अर्धविधवा : पाकिस्तानात कैद पतीच्या प्रतीक्षेतल्या मच्छिमारांच्या बायकांची व्यथा

पश्चिम भारतातल्या दीव आणि दमणमधल्या वनकबरा गावात अमृत सोळंकी राहते. अमृतचे पती कांजी आणि आणखी सहा जणांना पाकिस्तान सरकारने जानेवारी 2017 मध्ये अटक केली.

अमृतची मुलगी नम्रता 13 वर्षांची आहे. नम्रताने जेवावं म्हणून ती सारखी तिला तिचे वडील येणार आहेत, असं सांगत राहते.

दीव-दमणच्या केंद्रशासित प्रदेशातलं हे मच्छिमारांचं गाव आहे. नवरा आता पाकिस्तानात कैद असल्याने अमृतला कुटुंबाची गुजराण करण्यासाठी व्याजाने पैसे आणावे लागले.

गुजरातच्या किनारी भागातले हे मच्छिमार नेहमीच अरबी समुद्रात मासेमारी करायला जातात. त्या वेळी भरकटून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत गेल्यामुळे त्यांना अटक केली जाते.

पाकिस्तानमधील मच्छिमारांचंही हेच होतं. पण या सगळ्यांत या मच्छिमारांच्या पत्नींची फरफट होते. त्यांच्या भाळी अर्धविधवेचं आयुष्य येतं.

दिल्ली आणि इस्लामाबादमधले संबंध तणावाचे होतात तेव्हा त्याचा सगळ्यात मोठा फटका दोन्ही बाजूंच्या मच्छिमारांना बसतो.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)