जगातील सर्वांत मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात अब्जाधीश महिलेला फाशीची शिक्षा
राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.
थोडक्यात
- हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात स्कूल बस उलटून पाच मुलांचा मृत्यू झाला असून अनेक मुलं जखमी झाली आहेत.
- इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्ला आणि रॉकेट लॉन्च व्हेईकल बनवणाऱ्या स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं सांगितलं आहे.
- मात्र, बैठक कधी होणार, ती भारतात होणार की अन्य कुठे? याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
- निवडणुकीआधी सगळ्या पक्षांना समान संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असतं. जर याचं उल्लंघन झाल्याचा आरोप झाला तर मात्र निवडणूक आयोगाला त्या आरोपाची चौकशी करण्याचा अधिकार असल्याचं माजी मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी स्पष्ट केलं.
- या सगळ्या मुद्द्यांवर अशोक लवासा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे.
लाईव्ह कव्हरेज
रशियाने युक्रेनचा मोठा वीज प्रकल्प केला उद्ध्वस्त

फोटो स्रोत, Reuters
रशियाने युक्रेनची राजधानी किव्ह येथील एक मोठा वीज प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे.
कीव्हसह युक्रेनच्या तीन मोठ्या प्रदेशांसाठी ट्रिपिल्या वीज प्रकल्प सर्वात मोठा वीज उत्पादक होता.
ऊर्जा कंपनी सेंटरनेर्गोने आपला वीज प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. कंपनीचे अध्यक्ष आंद्रे होटा म्हणाले, "हल्ल्यामुळे झालेला विनाश भयानक आहे."
रशिया अनेक दिवसांपासून जाणूनबुजून आणि पद्धतशीरपणे युक्रेनच्या ऊर्जा यंत्रणेला लक्ष्य करत आहे.
होटा यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (11 एप्रिल) सकाळी झालेल्या रशियन हल्ल्यात "ट्रान्सफॉर्मर, टर्बाइन, जनरेटर नष्ट झाले. या हल्ल्यांमुळे वीज प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे."
रशियाने 80 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने युक्रेनच्या वेगवेगळ्या भागांना लक्ष्य केलं.
जगातील सर्वांत मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात अब्जाधीश महिलेला फाशीची शिक्षा

फोटो स्रोत, Reuters
व्हिएतनामच्या ट्रुओंग माय लॅन यांना जगातील सर्वांत मोठ्या बँक फसवणूक प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
व्हिएतनामच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. ट्रुओंग माय लॅन यांच्यावर 11 वर्षं देशातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या सायगॉन कमर्शियल बँकेला लुटल्याचा आरोप आहे.
लॅन यांनी बँकेकडून 44 अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं होतं. वकील म्हणतात की यापैकी 27 अब्ज डॉलर्स कधीही वसूल होणार नाहीत.
व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहरात लेन राहतात. सुरुवातीच्या काळात त्या आईसोबत सौंदर्य उत्पादनं विकायच्या. 1986 मध्ये कम्युनिस्ट पक्षाने सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनंतर त्यांनी जमीन आणि मालमत्ता खरेदी करण्यास सुरुवात केली.
1990 च्या दशकात, लॅन मोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या मालकीण झाल्या. तर 2011पर्यंत त्या शहरातील एक प्रसिद्ध व्यावसायिक महिला म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
जगभरात अशा प्रकारे साजरी झाली ईद, पाहा फोटो
जगभरातील मुस्लीम बांधवांनी गुरुवारी (11 एप्रिल) ईद-उल-फित्रचा सण साजरा केला.
रमजान महिन्याच्या शेवटी ईद साजरी केली जाते. मुस्लिमांचा सर्वात मोठा सण मानला जातो.
रमजान दरम्यान, मुस्लिम संपूर्ण महिना उपवास ठेवतात आणि रमजान महिन्याच्या शेवटी ईद साजरी करतात.

फोटो स्रोत, ANI
दिल्लीतल्या जामा मशीद येथे ईद साजरा करण्यासाठी आलेल्या दोन चिमुकल्या.

फोटो स्रोत, Reuters
नायजेरियात कडुना येथे लोकांनी अशाप्रकारे उत्साहात ईद साजरी केली.

फोटो स्रोत, Reuters
पाकिस्तानच्या लाहोरमधील बादशाही मशिदीबाहेरचे ईदच्या दिवशी असं दृश्यं होतं.

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेत येमेनी कुटुंबीय ईदच्या दिवशी प्रार्थना करताना

फोटो स्रोत, Reuters
बांगलादेशातील ढाका येथे ईदची प्रार्थना झाल्यावर चिमुकल्यांनी एकमेकांनी मिठी मारली.
मुंबईतल्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे का?
व्हीडिओ कॅप्शन, मुंबई लोकसभा: काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज? वर्षा गायकवाड म्हणाल्या... मुंबईतील लोकसभा जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात बिनसलं आहे का? याविषयी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने मुंबई शहर काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्याशी केलेली ही खास बातचित.
मुलाखत - प्राजक्ता पोळ
कॅमेरा - शार्दुल कदम
उष्णतेच्या लाटेमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर परिणाम होणार?
वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर त्यांच्या सुनेचे गंभीर आरोप
वर्धा लोकसभेच्या निवडणुकीत रामदास तडस यांच्याविरोधात त्यांच्या स्नूषा पूजा तडस यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर त्या अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवणार आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि पूजा तडस यांनी नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन खासदार रामदास तडस यांच्यावर आरोप केले. पूजा तडस यांनी रामदास तडस यांच्यावर आणि संपूर्ण तडस कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

