या पद्धतीने खुलेआम गुंडगिरी सुरू आहे त्यावरून सध्याच्या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. यांच्यामध्ये गुन्हेगारांना रोखण्याची हिंमत नाही. यांचं राज्याकडे लक्षच नाहीये. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे."

    उद्धव ठाकरे

    फोटो स्रोत, Uddhav Thackeray/facebook

  6. यंदाच्या मान्सूनमध्ये समाधानकारक पावसाची शक्यता

    यंदा मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.

    जून ते सप्टेंबर या नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात पावसाचं प्रमाण कसं असेल याचा पहिला अंदाज हवामान खात्यानं 15 एप्रिलला एका पत्रकार परिषदेत जारी केला.

    त्यानुसार देशभरात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात आणि काश्मिरमध्ये पाऊस सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा कमी राहील.

    महाराष्ट्रात पूर्व विदर्भामध्ये सरासरीएवढा तर इतर विभागांत बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मोसमाच्या सुरुवातीपेक्षा दुसऱ्या टप्प्यात जास्त पाऊस पडेल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.

    हवामान विभागाचे मुख्य संचालक डॉ. मृत्युंजय मोहोपात्रा यांनी माहिती दिली की मान्सूनच्या पूर्वानुमानासाठी पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती, हिंद महासागरातील प्रवाहांचं तापमान (इंडियन ओशन डायपोल) आणि उत्तर गोलार्धात किती हिमवर्षा झाली याचा अंदाज घेतला जातो.

    सध्या पॅसिफिक महासागरात मध्यम स्वरुपाच्या एल निनोचा प्रभाव जाणवतो आहे. मान्सूनच्या सुरुवातीला तो पूर्णतः न्यूट्रल होईल आणि ऑगस्टच्या आसपास ला निनाचा प्रभाव जाणवू शकेल.

    तसंच यंदा सकारात्मक इंडियन ओशन डायपोल तयार होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उत्तर गोलार्धात यंदा सरासरीपेक्षा कमी बर्फवृष्टी झाली आहे.

    या तीन्ही गोष्टी मान्सूनच्या काळात भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाकडे निर्देश करतात. मान्सूनचं आगमन कधी होणं अपेक्षित आहे आणि नेमका कुठे किती पाऊस अपेक्षित आहे, याविषयीचा अंदाज मे महिन्यात हवामान विभागातर्फे जाहीर केला जाईल.

    ढगाळ वातावरण

    फोटो स्रोत, JANHAVEE MOOLE/BBC

    फोटो कॅप्शन, ढगाळ वातावरण
  7. 21 माजी न्यायधीशांचे सरन्यायाधीशांना पत्र, 'न्यायपालिकेचा अपमान' होत असल्याची तक्रार

    21 निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. न्यायपालिकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करून तिला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.

    न्यायपालिकेला अशा अनावश्यक दबावापासून दूर ठेवणं गरजेचं असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. तसंच न्यायपालिकेच्या विश्वासार्हतेबाबतही पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

    काही तत्वं राजकीय हित आणि त्यांच्या वैयक्तिक फायद्यांसाठी न्यायपालिकेवरील लोकांचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. या पत्रावर ज्या 21 न्यायाधीशांच्या सह्या आहेत, त्यात सर्वोच्च न्यायालयाचे चार माजी न्यायाधीश आणि उच्च न्यायालयांचे 17 माजी न्यायाधीश यांचा समावेश आहे.

    सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड

    दबाव, दिशाभूल करणारी माहिती आणि सार्वजनिकरित्या अपमान करून न्यायपालिकेची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पत्रात म्हटलं आहे.

    “आम्हाला प्रामुख्यानं दिशाभूल करणारी माहिती आणि न्यायपालिकेच्या विरोधात जनतेच्या भावनांबाबत चिंता आहेत. हे फक्त अनैतिकच नाही तर लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधीही आहे,” असं पत्रात म्हटलं आहे.

    पत्रावर सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश दीपक वर्मा, कृष्णा मुरारी, दिनेश माहेश्वरी, एम.आर. शाह यांच्या सह्या आहेत. त्याशिवाय हायकोर्टाच्या 17 न्यायाधीशांच्या सह्या आहेत.

  8. कन्हैया कुमारच्या उमेदवारीवर गिरीराज सिंह यांची टीका

    बिहारच्या बेगुसरायचे खासदार आणि भाजप नेते गिरीराज सिंह यांनी कन्हैया कुमारच्या ईशान्य दिल्लीच्या उमेदवारीवर भाष्य केलं आहे.

    गिरीराज सिंह केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत. कन्हैया कुमारनं बेगुसरायमध्ये गिरीराज सिंह यांच्या विरोधात 2019 मध्ये निवडणूक लढवली होती.

    2024 च्या निवडणुकीत काँग्रेसनं कन्हैया कुमारला ईशान्य दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.

    कन्हैयाच्या उमेदवारीवर बोलताना गिरीराज म्हणाले, "काँग्रेसकडे उमेदवार नाही, चेहरा नाही, ते सर्व नाकारलेल्यांसाठी तुणतुणं वाजवत आहेत. त्यांना हवं तिथून निवडणूक लढवू शकतात, पण जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी मनोज तिवारी यांचा पराभव करू शकते.”

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    कन्हैया कुमार

    फोटो स्रोत, DEBAJYOTI CHAKRABORTY/NURPHOTO VIA GETTY IMAGES

    फोटो कॅप्शन, कन्हैया कुमार

    गायक मनोज तिवारी ईशान्य दिल्लीतून भाजपचे खासदार आहेत.

    या जागेवर कन्हैया कुमारची आता मनोज तिवारीशी लढत होणार आहे.

  9. 'इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यास अमेरिका सहभागी होणार नाही'

    अमेरिका

    फोटो स्रोत, Reuters

    इस्रायलनं इराणला प्रत्युत्तर दिल्यास अमेरिका त्याला पाठिंबा देणार नाही, असा इशारा अमेरिकेनं इस्रायलला दिला आहे. व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

    शनिवारी संध्याकाळी उशिरा इराणनं इस्रायलवर 300 हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली.

    एक एप्रिल रोजी सीरियातील इराणच्या दूतावासावर इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं इराणचं म्हणणं आहे.

    इराणने डागलेली जवळपास सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे इस्त्रायलसह त्याचे मित्र राष्ट्र अमेरिका आणि ब्रिटनने हवेत पाडले.

    अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी संवाद साधताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, इस्रायलने आपल्या प्रत्युत्तरात संयमानं वागलं पाहिजं.

    अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्राध्यक्ष जो बायडन नेतन्याहू यांना 'खूप काळजीपूर्वक आणि धोरणात्मकपणे विचार करावा' असं सांगितलं आहे.

  10. महाविकास आघाडीच्या सांगलीतल्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

    सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यावर काँग्रेसनं बहिष्कार टाकला आहे.

    शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या उद्देशाने महाविकास आघाडीच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

    शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विश्वजित कदम यांनाही निमंत्रण दिलंय. मात्र, मेळाव्याला न जाण्याची भूमिका काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी जाहीर केलीय.

    विशाल पाटील

    फोटो स्रोत, Facebook

    विशाल पाटलांना सांगलीतून उमेदवारी मिळावी, अशी मागणी काँग्रेसची होती. मात्र, सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाली आणि तिथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली गेली.

    विश्वजित कदम हे तातडीच्या बैठकीसाठी नागपूरला गेले आहेत. नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नागपुरात काँग्रेसची बैठक आहे.