You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदींचं नेतृत्व मान्य असेल तर राणे NDAमध्ये : मुख्यमंत्री फडणवीस
काँग्रेस पक्षातून बाहेर पडून नवा पक्ष काढणाऱ्या नारायण राणेंचा सत्ताधारी आघाडीत सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीबीसी मराठीशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की राणेंचं NDAमध्ये स्वागत केलं जाईल.
राणेंनी 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'ची स्थापना केल्यानंतर हा पक्ष सत्तेत सहभागी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण याविषयी सत्ताधारी भाजपकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नव्हती.
पण आता थेट मुख्यमंत्रीच म्हणाले आहेत की नारायण राणेंना मोदींचं नेतृत्व मान्य असेल, तर त्यांचं NDAमध्ये स्वागत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुलाखतीतले ठळक मुद्दे:
- नारायण राणेंनी जर तयारी दर्शविली आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं, तर त्यांना नक्कीच एनडीएमध्ये सामाविष्ट करून घेण्यात येईल.
- एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या दुर्दैवी घटनेची जबाबदारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी स्वीकारली आहे.
- बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्रालाही होणार.
- (राज ठाकरेंचं नाव न घेता) ज्यांचं राजकीय अस्तित्व हरपलं आहे, ते राजकीय अस्तित्व शोधण्यासाठी अशा घोषणा करत आहेत. तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे.
- बुलेट ट्रेनबाबत बोलण्याआधी त्यांनी अभ्यास या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करावा.
- शिवसेना आमच्यासोबत सरकारमध्ये आहे, त्यामुळे आम्ही 'मॅरिड' आहोतच. आमचा घटस्फोट झालेला नाही.
- (शिवसेनेच्या टीकेबद्दल) प्रत्येकाचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळ असतात.
- हे सरकार पाच वर्षे चालणार आहे आणि पाच वर्ष माझ्या मुख्यमंत्रिपदाला धोका नाही.
- सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात आहेत. ते कोणाचे आहेत हे योग्य वेळी सांगू.
- ज्या वेळी या हातांची गरज लागेल ते तेव्हा बाहेर येतील आणि ते तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा लोकांचे असतील.
- एनडीएमध्ये सहभागी होण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आम्हांला मिळालेला नाही. त्यांच्या सहभागाची कोणतीही शक्यता सध्या नसली तरी ही शक्यता नाकारताही येत नाही.
- दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी आल्या ही गोष्ट खरी आहे. अण्णा हजारे
- अण्णा हजारे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. त्यांच्यात आणि नरेंद्र मोदींमध्ये संवादाचा अभाव असेल, तर तो भरून काढेन. त्यांच्याशी चर्चा करेन.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)