फोटो स्रोत, Facebook
पूजा तडस यांनी म्हटलं की, मोदीसाहेब म्हणतात की संपूर्ण देश हा माझा परिवार आहे. त्याच परिवारातल्या एका व्यक्तीच्या म्हणजेच रामदास तडस यांच्या प्रचारासाठी मोदीजी वर्ध्यात येणार आहेत. मी पंतप्रधान मोदींना एक विनंत करते की, मोदींनी सभेसाठी आल्यानंतर मला थोडा वेळ द्या आणि त्यांना मला न्याय द्यावा. आता मी लोकांच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी अपक्ष म्हणून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे."
पूजा तडस यांच्या आरोपांबाबत बोलताना खासदार रामदास तडस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "आता निवडणुका आल्या की सगळेजण गंभीरआरोप करत राहतील. पूजा तडस यांचं प्रकरण कोर्टात आहे. माझा मुलगा आणि ती मुलगी यांनी लग्न केल्याचं मला माहिती नाही. त्यानंतर त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांच्या विरोधात कोर्टात गेले. आता निवडणुका आल्या की हे असे आरोप होत राहतील. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
विरोधकांना हाताशी धरून आता तिने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.”
हरियाणात शाळेची बस उलटल्याने पाच मुलांचा मृत्यू

फोटो स्रोत, ANI
हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यात स्कूल बस उलटून पाच मुलांचा मृत्यू झाला असून अनेक मुलं जखमी झाली आहेत. निहाल हॉस्पिटलचे डॉक्टर रवी कौशिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 20 मुले आमच्याकडे आली, त्यापैकी चार मुलांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. तर 15 मुलं जखमी झाली आहेत."
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
डॉ. रवी कौशिक पुढे म्हणाले, “आम्ही 15 मुलांचे प्राण वाचवण्यात यशस्वी झालो आहोत. या मुलांची प्रकृती सध्या चांगली आहे. काही मुलांना चांगल्या उपचारांसाठी रेफरही करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना गावाजवळ या बसला अपघात झाला.
'निवडणुकीची प्रक्रिया विश्वासार्ह बनवणं हे आयोगासमोरचं मोठं आव्हान'

निवडणुकीआधी सगळ्या पक्षांना समान संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असतं. जर याचं उल्लंघन झाल्याचा आरोप झाला तर मात्र निवडणूक आयोगाला त्या आरोपाची चौकशी करण्याचा अधिकार असल्याचं माजी मुख्य निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी स्पष्ट केलं.
तपास यंत्रणांना निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेच्या कक्षेत आणायचे की नाही हा मोठा प्रश्न असल्याचं लवासा यांनी कबूल केलं. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त आहेत. त्याच वेळी, सर्वांच्या नजरा निवडणूक आयोगाकडे आहेत कारण मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याची संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची असते.
दरम्यान, गेल्या काही आठवड्यांमध्ये जेव्हा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि नंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली तेव्हा निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या.
त्यातच मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची बँक खाती गोठवल्याचंही समोर आलं. या घडामोडींमुळे सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करून निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना लक्ष्य करत आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांना समान संधी मिळाली पाहिजे याची दक्षता आयोग घेत आहे की नाही असा प्रश्नही निर्माण झाला. या सगळ्या मुद्द्यांवर अशोक लवासा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहे.
ही संपूर्ण मुलाखत तुम्ही इथे वाचू शकता.
महाराष्ट्राच्या कोपऱ्यातलं एक गाव जिथे नदीवर पूल नसल्यामुळे होतात गर्भपात, सर्पदंशामुळे मृत्यू
इलॉन मस्क आणि पंतप्रधानांच्या भेटीत काय चर्चा होऊ शकते?

फोटो स्रोत, ANI
इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्ला आणि रॉकेट लॉन्च व्हेईकल बनवणाऱ्या स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचं सांगितलं आहे.
सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी लिहिले की, मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास उत्सुक आहे. मात्र, बैठक कधी होणार, ती भारतात होणार की अन्य कुठे? याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने बातमी दिली आहे की, मस्क भारतातील कारखाने आणि गुंतवणुकीबाबत महत्त्वाची घोषणा करू शकतात. एजन्सीचे म्हणणे आहे की 22 एप्रिल रोजी मस्क दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटू शकतात, त्याशिवाय ते त्यांच्या दौऱ्यात भारतातील गुंतवणुकीसंदर्भात महत्त्वाच्या घोषणाही करू शकतात.
रॉयटर्सने लिहिलं की इलॉन मस्क आणि मोदी यांची शेवटची भेट जून 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाली होती. या महिन्यात भारताने आपले नवीन इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण तयार केले आहे.
या नवीन धोरणानुसार, काही मॉडेल्सवरील आयात शुल्क 100 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याबाबत बोलले गेले आहे, जर कंपनीने भारतात 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि येथे कारखानाही उभारला जाईल.
नमस्कार... बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर तुमचं स्वागत आहे. राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही इथे वाचू शकता.

